गादी

©® नीला महाबळ गोडबोले.




सहा बाय तीनची जाडजूड नि जडच्या जड गादी एकटीने डोक्यावर घेऊन जयश्री अपार्टमेंटचे दोन जिने जिवाच्या करारावर उतरली नि झपझपा घराकडे चालू लागली.
तिचे घर म्हणजे पत्राच्या दोन छोट्याश्या खोल्या होत्या.. साध्याशा...झोपडपट्टीतल्या..
पण स्वत:च्या मालकीच्या..चाळीस वर्षांपूर्वी तिच्या सास-यानं विकत घेतलेल्या.
म्हणून तिच्या डोक्यावर आज छप्पर तरी होतं..

नाकीडोळी नीटस,चुणचुणीत असलेल्या, खेडेगावातल्या जयश्रीला हुशार सास-यानं भावकीतल्या एका लग्नात हेरलं नि आपल्या निकम्म्या नि व्यसनी मुलासाठी तिला मागणी घातली. तेंव्हा ती जेमतेम सोळा वर्षाची होती.
सहा पोरं पदरात असलेल्या तिच्या आईला आभाळ ठेंगणं झालं.
पोरगी लग्न करून शहरात जाणार होती.. पुढंमागं स्वत:च्या पोरांना तिच्याकडं शहरात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पाठवता आलं असतं. 

नवरा मुलगा दिसायला बरा होता. शिवाय मुलाच्या वडिलांना पेन्शन होती. झोपडपट्टीत का असेना स्वत:चा घर होतं.
आणि मुख्य म्हणजे फक्त नारळ आणि मुलगी द्यायची होती.
" पोरीनं नशीब काढलं " गावभर चर्चा झाली..
जयश्रीचं लग्न झालं नि नव-याच्या व्यसनांशीपहिल्या दिवशीच तिची ओळख झाली.
आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय ,हे चाणाक्ष जयश्रीने ओळखलं नि ती निराश झाली.


पण निसर्ग काही चुकला नाही..
वर्षा-दोन वर्षाच्या अंतरानं तीन पोरी त्यानं तिच्या पदरात घातल्या.
तिने संसारासाठी चार घरची कामं धरली.
लग्नानंतर दहा वर्षातच नवरा दारू पिऊन देवाघरी निघून गेला.
पाठोपाठ सासरा आणि सासूनेही हे जग सोडलं .. नि पेन्शनचा रतीबही बंद झाला..
पण जयश्री हारणा-यातली नव्हती.  तिनं अजून चार घरची कामं धरली नि संसाराचा गाडा हिकमतीने हाकू लागली..


थोरली पोरगी तिच्यासारखीच ..
नाकीडोळी नीटस,चुणचुणीत..चारचौघीत उठून दिसणारी..टापटिपीत राहणारी..
जयश्रीच्या भाच्याच्या लग्नात तिला विचारणा आली.
स्थळ खेड्यातलं होतं पण स्वत:चं घर होतं,तीन-चार एकर शेत होतं.पोरगा नोकरीला होता ,व्यसनी नव्हता..
स्थळ नाकारायला कुठेही जागाच नव्हती.


पण " तोळाभर सोनं नि लग्नाचा दोन्ही अंगानं खर्च " अशी मागणी केली गेली.
जयश्रीला हे फार जास्त होतं..
तिनं नकार द्यायचं ठरवलं.
पण पोरगी रडायला बसली.तिच्या मनात तो पोरगा भरला होता..
जयश्रीला पोरीचं मन मोडवेना..
तिनं मंगळसूत्र गहाण टाकलं..
कामावरून कर्ज काढलं नि पोरीला उजवलं..


पोरगी सुखानं सासरी नांदत होती..
साधारण दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट...
जयश्री सकाळी कामावर गेली. बिल्डिंगच्या खाली ब-याच गाड्या नि माणसं गोळा झाली होती. अशुभाची चाहूल काही लपून रहात नाही..
" तीनशे चारमधल्या आजी वारल्या. काल रात्रीपर्यंत चांगल्या होत्या.जेवण केलं .नातवंडांबरोबर टी.व्ही.पाहिला. गप्पा मारल्या.
सकाळी चहा घ्यायला आल्या नाहीत म्हणून मुलगा उठवायला गेला तर सगळं संपलेलं होतं. आजींची लेक मुंबईहून यायचीय.ती आली की नेतील.." त्याच बिल्डिंगमधे काम करणा-या सुनितानं जयश्रीला माहिती पुरवली..

कामं आटोपून जयश्री तीनशेचार मधे जाऊन भेटून आली..तिथे काम करत नसली तरी आजी रोज येता जाता भेटायच्या. चौकशी करायच्या. कधी दिवाळीला मुलांसाठी म्हणून खाऊचे पैसे द्यायच्या..
त्यांचं कलेवर पाहून जयश्रीला रडू आवरलं नाही..
दुपारी आजींची लेक आली.
जयश्रीने आजींच्या पार्थिवाला अंघोळ घालणं,पातळ नेसवणं यात मदत केली..
आजींना नेल्यावर घरच्यांना अंघोळी घातल्या नि मग घरी गेली.

म्हणूनच आज त्यांच्या चौदाव्याला तिला आवर्जून जेवायला बोलावलं होतं.
" जयश्री, या आजींच्या चार साड्या आहेत .तुला घेऊन जा." सून बोलली.
" ताई , बरोबर आहे की नाही माहीत नाही पण एक विनंती होती..
मला साड्या नकोत, ताई.. त्याऐवजी आजींची गादी तुम्ही मला द्याल का?
म्हणजे तुम्हाला बरोबर वाटलं तरच द्या "
" अगं घेऊन जा की ..कुणाला तरी द्यायचीच आहे..ज्याला पाहिजे त्याला दिली तर चांगलच आहे..लगेच घेऊन जा. "

जयश्रीने आनंदाने गादी फोल्ड केली..डोक्यावर ठेवली नि जिने उतरून लगबगीने घराकडे निघाली.
धाकट्या पोरीनं दार उघडलं.
" आई, ही गादी कुठून आणलीस ?"
पोरगी आनंदाने ओरडली.
ते ऐकून मधलीही बाहेर आली नि चार दिवसांपूर्वीच माहेरी आलेली थोरलीही आली.
" अगं पोरींनो थांबा.जरा गादी उतरवायला मला मदत करा."
पोरींच्या मदतीने ती गादी खोलीच्या कोप-यात विसावली.


" मी काम करते नं त्या लिमयांकडं सगळ्या नवीन गाद्या केल्यात .म्हणून या जुन्या आम्हा कामवाल्यांना दिल्यात . बरं झालं की नाही..? सद्गुरुच पावले म्हणायचे ..आपल्याला हवीच होती नं गादी ...!! "
पोरींनी कूतुहलाने गादीला हात लावून पाहिला ..
" कसली गुबगुबीत आहे नं गादी ..! ताई तुझ्या घरीपण अशीच गादी आहे नं गं ..तुला आता छान झोप येईल बघ या गादीवर "
थोरली खूश झाली..
तिघींनी गादीची पूजा केली.


" ए ताई ,पण आजच्या एक दिवसतरी आम्ही पण झोपणार बरं का या गादीवर "
कधी एकदा रात्र होतीय असं पोरींना झालं होतं.
रात्रं झाली.
पोरींनी जमिनीवर गादी घातली. त्यावर पलंगपोस घातला नि धाकट्या दोघी त्यावर अक्षरश: नाचल्या.
गादीवर या टोकापासून ते त्या टोकापर्यंत लोळल्या ..
असा सखद स्पर्श त्या आयुष्यात प्रथमच अनुभवत होत्या..
" ए आई ,कसलं श्रीमंत झाल्यासारखं वाटतय गं ! "
सगळं घर हसलं..


" चला उठा ..आता ताईला झोपूदे गादीवर " जयश्री ओरडली.
" आई ,एक दिवस आम्हाला झोपू दे नां गं गादीवर "
" आई ,आम्ही तिघीही झोपतो नं गादीवर , या गं इकडे " ताईनं बहिणींना बोलावलं तशा दोघी धावत आल्या.
थोरली मधे झोपली. धाकट्या दोघी थोरलीच्या दोन बाजुंना पहुडल्या. थोरलीनं दोघींंना कुशीत घेतलं..गप्पा गोष्टीकरत तिघीजणी एकमेकींना बिलगून निद्रादेवीच्या कुशीत शिरल्या..

गाादी समाधानानं तृप्त झाली.
जयश्रीची घरातील कामे आटोपली.
पोरींशेजारीच तिने चटई घातली..
त्यावर एक वाकळ अंथरली. अंथरुणावर
आडवी होऊन ती पोरींकडे पाहू लागली नि तिचे डोळे पाझरू लागले..
एका बाजुला बहिणींमधली माया पाहून तिचा जीव सुखावत होता.
यांचं प्रेम जन्मभर असच टिकावं,म्हणून ती परमेश्वराकडे साकडं घालीत होती.


पण त्याचवेळी ,
" मी केलं ते बरोबर आहे का?" असा प्रश्न ती स्वत:ला प्रश्न विचारत होती.
" मी दुसरं काय करू शकणार होते ?" उत्तर म्हणून अजून एक प्रश्नच आला.
झालं होतं असं की जयश्रीच्या थोरलीला लग्नानंतर लगेचच दिवस गेले होते. 
आता सातवा महिना लागला होता..
सासरच्यांनी पहिलं बाळंतपण माहेरी असतं म्हणत ऐपत असूनही स्वत:कडे जबाबदारी न घेता बाळंतपणासाठी माहेरी धाडलं होतं.

आनंदाची गोष्ट असूनही जयश्री खर्चाच्या विचाराने धास्तावली होती.
मोठं पोट आलेल्या नि सासरच्या सुबत्तेला सरावलेल्या लेकीला माहेरच्या चटईवर झोपून भयंकर पाठ दुखू लागली होती.
तिला डॉक्टरांनीही गादीवर झोपण्याचा सल्ला दिलेला होता.
लेकीची पाठदुखी पाहून जयश्रीतली माऊली रोज आसवं गाळायची..
बायकोला भेटायला आलेल्या जावयानेही गादीसंबंद्धी बोलून दाखवलं होतं पण जवळ असूनही गादीसाठी पैसे काढले नव्हते.


जयश्री दुकानात गादीची चौकशी करून आली. हजार रुपयांखाली गादी नव्हती.
लेकीच्या लग्नाच्या कर्जाचे हप्ते, रोजचा खर्च आणि बाळंतपणाचा आगामी खर्च यात हजार काय शंभर रुपयेही तिला परवडणारे नव्हते..
या धर्मसंकटात असतानाच तिला आजींच्या मृत्युची बातमी समजली.
अर्जुनाच्या माशाच्या डोळ्याप्रमाणे तिच्या डोळ्यासमोर फक्त गादी दिसत होती..
शेवटी तिने आजींच्या सुनेला विनंती केली नि देवदयेने तिला ती गादी मिळाली..!!


गेलेल्या माणसाची गादी आहे असं सांगितलं असतं तर लेक घाबरली असती. म्हणून तिने मालकिणीने गादी दिल्याचं खोटच सांगितलं..
पण मनातून मात्रं ती खूप घाबरली होती. गेलेल्या माणसाच्या गादीमुळे पोरीला काही त्रास तर होणार नाही नं याची काळजी तिला लागून राहिली होती.
आज त्याच गादीवर लेक सुखाने गाढ झोपली होती.
जयश्रीचं मन मात्रं चूक -बरोबरच्या ओढाताणीत अडकलं होतं..
अशातच कधीतरी तिचा डोळा लागला.


" जयश्री, एका उगवत्या कोवळ्या जीवासाठी माझ्या गादीचा उपयोग होतोय ..समाधान वाटलं गं !सगळं छान होईल बघ तिचं ..काही काळजी करू नकोस ...जप लेकीला !" तीनशे चारच्या आजी जयश्रीला तिच्या स्वप्नात येऊन सांगत होत्या..
आता जयश्री निर्धास्त होती!!

©® नीला महाबळ गोडबोले

सदर कथा लेखिका नीला महाबळ गोडबोले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने