अंतर

©️ सायली जोशी




पावसाळ्याच्या सुरुवातीला विठाबाईच्या चाळीला शासनाने नोटीस पाठवली अन् काही दिवसांतच जोरदार पाऊस सुरू झाला.

अनेक वर्षांपासून दिमाखात उभी असलेली, अनेक पिढ्या सामावून घेणारी आपली चाळ अशी तडका -फडकी सोडायची म्हणताना, तिथल्या साऱ्या कुटुंबियांच्या काळजाला घरं पडली. 

पण चाळ सोडली नाही तर जीवाला धोका असल्याने मनाची तयारी करून, एकमेकांची समजूत घालून, तिथल्या इन मीन दहा कुटुंबांनी ती चाळ सोडण्याचा निर्णय घेतला.

त्या कुटुंबांपैकी जवळपास साऱ्यांची मुले शहरात नोकरीला असल्याने बरेच जण शहरात निघून गेले. पण उरलेल्या कुटुंबांना बिल्डरच्या मुलाने जागा उपलब्ध करून दिली. 

विठाबाई जरुरीपुरते सामान घेऊन इतरांबरोबर त्या जागेत राहायला आल्या. बाकी मोठे सामान बिल्डरच्या मुलाने विठाबाईंच्या लेकीकडे पाठवून देण्याची व्यवस्था केली.

नव्या जागेत सामान लावण्यापूर्वीच बातमी आली, 'चाळ जमीनदोस्त झाली.'
विठाबाई भर पावसात पडलेली आपली चाळ पाहायला आल्या. ती पडझड पाहून त्या अगदी गदगदून रडल्या. 

जिथं गेली अनेक वर्षे त्या स्वयंपाक करत होत्या, ती भिंत मात्र तशीच ताठ मानेने उभी होती. पुढे जाऊन त्यांनी त्या भिंतीवरून प्रेमाने हात फिरवला. 

इतक्यात कोणीतरी ओरडले, "ओ आजी, पुढे जाऊ नका. आता आणखी वांदे नकोत."

"नाई रं बाबा, नुसतं डोळ्यात साठवून घेते. माझं लई पिरेम हाय या जागंवर."
विठाबाई काही वेळ तिथेच थांबून आपल्या नव्या जागी परत आल्या. 

शेजारी असलेल्या ओळखीच्या कुटुंबाकडून त्यांनी फोन घेऊन आपल्या मुलाला फोन लावला.

चाळीची बातमी ऐकताच संतोषच्या डोळ्यात पाणी आलं.
"आई, इतके दिवस काहीच कसं सांगितलं नाहीस? इतकी वर्षे एकटीने काढलीस! तू गप इकडं निघून ये. इथं हक्काचं घर असताना त्या चाळीतल्या दोन खोल्या कशाला हव्यात तुला?"

"काय सांगायचं पोरा? तुला तरास द्यायला मन धजावत नाई. समदं आयुष्य इथं गेलं. त्या बांधकाम करणाऱ्या मुलानं आमची चांगली सोय केली. इथं कसलीच काळजी नाई बघ आणि तुझा बा अचानक घरातून गायब झाला त्या दिवसापासून म्या एकलीच पडले. एकलेपण तवाच वाट्याला आलं." विठाबाई पदराने डोळे पुसत म्हणाल्या.

"किती दिवस आम्ही इकडं बोलवतो आहोत तुला! ते काही नाही. मी उद्या न्यायला येतोय. बांधलेलं सामान सोडू नकोस. त्यातलं जरुरी पुरतं सामान घेऊ आणि इकडे येऊ. आता मला कोणतीही कारणं नको आहेत. तुझी सून आठवण काढते कधीची. तू यायलाच हवंस." इतके बोलून संतोषने फोन ठेवून दिला.

म्हटल्याप्रमाणे संतोष दुसऱ्या दिवशी हजर झाला. 

त्याने विठाबाईंचे जरुरीपुरते सामान आपल्या सोबत घेतले. बाकीचे ताईकडे पाठवून दिले. 

लेकाने चारचाकी मोठी गाडी आणली म्हणून विठाबाईंना आनंद झाला खरा. पण त्यात बसताना फार अवघडल्यासारखं झालं. 

त्यांनी आपल्या ओळखीच्या माणसांना आपल्यासोबत येण्याचा आग्रह केला. पण कोणी यायला तयार होईना. अर्थात तेही खरंच होतं. कारण आपल्या माणसांना, जागेला सोडून परक्या ठिकाणी कोण कसे जाईल? 

सर्वांनी विठाबाईंना निरोप दिला.
---------------------------------

शहरातल्या उंच उंच इमारती पाहून विठाबाईंना आपल्या चाळीची मनापासून आठवण झाली. त्या आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या उंच इमारती पाहून आपल्या लेकाला म्हणाल्या, "आपल्या चाळीची सर या इमारतीला कधीच यायची नाई. म्या असं ऐकलं, सदानकदा इथल्या घरांची दारं बंदच असत्यात! कोणी कोणाचं नसतं."

बराच वेळ थांबून त्या पुढं म्हणाल्या,
"तुझ्या घराचा मजला कितवा रं?"

"बावीस." संतोष लिफ्टचे बटण दाबत म्हणाला.

"बावीस म्हंजे, दोनावर दोन ना? मग आपल्या चाळीचा मजला दुसरा म्हणायचा अन् हा त्यावर एक. नाई का?" विठाबाई हसत म्हणाल्या.
"पण येळ लागंल ना? इतक्या उंचीवर जायला?"

"नाही आई. हे काय आपलं घर आलं सुद्धा." संतोष सामान घेऊन लिफ्टमधून बाहेर येत म्हणाला.
घटक्यात इतक्या उंचावर पोहोचता येतं म्हणून विठाबाईंना फार आश्चर्य वाटलं.

आपल्या सुनेने केलेल्या स्वागताने विठाबाईंना आनंद झाला. 

लेकाचं चकचकीत, झगमगीत घर पाहून त्यांना या घरात आपलं पाऊल ठेवावं की नको? असं वाटू लागलं.
"काय झालं सासुबाई? अशा दारात का थांबलात?" सुनेच्या आवाजाने विठाबाई भानावर आल्या.

"आम्ही गावाकडची माणसं. या झगमगीत दुनियेची सवय नाई पोरी. काय वाटतं? हे सांगू शकत नाई बघ."

"हे तुमचंच घर आहे. विनासंकोच आत या." सुनेने हाताला धरून विठाबाईंना घरात नेलं. बाईंनी सारं घर तीन -चार वेळा पुन्हा, पुन्हा फिरून पाहिलं.

"आपल्या चाळीच्या जागंपेक्षा दुप्पट -तिप्पट जागा वाटती रं. इतक्या दिसांत इथं येण्याचा प्रसंग आलाच नाई कधी. बेश घर घेतलंस बघ. पर आमच्यासारख्या गावाकडच्या माणसांना इथं राहण्याचा अधिकार नाई."

"आई, असं का म्हणतेस? आम्ही कोणी परके आहोत का? आता तू इथेच आमच्यासोबत राहायचं. अगदी कायमचं." संतोषने आपल्या आईची कशीबशी समजूत घातली.

विठाबाईंना राहायला वेगळी खोली होती. अगदी त्या चाळीच्या दोन खोल्या इतपत मोठी! ती खोली पाहून त्या पार अवघडून गेल्या. सवय होईपर्यंत बिचकतच त्या घरात राहू लागल्या. आपल्या हातून काही पडेल, फुटेल काय? अशी भीती वाटू लागली त्यांना. 

या उंच घरातून दिसणारा पाऊसही त्यांना वेगळाच वाटू लागला.
"गावाकडचा पाऊस आणि शहरातला पाऊस दोन्हीत लई फरक..तो आपला वाटतो अन् हा परका!"

"तुम्ही एकदा का इथे रुळलात की बरं वाटेल. तुमचं सगळं आयुष्य गावाकडे गेल्याने तिथली ओढ वाटणं साहजिक आहे. पण तुम्ही निश्चिंत मनाने इथे राहा. आम्हाला तुमची कसलीच अडचण होणार नाही." सुनेने पुन्हा एकदा आपल्या सासूची समजूत घातली.

विठाबाईंना आपली सून नोकरी करते, याचं फार अप्रूप वाटलं. त्या कौतुकानं सुनेची लगबग पाहत राहायच्या. जमेल तशी तिला मदत करायच्या.

इथलं स्वयंपाकघर पाहून विठाबाईंना आपल्या स्वयंपाकघराची आठवण झाली. सुरुवातीला चुलीवरचा स्वयंपाक असायचा. कित्येक वर्षानंतर गॅस आला आणि भीतीपोटी विठाबाईंनी तो अनेक दिवस वापरलाही नाही.

"इथं तर चकचकीत स्वयंपाकाचा कट्टा! त्यावर धूर बाहेर निघायला चिमनी बसावत्यात. आकाशात उडणारी चिमनी येगळी अन् ही येगळीच."

जुन्या कितीतरी आठवणी सुनेला सांगत चार-पाच महिने विठाबाई आपल्या लेकाच्या घरात रुळायचा प्रयत्न करत राहिल्या.

सुनेने त्यांना आपल्या सोसायटीत फिरवून आणलं. सर्वांना त्यांची ओळख करून दिली. कपाळावर नाण्याएवढं मोठं कुंकू, नाकात नथ, हातात भरगच्च बांगड्या..कोणी त्यांचं स्वागत केलं तर कोणी गावाकडची बाई म्हणून नाक मुरडलं.

मधेच लेकीचा फोन आला. "शहरात करमतं का?" ती आईला विचारू लागली. 

विठाबाई कशाबशा हो म्हणाल्या. कारण गावची आठवण त्यांची पाठ सोडत नव्हती. जिथं अख्खं आयुष्य गेलं, तिथल्या आठवणी मनातून कशा पुसून टाकायच्या?

अचानक एक दिवस संतोषला बिल्डरच्या मुलाचा फोन आला. पडलेली चाळ पुन्हा नव्याने बांधायची होती. आईने पुन्हा गावी जावं, यासाठी संतोषचा नकार होता.

"दोन खोल्यांची का असेना. पण आपली हक्काची जागा का सोडायची?" विठाबाई आपला हट्ट सोडायला तयार नव्हत्या.

सून म्हणाली, "या इतक्या महिन्यात तुमची सवय झाली. आता जाऊ नका. इथे आमच्या सोबतीला मोठं कोणीतरी हवं."

"अगं, आपल्या हक्काचं घर हाय ते. ती जागा का सोडायची? माझ्या माघारी काय करायचं ते करा. पण म्या आणखी काही महिने इथं राहिले तर तुलाच लाज वाटून राहील. ही अडाणी बाई नकोशी वाटू लागली की, मग ही पिडा कधी जाते, असं होऊन जाईल तुला.
शिकले नसले तरी दुनियादारी कळते आपल्याला. माणसांची मनं वाचता येतात. म्या चार पावसाळे जास्त बघितलेत तुमच्यापेक्षा!"

यावर सुनेला काही बोलता आलं नाही. ती मान खाली घालून उभी राहिली.

"आई, असं कसं होईल? हा पोटचा मुलगा तुला कधी अंतर देणार नाही. पण तुझा हट्ट असेल तर मी उद्या तुला पोहोचतं करतो. घर बांधून होईपर्यंत ताईकडे राहा. 
मी अधून -मधून येत जाईन. पण उद्या सगळी चौकशी करून, मगच घर बांधायचा निर्णय घेऊ." संतोष विचार करत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी विठाबाईंनी आपलं सामान गाडीत भरलं. तशी सून त्यांच्या पायाशी वाकली. 

"सासुबाई, अशाच अधून -मधून येत जा. त्याशिवाय आपल्यातलं अंतर कमी व्हायचं नाही."

"व्हय. सांभाळून राव्हा दोघं." विठाबाईंनी सुनेच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवून बोटं आपल्या कानशिलाजवळ नेऊन कटाकट मोडली.
"गुणाची बाई माझी..लवकर ग्वाड बातमी दे."

काही वेळातच सगळे गाडीत बसून स्टेशनवर आले.

"शहरात आले अन् फोरीन का काय म्हणतात ते? तिथं आल्यासारखं वाटलं पोरांनो. सुट्टीला येत जावा. म्याही येत जाईन."
इतकं बोलून विठाबाई भरल्या डोळ्यांनी गाडीत बसल्या. 

तसे सुनेने आपले डोळे पुसले. 

गाडी सुटली अन् दोघी एकमेकांना दिसेनाशा होईपर्यंत हात हलवत राहिल्या.
दोघींत अंतर पडत असलं तरी ते कमी होत असल्याचा भास दोघींनाही होत राहिला.

समाप्त.
©️ सायली जोशी.

सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

ही कथाही अवश्य वाचा



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने