पहिलं प्रेम

©️®️ सायली जोशी




'आयुष' साधारण सहा फूट उंची, कुरळे केस, भेदक डोळे, धारदार नाक, गव्हाळ वर्ण. एखाद्या चित्रपटातील हिरोला शोभेल असे व्यक्तिमत्व लाभलेला शहरातील एक उत्कृष्ट आणि प्रसिध्द फोटोग्राफर.
लहानपणापासून असलेली फोटोग्राफीची आवड त्याने आपल्या व्यवसायात रूपांतरीत केली होती आणि एक आज एक 'उत्कृष्ट फोटोग्राफर ' म्हणून त्याची साऱ्या शहरात ओळख होती.

एका कामानिमित्त शहरातील प्रसिद्ध शॉपिंग मॉलमध्ये फिरत असताना त्याने सहज क्लिक केलेल्या, एका काचेच्या दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या सुंदर तरुणीचा फोटो तो कितीतरी वेळ पाहत उभा होता.

नकळत कुठूनशी आलेली उन्हाची तिरीप तिच्या चेहेऱ्यावर, केसांवर अलगद विसावली होती. वाऱ्याने उडणारे केस सावरत असताना तिची छबी कॅमेरात अगदी सफाईदारपणे क्लिक झाली होती. 
कॅमेऱ्यासमोरचा चेहेरा वाचण्याची कला अवगत असलेल्या आयुषला या फोटोमध्ये असे काय वेगळेपण आहे? हे उमगतच नव्हते.

"ठरवूनही अशी पोझ मिळाली नसती. एकदम परफेक्ट लूक आहे!"

तो कितीतरी वेळ त्या फोटोकडे पाहत होता.

हरिणीसारखे डोळे, किंचित उंच असलेला नाकाचा शेंडा, नाजूक जिवणी, बाकदार हनुवटी.. चेहेऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा सावरताना तिचा नकळत काढलेला फोटो आयुषने गेल्या दोन दिवसांत कित्येक वेळा पाहिला असेल!

'आपल्याला नक्की काय होतंय?' हेच त्याला कळत नव्हतं. 'हे लव अॅट फर्स्ट साईट तर नाही?' तो आपल्याच विचारात हरवला होता.

'आजवर इतके फोटो काढले. पण याहून कुठलीच स्त्री सुंदर नव्हती.' अचानक त्याला आपल्या नसलेल्या आईची आठवण झाली. 
'सगळे म्हणतात, आई खूप सुंदर दिसायची. पण ती मला पाहायला मिळाली नाही.
' आई म्हणून कोणाचा चेहरा डोळ्यांसमोर आणायचा? त्याच्या मनात आपल्या आईची प्रतिमा स्पष्ट नव्हती.

इतक्यात फोन वाजल्याने त्याची तंद्री भंग पावली.

"हॅलो आयुष, एक इन्क्वायरी आहे. परवा आपण ज्या शॉपिंग मॉलमध्ये फोटोज् काढले होते, तिथेच एक फोटो शूट करायचे आहे. मी क्लायंटचा नंबर पाठवतोय. बाकी डिटेल्स विचारून घे. 
पेमेंट आणि कामाचं स्वरूप पटलं तर करू. तू बाकी बघून ये." एवढं बोलून मित्राने फोन ठेवून दिला.

त्याच मॉलमध्ये पुन्हा जायचं म्हणून एक्साईट झालेल्या आयुषने, मित्राने पाठवलेल्या नंबरला फोन लावला. 
प्रॉडक्ट फोटोग्राफीचे काम होते. म्हणजे अगदी त्याच्या आवडीचे! तो काही वेळातच त्या शॉपिंग मॉलमध्ये पोहोचला.
अॅड्रेस सांगितलेल्या शॉपसमोर उभा राहिला आणि पुढच्या क्षणी तिने दार उघडले.

"या, आत्ता माझ्या असिस्टंटने म्हणजे वेदांतनेच तुम्हाला फोन केला होता." एक मधाळ आवाज त्याच्या कानापाशी गुणगुणला.

"तुम्ही! आणि इथे?" आपण जिचा फोटो काढला तिला अचानक समोर पाहून आयुषला आश्चर्याचा धक्काच बसला.

"म्हणजे? तुम्ही मला ओळखता की काय?" ती आपल्या केसांच्या बटा कानामागे सारत किंचित लाजून म्हणाली. तिची ती नेहमीची लकब असावी, असे आयुषला उगीचच वाटून गेले. 
नकळत त्यानेही आपल्या केसातून हात फिरवला.

"नाही. मी ओळखत नाही. ते आपलं..परवा फोटोग्राफी करताना तुम्हाला इथेच पाहिलं होतं म्हणून म्हणालो." आयुष आत येत म्हणाला.

"अच्छा. हो का? म्हणूनच कॉल केला आम्ही. प्लीज बसा. बाय द वे, चहा घेणार की कॉफी? नाही म्हणू नका. दोन्हीपैकी काहीतरी घ्यावं लागेल हा."

"काहीही चालेल." आयुष आपली बॅग खाली ठेवत म्हणाला.

तशी तिने कॉफीची ऑर्डर दिली.

"हे आपलं ब्युटी प्रॉडक्ट्सचं शॉप आहे." तिने भराभर सगळे प्रॉडक्ट्स दाखवले. "सगळे प्रॉडक्ट्स ब्रँडेड असतात हं. उत्तम क्वालिटीचे!
याची फोटोग्राफी करायची कल्पना खरंतर माझ्या असिस्टंटची. त्याने तुम्हाला परवा मॉलमध्ये पाहिलं, तेव्हा त्याला ही कल्पना सुचली.
शहरातल्या एका उत्कृष्ट फोटोग्राफरने आमच्या प्रॉडक्ट्सचे काढलेले फोटो असतील तर आमचा फायदा नाही का होणार? पर्यायाने आमचे ग्राहक वाढतील. तितका खपही वाढेल. मग ग्राहक आणि आम्ही दोघेही खुश!" ती छान बोलत होती आणि आयुष नुसताच ऐकत होता. 

मधेच तिच्याकडे टक लावून पाहत होता.
गोरा रंग, नाकी -डोळी अतिशय सुंदर, शरीरयष्टीला साजेशी उंची, नाजूक बांधा. 
तिच्या चेहऱ्यावर मेकअप केल्याची एकही खूण दिसत नव्हती. तिचं सौंदर्य एकदम नॅचरल होतं. 

आपल्या कॅमेऱ्याने चेहऱ्यावरचे सौंदर्य टिपणाऱ्या आयुषला ती मनापासून आवडली.
नकळत तो तिच्यात हरवून गेला होता.

"हॅलो, कुठे हरवून गेलात? तुम्हाला आमचे प्रॉडक्ट्स बरे वाटले ना?" तिच्या आवाजाने आयुषची तंद्री भंगली.

इतक्यात कॉफी आली.

"प्रॉडक्ट्स तर छान आहेत आणि फोटोग्राफीसाठी जागाही उत्तम आहे. हे फायनल करू. आता तुम्ही सांगा, कधीपासून काम सुरू करूया?" आपली नजर तिच्यावरून हटवत, आयुषने सगळे प्रॉडक्ट्स डोळ्यांखालून घातले. 
काम कसे करता येईल, याचा अंदाज घेतला. त्यासाठी काही फोटोज् काढून घेतले आणि आपल्या मित्राला फोन लावला.
 काही मिनिटे बोलून आयुषने फोन ठेऊन दिला.

"दोन दिवसांत काम सुरू करूया? म्हणजे त्याआधी आम्हाला तयारी करता येईल. चालेल ना?" ती आपल्या मानेला हलकासा झटका देत म्हणाली.

"चालेल. मी संध्याकाळी येऊन सगळं फायनल करून जाईन आणि पेमेंटसाठी दोन कोटेशनही देईन. तुम्हाला जे सूट होईल ते फायनल करू." आयुष आपल्या कॅमेऱ्याची लेन्स बॅगमध्ये ठेवत म्हणाला. 
तशी तिने मान डोलावली. 
आयुषने सगळे प्रॉडक्ट्स पुन्हा एकदा नजरेखालून घातले.

"चला, मी निघतो. संध्याकाळी पुन्हा भेटू."
आयुष वेदांतच्या हातात हात देत म्हणाला.

पुढे जातो न जातो तोच आपली बॅग विसरल्याचे लक्षात येताच आयुष पुन्हा मागे वळला.

"थॅन्क्स वेदांत. मी जेव्हा पहिल्यांदा आयुषला पाहिलं होतं, तेव्हाच तो मला आवडला होता. यू नो? लव अॅट फर्स्ट साईट." तिने लाजून एक छानशी गिरकी घेतली आणि आपल्या मागे उभ्या असलेल्या आयुषला पाहतच ती एकदम दचकली.

"तुम्ही पुन्हा आलात का? सॉरी, ते आपलं.." तिने आपले हात पटकन आपल्या चेहऱ्यावर ठेवले.

"सॉरी. माझी बॅग इथे विसरली म्हणून आलो." तो गालातल्या गालात हसत आपली बॅग शोधत म्हणाला.

"हा. ही घ्या." काही मिनिटांतच ती मान खाली घालून पुढे आली.

"संध्याकाळी किती वाजता याल? म्हणजे शॉप ठीक आठ वाजता बंद होतं. जास्त उशीर झाला तर घरी आवडत नाही. मग आई ओरडते. मुली कितीही मोठ्या झाल्या तरी आईला त्या लहानच वाटतात." ती बॅग देताना एखाद्या लहान मुलीसारखी गडबडीने म्हणाली. 

तिला आयुषच्या नजरेशी नजर मिळवण्याचे धाडस होईना.

बहुतेक तिला खूप बोलायची सवय असावी. आयुष तिला न्याहाळत म्हणाला, "तुम्ही म्हणाल त्या वेळेत येतो." बॅग घेताना तिचा नकळत झालेला स्पर्श त्याला खूप काही सांगून गेला.

"ठीक सात वाजता याल? आणि हो, ही कॉफी तशीच राहिली की." आता ती थेट आयुषच्या डोळ्यात पाहत, गोड हसून म्हणाली.

"आता राहू दे. माझ्या वाटणीची कॉफी तुमच्या असिस्टंटला द्या. मी संध्याकाळी येईन त्यावेळी नक्की कॉफी घेईन ." तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.

तशी तिने लाजून आपली नजर फिरवली.

"नक्की या. मी वाट बघते." नकळत तिच्या तोंडून निघून गेलं.

तसे दोघेही एकमेकांकडे पाहून छान हसले आणि ही दोघांच्या पहिल्या -वहिल्या प्रेमाची नुकतीच सुरुवात झाली होती!

समाप्त.

©️®️सायली जोशी.

सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

ही कथाही अवश्य वाचा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने