मन झाले विरागी ( भाग 1 )

©® सौ. प्रतिभा परांजपे




'शिवाजी पार्क,'--बस कंडक्टरचा आवाज येताच बसमधले इतर प्रवासी पटापट उतरले. पण नयना पेपर तोंडासमोर धरुन बसून राहिली. 
स्टॉपवर तिने अविनाशला दुरूनच पाहिले होते, ‘हा? आज इथे बस साठी?’

तेवढ्यात बस सुरू झाली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला व पुढच्या स्टॉपचे तिकीट घेतले.

अविनाश, तिचा पहिला नवरा, त्यांचा सामना करण्याची तिची हिंमत नव्हती. आपला पराभव झाला झाला, हे त्याच्या नजरेतून पाहणे तिला लज्जास्पद वाटत होते.

पुढच्या स्टॉपवर उतरून तिने टॅक्सी केली व ऑफिस गाठले.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर इतर सहकर्मी घाईघाईने निघाल्या.

“काय नयना ओव्हर टाइम की काय"? तिची खास मैत्रिण मीनलने विचारले.

"आता कुणाबरोबर?" एकीने हसत टोमणा मारला तो नयनाला जिव्हारी लागला, तरीही वरकरणी न दाखवता नयना टेबल आवरू लागली.

घरी आल्यावर कॉफी व बिस्कीट घेऊन टीव्हीवरचे चैनल बदलून बदलून मन रमवायचा बराच प्रयत्न केला.

रात्री झोप लवकर येत नव्हती, सकाळी स्टॉपवर अविनाशना पहिले, तसेच दिसत होते वरून शांत, मनातले न दिसू देणारे.

कां आपले धैर्य नव्हते त्यांचा सामना करण्याचे,?? मग तेव्हा कुठून आली होती हिम्मत एवढा मोठा निर्णय घेताना?

अविनाश तिला परत परत हेच समजावत होते, 'विचार कर अजून थोडा.'

पण-- तिला घाई झाली होती. फार दिवस दोलायमान मनस्थितीचा नयनाला त्रास होत होता. 
नयनाची आई, भाऊ सर्वच तिच्यावर नाराज होते. एवढेच काय तिची मुलगी संपदा, या सगळ्या पायी तिच्याशी बोलेनाशी झाली होती.

नयनाचा निर्णय झाला होता, वयाच्या चाळिशीला तिने अविनाशला डिवोर्स देऊन दुसरे लग्न केले.

स्वतःचा जॉब असल्याने आर्थिक अडचण नव्हती, पण-- जर नोकरी नसती तर?--तर नीरज ही भेटले नसतेच आणि ही पुढची फरफट---विचार करता करता डोळे जड व्हायला लागले.

सकाळी जाग खूप उशिरा आली, उठायचीच इच्छा नव्हती. तरीही बाथरूम कडे वळली. डोके गरगरते आहे असे वाटत होते, आताशा मधून मधून असे का होते? चहा प्यावा का? पण देणार कोण? पूर्वी सकाळचा चहा अवि करत, ती चहा समोर आला की उठायची.

काल ते दिसल्याने जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. त्यातून बाहेर पडायला हवे, हिम्मत करून तिने आवरायला सुरुवात केली.

आज सुर्वे मॅडम सुट्टीवर आहे त्यांचेही काम काम पाहावे लागणार तेव्हा यायला उशीर होणार. दोन पोळ्या जास्तच करून ठेवाव्या आल्यानंतर त्राण राहील का नाही कोणास ठाऊक?

पुढचे चार दिवस कामाचे प्रेशर वाढले, सुर्वे मॅडमनी सुट्टी आणखी वाढवली. घरी येताना बस मध्ये मीनलशी बोलताना जीव घाबरायला लागला, चक्कर आल्यासारखे वाटत होते,
" नयना तू चल बरं आजच डॉक्टर कडे" मीनलने तिला डॉक्टर कडे नेले. वाटत होते त्यापेक्षाही बी.पी वाढलेले होते.

पूर्ण आराम नियमित औषधे अशा सूचनांचा मारा घेत नयना घरी आली. 

मीनलने आज तिच्यासोबत थांबायचा निर्णय घेतला. पुढचे दोन दिवस ती औषधांच्या गुंगीतच होती. मीनलने नयनाच्या आईल ही कळवले, पण येणार नाही माहीतच होते.

नयनाची तब्येत थोडी स्थिरावल्यावर मिनल घरी गेली.

हे काय बरे झाले ? --किती स्वप्न पाहिली आणि काय मिळाले? झोपेच्या गोळ्यांची डोळ्यावर गुंगी असायची पण मनात विचार चक्र उलट्या दिशेने फिरत होते.

नीरज प्रथम भेटले ते ऑफिसमध्ये, तिच्याच सेक्शनचे हेड म्हणून.
नेमका त्याच दिवशी नयनाला यायला उशीर झाला. घाबरतच ती केबिनमध्ये गेली. हे येणारे बॉस जरा strict आहेत असे कानावर होते.

"काय मॅडम किती उशीर? आणि स्टेटमेंट ची फाईल कुठे?"

"सॉरी सर" म्हणत तिने फाईल समोर ठेवली. बॉस खूपच यंग आणि स्मार्ट आहे हे तिच्या लक्षात आले.

"हं--काम परफेक्ट आहे" म्हणत, हसत त्यांनी वर पाहिले, नयना ने ही स्माईल केले ,मनाचा ताण गेला.

लेडीज स्टाफ मध्ये आताशा बॉस , हा चर्चेचा विषय असे, ते मॅरीड की अन मॅरीड, त्यांचे वय, ते किती हँडसम,बरीच वर्ष विदेशात होते, वगैरे वगैरे. 

त्याच सुमारास सरांसाठी वेलकम पार्टीही झाली. नेहमीप्रमाणे नयनाचे गाणे झाले. त्याची सर्वांनी विशेषतः सर नीरज प्रधान यांनी तारीफ केली. त्यामुळे नयना खूपच भारावली होती. त्याच मूडमध्ये ती गुणगुणतच घरी आली.

घरी नेहमीप्रमाणे अविनाश कॉलेजमधून येऊन स्टडी मध्ये बसले होते आणि लेक संपदा आपल्या मैत्रिणीकडे, घरातले असे वातावरण पाहून नयनाचा मूड ऑफ झाला. 
किती उत्साहात ती घरी आली पण तिचं कौतुक ऐकायला घरी कोणालाच वेळ नव्हता.

या प्रसंगानंतर तिचे मन तुलना करू लागले, नीरज प्रधान किती उत्साही वाटत . अविनाश मात्र नेहमी पुस्तक लायब्ररी यातच गढलेले असायचे, मग तिची चिडचिड व्हायची.

मागे बरेच वेळा आईजवळ ती बोलली, पण आईचे नेहमीप्रमाणे अविनाशचेच कौतुक ",तुझी किती काळजी घेतात असा नवरा मिळाला भाग्य लागतं वगैरे". 

तिला नेमके काय हवे हे समजून घ्यायला कोणीच तयार नव्हते .

तिला हवा होता तिच्यासोबत कधीतरी रोमॅण्टिक डिनरला जाणारा, कधीतरी बागेत बसून गप्पा मारणारा, तिच्यासोबत फिरणारा उत्साही साथीदार .
यावरून तिचे अविनाशशी बऱ्याचदा वाद होत. तिला गाण्याची आवड होती तेव्हा तिच्या कलासक्त मनाची घुसमट होत असे. मग कधीतरी अविनाश तिच्यासोबत जात ही, पण मग त्यात तिला अपेक्षित असे थ्रिल नसे त्यामुळे मग इतके करूनही ती उदासच असे.

तिला खुश करायचा अविनाश प्रयत्न करीत. तिला सकाळी चहा करून देत.

वेळ मिळत नाही पाहून घर आवरून ठेवत. त्यांचे हे प्रयत्न पाहून तिला ओशाळल्या गत व्हायचे. मग तिने अपेक्षा करणे सोडले. रुटीन जीवन आपल्या गतीने चाललेच होते.

त्याच सुमारास ऑफिसमधल्या सोहनींच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. ऑफिसचा सगळा स्टाफ होता, लेडीज स्टाफ मध्ये नीरज प्रधान सर डिव्होर्सी आहेत व एकटेच आहेत अशी खुसुर पुसुर चालली होती.
काही कुवाऱ्या कन्या त्यांच्या मागे पुढे करत होत्या.

पार्टी संपून घरी येताना प्रधान सरांनी नयनाला "तुम्हाला घरी सोडू कां" असे विचारले. 
मीनल आली नव्हती तेव्हा मग, हो नाही करता करता नयना तयार झाली.

नीरजचे सफाईदार गाडी चालवणे, त्यांच्या सूटला येणार धूंद सुगंध सारे काही खूपच एक्साइटींग होते.

पुढचे दोन-तीन दिवस नयना नणंदेकडे लग्न होते म्हणून रजेवर होती. रजा संपवून ऑफिसमध्ये येताच मीनलने   "सर तुझी विचारपूस करत होते" म्हणत चिमटा काढला. मनातल्या मनात नयना खूप सुखावली.

हळूहळू नयनाच्या वागण्यात बदल होत होते, आताशा अविनाश सोबत ती Bed-Share करताना काही ना काही कारण सांगून त्यांना टाळत असे, तिच्यात होणारे बदल हळूहळू अविनाशच्या लक्षात येत होते. पण असे काही असेल याची त्यांना कुठे कल्पना होती.

ऑफिसमध्येही टी -टाईमला बरेच वेळा ती व नीरज बरोबर असत. तिच्या सहकर्मीच्यां हे लक्षात येत होते. मीनल ने तर, "हे बॉस लोक गोड बोलण्यात एक्सपर्ट असतात," असा इशाराही दिला पण-- नयना तर वेगळ्या दुनियेत वावरत होती.

एक दिवस एका गाण्याच्या प्रोग्राम ची दोन तिकीट घेऊन नीरजने तिला चलतेस का असे विचारले. तिला गाण्यात खूप इंटरेस्ट होता त्यामुळे ती सहज तयार झाली.

त्या दोघांना तिथे बरोबर पाहणाऱ्या मध्ये तिची दूरची नणंदही होती. तिने घरी येऊन अविनाश समोरच विचारले नयनाची मुश्किल झाली.

हळूहळू अविनाश लक्षात येत होते.पण हे कसं थांबवावे कळत नव्हते.

हळूहळू अविनाश लक्षात येत होते. ऑफिसला जाताना नयनाचे छान तयार होणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे .

ऑफिसमध्ये तर स्टाफ मध्ये ती नसताना त्यांच्या रिलेशन बाबत बरेच बोलले जात असत.

एक दिवस नीरज ने सरळ-सरळ तिचा हात हातात घेत तिला विचारले, "आर यु इंटरेस्टेड? किती दिवस अश्या गोष्टी लपवणार?"

एक दिवस तिने अविनाश जवळ विषय काढला.
" मला नीरज ची सोबत हवी आहे .तुमचा माझा स्वभाव वेगळा आहे मी नाही ऍडजेस्ट करू शकत".

अविनाश खरेतर हादरले," तू त्याच्याबरोबर खरंच सुखी होशील? आहे तुला गॅरेंटी"? पण मग पुढे स्वतः म्हणाले "माझ्या सोबत तरी तू कुठे खुश आहेस?  तरीपण परत विचार कर घाईघाईत निर्णय घेऊ नको."
पण नयना ला घाई होती. नीरज सारख्या साथीदाराचे स्वप्न तिला साद घालत होते.

प्रेमात कुठे कोण विचार करतं?

नयनाच्या इच्छे पुढे अविनाश ने मान झुकवली. 
डिवोर्स लगेच मिळाला. सगळे बंध तोडून ती मिसेस प्रधान झाली.

आठ दिवस उटला फिरून नयना आणि नीरज दोघे परत कामावर रुजू झाले. हे आठ दिवस किती लवकर गेले कळलेच नाही. नयना नीरजच्या प्रेमात चिंबचिंब भिजून पूर्ण उमललेल्या फुलागत मोहक सुंदर दिसत होती.

ऑफिस मध्ये पोहोचल्यावर मीनल हळूच जवळ येऊन कुजबुजली,  "वा काय दिसते स ग ! दृष्ट काढायला हवी तुझी."

एक महिना सरता सरता नीरज ने त्याची ट्रान्सफर जुन्या ब्रांच मध्ये झाल्याची बातमी दिली. प्रमोशन असल्याने नयनाने ते सहज स्वीकारले. 
या नव्या घरापासून तिचे ऑफिस खूपच जवळ होते त्यामुळे तिला नीरज साठी बराच वेळ काढता येई, त्याच्या आवडी निवडी, बरोबर फिरणे, संध्याकाळी किंवा रात्री लॉंग ड्राईव्ह सर्व स्वप्नात असल्यासारखे अनुभवत होती ती.

नीरज हळूहळू बिझी होत गेले. असे सहा महिने भुर्रकन गेले. तरीही दोघे खूप आनंदात होते .

पण-- या सर्व सुखाला अचानक कुणाचीतरी नजर लागली. भरतीनंतर ची ओहटी सुरू झाली.

नयनाला मेनोपॉजचा त्रास सुरू झाला. लेडी डॉक्टर ला दाखवून काही औषधे घेऊन झाली. काही महिने त्यामुळे ठीकठाक गेले पण परत तक्रार सुरू झाली. ऑफिसमधून ही तिने सुट्टी घेतली असे मधून मधून व्हायला लागले.

एक दिवस ऑफिस मध्ये बॉस ने विचारले "काल तुम्ही पार्टीला नव्हतात, मिस्टर प्रधान एकटेच होते,"

नयना ने तब्येतीचे कारण पुढे केले ,पण खरेतर तिला या पार्टीच काहीच माहीत नव्हते. तिने नीरज जवळ विचारणा केली. 
त्यांनी "तुला बरे नसल्याने नाही विचारले" असे म्हणून वेळ मारून नेली.

नयना मनातून दुखावली, नीरज आपल्यापासून दुरावतो या कल्पनेने ती सावध झाली. 
नीरज च्या मर्जीनुसार वागून त्यांच्या आवडीप्रमाणे त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करू लागली.

लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले ते दोघं सुट्टी घेऊन फिरायला महाबळेश्वरला गेले, नयना खूपच उत्साहात होती. पण परत येताच तिच्या उत्साहावर पाणी पडले. नीरजना कंपनी दोन महिन्यासाठी जर्मनीला पाठवत होती.

नीरजसाठी हे सर्व नवीन नव्हते. मागे बर्‍याच कंपन्यांच्या कामासाठी त्यांनी विदेश दौरे केले होते .

नयनाला सुट्टी घेणे शक्य नव्हते व सध्या तिची तब्येत ही ठीक नव्हती, त्यामुळे हे दोन महिने तिला एकटे पण सहन करणे भाग होते.

ती व नीरज रोज व्हिडीओ कॉलिंग करून बोलून घेत होते पण कधीकधी दोघांच्या वेळा जमत नसत. 
दोन महिने असेच गेले, नयना निरजची आतुरतेने वाट पाहत होती.

क्रमश:

काय होईल पुढे? नयना ज्यांची आतुरतेने वाट बघत होती ते नीरज येतील का परत? कसा असेल त्यांच्या नात्याचा प्रवास? नियतीने काय मांडून ठेवले असेल नयनाच्या आयुष्यात ??
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी वाचा उद्याचा पुढचा व अंतिम भाग.

©® सौ. प्रतिभा परांजपे


सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!

📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

या कथाही अवश्य वाचा

नकोतच सोपस्कार फक्त


निर्णय


कर्माचे फळ



















1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने