करडा रंग



©® माधवी देवळाणकर






"बाई!! तुम्हाला कळलं का?"
मी झाडू मारणाऱ्या लताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
तशी ती झाडू ठेवून माझ्यापाशी आली व बसली. 
"म्हणजे? तुम्हाला माहीतच नाही होय?"
काही तरी मोठा गुन्हा झाल्यासारखा तिचा चेहरा बघून मी दचकले व म्हणाले, "अग!! सांग ना लवकर. नमनाला किती घडाभर तेल ओतशील."
तशी ती सावरून बसली व म्हणाली, "तुम्हाला ती देशमुखांचे घर माहीत आहे ना!! त्यांची नवीन सून रेखा. वर्षांपूर्वी लग्न झाले होते तिचे"

आता मात्र माझी उत्सुकता ताणली गेली, मी जवळ जवळ ओरडलेच, "अग!! काय झाले तिला? पटकन सांग"
"अहो काल तिने स्वतःला जाळून घेतले…" असं म्हणून लता हनुवटीवर हात ठेवून माझ्याकडे बघत बसली.
हे ऐकून मला धक्काच बसला.
रेखा!! चार दिवसांपूर्वी तर भेटली होती मला. छान गप्पा पण मारल्या आम्ही. आणि तिने स्वतःला जाळून…. 
कसे शक्य आहे?
"अग !! चार दिवसांपूर्वी भेटली होती ती मला. किती छान गप्पा मारल्या आम्ही. आणि आज अचानक असे… नेमके काय झाले…?"

झाडू हातात घेत एक उसासा सोडत लता म्हणाली, "काय माहित बाई ? का असं केलं असलं तिने?"
मी शून्यात बघत राहिले.
तेवढ्यात लता पुन्हा झाडू ठेवून माझ्यापाशी आली व हलक्या आवाजात म्हणाली, "बाई खरं खोटं देवाला माहीत. पण बाहेर काही बाही ऐकलं म्या"
"काय ऐकले तू…?"
"बाई!! त्या रेखाच मनाविरुद्ध लग्न झालं होतं म्हणे. तीच कुणावर तरी प्रेम होतं असं म्या ऐकलं"

"काही तरीच काय..? लोक वाटेल ते बोलतात"
मी लताला झिडकारून लावले. ती पुन्हा झाडू मारू लागली.
मला काही सुचेना. दोन बिल्डिंग सोडून रेखा राहत होती.
तिची सासू व माझी सासू शाळा मैत्रिणी म्हणून जरा जास्तच घरोबा होता आमचा.
त्यांची दोन मुले नौकरिनिम्मित बाहेरगावी होती व हा तिसरा मुलगा, त्याची बायको रेखा.
नवीन लग्न होऊन आली तेव्हा रेखाच्या सासूने आवर्जून तिची व माझी ओळख करून दिली होती. 

त्यानंतर आम्ही निमित्ताने भेटत होतो. तिच्या व माझ्या वयात दहा वर्षाचे अंतर होते. तरीही आमचे ट्युनिंग छान जमले होते.
आतापर्यंत कितीदा आम्ही भेटलो होतो. पण तिच्या वागण्या, बोलण्यात कधी दुःखाचा स्वर मला आढळला नव्हता.
मी कविता,लेख, कथा वगैरे लिहते ह्याचे तिला खूप कौतुक वाटे. माझ्या कित्येक कार्यक्रमांना ती हजेरी लावायची.
तेवढ्यात फोन वाजला.
"हॅलो!!"
"बोल प्रिया!!"
"अग तुला समजलं का? ती देशमुखांची सून…. तिने म्हणे…."

मी तटकन तिचे बोलणे तोडत म्हणाले, "हो!! आत्ताच कळले"
"बिच्चारी!!"
मला प्रियाशी बोलणे नकोच वाटू लागले. तो नाटकी स्वर, सहानुभूती… शब्दांना दुःखाचे कढ लावत नको त्या चौकशा. सगळं असह्य होऊ लागले मला.
"प्रिया नंतर बोलू या का…? कुणीतरी आलंय बहुतेक"
"बरं!! पण तू जर जाणार असशील तर कळव मला. तसही बॉडी पोस्टमार्टेमला नेली आहे म्हणे… वेळच लागणार यायला"

मी काही न बोलता फोन कट केला. तेवढ्यात सायरन वाजवत दोन गाड्या गेल्या. लता लगबगीने ओल्या हाताने गॅलरीत धावली.
"बाई !! पोलीस आले"
मी पण घाईतच गॅलरीत गेले. आमच्या बिल्डिंगपासून रेखाची बिल्डिंग थोडी समोर होती. त्यांच्या बिल्डिंगचे फक्त गेट दिसायचे माझ्या गॅलरीतून. त्या बिल्डिंगच्या बाहेर खूप लोक घोळक्या घोळक्याने उभे होते.
त्या गाड्या आत शिरल्या. माझी नजर सहज रस्त्यावरच्या गुलमोहराकडे गेली. 
नेहमी सळसळ करणारा तो आज शांत उभा होता. 
मी आत निघून आले. माझ्यापाठीमागे लता आत आली व म्हणाली,

"बाई!! आता पोलीस तिच्या नवऱ्याला धरून नेतील का हो?!!"
"अग!! चौकशीसाठी आले असतील. इथं बसून मला कसं कळणार?"
मी जरा चिडलेच. लता पटकन आत जात म्हणाली, "माझं त्या बिल्डिंगमध्ये एक काम बाकी आहे. आता तिकडेच जाते."
ती आत निघून गेली. मला काही सुचेना.
तशी खूप घनदाट मैत्री नव्हती आमची. पण खूप बोलघेवडी होती ती. त्यामुळे भेटल्यावर खूप गप्पा व्हायच्या आमच्या.

छान राहायची. एकदम टिपटॉप.
मी एकदा तिला म्हणाले होते, "रेखा !! मला नेहमी तू सिरीयलमध्ये काम करणाऱ्या बायकांसारखी वाटतेस. नेहमी अपडेट. कसं जमतं ग तुला?"
"ताई !! आवडतं मला असं राहायला. तुमच्या राहणीमानातून तुमचं अर्धे व्यक्तिमत्त्व लक्षात येते. आता तुम्ही नेहमी डिसेंट कपडे घालता. त्यावरून तुम्ही शांत स्वभावाच्या असाल असे लक्षात येते. अर्थात हे माझे अनुमान आहे बरं!!"
"अग !! घरात नेहमी गबळ्या अवतारात असते मी. माझा नवरा चिडवतो मला. तुझ्यापेक्षा लता चांगली राहते म्हणून…"
त्यावर आम्ही खूप हसलो होतो.

"बाई!! मी चालले!!" असं म्हणत लता दरवाजा ओढून निघून गेली. आणि मी भानावर आले.
आता घरात मी एकटीच… ह्या विचाराने क्षणभर अस्वस्थ वाटले.
लता होती तोपर्यंत एक जिवंत जाणीव आजूबाजूला वावरत आहे. हा दिलासा वाटत होता.
मी उठून किचनमध्ये गेले. ग्लासभर पाणी पिल्यावर बरे वाटले. 
पुन्हा हॉलमध्ये आले. हॉल एकदम चकचकीत होता.
मी घरावरून नजर फिरवली. हे माझे घर. इथल्या प्रत्येक वस्तू मी घेतल्या. त्या वस्तुंना त्यांची जागा दिली. मी टेबलवरचा फ्लॉवरपॉट उचलला. हा मी लोणावळ्याला गेले होते तेंव्हा आणला. रंगबिरंगी काचेनी जोडलेला. युनिक असा. मी पुन्हा काळजीपूर्वक तो ठेवला.

रेखाने स्वतःला काडी लावली. तेव्हा तिला कोणत्याच गोष्टींचे बंध का अडवू शकले नाहीत…? निर्जीव, सजीव असे कोणतेच बंध तिच्यालेखी नव्हते का…? अश्या एकामागून एक प्रश्नांची आवर्तने मनावर आदळू लागली. मी मग न राहवून फोन उचलला.
व्हाट्सएपच्या कॉलनीच्या ग्रुपवर तीच चर्चा, तिचे जुने फोटो, तिचे किस्से ह्याने ग्रुप ओसंडून वाहत होता. मला ते बघवेना. मी फोन बंद केला.
मनात काही तरी ठसठसतय पण तो ठणका कुणाला सांगता येत नाही. अशी काही तरी विचित्र अवस्था झाली होती माझी. 

पुन्हा फोन वाजला,
"हॅलो!!"
"हं!! बोल!!"
"कळलं ना तुला?"
"होय"
"जाऊन आलीस?"
"नाही अजून.."
"का बरं…?"
आता ह्या का बरं..? ला काय उत्तर द्यावे. हे मला सुचेना.
"बहुतेक आम्ही सगळ्या तिची बॉडी आणल्यावर जाऊ तिकडे"
"अच्छा!! मी पण लवकरच येतो आज ऑफिसमधून"
"ओके"

फोन बंद झाला. माझ्या लक्षात आले. थोड्यावेळापूर्वी प्रियाने बॉडी हा शब्द उच्चारला तर आपण अस्वस्थ झालो होतो. पण आपण देखील आत्ता सहजपणे तोच शब्द उच्चारला.
मला आता खरंच मानवी मनाची गंमत वाटली. किती लवकर आपण आता ती ह्या जगात नाही. ह्याची सवय करून घेतली. ती आता ह्या जगाच्या पलीकडे कुठेतरी निघून गेली. हे सत्य आपण स्वीकारत आहोत. हे जाणवून ती दचकलीच.
दुपारचे दोन वाजले होते. पोटात कावळे भूक लागल्याची जाणीव करून देत होते.
पण इच्छा होत नव्हती. दोन ग्लास पाणी पिऊन मी अर्धे राहिलेले सफरचंद खाल्ले, अन्न फ्रिजमध्ये कोंबले व डोळे मिटून सोफ्यावर पडले.

सकाळपासून झालेल्या मानसिक श्रमाने पटकन डोळा लागला.
"ट्रीगं … ट्रीगं…." बेल वाजत होती. डोळे चोळत घड्याळाकडे पाहिले. चार वाजत होते.
"अरे बापरे!! बराच वेळ झोप लागली"
असे म्हणत दरवाजा उघडला. समोर राहणारी मिश्रा होती.
"आईए!!"
"नही भाभी!! वो अगर आप उधर जानेवाली हो तो बताना! मै भी आती हुं साथ मे"
"जी ठीक है!!"

ती गेल्यावर दरवाजा बंद करून मी आत वळाले. डोकं दुखत होते. बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ तोंड धुतले व किचनमध्ये जाऊन हवी तशी कडक कॉफी करून घेतली. 
कॉफीचा मग घेऊन मी बाल्कनीत आले.
नजर तिच्या बिल्डिंगकडे गेली. आता तिथली गर्दी कमी झाली होती. थोडी फार माणसे दिसत होती. कदाचित नातेवाईक असतील. मी आत आले. 
कॉफीच्या घोटाने भूक चाळवली गेली. डब्ब्यातले बिस्कीट घेतले. कॉफी व बिस्किटे खाल्ल्याने डोकं थोडं शांत झाले होते.

पाच वाजत होते. फोनवर नोटिफिकेशन वाजत होते. मी व्हाट्सएप बघितले. ग्रुपवर कधी निघायचे? वगैरे चर्चा चालू होती. एकीने विचारले, "पांढरा ड्रेस कंपल्सरी असतो का?"
मला चिडच आली. मी फोन बंद केला.
अरे एक चालता, बोलता जीव गेला आहे? ह्याने तुम्हाला काही फरक पडत नाही का? तिच्या असण्या नसण्याची किंमत शून्य झाली होती. तीच अफेयर, तिचा नवरा, सासू मानसिक छळ करत होते. याबद्दल रसभरीत वर्णन. ती असताना कुणाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. मग आताच कुठून उडत आल्या या बातम्या?

कुणी म्हणे तिला मुलं होत नाही म्हणून नवरा व सासू बोलायचे.
खरंच रेखाला मला या सगळ्यातला एक शब्दही कधी सांगावा का वाटला नाही? की मी तिला जवळची, विश्वासाची कधीच वाटले नाही. बरं मी नाही तर अजून कुणी. एखादी मैत्रीण, मित्र, आई, बहीण, भाऊ, बाबा…. मानवी नात्याची भली मोठी लिस्ट डोळ्यासमोर येऊ लागली.
मग रेखाला इतकं जवळच, मनातली सल उलगडून दाखवावी कुणीच नव्हते का…? शेवटी तिला अग्नीची एक ज्वाळा जवळची वाटली. आपली दुःखे तिला सांगून ती त्यात विलीन झाली. अगदी मुक्त… उन्मुक्त….

एकदा ती मला म्हणाली होती, "ताई!! तुम्ही लेखक कल्पनेच्या जगात जास्त वावरत असता का…? जे दिसतं त्या पलीकडच्या कविकल्पना सोडून त्यांना वास्तव दिसतं नाही का…?"
हे बोलताना तिचे डोळे गढूळ झाले होते…
काय सुचवायचे होते तिला मला….
विचारांच्या ह्या अवर्तनात डोकं, मन गरगर फिरू लागले.
मी दोन्ही हाताने डोकं गच्च धरले व म्हणाले, "रेखा!! एकदा तरी बोलायला हवे होते ग!!" आणि डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागले. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक… फोनची रिंग वाजत होती.

"हॅलो!! अग निघायचे आहे ना?आम्ही सगळ्या खाली आहोत. ये पटकन"
कसेतरी तोंड धुतले. अंगावर बऱ्यापैकी ओढणी घेतली व लॅच लावून खाली उतरले. तेवढ्यात मिश्रा भाभीची आठवण झाली. त्यांना फोन करून खाली बोलावले.
प्रिया मला बघून म्हणाली, "अग!! डोळे किती लाल झाले आहेत तुझे? रडलीस का?"
मी काहीच बोलले नाही. मी बोलले तरी ते तिच्यापर्यंत कितपत पोहचणार होते. हे जाणवून मी गप्प बसले.

सगळ्या काही तरी बोलत होत्या. बोलता, बोलता बिल्डिंग जवळ आली. तेवढ्यात नवऱ्याचा फोन आला.
तो तिथेच होता.
रेखाला थोड्या वेळात आणणार होते. तिच्या घरात पाऊल ठेवताना मनात कुठेतरी चर्रर्र झाले.
तिचा एक फोटो एनलार्ज करून ठेवला होता. त्यावर निशिगंध व गुलाब ह्यांचा ताजा हार होता.
एकदा आम्ही भेटलो तेव्हा तिच्या हातात खूप सारा निशिगंध होता. मला म्हणाली, "मला खूप आवडतो निशिगंध, पण नवऱ्याला मुळीच आवड नाही. मग मीच बाजारात गेले की आणत असते…"
आज ती नाही पण तिची ही आवड लक्षात ठेवून निशिगंध तिच्या फोटोवर लटकत होता. 

मी तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो शून्य नजरेने कुठेतरी बघत होता. मनात आले, "बायको होती त्याची. वर्षभराच्या प्रवासात काहीतरी सुखदुःख वाटली असतील ना दोघांनी"
आम्ही हॉल मध्ये बसलो, तिची आई व सासू रडत होत्या.
मधेच कुणीतरी त्यांना चहा, पाणी पाजत होते.
कुणीतरी आम्हाला पण चहा आणून दिला. काय बोलावे हे न सुचून आम्ही उगाच चुळबूळ करत होतो.
नेहा हळूच कानात कुजबुजली, "खूप वेळ लागणार आहे असं दिसतंय. स्वैपाक करून आले असते तर बरं झाले असते.."

मी काहीच बोलले नाही. आता कुजबुज फारच वाढू लागली होती.
संध्याकाळच्या धूसर छाया पसरू लागल्या. आजपर्यंत ती संध्याछाया मला नेहमी लुभावत होती. पण आज ती नकोशी वाटत होती. ह्या छायेला मरणाचा एक गंध चिटकला होता. करडा असा….
मला तिथे बसवेना. तेवढ्यात कुणीतरी म्हणाले, "बॉडी आली!!"
मला धस्स झाले. नजरेसमोर अंधार दाटू लागला. मी डोळे मिटून घेतले.
कुणी तरी मला म्हणाले, "उठ ग!! तिला आत आणत आहेत!!"

आता रडण्याचा एकच कल्लोळ उठला. पांढऱ्या शुभ्र कपड्यात लपेटून आणले होते. चेहरा दिसतच नव्हता.
"नव्वद टक्के जळली होती !!" पाठीमागून आवाज आला.
लता, प्रिया, निशा, नेहा सगळ्याच रडू लागल्या. पण माझ्या डोळ्यातून टिपूसभर पाणी येईना. मला खूप रडावं वाटत होते पण डोळे कोरडे होते.
अर्ध्या, एका तासांनी तिला बाहेर नेण्यात आले. त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यालाच एक सुंदर नवी साडी, गजरा वगैरे घालण्यात आले. मला ते सगळे खूपच विचित्र वाटत होते. पाहवत नव्हते. बघितलेले हॉरर मूवी समोर नाचत होते. मी पटकन मान वळवली.

नेहा कोपऱ्यात बसली होती रडत. मी तिच्याकडे गेले.
ती रडत म्हणाली, "माझी आई अशीच गेली ग!! त्यावेळी मी सातवीत होते. अशीच साडी नेसवली होती तिला"
अंगावर सर्रकन काटा आला. तिला जवळ घेऊन थोपटत राहिले.
मनात आले एक मृत्यू किती अनुभव, आठवणी देऊन जातो….
थोड्याच वेळात श्रीराम!! जय राम! म्हणत तिला घेऊन गेले.
एरवी हा गजर मनाला शांती देणारा, आधार देणारा वाटतो. पण आज… त्या गजरात जीवनाची अंतिम सत्यता डोकावत होती. जीवन हे किती क्षणभंगुर आहे. याची जाणीव करून देत होते. मला त्या गजरात देखील एक करडा रंग लपेटल्या सारखा वाटत होता.

ती गेली अन् मागे उरली एक पोकळी… एक शांतता… आम्ही पण न बोलता घरी निघालो. घरी जाताना गुलमोहराच्या झाडाकडे लक्ष गेले. रस्त्यावरचे ते झाड देखील आज लाल, करडे वाटत होते.
घरी आल्यावर आंघोळ केल्यावर नवरा म्हणाला, "काही करू नकोस. बाहेर जाऊ चल…"
मी नाही म्हणायचा निष्फळ प्रयत्न केला. पण मनातून कुठेतरी या वातावरणातून, या करड्या रंगातून बाहेर जावे असे वाटतं होते. एक साधा ड्रेस घालून मी गाडीत बसले.
ऑर्डर देताना नवऱ्याने एक बियर मागवली. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले.

तसा तो म्हणाला, "डोकं दुखत आहे ग!! पाहवत नव्हतं मला ते सर्व"
मी काही बोलले नाही. जेवण झाल्यावर मी तृप्ततेने बडीशेप चघळत म्हणाले, "छान होते ना जेवण..?"
गाडीत बसल्यावर नवऱ्याने टेपचा व्होल्युम मोठा केला.
किशोर गात होता…
"छु कर मेरे मन को…"
मी गाण्याच्या तंद्रीत बुडून गेले.
कॉलनी आली. माझं लक्ष बिल्डिंगकडे गेले. बिल्डिंग आता शांत होती. कुठूनतरी टीव्हीचा आवाज येत होता. दोन, चार मुले कट्ट्यावर बसून गप्पा मारत होते. मी सीटवर मान टेकवली.


दुसऱ्या दिवशी सकाळी मी गॅलरीत जाऊन पाहिले. कालचा लाल, करडा वाटणारा गुलमोहर आज सळसळत होता. काल शांत, गंभीर असणारी कॉलनी गजबजली होती. नित्याचे व्यवहार सुरू झाले होते.
मी एक सुस्कारा सोडून आत आले व पेपर हातात घेतला. तेवढ्यात नवरा छान परफ्युम मारून आला. मी उठून त्याच्या हातात टिफिन दिला.
निघताना त्याने मला जवळ घेतले व म्हणाला, "मूड ठीक आहे ना आता…?"
मी त्याच्या मिठीत थोडा वेळ रेंगाळले. गालावर ओठ ठेवत टाटा करत तो निघून गेला.
मी त्याच्या स्पर्शाने दरवळून गेले होते. मी हसत दरवाजा बंद केला.

मी कॉफीचा मग हातात घेतला व पेपर वाचू लागले. पेपरमध्ये एका कॉलममध्ये तिच्या मृत्यूची छोटी बातमी आली होती. मनाचा एक कोपरा पुन्हा हळहळला.
खरंच जाताना तिला कुणाची आठवण आली असेल..?
तेवढ्यात लता आली व मला आठवले, "अरेच्चा!! आपल्याला आज भिशीपार्टीला जायचे आहे…."
मी पेपरमधली ती बातमी विसरून गेले. काल दिवसभर जाणवणारी ठसठस आज कुठेही जाणवत नव्हती.


मनाचा तळ उद्ध्वस्त करणारी कालची घटना…. आज त्याचा मागमूस दिसत नव्हता.
कालची मोठी गोष्ट आज छोटी झाली होती. नेहमी वाचत होते अगदी तश्याच बातमी पैकी आज तिची बातमी झाली होती.
कालचा करडा रंग आज मला कुठेच दिसत नव्हता….
©® माधवी देवळाणकर

सदर कथा लेखिका माधवी देवळाणकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने