कन्फेशन बॉक्स

©® दीपिका दिगंबर सामंत.




विभा आज कोकणकन्या एक्सप्रेस ने गावी खास तिच्या लाडक्या रमा काकीला भेटायला आली. कारण सुद्धा तसच खास होतं. तिच्या काकीला गेले काही महिने निद्रानाशाचा विकार जडला होता.
कित्येक डॉक्टर्सना भेटून झालं होतं पण काही फरक पडला नव्हता.

शेवटी विभा एक सायकॉलॉजिस्ट असल्याने शेवटचा प्रयत्न करून पहायचे ठरवले. काकीला पाहताच तिच्या लक्षात आले की हिच्या मनात खूप काही खदखदत आहे आणि त्यामुळे तिच्या तब्येतीवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. पूर्वीची सुंदर,रसरशीत वय जास्त असले तरी त्याच्या खुणा न दिसणारी रमाकाकी एकदम वयस्कर दिसू लागली होती.

विभा घरी पोहोचली. रामाकाकीच्या हातचे मस्त माशाचे कालवण चापून तिने एक छान झोप काढली.
संध्याकाळी रमाकाकीला सोबत घेऊन ती नदीवर आली.
नदीच्या बाजूने असलेल्या बांधांवरून त्या दोघी चालत होत्या.
“काकी ,तुझ्या या झोप न येण्यामागे काही मानसिक कारण आहे असे मला वाटते.” विभाने विषय काढला.

“ता माका काय समाजना नाय ,पण झोपाक गेलय की कायबाय मागचा आठवत रवता या बाकी खरा“ रामा काकी उत्तरली.
“मग काकी सांग ना मला.मन मोकळ कर.हे बघ,मी कोणालाही सांगणार नाही’विभाने आग्रह केला.
”ताच तर माका कळणा नाय गो” रमा काकी त्रासून बोलली.
आता विभा पण विचारात पडली मग काही एक सुचून ती काकीला म्हणाली “काकी हे बघ हे चर्च असते ना तिथे एक कन्फेशन बॉक्स असतो तर ज्याला कोणाला मनातल दुसर्याला सांगता येत नाही तो या कन्फेशन बॉक्स मध्ये जाऊन येशूला सांगतो आणि विशेष म्हणजे तो सांगत असतो तेव्हा ते कोणीही ऐकत नाही फक्त येशू आणि तो. तसच आपल्या घरी देवखोली आहे ना तिथे जाऊन तू तुझ्या विठोबा जवळ तुझ मन मोकळ कर. वाटल्यास मी दरवाजा लावून घेते आणि हो, मी ही ऐकणार नाही मग तर झाल?” रमाला ही कल्पना पटली. 

संध्याकाळीच तिन्हीसांजेला रमाने देवाला दिवा लावला आणि देवासमोर बसली.
विभाने बाहेरून दरवाजा बंद केला व थोड्या अंतरावर ती बसली. रमाने डोळे मिटले. तिच्यासमोर तिचे पूर्व आयष्य डोळ्यासमोरून सरकू लागलं.

रमा तिच्या आईवडिलांसोबत मालवणला रहात होती. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण होती. रमा दहावीपर्यंत शिकली असली तरी हुशार होती. दिसायलाही सुंदर होती, जेव्हा तिच्या लग्नाचे वय झाले त्याच वेळी तिला हे इनामदारांचे स्थळ सांगून आले.
त्यांचा मोठा मुलगा दिसायला बरा, शिकलेला होता. वयाने थोडा मोठा होता,पण त्याची तब्येत थोडी नाजूक असल्याने बर्याच स्थळांनी त्याला नाकारले होते.

लवकरच रमा इनामदारांच्या घरात सून म्हणून आली. सुरवातीचे दिवस खूप छान सुखात गेले. सासुसासर्यांचे लाड, पतीचे प्रेम आणि धाकट्या दीर ,नणंदेची माया या सार्यात ती न्हाऊन निघाली पण थोड्याच दिवसात या सगळ्याला दृष्ट लागली.
तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. रमा कोलमडून पडली पण घरातील लोकांनी तिला सावरले. वय लहान असल्याने दुसर्या लग्नाचा प्रस्ताव मांडला गेला पण रमाने ठाम नकार दिला.
ती त्या घरातच सासुसासर्या बरोबर राहू लागली. 

दीर नोकरीनिमित्त मुंबईला गेला. त्याचे लग्नही झाले. नणंदेचेही लग्न होऊन ती मुंबईला आली. सासू सासरेही आता थकले. रमा सासूच्या हाताखाली तयार झाली होती. इनामदारांचा व्याप मोठा होता पण रमा आता एकहाती सर्वावर वचक ठेऊन होती. दरम्यान सासूसासरे निवर्तले.

आता रमा एकटीच सगळे सांभाळत होती. पण कुटुंब मात्र तिने एकसंध ठेवले.
दीर आणि नणंद यांचे तिच्याशिवाय पान हलत नव्हते. कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर रमाकाकीचा सल्ला घेतला जात असे.

अशातच एकदा तिचा पुतण्या अचानक गावी आला. आधी रमाने त्याच्याबद्दल थोडं फार ऐकले होते. तो मित्रांच्या नादाने दारू वैगरे घेत होता .पण आज हा असा अचानक आणि घाबराघुबरा होऊन आला होता.
रमाने त्याच्याकडून सर्व हकीकत काढून घेतली. प्रथम तो सांगायला तयारच नव्हता पण रमाने त्याला थोडे आश्वासित केले व त्याची माहिती काढून घेतली.
तो एका अंमलीपदार्थ विकणार्या टोळीच्या जाळ्यात सापडला होता व आता त्याला त्यातून बाहेर पडायचे होते पण ते लोक त्याचा पाठलाग करत होते व त्याचा शोध घेत गावी येण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती .

रमाने त्याला धीर दिला. मनात काही एक ठरवले. त्या दिवशी रात्रीच त्यांचा दरवाजा ठोठावला गेला .रमा सावध झाली. तिने साडीचा फास पंख्यावर टाकला खाली खुर्ची ठेवली व खाली जमिनीवर त्याला झोपवून त्याच्या अंगावर पूर्ण चादर घालून त्याने आत्महत्या केल्याचा सीन तयार केला व दरवाजा उघडला.
समोरचं दृश्य बघून ते लोकच घाबरले व तो आता गेला तर पाठलाग करायची आवश्यकता नाही असं समजून निघून गेले.

दुसर्या दिवशी रमाने त्याच्या आईवडीलाना तो इकडे आल्याचे व त्याची कुठेही वाच्यता करू नका असे सांगितले. मात्र तिने पुतण्याला घरातच राहून कुठे ही बाहेर पडू नको अशी तंबीच दिली.

मालवणला तिच्या ओळखीच्या एका एजंट मार्फत तिने पुतण्याला दुबईला पाठवले व तिथे तो सेट झाल्यावर काही वर्षे भारतात येऊ नको असेही सांगितले.
त्याच्या आईबाबांना मात्र तो इथून कुठे गेला माहित नाही पण तुम्ही पोलिसात जाऊ नका नाहीतर गोंधळ होईल असे सांगितले.

काही वर्षांनी त्यानेच आपल्या आईवडील व रमा यांना पत्र आणि भेट वस्तू पाठवून खुशाल असल्याचे सांगितले परंतु अद्यापही तो कुठे आहे व तो कुठून पत्रे व भेटवस्तू पाठवतो हे त्याच्या आईवडीलाना ठाऊक नव्हते.

हे सर्व बोलून रमाने देवाकडे प्रार्थना केली “देवा, मी ह्या सगळा त्याच्या जिवंत रवण्यासाठी केलय माका माफ कर” असे म्हणून अश्रू भरल्या नेत्राने देवाला हात जोडले.

आता तिला थोडं हलकं वाटू लागलं पण अजून काहीतरी सांगण्यासाठी तिने धीर एकवटला .

तिच्या नणंदेची मुलगी जया, एकदिवस ते तिघेही म्हणजे जया व तिचे आईवडील रमा कडे आले. जयाचे कुणाएका मुलावर प्रेम बसले होते व त्यातूनच ती दोन महिन्याची गरोदर राहीली.परंतु आता त्या मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. अशा परीस्थितीत त्या मुलाला धमकावून लग्न लावून देण्यात काहीच अर्थ नव्हता.
पण प्रश्न त्या पोटात असलेल्या बाळाचा होता त्याचं काय करायचं हे ठरविण्यासाठी ते तिघे आले होते. रमाने त्यांना धीर दिला.
त्याना सांगितले की जया इथेच राहू दे मी काय करायचे ते बघते तुम्ही काळजी करू नका. गर्भपात करण्याचा एक उपाय होता पण त्याने जयाला धोका होता व ते बेकायदेशीरही ठरले असते कारण जयाचे लग्न झालेले नव्हते.

रमाने ते मुल वाढविण्याचा सल्ला दिला.जयाला मी इथेच ठेवून घेते व लोकांना काय सांगायचे ते मी सांगते असे सांगून तिच्या आईवडीलाना परत पाठवले.

जयाचे दिवस भरत आले .एके दिवशी जयाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. लगेच रमाने एका माणसाला निरोप दिला आणि ते बाळ मालवण मध्ये शिक्षक असणारे एक जोडपे जे मुल होण्यासाठी आसुसलेले होते त्यांच्याकडे पाठवून दिले.
अर्थात या विषयी आधीच बोलणे झालेले होते. जया बेशुध्द होती ती शुद्धीवर आल्यावर तिचे बाळ मृत जन्माला आले व ती बघून घाबरेल म्हणून ते लांब बागातील विहीरीच्या जवळ असलेल्या माडाखाली पुरले असे सांगितले. 

जया कित्येक दिवस त्या माडाखाली जाऊन रडत असलेली पाहून रमाला वाईट वाटायचे पण तिचा नाईलाज होता.

जया हळूहळू या दु:खातून सावरली व नंतर ती परदेशात शिकायला गेली व तिथेच नोकरी करून लग्न ही केले. पण कित्येक वर्षे लग्नाला झाली तरी तिला मुल होईना आणि आता देव मलाच त्या गोष्टीची शिक्षा देतो असे रमाला वाटत होते. 
त्याच वेळी ते मालवण मधील शिक्षक ज्यांच्याकडे जयाचे बाळ दिले होते ते एक दिवस आले व त्यांच्या मुलाला अमेरीकेतून एका कोर्स साठी स्कॉलरशीप वर शिकण्याची संधी आल्याचे सांगितले. 
अमेरिकेत तुमच्या कोणी ओळखीचे आहे का याची चौकशी करायला ते आले होते. 
रमाने लगेच जयाशी त्यांची गाठ घालून दिली व त्यांचा मुलगा जयाकडे राहू लागला.

जयाला त्या मुलाविषयी एक अनामिक ओढ वाटते असे ती रमाला फोनवर सांगे पण रमाने त्या विषयी उत्तर द्यायचे टाळले होते.

हे सर्व रमाने त्या देव्हार्यातील विठ्ठलाला सांगितले आणि हात जोडून विनंती केली “देवा, हे सर्व मी मुलांचा चांगला होऊदे म्हणून केले’ माझो कायच स्वार्थ नाय तरी पण माका क्षमा कर” अशी रमा प्रार्थना करत तिने डोळे मिटले, डोळ्यातून अश्रू वहात होते. 

रमाने श्री चरणी डोके टेकले तेव्हढ्यात विभा दार लोटून आत आली. “काकी झाल का तुझे सांगून?” असं म्हणत तिने देवाच्या पायाशी डोके टेकलेल्या रमाकीला उठवायला गेली,आणि पाहते तर काय तिच्या रमाकाकीला गाढ झोप लागलेली, तिची रमाकाकी चिरनिद्रा घेत अनंतात विलीन झाली होती.


©® दीपिका दिगंबर सामंत


सदर कथा लेखिका दीपिका दिगंबर सामंत यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

धन्यवाद.!!!

📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने