ऋणानुबंध


©® अश्विनी तांबे.




‘सुपर्णाज भरतनाट्यम क्लास’ हि मोठी पाटी असणाऱ्या इमारतीसमोर गाडी थांबली आणि सुपर्णा गाडीतून उतरली. सुपर्णा राव, राज्यात नाही तर देशविदेशात मान्यता मिळवलेली एक नृत्य कलाकार , प्रशिक्षिका आणि भारतीय नृत्यपरंपरा यावर जिचे अनेक शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत अशी विदुषी.
परदेशातील दौरा संपवून दोन दिवसापूर्वी ती परतली होती. 
यावेळेला परदेशात जवळजवळ तीन महिने राहिल्याने खूप आतुरतेने ती नृत्यालयात येत होती. 
या काळात नृत्यालयाची सगळी जबाबदारी तिच्या शिष्या अनघा आणि पूर्वा बघायच्या. 

नृत्यालयात शिरतानाच सुपर्णाला घरी आल्याची जाणीव झाली. त्या बैठ्या इमारतीत एका बाजूला वर्ग होते आणि दुसऱ्या बाजूला तीन चार खोल्या होत्या ज्यात नृत्याचे धडे घ्यायला आलेल्या परदेशातील शिष्यांची रहायची सोय केलेली असायची. 
सुपर्णा आपल्या खोलीत गेली आणि तिथे असलेल्या तिच्या गुरूच्या,मालविकादेवीच्या फोटोला नमस्कार केला आणि नटराज मूर्तीला चाफ्याची फुले वाहिली. 
अनघा आणि पूर्वा दोघी तोपर्यत तेथे आल्याच, त्यांना हि दौरा कसा झाला हे ऐकायची उत्सुकता होती. 

थोड्या गप्पा झाल्यावर , वर्ग कसे चालू आहेत त्याचा आढावा घेतला गेला.
सुपर्णाच्या शिष्या जरी आता वर्ग बघत असल्या तरी आठवड्यातून किमान तीन वेळा सुपर्णा जातीने वर्गात
येऊन विद्यार्थ्याचे नाचाचे धडे घ्यायची. नवीन आलेल्या विद्यार्थ्याना भेटून त्याची ओळख करून घेणे आणि
नृत्याबाबत त्याच्यात उर्जा वाढवणे हा तिचा शिरस्ता होता.
या तीन महिन्यात काही नवीन विद्यार्थिनी दाखल झालेल्या होत्या. 
पुढील चार महिन्यात नृत्याचे काही कार्यक्रम ठरवायचे होते त्याविषयी नियोजन झाल्यावर तिघीजणी वर्गात जायला निघाल्या.

सुपर्णा वयाच्या आठव्या वर्षापासून नृत्य शिकत होती आणि त्यानंतर नृत्य हेच तिचे आयुष्य बनले होते. 
अर्थात तिच्या या कलेला तिचे जीवन बनवण्यामागे तिच्या आईचा मोठा वाटा होता. एकवेळ शालेय शिक्षणात मागे पडलीस तरी चालेल पण नृत्य सोडायचे नाही हे आईचे म्हणणे काहीवेळा लहान वयात सुवर्णाला जाचक वाटायचे. पण आत्ता जेव्हा आईने तिच्याबाबत घेतलेला ध्यास तिला आठवे त्यावेळी सुपर्णा मनोमन आईचे आभार मानत रहायची. 
या तिच्या कलेमुळेच तिची निरुपमशी, प्रसिध्द तबलावादक याच्याशी ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर नंतर विवाहात झाले. आज दोघेही आपापल्या क्षेत्रात व्यग्र आहेत. एकमेकांची कला जपत आहेत आणि त्याला प्रोत्साहन देत आहेत.

सुपर्णा हा विचार करतच वर्गात पोहोचली. वर्गात विविध वयाची नाचणारी पावले अतिशय छान नाद निर्माण करत होती. सुवर्णाला पाहून सगळ्या मुली धावत तिच्या जवळ आल्या आणि प्रत्येकीची तिच्या पाया पडायला पुढे जायची जणू चढाओढ लागली. नवीन मुली होत्या त्यांनीदेखील इतरांचे अनुकरण केले.
सुपर्णा आवर्जून प्रत्येक मुलीला, ती पाया पडल्यावर पाठीवर थोपटत होती. 
एक दहा –बारा वर्षाची मुलगी तिच्या जवळ आली आणि वाकून नमस्कार केला, सवयीने सुपर्णाने तिच्या पाठीवर थोपटले आणि मुलीने वर पाहिले. क्षणभर मुलगी तिच्याकडे पहात होती आणि सुपर्णाने देखील तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा खूपच ओळखीचा होता. सुपर्णा तिच्याकडे बघून हसली आणि इतरांशी बोलू लागली.

अनघाने नंतर, नवीन मुलींची ओळख करून दिली, त्यात ती मुलगी स्वरूपा असल्याचे कळले. त्या सगळ्याशी बातचीत करून आणि काहीवेळ त्यांचा सराव पाहून सुपर्णा परत आपल्या खोलीत परतली. पण त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. 
ती मुलगी आधी कधीच भेटलेली नव्हती पण खूप माहितीची वाटत होती. 
बराचवेळ तिचाच विचार रेगाळत राहिल्यावर सुपर्णाने, तिला कुठल्यातरी कार्यक्रमात बघितले असेल, अनेकजण मुलांना घेऊन कार्यक्रम संपल्यावर भेटायला येतात तेव्हा बघितले असेल म्हणून विचार झटकला आणि टेबलावर येऊन पडलेल्या पत्राच्या ढिगातून काही महत्वाची पत्रे बाजूला काढून वाचायला लागली.

शहरात असेपर्यत रोज नृत्यालयात येऊन वर्गात सराव घ्यायचा सुपर्णाचे ठरलेलेच असायचे, नृत्य शिकवणे तिची जणू उर्जा होती, जेवढी ती शिकवायची तेवढा तिचा उत्साह वाढायचा. तिच्या परदेशी विध्यार्थिनीचा एक कृष्ण राधेच्या वर एक कार्यक्रम बसवायचे तिच्या मनात होते. त्या विचारात नंतर ती गढून गेली.
दुसऱ्या दिवशी वर्ग सुरु झाला आणि जवळजवळ अर्ध्या तासाने सुपर्णाला दारात एक मोठी गाडी थांबलेली दिसली ज्यातून स्वरूपा उतरली आणि धावत आत आली. 
वर्ग संपल्यावर सुपर्णाने तिला बोलवून वर्गाला वेळेत येण्याविषयी सांगितली, त्यावेळी शेट्टी अंकलची गाडी उशिरा आली असे सागितले. पण पुढच्या वेळी उशीर होत असेल तर मी गाडीची वाट पहाणार नाही, माझी मी कशीही वेळेत येईल असे म्हणाली. 

सुपर्णा कोणाही विद्यार्थिनीबाबत व्यक्तिगत गोष्टीत लक्ष द्यायची नाही पण स्वरूपाचे बोलणे, चेहरा या सगळ्याबाबत ती आपसूक विचार करत होती जो तिला काहीसा अस्वस्थ देखील करत होता.
अनघाला तिने न राहून विचारले, कि स्वरूपा कधीपासून येत आहे? इथे तिला घेऊन आले होते? तिच्या सांगण्यानुसार स्वरूपाला कोणी वरुणराज शेट्टी ज्याची शहरात अनेक उडपी हॉटेल आहेत घेऊन आले होते.
स्वरूपाची नाचाची आवड पाहून त्यांनी तिला प्रोत्साहन देण्यासाठी इथे दाखल केले होते. स्वरूपाची आई
कधीच तिला सोडायला येत नाही , कायम तिला तिचे शेट्टी अंकल गाडीतून सोडतात.
सुपर्णाला नको इतकी स्वरूपाबाबत उत्सुकता खरेतर ओढ वाटायला लागली होती. 

तिचे डोळे तिला कोणाची तरी आठवण द्यायचे पण कोणाची आठवण ते तिला कळायचे नाही. स्वरूपाची नाचात असणारी प्रगतीदेखील इतर मुलींपेक्षा अधिक होती. अश्यात दोन महिने कसे सरले कळलेच नाही. सुपर्णा बसवत असलेल्या राधाकृष्ण नृत्य नाटीकेची तयारी जोरात सुरु होती. 
अशाच एका शनिवारच्या दुपारी वर्ग सुरु व्हायला बराच वेळ असताना सुपर्णाला , स्वरूपा येऊन बसलेली दिसली. "इतक्या लवकर तू कां आलीस?" असे तिने विचारले असता, "आज आई आणि अंकलला कुठेतरी जायचे होते म्हणून मला लवकर सोडले." म्हणाली. 

"तुझी आई तुला सोडायला कधीच येत नाही, फी देखील तुझ्याबरोबर देतात असे का?" सुपर्णाने न राहून मनात रेगाळणारा प्रश्न विचारला.
स्वरूपा काहीवेळ उत्तर न देता, बोलावे कि नाही या विचार करत थांबली. 
नंतर थोडी ओशाळत म्हणाली, "आई जरी येत नसली तरी मी नेहमी इथे शिकवलेले तिला करून दाखवते. ती पण तुमच्याविषयी खूप प्रश्न मला विचारत असते. तिला तुम्ही बहुधा खूप आवडता." 
सुपर्णा हे ऐकत होती आणि तिची उत्सुकता वाढायला लागली. तिने आईचे नाव विचारले. रोशनबाला, स्वरूपा बोलली. 

सुपर्णाला या नावाचे कोणी भेटल्याचे स्मरत नव्हते, पण आपले खूप चाहते आहेत जे आपल्या परिचित नाहीत त्यातील कोणीतरी असेल हे म्हणून ती कामाला लागली. 
सुपर्णा आणि तिच्या शिष्याचा चाललेला सराव स्वरूपा पहात बसली आणि मग स्वरूपाचे लवकर येऊन सराव बघणे नित्याचे झाले. एका अर्थी सुपर्णाला तिचा लळा लागला म्हणा ना !
आज देखील सुपर्णा सराव सुरु करण्यापूर्वी काही पत्र चाळत बसली होती आणि स्वरूपा दारात येऊन थांबल्याचे तिला जाणवले. तिच्या हातात डबा होता. 

"काय ग, स्वरूपा इथे कां उभी आहेस?" सुपर्णा ने विचारले. 
"तुम्हाला हे द्यायचे होते." डबा दाखवत ती म्हणाली. 
"काय आहे त्यात?" 
"तिखट मिठाच्या पुऱ्या, तुम्हाला आवडतात ना? म्हणून आणल्या आहेत," स्वरूपा म्हणाली. 
"मला आवडतात, पण तुला कसे माहित?" या सुपर्णाच्या प्रश्नावर स्वरूपा गोधळली. 
"इतर मुलींकडून कळले," असे चाचरत म्हणाली. 

सुपर्णा अचंब्याने पहात म्हणाली, "मला पुऱ्या आवडतात हे कोणालाच माहित नाही. खर सांग, कोणी सागितले तुला?"
स्वरूपा आता अजून गोधळली,घाबरत म्हणाली, "अम्मीला माहित होते, त्यामुळे घरी पुऱ्या केल्या त्यावेळी तिला तुम्हाला त्या द्याव्या वाटल्या. पण मी हे तुम्हाला सांगितले , आता अम्मी मला ओरडणार." 
सुपर्णाला हे सगळे अनाकलनीय वाटत होते.
कोणीतरी अपरिचित माझी चाहती म्हटले तरी माझ्या आवडी निवडी ती
कश्या जाणू शकते???
सुपर्णाने मी आता मर्यादित आणि विशिष्टच खाते सांगून त्या पुऱ्या नाकारल्या. 

स्वरूपाला मात्र ,मला तुझ्या आईला भेटायचे आहे सागितले. 
"अम्मी इथे नाही येणार, तुमचा काही निरोप असेल तर मीच तिला देते." म्हणाली. 
सुपर्णा यावर काहीच बोलली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुपर्णाला अनोळखी नंबरवरून फोन आला, तो घ्यावा कि नाही या विचारात असतानाच तिने तो उचलला. 
तिच्या नमस्कार, कोण बोलते आहे? ,याला काहीवेळ उत्तर मिळाले नाही.
"मी रोशनबाला बोलते आहे... मला , आपल्याला भेटायचे आहे पण कोणी इतर नसताना , वर्गाच्या आधी भेटता येईल का?" प्रश्न आला. 

तो स्वर दबका होता, जणू कोणा इतरांना ऐकू जाऊ नये यासाठी हळू काढलेला आवाज. 
सुपर्णा म्हणाली, "भेटता येईल, कधी येता आहात सांगा."
"आज दुपारी येते.. वर्गाच्या आधी दोन तास, जमेल कां?"
सुपर्णाला भेटायची उत्सुकता असल्याने तिने त्वरित हो सागितले. त्यासाठी तिला काही पूर्वनियोजित कामे बाजूला ठेवावी लागणार होती पण ते शक्य होते.
दुपारी सुपर्णा नृत्याल्यात पोहोचली. 
तिच्या तिथे रहाणाऱ्या परदेशी शिष्यांशी काहो बोलून ती ऑफिसला येऊन बसली. 

दहा मिनिटातच दाराला टकटक केले गेले, सुपर्णाने वर पाहिले आणि "या" असे म्हटले. 
आत आलेली व्यक्ती पाहिली आणि सुपर्णा उभी राहलेली पटकन बसली. 
तीच होती कां ती? हो.. आणखी कोण असणार? अगाने भरलेली, थोडा भडक मेकअप , पांढरा सलवार कमीजमध्ये असणारी ती महिला ‘बेला’ होती
बेला, सुपर्णाची नृत्यवर्गातील अतिशय जिवलग मैत्रीण, सुपर्णा नाच शिकायला लागली त्यांच्या पुढेमागे बेला पण तिथे यायला लागली. दोघीची घर जवळ नव्हती तरी एकच रस्त्यावर असल्याने येताजाता एकत्र येणे, सुट्टीच्या दिवशी कोणा एकीकडे नाचाचा सराव करणे हे ठरलेलेच असायचे. दोघींना नृत्याचा ध्यासं होता, त्यामुळे पुढे जाऊन नृत्य शिकवायला एकत्रच क्लास काढायचा असे त्यांचे ठरले होते. 

दोघी तेव्हा चौदा-पंधरा वर्षाच्या असतील. त्यावेळी, वर्गाची नृत्यनाटिका बसवली होती, त्यात गाण्याला साथसंगत
द्यायला पेटी आणि तब्बलजी बोलावलेले होते. त्यातील तब्बलजी तन्वीर, नुकताच मिशी फुटलेला, लाजाळू आणि तरतरीत नाकाचा विशीतला तरुण, जो सरावाच्या वेळी यायचा आणि खाली मान घालून तबला वाजवायचा. 
सगळ्या मुली त्याला फार हसायच्या. 
ज्यावेळी कार्यक्रम झाला त्यावेळी त्याचे विशेष कौतुक केले गेले आणि मग तो क्लासचा नेहमीचा तब्बलजी बनला. तन्वीरचे जसे क्लासला येणे वाढले तसा तो मुलींमध्ये वावरायला सरावला. 

बेला आणि सुपर्णा दोघीशी त्याची जरा जास्त दोस्ती होती. दहावीची परीक्षा या दोघीची पार पडली आणि मग सुट्टीत दोघी एकत्र असायच्या, वेळ असेल तेव्हा फिरायला जायच्या, ज्यात तन्वीरपण नंतर यायला लागला. तन्वीर, लखनऊचा होता, जो तबला शिकायला आणि काम शोधायला त्यांच्या काकाकडे येऊन राहिला होता.
तन्वीरचे वादनातील कौशल्य, हळूवार आदबशीर बोलणे दोघीच्या मनात रुजू लागले, तो नसताना त्यांच्याविषयी बोलणे हाच त्यांच्या गप्पाचा विषय असायचा. 
नकळत आपण दोघी त्याच्यात गुंततो आहोत हे त्यांना जाणवत होते. पण तन्वीरला आपणच आवडतो, हे दाखवण्याची दोघीमध्ये हळूहळू चढाओढ लागली. इथे मैत्री कमी होऊन प्रतिस्पर्धी म्हणून दोघी एकमेकीकडे बघू लागल्या.

दोघींना त्यांच्याविषयी प्रेम वाटण्यापेक्षा तारुण्य सुलभ आकर्षण होते हे त्यांना कळण्याचे वय नव्हते. पण त्याच्या कलेवर दोघी प्रेम करत होत्या हे नक्की. आता दोघी एकमेकीशी मोकळेपणाने बोलण्यापेक्षा मनात ठेवून रहायला लागल्या. 
विशेष म्हणजे तन्वीर दोघींना वेगळे भेटायचा ज्याच्या त्यांना पत्ताच नव्हता.
दहावीनंतर सुपर्णा आणि बेलाने पुढे महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण वेगवेगळ्या ठिकाणी. आता पूर्वीचा तन्वीर नाहीसां होऊन थोडा हुकुमत गाजवणारा झाला होता. 
अश्यात ११ वीचे वर्ष पार पडले आणि सुट्टीत घरच्याबरोबर सिनेमाला सुपर्णा गेली असताना सिनेमागृहात तिने तन्वीर आणि बेलाला बसलेले पाहिले. 

सिनेमापेक्षा ते दोघे काय करत आहेत याकडे तिचे लक्ष जास्त होते. तिच्या आईने देखील दोघांना पहिले असल्याने बेलाशी आता जास्त बोलू नकोस अशी तिला तबी मिळालीच .
नंतर तन्वीर आणि सुपर्णाचे जोरदार भांडण झाले , बेलाचे देखील दर्शन नको म्हणून तिने वर्गाचे वेळ बदलून घेतली. तन्वीरशी अबोला राखणे तिला जड जात होते, नृत्य हि सोडावे असा विचार येऊन गेला,
पण ते शक्य होणार नव्हते. तन्वीरने एक दोन वेळा बोलायचा प्रयत्न केला पण सुपर्णावर लक्ष ठेवून असलेल्या तिच्या आईला काहीतरी आपल्या नकळत घडत होते आणि घडू शकते याची जणू चाहूल लागल्याने ती कायम सुपर्णाच्या बरोबर असायची. त्यामुळे तन्वीरशी बोलणे व्हायचे नाही. 

अश्यात जवळजवळ तीन महिने गेले. सुपर्णाच्या मावशीचे लग्न निघाल्याने पंधरा दिवस सगळे गावी गेले आणि परतल्या वर कळले बेला आणि तन्वीर पळून गेले. 
तन्वीरच्या काकाने तो कुठे गेला याबाबत माहित नसल्याचे सांगून हात वर केले. 
बेलाच्या आईने पोलिसात तक्रार केली ,तपास सुरु केला गेला, पण दोघांचा पत्ता लागेना. दिवसागणित शोधाची गती मंदावली. सुपर्णाला काही काळ त्रास झाला कि तन्वीरला माझ्यापेक्षा बेला जास्त आवडत होती. हळूहळू ती पण हि गोष्ट विसरली. 
पदवी शिक्षण होत असतानाच तिच्या नाचाच्या परीक्षा पण होत गेल्या. 
आता ती ताईबरोबर क्लासमध्ये शिकवायला लागली होती. 

ताई तिला आपली उतराधिकारी मानायच्या. यश आणि प्रसिद्धी सुपर्णाने काबीज केली आणि एक प्रतिथयश नृत्यागना म्हणून लोकिक मिळवला. 
याकाळात बेलाचा विचार क्वचित आला होता, पण आता ती समोर उभी होती.
बेला नाही, आताची रोशनबाला हिला सुपर्णाने बसायला सांगितले. 
अजून ती धक्क्यातून बाहेर आली नव्हती. 
बेला सगळी खोली आणि सुपर्णाचे लावलेले फोटो , सन्मानचिन्ह पहात होती आणि मग एक खिन्न स्मित देऊन म्हणाली,  "मी कल्पना केली होती त्यापेक्षा तुम्ही फारच मोठया झाल्या आहात.. छान वाटले बघून. स्वरूपा, तुमचे सतत गुणगान करत असते. तिला तुमच्यासारखे व्हायचे आहे." 

सुपर्णा भानावर येत म्हणाली, "अहो जाहो कश्याला? मी तीच सुपर्णा आहे."
यावर बेला म्हणाली, "पण बेला तीच नाही ना , ती आता केवळ रोशनबाला म्हणून ओळखली जाते."
"तन्वीर कसा आहे? तुझ्या बरोबर असतो ? लग्न कधी केले तुम्ही ? कधी स्वरुपाला सोडायला आला होता का?" या प्रश्नावर भकासपणे सुपर्णा कडे पहात बेला म्हणाली, "माझी कहानी खूप मोठी आहे, आणि ती ऐकून तू काय करणार?" 
थोडावेळ थांबून बेला बोलती झाली. 
"तन्वीरला खर तर तू आवडायची, पण तू भेटेना झाल्यावर तो माझ्याशी प्रेमाची भाषा करू लागला, मला हि ते आवडत होते. घरी जेव्हा हे कळले तेव्हा आई बाबांनी मला क्लासला पाठवणे बंद केले पण कॉलेज चालू होते 

खरतर आपली १२ वी म्हणून त्यावेळी ते चालू ठेवले, त्यावेळी कॉलेज बुडवून त्याला भेटायचे. यातच दोघांनी पळून जायचे ठरवले. त्यांच्या घरी न जाता आधी त्यांच्या मामुकडे जबलपूरला गेलो, तेथेच निकाह केला. त्यांनंतर त्याच्या घरी गेलो आणि मला जाणवले मी चूक केली. 
त्याच्या कुटुंबाने मला स्वीकारले नाहीच पण घरात घेतले नाही.
आम्ही खोली घेऊन राहायला लागलो, पहिल्यादा तो काम करायचा पण दोघांची मुळात फार कष्ट न करता पैसा मिळावा हि अपेक्षा, मग प्यायला लागला. घरच्याच्यासाठी अजून शादी केली. जे सहन करणे मला शक्य नव्हते पण पर्याय नव्हता. त्याचे पिणे आणि मारणे वाढले. मला बारमध्ये नाचायची सक्ती केली. 

मला पर्याय नव्हता, कारण मी अजून तन्वीरवर प्रेम करत होते. घर चालवायला कोणी तरी काम करावे लागणार,तू कर हे तो काकुळतीने म्हटल्यावर मी बारमध्ये गेले आणि नवीन आयूष्य सुरु झाले." बेला हे सांगताना थांबली आणि सुपर्णाचा चेहरा बघत होती. चेहऱ्यावर असणारे भाव बघत होती. 
सुपर्णा काही उमगत नसल्यासारखी सुन्न झाली होती. 
बेला बोलायचे थांबल्यावर , तिने बेलाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होते.
बेला मात्र कोरड्या नजरेने पुढे सांगायला लागली. 

"तन्वीर खूप प्यायचा, त्यातच तो मेला. आता तेथे रहाण्यात मला काही गम्य नव्हते, त्यामुळे बाहेर पडले. आईचे घर कधीच सुटले होते. त्यामुळे बारमधील झालेल्या ओळखीवर मुबईत गेले. तेथे तेच काम पण आता केवळ स्वत: साठी जगणे सुरु झाले. तेथेच सुरेश कुमार भेटला, तो बिहारचा, त्याच्या बरोबर रहायला लागले. लग्न न करता पण त्याची बायको म्हणून वावरायचे. तेव्हाच स्वरुपाचा जन्म झाला. 
ती दोन वर्षाची होईपर्यत सर्व ठीक होते पण नंतर त्याची बदली परत बिहारला झाली आणि तिकडे तो मला नेऊ शकत नाही हे त्याने सागितले. 
मला तो धक्काच होता पण आता स्वरूपासाठी जगणे आवश्यक होते. 

त्यामुळे परत इकडे आले आणि काम शोधत असताना माझा जुना कस्टमर शेट्टी भेटला. त्याने मला आधार दिला. आता त्याने दिलेल्या घरात रहात आहे. तुझा फोटो वर्तमानपत्रात पाहिला होता. स्वरूपाला तुझ्या इथेच नाच शिकायला पाठवायचे ठरवले पण फि परवडेल कि नाही वाटले. शेट्टीने फीची जबाबदारी उचलली. पण स्वरूपाला माझ्यासारखे जीवन द्यायचे नाही त्यामुळे तिला दूर ठेवायचा विचार करते आहे." 
बेला काही काळ नंतर समोर होती तरी काय बोलावे हे सुपर्णाला कळत नव्हते.
बेला निघते म्हणून गेली तरी कितीतरी वेळ सुपर्णा बधिरपणे बसली होती. 
वर्गाच्या मुली आल्या, वर्ग सुरु झाले पण आज तिथे जायला सुपर्णाला जाणीवच नव्हती. 

ती फक्त विचार करत होती, तन्वीरची पहिली पसंत आपण होतो हे त्यावेळी कळले असते तर ते प्रेम वाटून आपण बेलासारखे पळालो असतो देखील पण मग आपले जीवन कसे होऊ शकले असते हा विचार करून शरीरावर काटा येत होता. 
आपण बेलासारखे केले असते कि नाही माहित नाही पण आज जे आपण आहोत ते नक्की नसतो.
रात्रभर सुपर्णा विचार करत होती. 
बेला , स्वरूपाला दुसऱ्या शहरात शिकायला ठेवणार हे जरी ती म्हणत
असली तरी तिला ती वेगळे जीवन देऊ शकणार आहे का? शेट्टीच्या जीवावरच स्वरूपाचे पुढचे जीवन ठरणार मग ते सूरक्षित असणार आहे का? 
स्वरूपाचा चेहरा आठवून तिला काही भोगायला लागेल या विचाराने सुपर्णा अस्वस्थ होत होती. यात तिने निर्णय घेतला.

सकाळ होताच, तिने बेलाला फोन केला, फोन घ्यायला बराच वेळ लागला. 
बेलाला तिचा फोन आल्याचे पाहून आश्चर्य वाटले पण पुढचे बोलणे ऐकून बेलाला आनंदाने रडू फुटले. 
सुपर्णाने तिला स्वरूपा मला देशील का विचारले होते. यापुढे ती सुपर्णाकडे राहील आणि शालेय आणि नृत्य शिक्षण दोन्ही पूर्ण करेल.
सुपर्णाची वारसदार, मानसकन्या म्हणून तिची ओळख बनणार होती. याहून जीवनाचे सार्थक झाल्याची अनुभूती बेलासाठी काय असणार होती? दोघी फोनवर हसत आणि तितक्याच रडत होत्या. 
इथे शब्द गरजेचे नव्हतेच. ....

©® अश्विनी तांबे

सदर कथा लेखिका अश्विनी तांबे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा वाचत राहण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने