©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
साठे कुटुंबात सहा बहिणींपैकी मीरा सर्वात धाकटी. ती लास्ट इयरला असतानाच वडील किडनीच्या आजाराने आजारी पडले.
घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती, कशीबशी वडिलांनी पाच पोरींची लग्नं केली आणि मीराच्या लग्नाआधीच ते वारले.
मीराची आई वडील वारले, या धक्क्यानं सतत आजारी पडू लागली. तिला दम्याचा त्रास सुरु झाला.
पाचही बहिणींना काळजी वाटू लागली.
आईही या जगातून गेली तर मीराचं कसं होणार, ती एकटी पडेल ? कारण या पाचही जणी तशा फार काही श्रीमंत नव्हत्या, त्यांनी ठरवलं मीराचं लवकरात लवकर लग्न करायचं.
मीरा एका पतपेढी मध्ये चार हजार रुपये पगारावर नोकरी करत होती. लग्नात खर्च करायला जास्त पैसे नव्हते, मीराचा अर्धा पगार तर आईच्या आजारपणावरचं खर्च होत होता.
मीरा बहिणींची समजूत घालायची, तुम्ही काळजी करू नका, वेळेत होईल माझं लग्न...
असेच दिवस जात होते, आई घरात सतत आजारी, गरीब परिस्थिती, त्यामुळे मीराच्या लग्नात अडचणी येवू लागल्या. बहिणी आम्ही खर्च करतो असं बोलत नाही आहेत हे मीराला समजत होते.
एके दिवशी मीराच्या एका चुलत भावाने तिच्यासाठी एका मोठ्या घरातून स्थळ आणलं.
चुलत भाऊ गणेश घरी येवून सांगू लागला. काकी, स्थळ खूप चांगल आहे, बंगला, गाडी, स्वतःचा खूप मोठा बिजनेस आहे त्यांचा…, त्यांना फक्त घर निट सांभाळणारी गुणी मुलगी हवी आहे.
पण काकी मुलात थोडा प्रोब्लेम आहे.
त्या मुलाला एक आजार झाला होता. त्यात तो व्यवस्थित झाला आहे पण तो जास्त चालू शकत नाही आहे त्याला चालण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागतेय. त्याला आधार द्यावा लागतो.
बाकी तो एकदम व्यवस्थित आहे. पण ते हि लवकरच निट होईल, उपचार चालू आहेत.
काकी , मीरा माझी बहीण आहे. चुकीच स्थळ मी माझ्या बहिणीसाठी सुचवेन का, सार्थक दिसायला चांगला आहे. श्रीमंत आणि मुळात बुद्धीने हुशार आहे, बिजनेस सांभाळतो आहे.
शेवटी गणेशने मीरा आणि तिच्या बहिणींना तयार केलं.
मीराला हे स्थळ पसंत नव्हत. पण आपल्या गरीबीचं कारण सांगून बहिणी आणि आईने तिला तयार केलं. मुलाकडच्यांची काहीच अट नव्हती, सगळा खर्च ते लोकच करणार होते.
मुलीकडच्यांनी फक्त पुण्याला मुलीला घेवून जायचं होत.
लग्न पुण्याला मोठ्या दिमाखात झालं. मीराची आई, बहिणी, त्यांचे नवरे, मुलं सर्वांना लग्नात छान मान दिला गेला. सर्वाना उंची कपडे भेट देण्यात आले. मीराच्या आईकडून नवर्याकडच्यांनी काहीच पैसे घेतले नाहीत.
मीरा पुण्याला आल्यावर तो तीन मजली बंगला, गाडी, घरात असणारे नोकर – चाकर हे सगळं बघून खूप खुश झाली. सासूसासरे पण स्वभावाने खूप चांगले होते. सार्थक त्यांचा एकुलता एक मुलगा होता.
सार्थकचे पाय आजारपणामुळे निट काम करत नव्हते. त्याला उठता – बसताना पण हात धरावा लागे, त्याच्या मदतीला नोकर माणस होती. त्याला बाथरूमला जाताना पण धरून न्यावे लागे. त्याला त्रास होत असे म्हणून तो जास्त करून व्हीलचेअर वरून इकडे – तिकडे जात असे.
मीराला तो खूप जीव लावत असे.
मीराला सुद्धा सार्थकला छान साथ देत होती. अनेक कार्यक्रमांत ती सार्थकबरोबर जात असे.
सार्थक व्हीलचेअर वर असे. एकदा त्यांच्या कंपनीच्या एका कार्यक्रमानंतर ती सार्थकबरोबर बाहेर येत असताना मीराला तिच्या कॉलेजमधला मित्र आकाश दिसला. मीराने त्याला हाक मारली.
आकाशने हाय कशी आहेस, कुठे राहतेस अशी सगळी चौकशी केली.
मीरा - अरे मी लग्न करून इथे असते पुण्यात तीन वर्ष झाली असं बोलली.
हे माझे पती सार्थक, मीराने त्या दोघांची ओळख करून दिली. हाय मी सार्थक, हस्तांदोलन करत सार्थक म्हणाला. त्याच्या व्हीलचेअरकडे आकाशचं लक्ष गेलं. आणि त्याने पटकन मीराकडे बघितलं.
मीराने तू इथे कसा विचारल्यावर तो म्हणाला मी हल्लीच पुण्यात नोकरीसाठी शिफ्ट झालो आहे.
एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर आहे. अजून लग्न केलं नाहीए.
एकमेकांच्या मोबाईल नंबर्सची देवाण घेवाण झाली.
आणि इथेच मीरा चुकली.
मीराने अशा आजारी माणसाशी लग्न का केलं असेल, हा प्रश्न आकाशला सतावत होता. आणि ह्याच विचारातून आकाशने एक दिवस मीराला फोन केला ‘भेटूया का, गप्पा मारुया’ असं विचारलं.
मीरा बोलली आपण इथल्याच जवळच्या हॉटेलमध्ये भेटूया..
मीराने तिने कुठल्या परिस्थितीमध्ये सार्थकबरोबर लग्न केले आणि का केलं ते सर्व आकाशला सांगितले.
सार्थकचा बिझनेसही ती आता बघतेय त्याच्या घरची श्रीमंती अशा अनेक गोष्टी तिने आकाशाला सांगितल्या. पुन्हा भेटू, गप्पा मारू असं बोलून दोघे आपल्या वाटेला निघाले.
हळू हळू वर्षभरात आकाशबरोबर मीराच्या भेटी वाढल्या. ती दोघं एकत्र फिरायला जाऊ लागली. त्यांच्यातली जवळीक वाढू लागली.
मीराला आता आकाश जवळचा वाटत होता. त्याच्याबरोबर संसार थाटायची स्वप्नं ती बघत होती. सार्थक पासून तिला मुलं होत नव्हत. ती त्याच्यामुळे आई होवू शकत नाही आहे हा विचार तिच्या मनात घोळू लागला.
सार्थक पायानं अधू असला तरी कर्तबगार होता. मीरावर त्याचं खूपच प्रेम होतं. तो तिला नेहमी म्हणायचा, ‘‘ माझे पाय पूर्ण बरे झाले की मी तुला युरोपला पण नेईन हा ..’’
पण आता हल्ली मीराच्या वागण्यात झालेला बदल त्याला जाणवत होता. पण तो शांत होता.
मीरा बरेचदा ऑफिस मधून उशिरा येत असे, आकाश पहिल्यापासून पायांना जास्त त्रास नको म्हणून ऑफिसमधून पाच वाजता घरी येत असे.
त्यांच स्वतः चं तर ऑफिस होत. पण हल्ली मीरा अजून काम आहे सांगून सात – आठ वाजता घरी येत असे. ऑफिस स्टाफकडून ती साडे – पाचलाच रोज निघते हे सार्थकला समजले होते.
सार्थकने एके दिवशी मीराला या बाबतीत विचारलं, तेव्हा तिने मी मैत्रिणींकडे भिशी, किटी पार्टी असते म्हणून जात असते असं सांगून वेळ मारून नेली.
सार्थकला तिच्या डोळ्यात खोटेपणा दिसून आला. शेवटी एके दिवशी अगदी न राहवून सार्थकने तिचा पाठलाग करायचे ठरवले. आणि ऑफिस सुटल्यावर मीरा आणि आकाश त्याला दिसले.
त्याने ड्रायव्हर ला त्यांचा पाठलाग करायला सांगितले. आणि ते दोघे एका हॉटेलमध्ये गेले, आणि रूमची चावी घेवून वरच्या फ्लोअरला गेले.
सार्थकला खूप वाईट वाटले, तो पंधरा मिनिट गाडीत बसून अक्षरशः रडला, पण शेवटी स्वतः ला सावरत तो ड्रायव्हरला बोलला मला तिथे घेवून चल.
सार्थकने त्यांच्या रूमची बेल वाजवली. आकाशने दरवाजा उघडला, खोलीत बेडवर मीरा झोपलेली होती. संतापलेल्या सार्थकला असं समोर बघून ती घाबरली.
सार्थक बोलू लागला... ‘‘ तुला बिजनेस मध्ये पार्टनर केलं, तुला कसलीच कमी पडू दिली नाही, तुला गाडी घेवून दिली, पैसा भरपूर दिला, तुझ्यावर खूप प्रेम केलं त्याच आज हे फळ दिलंस तू मला."
मीरा ओरडून बोलली, "काय चुकीच वागतेय मी , सगळं आयुष्य मी तुमच्यासारख्या अपंग माणसाबरोबर नाही काढू शकणार. मला सशक्त जोडीदार हवाय.’’ मीराचा आवाज चढला होता.
"मग राहा या आकाशबरोबर. यापुढे माझ्या घरात तुला जागा नाही.’’ सार्थक ओरडून बोलला.
रात्री उशिरा मीरा घरी आली, आणि सार्थकला बोलली मी उद्या सकाळी घर सोडून जाते आहे.
सासू – सासरे तर ती सकाळी निघाल्यावर रडू लागले काय झालं असं सार्थकला विचारू लागले.
सार्थक बोलला मी नंतर सगळ सांगतो, मीराला कोणीच अडवू नका, जावूदेत तिला.
मीरा गेल्यावर सार्थकने पुन्हा आपल्या व्यवसायात लक्ष घातले, मधल्या काळात त्याने अनेक गोष्टी मीरावर सोपवल्या होत्या. आणि आता ऑफिसमध्ये नीट सगळं चेक केल्यावर जे वास्तव समोर आलं ते धक्कादायक होतं.
मीरा आणि आकाश ज्या हॉटेलला जात होते तिथली हॉटेलची लाखो रूपयांची बिलं कंपनीच्या पैशातून दिलेली होती. जाताना पन्नास लाख रोख रक्कम मीराने बँकेतून काढले होते.
मीरा असा विश्वासघात करेल याची त्याने कल्पनाचं केली नव्हती.
पण काळ हळू हळू पुढे सरकत होता. व्यवसाय अधिक जोमाने चालू लागला.
मीराने वकीलांमार्फत घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. एक कोटींची मागणी केली होती. ती अजूनच लोभी बनली होती. शेवटी सार्थक आणि त्याच्या आईबाबांनी निर्णय घेतला की परस्पर संमतीनं घटस्फोट अन् पोटगी म्हणून ऐंशी लाख रुपये देऊन तिचा विषय संपवूया.
ऐंशी लाख रुपये घेऊन मीराने सार्थकला घटस्फोट दिला आणि आकाशबरोबर लग्न केलं.
मीरा आनंदात होती. आकाश बरोबर खुश होती, भरपूर पैसा हातात आला होता.
हातात फुकटचा पैसा आल्यानं आकाशने हि नोकरी सोडून धंदा सुरू केला होता. दोघेही मुंबईला शिफ्ट झाले. भरपूर पैसे असल्याने जीवाची मुंबई करू लागले. पिकनिक, पार्ट्या, यात पैसे संपू लागले.
आकाशने नवीन बिजनेस चालू केला. मीराने आकाश आणि तिचं बँकेच अकौंट जॉइंट करून घेतलं. आकाश हवे तसे अकौंटमधून पैसे काढू लागला. दारू पिवू लागला. अशाने बिजनेस डबघाईत जावू लागला. धंद्यात नुकसान होवू लागले.
आणि एके दिवशी दारू पिवून गाडी चालवत असताना आकाशचा अपघात झाला. मीरा धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आकाश कोमात गेला होता. तीन दिवसाने शुद्धीत आला, पण मेंदूला जास्त लागल्याने त्याची शरीराची हालचालं मंदावली होती. हात – पाय जास्त काम करत नव्हते. एकवीस दिवसांनी त्याला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आले.
आजारपणामध्ये खूप खर्च झाल्याने पैशांची चणचण निर्माण झाली होती. एका जागेवर पडून पडून आकाश खूप चिडचिडा झाला होता. आता तो अपंग होता.
सार्थककडे तो अपंग असूनही स्वतःचा व्यवसाय आणि अफाट संपत्ती होती.
आकाशकडे तर काहीच नव्हतं. आजाराने एका जागेवर सतत पडून राहिल्याने आकाश मीरावर सतत ओरडत राही.
मीराला वाईट वाटायचं. तिच्या केलेल्या चुकांची शिक्षा ती भोगत होती.
तिला सार्थकची आठवण येवू लागली, त्याने वर्षात तिला कधीच दुखावलं नव्हत. तिचे खूप लाड केलं होते. तिला ते सगळं आठवून रडू येवू लागलं.
आकाशच्या उपचारांवर फार पैसा खर्च झाला होता. आता मुंबईत राहाणं मीराला अवघड वाटू लागलं म्हणून दोघेही आकाशच्या गावी नागपूरला जाण्यासाठी निघाले.
जाण्यासाठी मीरा व्हीलचेअरवरून आकाशला घेऊन विमानतळावर आली होती.
तिचा भूतकाळ तिच्या चुकीनं तिने उद्ध्वस्त केला होता. पण आता निदान भविष्य तरी वाचवूया या विचाराने ती निघाली होती.
गडबडीत मीराची पर्स खाली पडली आणि एका बाईने तिला ते सांगायला मिस तुमची पर्स असं बोलून आवाज दिला म्हणून ती उचलायला वाकली तर त्या बाईबरोबर सार्थक होता.
एका सीटवर बायकोच्या खांद्यावर डोकं टेकवून सार्थक निवांत झोपला होता. तेवढ्यात सार्थक उठून त्या बाईला चल निघूया असं बोलून चक्क चालू लागला.
मीरा मनात म्हणाली सार्थक चालायला लागला. उपचारांनी साथ दिली ह्याला, तरी तो म्हणत असे मी बरा होईन पण मीच करंट्या नशिबाची निघाले.
मीरा सार्थकला ती दिसू नये म्हणून पटकन पुढे चालत गेली. दोघंही खूप आनंदात दिसत होती.
मीराच्या डोळ्यांसमोरून भूतकाळ झरझर गेला. आज ह्याजागी मी असती पण माझी एक चूक आणि मी हि अशी व्हीलचेअरवरून आकाशला घेवून त्याच्या गावी शिफ्ट होतेय, हातात जास्त पैसे नाहीत तिथे जावून काय करणार माहित नाही.
आकाशचे आई – वडील अशा पहिल्या नवर्याला सोडून आलेल्या मुलीला स्वीकारतील का काय माहित. मी मृगजळाच्या पाठी धावले आणि कुठे येवून उभी राहिले आहे. मीरा विचार करत विमानात बसली.
आकाशच्या गावी दोघे पोचले आणि अपेक्षेप्रमाणे मीराचं स्वागत कोणीच केलं नाही.
तिची सासू मीराने तिचं लग्न झालेलं असूनही त्यांच्या मुलाला तिने नादि लावले असे सतत आरोप करत राहिली. आकाश सतत आजारी पडू लागला. होते, न्हवते तेवढे सर्व पैसे संपले आणि दोन वर्षांनी हार्टच्या आजाराने आकाश जग सोडून गेला.
आकाश वारल्यावर मीराचे हाल होवू लागले, सासू तर तिला घरची मोलकरीण समजू लागली. आणि शेवटी एके दिवशी कंटाळून मीराने विहिरीत उडी मारून स्वतः ला संपवले.
मीराने क्षणिक सुखासाठी सार्थकला सोडलं आणि शेवटी तिचा असा दुखद अंत झाला.
©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
सदर कथा लेखिका सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
