माझी होशील का? ( भाग 1)

©® मृणाल शामराज.




धड.. धड.. धड... लोकल पळत हॊती.
वेळ सकाळची...8.55 फास्ट ट्रेन...गच्च भरलेली.
ठाणे स्टेशन मधे शिरताशिरता शरुनी शिट्टी ऐकली..
कशीबशी धावत पकडली ट्रेन तिने..एवढ्या गर्दीत नेहमीच्या सराईतपणे आत चढली ती..

तिला हात देता देता ती बाई करवदली, अगं,मरायचंय का तुला..

उत्तरादाखलं शरु फक्त केविलवाणं हसली.. ते बघायला त्या बाईकडे कुठं वेळ होता.. ती बाहेर बघण्यात दंग झाली हॊती.

शरु तसच रेटत रेटत आत आली. पर्स वर टाकली आणि तिनं गच्च डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यानही तिला खूप बरं वाटलं..बरं झालं ट्रेन मिळाली .. नाहीतर आज रजा झाली असती.

कालच ऑफिस मधून तंबी मिळाली हॊती,उशीर झाला तर यायचच नाही..
काय दयायची रोज कारणं?
समोर बसलेली काय रोखून बघतेय आपल्या कडे तिच्या चष्म्यातून..?

उगाचच ओढणीचा कोपरा तिनी घट्ट धरून ठेवला..
चष्मा.. डोळ्यासमोर आली ती ऑफिस मधल्या वाकणकराची नजर.. त्या भिंगाच्या चष्म्यातून आरपार अंगभर फिरणारी..
तिनी नकळत ओढणी अंगभर लपेटून घेतली.
घाटकोपर गेलं होतं..
परत नवी गर्दी... आतल्यांचा एकत्र येऊन त्यांना प्रतिकार,दुसरं स्टेशन येई पर्यंत असंच.. परत नवीन गर्दी.. परत सगळ्या एकत्र येऊन तेच.

समुद्राच्या लाटा येऊन फुटाव्या,परत मागे जावून परत जोमानी पुढे यावं तसं काहीसं!
आज दिवसच कसा भगभगलेला वाटतोय..
ती ओठ मुडपून किंचित हसली,
नवीन काय? रोजचा दिवस असाच उगवतो.
"शरु.. शरु.. अगं किती उठवायचं? उठ ना लवकर.."
आईचं सतत हाकारणं चालूच होतं.

"आई.. झोपू दे ना.. थोडयावेळ.."
"अगं!पाणी भरायचंय.. नळावर गर्दी होईल."
"सुमीला उठावाव ना कधीतरी! नाहीतर राजला सांग."
"अगं तिचा हात दुखतो ना.. नाही झेपत तिला."
"राजला कॉलेजला जायचंय.. सायन्सला आहे ना.. खूप अभ्यास असतो त्याला.. उठ आता तू.."

नाईलाजाने शऱू उठते..
"आई.. चहा."
"जा आधी नंबरची बादली ठेवून ये. आणि तिथेच थांब कुणी बादली मागे सरकवेल."
साडेपाच वाजलेत.. चाळ केव्हाच जागी झाली आहे.
अजून थोडं झोपायला मिळालं असतं तर.. किती झोप येतेय.
रात्री दोन पर्यंत नोट्स काढत होतो.
परीक्षा जवळ आली आहे. आपल्यालाच हौस म्हणून एक्सटर्नल शिकतोय आपण.

नसलो सुमी सारख हुशार म्हणून काय झालं? ऑफिस मधे ही सुट्टी देतं नाही म्हणून सांगितलं.
मधे आई आजारी म्हणून सुट्ट्या झाल्या. चार राहिल्यात, त्या परीक्षेसाठी ठेवल्यात.
"अगं सरक ना पुढे.. बादली सरकली पुढे.."
अर्धा तास झाला..
चला, आला नंबर आता! तोपर्यंत आई अजून बादल्या घेवून आली.
दोघींनी पाणी भरल
आई.., सतत आजारी असते, तसं फार काही नाही.. पण कुरकुर सतत चालूच..

शरु मोठी, त्यात सोशिक. परिस्थितीनी आलेलं शहाणपण आणि जबाबदारी घ्यायची सवय, बाबा सरकारी नोकरीत, पण कारकून. त्यामुळे उत्पन्न यथातथाच.
पाठची दोन भावंड.
सुलू..पाठची बहीण. देखणी, हुशार. राज एकुलता एक भाऊ. कुलदीपक, त्यात हुशार.
दोघेही आईचे लाडके. आणि शऱू!
दिसायला सर्वसामान्य, बुद्धीने ही फार हुशार म्हणावी अशी नाही.
पण साधी, सरळ,प्रेमळ.परिस्थिती मुळे कसबस पदवी पर्यंत पूर्ण केलं आणि नोकरी पकडली.

अजून शिकायचं,पण इथं ही पण आडवा आला..
पुढच्या शिक्षणासाठी एक्सटर्नल ऍडमिशन घेतली.
बघू जमेल तसं करू म्हणून.
पहाटे उठायचं जमेल तितकी काम उरकायची की ऑफिस.
संध्याकाळी आलं की स्वयंपाकाचं काम तिचंच. घरात सतत आई, बाबांच्या कटकटी.
आईच्या अपेक्षा मोठ्या.. बाबा अती सामान्य, पुढे जायची धडाडी नसलेले.

त्यात शरु दिसायला,वागायला बाबांसारखी त्यामुळे आईची नावडतीच सकाळची कोवळी ऊन हळूच पसरत हॊती.
पाणी भरून झालं, कपडे धुवून दांडीवर गेले.पोळ्या करून झाल्या.
घड्याळाचे काटे सरकत होते.
"आई.. डब्बा."
"भरून ठेवलाय घे."
"सुलू, गरम पोळी झालीये, खाऊन घे..हो" आई.
"राज, दूध गरम करून ठेवलंय!"

शरुनी पाहिलं, मोठा ग्लास भरून गरम दूध ठेवलंय.
तिला हेही माहित आहे की ह्यात फक्त राजसाठी करून ठेवलेली बदाम पूड घातलीय.
सुलू,गरम पोळी खातेय.
आई.. मला,विचारायला जीभ रेटत नाहीये. लोकलची वेळ झाली आहे.
"आई.. येतें ग."
चप्पल पायात अडकवत शऱू निघाली.

आता तेच आठवतंय..पोटात भुकेनी खड्डा पडलाय.. तो खरपूस पोळीचा वास कुठेतरी मनात घुमतोय..
ती वरची पर्स देशील का ग..मुकाट उसासा टाकून तिनं पर्स मधुन बाटली काढली.ती पोटभर पाणी प्यायली. जरा बरं वाटलं तिला..
आज नवीन साहेब येणार होता. शिक्षणासाठी बाहेर होता म्हणे!
कसा असेल? आपण लागल्या पासून पहिल्यांदाच येतोय..
मॅडम यायच्या आधी.. पण तब्येतीमुळे आपण आल्या पासून त्या ही आल्या नाहीत.

दिड महिना तर झाला इथं लागून आपल्याला. 
ट्रेन दहा मिनिट लेट झाली.पळत पळत कसं तरी ऑफिस गाठलं. 
दारातच दत्तू, ऑफिस मधला शिपाई भेटला.
"काय रे! काय हालहवाल?आले का?" केबिनकडे बघत ती पुटपुटली.
डेस्कवर पर्स ठेवत नाही तो, "ताई.. साहेबांनी बोलवलंय.."
तिनं हातातल्या चिमुकल्या रुमालानी घाम पुसला.

आजूबाजूचे तिच्याकडे बघू लागले.
जाडजूड.. टकला.. किरकिरा..कुणीतरी आला असेल! बघू काय होतंय.

टॉक टॉक.. नॉक करत ती उभी राहिली.
"येस कम इन."
ती आत गेली. अरे.. तिचे डोळेच विसफारले!
तरुण,उंच, गोरपान, दाट केस.
हा साहेब...तो कामात दंग होता.
"सर.."
त्यानी वर पाहिलं..

ही.. अगदीच मध्यमवर्गीय दिसते आहे. सावळा रंग,नाजूक बांधा,कोरून काढावेत असे नाक, आणि टपोरे, मोठे बोलके डोळे..
गच्च बांधून ठेवलेले दाट केस.
स्वच्छ.. पण भांबावलेली नजर.
"सुप्रभात सर.." घंटेसारखा रुणझुण आवाज. हात जोडल्यावर दिसणारी लांबसडक नाजूक बोटं.
"गुड मॉर्निंग." जरा रुक्षच स्वर.
तरुण आहे, पण आहे खडूस म्हाताराचं!

शरु विचारानी खुदकन हसली.
"अं.. काय झालं."
"काही नाही." ती वरमली.
"ऑफिस दहाला चालू होतं, मला उशीर खपत नाही."
"हो, सर."
"ठीक आहे. आजच नोटेशन घ्या."
इतका रिस्पेक्ट,अपेक्षित नव्हता. तो सांगत होता,ती लिहीत हॊती..

एक मुद्दा निसटला होता त्यानी तो सांगितला..
"कुठं होतो आपण?" ती क्षणभर दचकली, पण तिनं पटकन सांगितलं.
अरे.. वा!लक्ष आहे हीच.
"बरं! आज हॆ कंप्लिट करा."
ती बाहेर आली.
"काय ग? खरडपट्टी का पहिल्यांच दिवशी
"नाही ग. बरा आहे तसा.. वाटलं तसं अगदीच खडूस नाही."
एकेकाला बोलवून प्रत्येकाची काम त्यानं ठरवून दिली.

कामात चुकारपणा चालणार नाही ह्याची त्यानं प्रत्येकाला जाणीव करून दिली. संध्याकाळी, ऑफिस सुटायच्या आधी ती केबिन मधे गली.
सुंदर अक्षरातले ते रिपोर्टस बघून तो खूष झाला.
"सर,हॆ बघता का? नीट झालं असेल तर प्रिंट काढते."
मोजके मुद्देसूद लेखन.,त्यातली अचूकता, प्रेसझेंटेशनची पद्धत. इतकं नेमकंपण! 
कसं जमतं हिला? त्यानी वर पाहिलं. ती त्याच्याकडेच बघत हॊती.

"मिस.."
"शरयू नाव माझं सर!काय झालं ? चुकलंय का काही? "
किती बावरली आहे ही.
"अहो.. नाही.खूप छान काम केलं आहे तुम्ही. कीप इट अप !" तो छानस हसला.
"जावू का मी सर ? "
त्यानं होकारार्थी मान हलवली.
तिनं पर्स उचलली आणि वळली तर वाकणकर तिच्या मागेच उभा.

"निघालीस का? टू व्हिलर आणली आहे. सोडतो तुला."
"नकॊ.आणि मिस शरयू म्हणा. " ती फणकऱ्यानी निघाली. 
"काय संबंध आहे ह्याचा?अगं, तुग करायचा?"
इकडे वाकणकर मनात म्हणतं होता, जाशील कुठं? काही नाही तरी हा दिमाख.. नाही तुला पटवलं तर बघ!
ती स्टेशनवर आली तर गाडी येतच हॊती..पटकन चढून तिनं जागा पटकवली.
चला, आजचा दिवस तरी छान गेला.

घरी आली तर कुलूप. हातपाय धुवून तिनं देवाला दिवा लावला. मस्त चहा केला. घोट घोट पीत ती विचार करत हॊती.
किती साधे आहेत साहेब. परदेशात होते म्हणे. दादरला बंगला आहे. आज ऑफिस मधे हीच चर्चा हॊती.
असू दे!आपल्याला काय करायचंय?
तोपर्यंत सगळे घरी आले,गप्पात दिवस संपला.
सकाळी जरा लवकरच उठली ती. पटपट आवरली सगळी काम.आता ऑफिसला उशीर करायचा नाही असं तिनं ठरवलंच.
पण परत तसंच.आज ही काही खायला वेळ झाला नाही.असू दे.
त्या दोघांना अभ्यास असतो,खाऊ दे त्यांना.

रोज असंच होतं होतं. पण ऑफिस मधे खूप आवडायचं तिला.
खूप गोष्टी तो समजवून सांगायचा. नवीन,नवीन गोष्टी शिकवायचा. काम करतांना मजा यायची तिला.
ऑफिसचे हॆ आठ तास तिला घरच्या कटकटी विसरायला लावायचे.
तो ही बघत होता. किती जीव ओतून काम करते ही.
सगळं काम नीटस.. देखणं.. ऑफिसमधे पण सगळ्यांना नीट सांभाळून घेते..आत्मविश्वास नाही असं नाही.. पण घाबरते ही.
तिनं स्वतःला ओळखावं असं त्याला फार वाटलं.

काही महिने असेच गेले. ऑफिसचं काम वाढलं होतं.प्रत्येक जण जीव तोडून काम करत होतं.
दिवाळी आता तोंडावर आली हॊती.
एक दिवस एक फोन आला ऑफिस मधे लँडलाईनवर.
नेमका शरुनी उचलला तो.
"श्री आहे का ?"
"कोण बोलताय आपण? "
"हॆ हाय टेक चं ऑफिस ना?"
"हो.श्रीकांत जोशी,आहेत का?"
"जोशी सर,का ? हो,देते. "

"आपण कोण बोलताय?"
"मी मिसेस जोशी."
"नमस्कार मॅडम.मी देते सरांना."
"सर.. घरून फोन आहे."
"बरं. " त्याला फोन देऊन ती बाहेर आली.
अच्छा ह्यांना श्री म्हणतात तर घरी. पाचच मिनिटात तो बाहेर आला.

"मी गडबडीत आहे. निघतो. ऑफिसच काम बघून घ्या."
काय बरं झालं असेल.. सर चिंतेत दिसले.
दुसऱ्या दिवशी पण तो उशिरा आला. तीच लक्ष सारखं त्या रिकाम्या खुर्चीकडे जात होतं.
"काय? आज करमत नाही का? सर नाहीतर.."
"वाकणकर.. माईंड युअर बिझनेस .. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला.."

आत येणाऱ्या श्रीच्या कानावर ही वाक्य पडली.
"सर आले.." दत्तू गडबडीने म्हणाला.
संतापानी तिचा चेहरा लाल झाला होता.. डोळे डबडबले होते.
"ताई.. आत बोलवलंय."दत्तूनी निरोप दिला.
तिनं डोळे टिपले आणि ती आत गेली.
"सर.."
"मिस शरयू.. कालच मी सांगितलेलं."
त्यानं वर पाहिलं.

"अरे, काय झालं हिला?अशी हताश का वाटतेय! डोळे ही पुसल्यासारखे वाटतात आहेत."
"काय झालं? "
"काही नाही सर..."
त्यालाही हॆ जाणवलं होतं. तो वाकणकरसारखं हिच्या मागावर असतो.
"मिस.. एक सांगू का क? रागवणार नसाल तर. "
नाकाचा लाल झालेला शेंडा तिनं हळूच पुसला.
किती सरळ नाक आहे हीच.

"सर.." तो भानावर आला..का गुंतत चाललोय आपण हिच्यात, नाही.. नकॊ.
"सर.. काही सांगणार होतात ना? "
"किती भाबड्या आहात तुम्ही.. या जगात असं चालत का.? खंबीर व्हा. स्पष्ट नाही म्हणायला शिका. आपल्याला हवं ते मागायला शिका. न मागता काही मिळत नसतं."
तिनं चमकून वर पाहिलं.
खरं.. हा विचार आपण का नाही केला कधी. नाही. सर म्हणताहेत ते खरं आहे.
आपण आपलं वागणं बदलायचचं.

तो तिचे भाव निरखत होता.
हो.. नाहीचा संभ्रम तिच्या चेहऱ्यावर सहज दिसतं होता.
"सर.. ठरलं असंच करणार." दोघं ही मनापासून हसले.
"सर.. एक विचारू? मिसेस जोशी ठीक आहेत ना? काल गडबडीत गेलात. राग मानू नका. मी विचारलं म्हणून. "
"नाही. जरा काम होतं म्हणून जावं लागलं. "
"बरं. निघू का सर. "
"बरं."

श्रीला आठवलं सगळं कालचं. आईचा फोन आला बरं नाही
त्याला आठवलं, काल दुपारी आईचा फोन आला,बरं वाटतं नाहीये,ये.
तसंच काम टाकून गेलो आपण घरी. पोचलो,तर दारातच खळखळून हसण्याचा आवाज आला.
आई.. हा तर आईचा आवाज.
अजून कोण आहे.. काय चाललंय इथे ?
तो आत आला..
"ये, रे.."
"आई.. काय झालं तुला अचानक? "

"काही नाही रे.. बघ कोण आलंय!"
ही शीला मावशी.. आठवतंय का आपण दिल्लीला गेलो होतो, हिच्या घरी.
त्याला आठवलं, नुकतीच बारावी झाली हॊती त्याची.बाबांची कॉन्फरन्स हॊती दिल्लीला. तो, आणि आई पण गेले होते त्यांच्या बरोबर.तेव्हा हिला भेटलो होतो.
आईची बेस्ट फ्रेंड.. आणि एक नमुना होता हिच्या घरी, काय बरं नाव तिचं..
"मम्मा..". लाडीक आवाजानी तो भानावर आला.
हेच ते पात्र बहुतेक..

गोरीपान, गोलमटोल.. चेहरा रंगवलेला,हीच ती..
"श्री अरे ही रैना.. आठवतेय का?"
"हिला कसा विसरेन!"त्याच्या चेहऱ्यावर मिस्किल भाव आले.
लाडवलेलं कार्टून..
"अय्या.. विसरला नाहीस मला?"
"अगं, ते अंगावर सांडलेल ice-cream अजून आठवतंय मला!"
"हॆ काय आई.. मला काम सोडून बोलवलंस? तू तर बरी दिसते आहेस."

"अरे,ह्या दोघी दोन दिवस आल्यात. रैनाला कंटाळा आला.. म्हणून बोलवलं तुला."
"मी काय जोकर आहे करमणूक करायला ? "
रैना हा.. हा.. जोरात हसली.
त्यानं जरा चिडूनच तिच्या कडे बघितलं.
"जा, फ्रेश हो.. थोडं बाहेर जावून या."
नाईलाजाने तो तिला घेऊन बाहेर पडला.


कारमधे तिची अखंड बडबड चालली हॊती. सगळा बालिशपणा.
"कुठल्या कॉलेजला होतीस? काय शिक्षण झालं?"
"श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स मधुन एम कॉम केलंय."
"आता काय करतेस ?"
"सकाळी आरामात उठते.. दिवसभर असंच विंडो शॉपिंग.. मूवी.. मॉल.. रात्री पब.."
"आई, बाबा काही म्हणत नाहीत ?"
"आई बाबा पण हेच करतात. गडगंज पैसा आहे,काय करायचंय ? तुझं काय.. तुला आवडतं का हॆ सगळं ?"

"हट.. नाही. "तो तडकन म्हणाला.
"असं रे काय.. मग आपलं कसं जमणार?" ती लाडीक म्हणाली.
"कशाला जमायला हवंय ? तू तुझ्या घरी,मी माझ्या."
"अरे,आपल्या मॉम आपलं लग्न ठरवताहेत!"ती लाजण्याचा केविलवाणा प्रयत्न करत म्हणाली.
तरीच, आईनी घाईनी बोलवून घेतलं.
"माझे आई.. माझ्या डोक्यात असं काही नाही. तू तुझ्या आवडीचा, तुझ्या मनाप्रमाणे वागणारा एखादा बघ. जावू या का परत घरी? मला एका अर्जंट मीटिंगला जायचंय."

घरी तिला सोडून तो परत बाहेर गेला.
त्याचा नूर बघून मालिनीला त्याच्या आईला काय झालं असेल ह्याचा अंदाज आला.दोन दिवस राहून त्या आज परत जाणार होत्या.
आता त्याला तेच सारं आठवत होतं.
ही आई पण.. उगाचच मागे लागली आहे.
काय ध्यान होतं ते!काय कपडे.. सगळं अंग उघडं.. आपल्यालाच ओशाळवाणं वाटतं होतं.. तो पैशाचा माज..
"सर.. येऊ का आत?"
"या.. ना."
तो फाईल चाळण्यात मग्न होता.

क्रमश:


©® मृणाल शामराज.

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

ही कथाही अवश्य वाचा


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने