©️®️ सायली जोशी
"आई, मला परेश सोबत लग्न करायचं आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. आता तू आणि बाबा काय तो निर्णय द्या." मयुरी.
"अगं, मैत्री पुरतं ठीक होतं सारं. पण त्याची जात -पात सगळंच वेगळं आहे. तुला सासरी रुळायला कठीण जाईल मयुरी." आशाताई आपल्या मुलीला म्हणाल्या.
"आई, जग किती पुढं गेलं आहे! आणि तू काय असले विचार घेऊन बसलीस? आमचं एकमेकांवर प्रेम आहे, इतकं पुरेसं नाही का? शिवाय त्याच्या घरी आमचे लग्न मान्य आहे. आता केवळ तुमचीच परवानगी बाकी आहे." मयुरी.
"जग कितीही पुढे जाऊ दे. पण आम्ही इतक्या पुढारलेल्या विचारांचे नाही मयुरी. कधीतरी आई- वडिलांचं ऐकावं. त्यांना आपल्या मुलांचं बरं - वाईट नीट कळत असतं आणि नुसत्या प्रेमाने पोट भरत नाही. प्रेमापासून सुरू झालेला प्रवास संसारापर्यंत आला की मग प्रेमाची झापडं आपोआप बाजूला होतात. हे लक्षात ठेव." आशाताई क्षीण हसत म्हणाल्या.
"मयुरी, तुझा विश्वास आहे ना? तू परेश सोबत लग्न करून सुखी, समाधानी राहशील?" इतका वेळ शांत असलेले विजयराव मधेच म्हणाले.
"अहो, काय बोलता आहात?"
"आशा, जरा शांत हो. मी बोलतोय ना? रोज तोच विषय, तिच चर्चा! आज काय तो सोक्षमोक्ष लागू दे एकदाचा." विजयराव.
"हो बाबा. मी परेश सोबत असला की नेहमीच खुश असते मी." मयुरी आनंदाने म्हणाली.
"मग झालं तर. या लग्नाला माझी मान्यता आहे. पण माझी एक अट आहे."
"बाबा, आता कसली अट? मी तुमच्याकडे परवानगी मागितली हे पुरेसं नाही का? नाहीतर कधीच पळून जाऊन लग्न केलं असतं. तसंही सज्ञान आहे मी. पण ते माझ्या संस्कारात बसत नाही." मयुरी नाक मुरडत म्हणाली.
हे ऐकून आशाताई चिडल्या. "अहो, तिचं काय ऐकता? आणि मयुरी, तू काय बोलतेस ते तरी कळतं का? म्हणे पळून जाऊन लग्न केलं असतं..तितकी धमक लागते अंगात."
"बाबा, तुमची अट सांगा." मयुरी आईकडे दुर्लक्ष करत म्हणाली.
"हे लग्न होईल. पण रजिस्टर पद्धतीने! आणि एकदा का लग्न झालं की तुझ्याकडून सासरची कोणतीच तक्रार येता कामा नये. हे मान्य असेल तर पुढची बोलणी करायला काही हरकत नाही." विजयराव शांतपणे म्हणाले.
"बाबा, ही कसली अट? पण तुम्ही आमच्या लग्नाला तयार आहात हेच खूप आहे. मी बोलते परेश सोबत." मयुरी आपला फोन घेऊन आत गेली.
पण आशाताई नाराज झाल्या. 'मयुरी एकुलती एक मुलगी. एका आईने आपल्या मुलीसाठी किती स्वप्नं पाहिलेली असतात! पण आईच्या मनाचा कधी विचारच होत नाही. आई आपल्या मुलीचं चांगल व्हावं याच हेतूनेच बोलत असते ना? पण तिचे कोणीच ऐकून घेत नाही. आईने जरा विरोध केला की लेक आपल्या वडिलांकडे जाते. मग वडील लेकीच्या प्रेमापोटी तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतात.'
"आशा, सगळं चांगलं होईल या विचाराने मी मयुरीला परवानगी दिली आहे. मुलांचं सुख ते आपलं सुख. नाही का?" विजयराव आपल्या बायकोच्या मनातलं ओळखून म्हणाले आणि आशाताई नाईलाजाने या लग्नाला तयार झाल्या.
महिन्याभरात मयुरी आणि परेशचे लग्न रजिस्टर पद्धतीने पार पडले. आशाताई मनातली सल विसरून आपल्या लेकीच्या लग्नात सहभागी झाल्या.
सासरी आलेली मयुरी खूप आनंदात होती. नवं लग्न, नवीन माणसं, नवा संसार सगळं कसं छान वाटत होतं. सासरची माणसंही बरी होती. आशाताईंना समाधान वाटलं आणि आपली निवड चुकली नाही, याचं मयुरीला समाधान वाटलं.
सहा महिने कसे अगदी छान गेले. मयुरी सासरी रुळायचा प्रयत्न करत होती. पण तिच्या सासुबाईंच्या तक्रारी सुरू झाल्या.
परेश आणि मयुरी दोघेही नोकरीला जात होते त्यामुळे घरचं सगळं तिच्या सासुबाईंना पाहावं लागत होतं.
आता त्यांची अपेक्षा अशी होती की, लग्न झाल्याने मयुरीने घर सांभाळावं.
त्या आशाताईंना फोन करून आपल्या तक्रारी सांगत असत. तुमची मुलगी अशीच वागते, या घरचे रीतिरिवाज शिकून घेत नाही. मी सांगितलेलं काही काम करत नाही..वगैरे.
सुरुवातीला आशाताईंनी सारं काही ऐकून घेतलं, आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण सासुबाईंच्या तक्रारी कमी व्हायचे नाव घेईनात.
लवकरच मयुरी या साऱ्याला वैतागली. तिने परेश कडे सासुबाईंची तक्रार केली. पण परेशने हात वर केले. कारण त्याला सासू -सुनेच्या भांडणात लक्ष द्यायचे नव्हते.
"परेश, आपण वेगळे राहायचे का? तसे इथे येत जात राहू. फक्त आपला संसार वेगळा! म्हणजे मला मोकळेपणाने राहता येईल."
मयुरीच्या या बोलण्यावर परेश चिडला.
"तू जायचे तिथे जा. मी कुठेही येणार नाही." या एका वाक्याने मयुरीचा प्रश्न कायमचा निकालात निघाला. ती आपली तक्रार घेऊन माहेरी आली.
"आई, माझी निवड चुकली का गं?" माहेरी आलेली मयुरी आशाताईंना विचारत होती.
"त्याच्या घरच्या पद्धती, रूढी-परंपरा सगळचं वेगळं आहे. मला ॲडजेस्ट व्हायला अजून वेळ हवा आहे. त्यात परेश माझ्या बाजूने कधीच बोलत नाही." मयुरी नाराज होती.
"हेच आम्ही सांगत होतो मयुरी. लहानपणापासून आपण ज्या वातावरणात वाढलो, जे संस्कार आपल्यावर झाले तेच आयुष्यभर सोबत राहतात. पण आता लग्न झालं आहे म्हंटल्यावर तुला ॲडजेस्ट करून घ्यावेच लागेल. त्याला पर्याय नाही आणि घरोघरी मातीच्या चुली!
सासू -सुनेच्या कुरबुरी या चालायच्याच. त्या आपण मनावर घ्यायच्या नाहीत. एकमेकांत संवाद हवा म्हणजे अशा कुरबुरी कमी होतात. मी तुझ्या सासुबाईंना कसे समजावणार? तूच प्रेमाने त्यांना जिंकून घे म्हणजे सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातील." आशाताई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.
"तुझ्याकडून सासरची कोणतीच तक्रार येता कामा नये अशी अट घातली होती ना मी? त्याची जबाबदारीही तू घेतली होतीस.." विजयराव म्हणाले.
"हो बाबा. मी प्रयत्न करते आहे. पण जर सासु बाईंचा सूर असाच राहणार असेल तर मात्र अवघड आहे." विजयरावांचे बोलणे मधेच तोडत मयुरी म्हणाली.
"अवघड आहे म्हणजे?" आशाताईंच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह होते.
"आता वेगळं राहायचा विचार आहे की काय तुझा?" त्या आपल्या लेकीला चांगल ओळखून होत्या.
"हो. मी परेशला म्हणाले होते, वेगळं राहण्याबद्दल. मात्र तो तयार नाही आणि सासुबाई आपला हेका सोडायला तयार नाहीत. मी अशा वातावरणात कशी राहू आई? जिथं माझं कोणीच ऐकून घेत नाही." मयुरी शांतपणे म्हणाली.
हे ऐकून आशाताईंनी डोक्याला हात लावला.
"लग्न म्हणजे खेळ वाटतो की काय तुला? आज केलं आणि उद्या मोडलं! अहो, आपले संस्कार कमी पडले नाहीत तर या आजकालच्या मुलांच्या विचारसरणीत कमालीचा बदल झाला आहे. पटलं नाही तर द्या सोडून! यांच्यात सहन करण्याची क्षमताही नाही अन् सगळं कसं झटपट हवं असतं यांना.
लग्न म्हणजे केवळ दोघांचा संसार नसतो. एकत्र कुटुंबात राहता ना? मग सर्वांशी मिळून मिसळून राहावंच लागत.
ते काहीही असो, हे लग्न मोडायला माझी परवानगी कधीही नसेल. सज्ञान आहेस ना? मग सगळं निस्तरायची जबाबदारी तूच घ्यायला हवीस. नाती सुधारायची असतील तर तू पुढे व्हायला हवं."
आईचं बोलणं मनाला लागलं, तरी मयुरीला ते पटलं होतं.
'सासुने नेहमी चांगलच वागावं ही सुनेची अपेक्षा असेल तर सुनेकडून सासुचीही तिच अपेक्षा असणार ना? आई म्हणते तसे सासुबाईंशी मोकळेपणाने बोलून पाहू. काही फरक पडला तर पडला.' मयुरी आपल्या स्वभावाला मुरड घालून सासुबाईंशी बोलू लागली.
तशा सासुबाईही एक पाऊल पुढे आल्या. आता आशाताईंकडे तक्रार करण्याऐवजी त्या मयुरीशी मनमोकळेपणे बोलू लागल्या. यामुळे दोघींतले नाते सुधारले आणि घरचे वातावरणही हसते - खेळते बनले.
हळूहळू सासुबाईंच्या मदतीने मयुरीने घराच्या रीतिभाती शिकून घ्यायला सुरुवात केली आणि सासुबाईंनी तिला मनापासून साथ दिली.
इकडे आशाताई खुश होत्या.
मुलगी सासरी गेली की नाही म्हंटल तरी आईला टेन्शन येतंच. कारण माहेरच्या रीती निराळ्या अन् सासरच्या निराळ्या. आपली मुलगी सासरी ॲडजेस्ट होईपर्यंत आईला धाकधूक असतेच.
एकदा का मुलगी सासरी रुळली की आईचा जीव भांड्यात पडतो. आपल्या लेकीला सासरची ओढ वाटू लागली की आईला मुलीचं माहेरपण जपताना जो आनंद वाटतो तो शब्दात व्यक्त होणारा नसतो! नाही का?
समाप्त
©️®️ सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
