अबोल प्रीत बहरली

© सौ. प्रतिभा परांजपे




अबोलीने फोनचा अलार्म बंद केला व हळूच उठून बसली.

खरंतर आता कुठे परीक्षा संपून सुट्ट्या लागल्या होत्या, वास्तविक हे आरामात लोळायचे दिवस आले होते, फायनल परीक्षा संपली होती,कशाचीच घाई नव्हती.
पण मनाचा निश्चय झाला व तिने उठून पटापट आवरायला घेतले व मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली.

आता रोज सकाळ, संध्याकाळ फिरायचे असा मनाशी निश्चय करुन ती निघाली. पाहू याने वजनात काही फरक पडतो का ?

मनात असा विचार करून ती झपझप पावले उचलू लागली.

बाजुच्या खोलीतून रश्मिचा, तिच्या चुलत बहिणीच्या गाण्याचा आवाज बराच वेळ तिचा पाठपुरावा करत होता. 

रश्मि ठरल्याप्रमाणे रोज गाण्याचा रियाज करते, मी पण रोज वाॅकला जाईन, आई जे जे सांगते ते सर्व करायचे ती नाराज नको व्हायला, त्यायोगे तरी काही कॅलरीज आणखी बर्न होतील असा विचार करून ती मनाशी हसली.

काय करणार ती तरी ?

खरं तर अबोली दिसायला छान,गोरी गुलाबी त्वचा, पिंगट केस, काळेभोर डोळे, अतिशय हुशार पण लग्नाच्या बाजारात तिची डिमांड झिरो. कमीत कमी तिने तरी मनाचा असा समज करून घेतला होता.

शरीर सुद्धा जर असेच झिरो फिगर असते तर?

तिला क्षणभर हसू आले झिरो फिगर तर आहे….. पण मोठ्ठा झीरो.

जाऊदे झाले. काय करणार, वाढत्या वयात काहीतरी हार्मोन्स बॅलन्स बिघडला असे आई पाहणाऱ्याला सांगत असते. लहानपणी फार नाजूक होती हो ही.

नको ते विचार..., म्हणत अबोली बाहेर निघाली. सरळ वाटेने न जाता ती बागेत शिरली. 

बागेमध्ये बरीच मुलं, मुली वाॅक घेत होते. तिला पाहून कोणीतरी….. 'लगता है वजन कम करने आये है……' म्हणत हसु लागले.

समोरच ओपन जिम होते. अबोली रन पाथ वर धावू लागली. थोड्याच वेळात तिला धाप लागली, जवळच असलेल्या बेंचवर बसून ती घोटभर पाणी प्यायली व जरा दम घेवून दुसऱ्या क्रासट्रेनर वर चढली. 

दोन्ही हाताने राॅड ओढायचा प्रयत्न करू लागली पण ते काही जमेना. 

तेवढ्यात, दोन हात पुढे आले,...... 'या राॅडला असे ओढा, मग बघा… .' असा एक पुरुषी आवाज तिच्या कानावर आला व तिच्या हातावर हात देऊन त्याने राॅड पुढे मागे करत तिला दाखवले, अबोलीने मान वर करून पाहिलं एक उंच पुरा मुलगा तिला मदत करत होता .

'आता तुम्ही स्वतः करून पहा'....' म्हणता तिने राॅड पुढे मागे करून पाहिले, 'जमलं की….' मनात म्हणत 'थँक्यू…..' म्हणायसाठी तिने मागे पाहिले तर तो नव्हताच तिथे . 

कोण होता हा... मदतनीस किती शांत स्वरात समजून सांगितले, नुसते सांगितलेच नाही तर करून दाखवले.

घरी आल्यावरही अबोली त्याच्याच विचारात होती.

आता ती रोज बागेत गेल्यावर नकळतपणे त्याला शोधू लागली. एक-दोन दिवस तो दिसला नाही.

एक दिवस ती एक्सरसाइज करत असताना तो आला "अरे वाS, आता छान जमतंय की! पण मुली यावर फारशा बसत नाही 'दुसऱ्या बाजूला उभे राहून तो बोलला."

"हो कां? मग काय करावे?"

"तुम्ही कशासाठी करता त्यावर अवलंबून आहे . म्हणजे विचार चांगला आहे पण कशासाठी ?

"ते------, मी फार बेढब दिसते."

"अस बघा….. म्हणजे प्रत्येकाचा एक फिगर असतो सर्व एका साच्यात नाही बसत."

"हो…. पण आईला वाटतं माझ्यासाठी. मी स्लीम व्हावे. तिला गरज वाटते."

"तुम्ही म्हणजे, तू----- नांव काय?"

" मी अबोली."

"मी आदित्य"

'तुला….. तू म्हटलेलं चालेल ?'

'होs…. चालेल की..'

'शरीर फिट राहावे म्हणून….' ठीक,----- पण उगाच बारीक दिसायच्या शर्यतीत धावून अशक्तपणा सुद्धा नको यायला इतकं पहा. तू आहे तशी छानच आहेस.'

आदित्यचं ते बोलणं मनाला सुखावून जात होते . मन कुठेतरी त्याच्यात गुंतायला लागलं काय…? पण हे बरोबर नाही नंतर त्रास होईल या विचाराने पुढचे दोन दिवस ती पार्कमध्ये गेलीच नाही.

पण दिल के हाथों मजबूर, दोन दिवसांनी पावले आपोआप, पार्क कडे वळली . 

आजही तो नव्हता. एकीकडे मन उदास झाले तर दुसरीकडे ठीकच आहे म्हणत ती स्वतःचे समाधान करून ती वाॅक करू लागली. 

अचानक काय झाले माहित नाही ती पाय अडखळून खाली पडली. पाय मुरगळला, उठता येईना. काही टारगट मुलं तिला पडलेली पाहून 'हाथी गिर गया' म्हणत हसायला लागले.

लाज वाटून अबोलीने उठायचा प्रयत्न केला पण काही जमेना.

तितक्यात एक हात पुढं आला, तिने पाहिलं आदित्य होता तो ,त्यांनी तिला हाताचा आधार देत उभे केले, पार्क बाहेर आणून स्वतःच्या गाडीवर बसवल.

'घर कुठे आहे…..?' तिने पत्ता सांगितला. त्याने घरापर्यंत आणलं . हळूहळूआत नेले.

"अगं बाई काय झालं, कुठे पडली?" आई घाबरली.

"काही नाही, पाय मुरगळला", म्हणत अबोली खोलीत गेली.

आईने त्याला बसा म्हटलं . नको मी निघतो म्हणून तो जायला निघाला.

अबोली ने खिडकीतून पाहिले, बाहेर तो रश्मि बरोबर हसुन बोलताना दिसला.

तो निघून गेला रश्मिनं आत येऊन हसत हसत 'अशी कशी पडली? प्रेमात तर नाही ना?' तिनं हळूच अबोलीच्या जवळ जात विचारले.

'काहीतरी काय, तो कुठे आणि मी कुठे ?'

'असं काही नाही.'

अबोलीची आई आत येऊन रश्मीला म्हणाली 'कोण आहे हा?'तुझी ओळख आहे?

'हा आदित्य साठे, आमच्या तरंग गाण्याच्या ग्रुप मध्ये येतो. खूप छान गातो‌ आम्ही एक डूएट ही गायलं होतं एकदा .

बँकेत नोकरी आहे, घरी आई बाबा व एक बहीण.'

'अरे वा छान स्थळ आहे अजून लग्नाचा आहे?' काकू आनंदून म्हणाली.

'हो खूप मुली मागे आहेत त्याच्या'. पण कोणीतरी आहे वाटतं त्याची, असं वाटतं. तो कधी बोलला नाही, पण अंदाज आहे थोडासा.'

हे सर्व अबोलीच्या कानांवर येत होतं. मनाला कितीही समजावलं, तरी दुखावलं गेलं.

कशी असेल ती…...? नक्कीच स्लिम ट्रिम ,उंच ,स्मार्ट …...

समोरच्या आरशात स्वतःला पाहायचं तिला धाडसच झालं नाही. मग रात्री किती वेळ ती सारखी कूस बदलत होती.

दोन दिवस लागले पाय बरा व्हायला.

'अग आज वाॅकला नाही गेली?' आईने विचारले सुद्धा.

पण आतून आता फिरायला जावेसेच वाटेना‌

काय सांगू आई ला, उगाचंच बागेत आदित्य भेटेल आणि मग या वेड्या मनाला सावरणं कठीण होईल.

'अबोली तुझा फोन केव्हाचा वाजतोय'.

'कोणाचा आहे आई?' अबोली पेंटिंग चे सामान आवरत होती, या दोन दिवसात तिने एक सुंदर लॅडस्कॅप चितारल होत.

'माझी भाजी करपते तूच पहा' म्हणून आई तिला फोन देऊन गेली.

'हॅलो, कोण?

तिकडून 'मित्राला किती वाट पाहायला लावणार आहे? पाय बरा आहे ना? अणि हो….बागेतली फुले ही वाट पाहत कोमेजून गेली.'

'इश्य्य, काहीतरीच काय,' अबोली लाजून लाल झाली.

'बघ तुझं ते लाजण वगैरे नंतर, 'उद्या तू येत आहेस…. ,अस मधेच व्यायाम स्किप करणं बरोबर नाही. मी वाट पाहीन 'म्हणत आदित्य नी फोन कट केला.'

अबोलीचं हृदय आनंदाने जोरा- जोरात धडधडत होतं. कधी सकाळ होते नी ती आदित्यला भेटते, असे तिला झाले.

मनातल्या मनात ती गुणगुणायला लागली "युंही कोई मिल गया,सरे राह चलते चलते'"

आता मनाच्या कॅनवास वर प्रेमाचे रंग पसरू लागले .सगळीकडे नुसती गुलाबी रंगाची उधळण होत होती. भेटी वाढत होत्या आता मनाला आवरण अशक्य वाटत होते.

आई जवळ बोलावे कां? पण इतक्यात नको, असे ठरवून अबोली तिच्या पेंटिंग क्लास ला गेली .

दोन दिवस खपून तिने एक सुंदर पोर्ट्रेट काढलें होते .पण त्यात तिला काही तरी मिसिंग आहे हे जाणवतं होते. पण काय ते कळत नव्हते.

ती पेंटिंग घेऊन रश्मि कडे आली. तिथे आदित्य बसलेला होता.

'अरे वा किती सुंदर युवती काढली आहे ग' रश्मि चित्र पाहून म्हणाली.

'हो….. पण यात एक कमतरता आहे' आदित्य म्हणाला.

'हो ना मला सर पण म्हणाले होते ‌ तूच ओळख पण काय ते मला उमजत नाही.'

'द्या ब्रश ‌‌ .'

अबोली ने ब्रश व कलर पैलेट देताच आदित्यने त्या सुंदरीच्या काळ्याभोर केसांमध्ये लाल रंगानी शेंदूर भरला व अबोली कडे सहेतुकपणे पहात तो हसला. आता चित्रं खरोखरच उठावदार दिसत होते.

अबोलीच्या गालांवर लज्जेची लालिमा पसरली. ती पेंटिंग घेऊन खोलीत पळाली.

गोल गोल गिरकी घेत गुणगुणायला लागली. 'तू माझा…. ‌‌ तुझी मी झाले'

बाहेर हाॅल मधे रश्मि आणि आदित्य युगल गीताची तयारी करत होते‌. त्या गाण्याचा स्वरां मधे अबोली आपला स्वर मिसळायचा प्रयत्न करू लागली.

रात्री जेवताना रश्मि ने सांगितले की तिला गाण्याची तालीम करायला कला विथिका मध्ये जावे लागेल तेव्हा यायला उशीर होईल. आदित्य असेलच.

आता रोजच रश्मि उशिरा घरी येत असे. तिला सोडायला आदित्य येत असे. घरात आल्यावर ही रश्मि गाणे गुणगुणत असे तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच नूर दिसे. अबोली खिडकीतून त्याला पहात बसे.

दोन दिवसांनी तरंग ऑडिटोरियम मधे कार्यक्रम होता. दोघेही ते युगल गीत तिथे गाणार होते.

अबोली,आई व काकू तिच गाणं ऐकायला गेल्या.

आदित्य आणि रश्मि दोघांची जोडी खूप छान दिसत होती. गाणे तर खूप छानच झाले‌. दोघेही गातांना एकमेकांकडे ते प्रेमाने पहात होते आणि गात होते.

"गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना.
थांब ना…...
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे.
थांब ना…..
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना.
थांब ना…….
तोल माझा सावरू दे, थांब ना.
थांब ना‌‌….. ‌,
थांब ना."

गाणे खूपच गाजलेलं होतं, दोघांनी छान गायले..मागे बसलेल्या बायका आपसात बोलत होत्या,"जोडी छान आहे नाही……"

ते सर्व ऐकून, पाहून अबोलीला खूप नर्वस वाटू लागलं.

घरी जाताना आई म्हणाली पण -- 'दोघांची जोडी खूप छान दिसते, विचारावे कां आपण ह्यांच्या घरच्यांना?' काकू म्हणाली.

'हो, खरंच की ! रश्मि आवडेलच त्यांना.'

घरी आल्यावर आईने रश्मी ला विचारले 'आदित्य कसा वाटतो तुला ?'

'छान आहे, मला ठाऊक आहे त्याची आवड काय आहे..'

ज्याने त्याने, त्याचा अर्थ, आपापल्या परीने काढला.

दुसऱ्या दिवशी आदित्य घरी आला तो आईस्क्रीम घेऊनच, गाण्याच सक्सेस सेलिब्रेशन म्हणून. रश्मि घे तुझ्या आवडीचा चॉकलेट आईस्क्रीम आणलय.

आई, काकू ला ही त्याने आग्रहाने खायला लावले.

अबोली ला इच्छा तर होत होती. पण इतके दिवस जे निग्रहाने टाळले तेच समोर हजर!

'नाही नको मला.' ती म्हणाली .

'अग हे स्पेशल तुझ्या साठी शुगर फ्री आणले आहे' आदित्य तिच्या हातात कप देत म्हणाला.

किती काळजी घेतो, मनातून अबोली सुखावली.

एक दिवस काकू घरी आली ,ती खूप आनंदातच ! घरी आल्यावर आईला म्हणाली 'वहिनी मी भेटून आले साठ्यांच्या घरी त्यांना बायोडाटा देऊन आले आहे. छान लोक आहेत‌ ‌‌'

आदित्य आला तो आपल्या आई-बाबांना घेऊनच. रश्मी तयार होती. 

'अबोली तू तयार हो ना.'चल आज मी तुला तय्यार करते.'

'मी कशाला ग तयार व्हायचे उगाच? तो तर तुला पाहयला येत आहे. तू बाकी छान दिसते आहेस ‌'

'वेडा बाई, प्रेम ही करते पण,-- राहू दे होऊ दे गम्मत थोडीशी' रश्मि मनात पुटपुटली.

हाॅल मधे आदित्य आणि रश्मि मन मोकळेपणाने बोलत होते. अबोली ने हळूच एकदा आदित्य कडे पाहिलं पण त्याचं लक्ष भिंतीवरच्या नव्या लावलेल्या पोर्ट्रेट कडे होते.

काकू आणि आई दोघीही खूप उत्साहात होत्या.चहा फराळ झाला.

'काय आदित्य, तुझ्या कडून होकार आहे ना ' आदित्यच्या बाबांनी विचारले.

'अर्थातच…...पण तिला विचारलं कां?'

'अहो इतका चांगला सोबती मिळण भाग्याची गोष्ट आहे.' काकू म्हणाली.

'मग काय म्हणताय, दोन्ही कडून होकार समजावा,' असे म्हणत आदित्यच्या आई म्हणाली. तोंड गोड करते मी माझ्या सुनेचं.

'तुम्हाला आवडली आहे न?'

'हो तर! छानच, आदि ची आवड तिच आमची सुद्धा'

पेढ्याचा बॉक्स उघडून, हातात पेढा घेऊन त्या अबोली समोर उभ्या झाल्या. अबोली रश्मीकडे पाहू लागली.

'अगं, आ कर' रश्मिने तिला हलवलं.

'तुला मागणी घातली आहे आदि ने. तुलाही आवडतो ना?' रश्मि ने तिला चिमटा काढत विचारले.

अबोलीने आदित्य कडे पाहिले त्याने हसून होकारार्थी मान हलवली. 

अबोलीने बावरून आईकडे पाहिले 'अग, घे पेढा त्या तुला मागणी घालतात आहे तुलाही आवडतो आम्हालाही ठाऊक आहे.' 

सगळ्या प्रसंगाने लाजून लाल झालेल्या अबोलीला पेढा अधिकच गोड लागला.

समाप्त

© सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

या कथाही अवश्य वाचा

सावट

सासर माहेर 

मी माझी समर्थ आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने