पुरुष

©® सौ. संध्या सूर्यकांत धर्माधिकारी.





" उम्या ऽऽ …."

" यालो आई " आईच्या एका हाकेत उमेश धाडधाड पायऱ्या उतरून खाली आला.

" तूझ्या दादाला न् अण्णाला उप्पीटाच्या पिलटा दे जा."

" बरं ऽ .. मला ? " उमेश त्याच्याही नकळत बोलून गेला.

" व्हय ऽऽ आदी 'बा'ला डबा दिवून ये. मग खा मनं. "

" मग उशीर होईल, माझा अभ्यास पण राहिलाय.." उमेश चाचरत म्हणाला.

"बसा की सगळी खात बसा. तुमच्या 'बा' ला डबा द्याला मी जाती, घरातली कामं बी मीच करती. " आईचा आवाज चढला, चिडका झाला.

" अगं..मी जायालोय.. पण सांगायलो तुला दादाला पाठवचिल म्हणून." म्हणत उमेश नको तितक्या समंजसपणे डबा घेऊन गेला.चालत जायचे असल्याने डबा देऊन येण्यात बराच वेळ गेला. अजून अंघोळ व्हायची, खाणं, अभ्यास.. काय करू ? काय करू नको ? असं त्याला झालं होतं. भरभर अंघोळ उरकून राहिलेला अभ्यास करू लागला. तेवढ्यात आजी कळवळून ओरडली.

" आरं न्ह्या की रंयऽ मला संडासापावतर. कवा धरणं आरडायल्या रंय ऽऽ."

" कशाला एवडं खाताव ? जरा टाचकं खावावं की, दम निघत न्हाय तर !" आईचा कुजकट टोमणा.

" आगं बायी कमीच खात्या गं.. पण जीव हाय तवर कमी का आसंना खावावं लागन का न्हाय ?" आजीच्या आवाजात लाचारी. तिनं मग उमेशला हाका मारायला सुरुवात केली.

" उमीसा ऽ यी बाळा ऽऽ यी रं सोन्या. तुज्याशिवट कोण न्हाय बाबा मला बगणारं." आईच्या जिभेच्या तलवारीचे सपासप वार चालूच होते. काहीही न बोलता उमेश उठला. आजीचे सर्व विधी पार पडेपर्यंत शाळेची वेळ झाली. उपाशी पोटीच गेला शाळेत.

पुढेही कमी अधिक फरकाने हेच घडत राहिलं. मोठे भाऊ चलाखीने कामं, जबाबदारी टाळत होते. आई वडील त्यांच्या चलाखीला फसत होते…..की तसं दाखवत होते ? नाना क्लूप्त्या करून चांगलं खाणं, भारी कपडे आई वडिलांना घ्यायला भाग पाडत, त्यांना हवं ते करून घेत. 'तू समजूतदार आहेस' या काटेरी मुकुटाच्या बदल्यात उमेशच्या वाट्याला मात्र मोठ्या भावांचे वापरलेले कपडे, पुस्तकं आणि गाढवा सारखं राबणं आलं. त्याबद्दल त्याची तक्रार नव्हती पण जेव्हा दहावी नंतर उमेश म्हणाला

" पप्पा उद्या ॲडमिशन घेऊया माझं. माझे सगळे मित्र घ्यायलेत."

" ॲडमिशन… बरं बघू.. करतो पैशाची जुळवाजुळव मग बघू." वडिलांची बेफिकिरी.

" घे जा हितल्या जवळच्या कालिजात. तितं न्हायतं पैसं लागत." आईनं सुचवलं.

" त्या काॅलेजमध्ये सायन्स साइड नाही आई. दादा, आण्णानं अकरावी बारावी केली त्या काॅलेजमध्ये घेतलं तर त्यांच्यासारखेच मलापण इंजिनिअरिंगला जाता येईल म्हणून म्हणायलोय. " उमेश.

" ए उम्या ऽ आमची बरोबरी करायला का बे ? आबे ऽऽ पयलं मार्क बघ बे तुझे !" उमेशचा मोठा भाऊ दादाचा कुत्सित सल्ला.

" दादा ऽ ह्येनं लयीच हवा करायलय बघ." मधल्या आण्णानेही हात धुवून घेतला.

आई , दोन्ही भावांकडून मिळणारी तुच्छ वागणूक व वडिलांची उदासीनता पाहून उमेश दुःखी झाला. 'आपण फक्त कामासाठी आहोत. आईला सुद्धा फक्त काम असेल तेंव्हाच आपली आठवण येते. आपल्या नशिबात आई वडिलांचं, भावांचं प्रेम,माया का नसावी ? माणूस म्हणून आपला कोणी विचार करणारच नाही का ? आपल्याला मन आणि मत नाहीच का ? ' हा विचार छळत होता.

आजीचं सगळं करावं लागलं तरी तीच तेवढी उमेशचं मन ओळखायची. तिच्या हातात काही नसलं तरी त्याची बाजू घेऊन लेकाशी भांडायची. डोक्यावरून फिरणाऱ्या थरथरत्या हाताच्या प्रत्येक कंपनात तिची माया जाणावायची. पण काही दिवसांपूर्वीच आजी उमेशला टाकून कायमची निघुन गेली, तो एकटा पडला. 
कुमारवयातच तो प्रौढ झाला, अधिक समजदार झाला. घरात काहीही न बोलता तो बाहेर मित्रांकडे जायचा. त्याचे मित्र फाटक्या तोंडाचे, फाटक्या परिस्थितचे असले तरी उमेशसाठी त्यांच्या मनात एक जिव्हाळ्याचे स्थान होते नव्हे ते उमेशच्या स्वभावामुळे निर्माण झाले होते. उमेश काहीच बोलला नाही तरी मित्रांना त्याची व्यथा समजायची.

" या ऽ याऽ अहिंसावादी संत .." उमेशला पाहून धीरज त्याचा स्वाभिमान जागा व्हावा म्हणून चेष्टेच्या सुरात म्हणाला.

" आऽबेऽ धिऱ्या, ह्येनं ती बी न्हाई बेऽऽ त्येनी ' आरे ला कारे 'तरी करत हुते.आणि ते कधी ? सगळ्याची चव घेतल्यावर ! वाचलाव की आपुण पुस्तकात. ह्येनं पयल्यापस्नं गपच बसतंय.." दत्ता उमेशला डिवचण्यासाठी मुद्दाम म्हणाला. ते ऐकून उमेशच्या डबडबलेल्या डोळ्यातून दोन पोरके थेंब झर्रकन गालावरून घसरून शर्टात लुप्त झाले. तरीही मित्रांच्या नजरेतून सुटले नाहीत.

" तुला चिडवायला म्हणंना बे आमी.. तू चिडून उठावं म्हणून.. उम्या बोल बे बोल ऽ " विशाल मनापासून म्हणाला.

" पोरींसारखं रडू नको बे ऽ मर्दासारखं इंगा दाकवाय शिक." श्रीकांत त्यानं हक्कासाठी भांडावं म्हणून म्हणाला.

' मर्द !' उमेश मनातल्या मनात पुटपुटला.

" हे बघ उम्या, गांधीगिरीनं काम होत नसंल तर मग गुंडगिरीशिवा इलाज नस्तय बे .

'अगर मांगने से हक नहीं मिलता तो उसे छिनना चाहिए' चल आमी बोलताव काकाला, काकुला." धीरज उमेशचा हात धरून उठवू लागला. उमेशनं केवळ नकारार्थी मान हलवली आणि गप्प बसला.

कसाबसा अकरावी आर्ट्सला प्रवेश घेतला. कांदा चिरून दे, लसूण सोलून दे, धुतलेले कपडे वाळत घाल अशी कितीतरी कामं उमेश शिवाय होतच नव्हती. त्याचे दोन्ही भाऊ इंजिनीअरिंग साठी पुण्याला गेले. तिकडेच नोकरी लागले. त्यांच्या त्यांच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्नही झाली. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार या घराकडे पाठ फिरवली. काळ पुढं सरकत होता म्हणून उमेशही बीए झाला. वडील रिटायर झाले. घरात पैशाची चणचण भासू लागली. आईनं नेहमीप्रमाणं उमेशवरच आग ओकायला सुरू केलं.

" आय बाची लाकडं मसणात गेली तरीबी तुला त्यानीच पोसायचं म्हण की ? बरूबरीचं भाऊ, मैतर नोकरी लागून संसाराला लागलं न् तू मसुबा बसल्यावाणी बस नुसता घरात."

" आई नुसत्या बीए वर नाही नोकरी लागत." उमेश संयमी स्वरात म्हणाला.

" करणाराला बक्कळ हायत कामं. तुला करायचंच आसल्यावं दुनियाची कामं मिळत्याली. " आई फक्त डागण्या देत होती.

" आई आता पहिल्या सारखं नाही राहिलं. ग्रॅज्युएशन बरोबर टायपिंग, काॅम्प्यूटर कोर्स करावा लागतो. म्हणून मी क्लास लावतो म्हणत होतो." उमेश धीर एकवटून बोलला.

" तुझं फाजील लाड कराय न्हाय बाबा जमायचं. 'हौसंला मोल न्हाय न् दिव्याला त्याल न्हाय' पैसं झाडाला लागत न्हायतं."

वर्ष असंच गेलं. त्याच्या मित्रांनीच मध्यस्थी केली. त्याच्या वडिलांना समजून सांगितले. एकदाचं क्लासला परवानगी आणि पैसे मिळाले. अर्ज कर, मुलाखती दे करण्यात आणखी दोन वर्षे गेली.

" पैसा घालून काय उजीड पाडलास? पैशापरी पैसा गेला न् येळंपरी येळ. ' खादीला कार न् धरणीला भार नुसता." आईचं असलं बोलणं ऐकून उमेशचा तोंडातला घास घशातच रुतायचा खाली उतरतच नव्हता. 

बरोबरीचे मित्रही आता संसार, नोकरीत गुंतल्यानं इच्छा असूनही पाहिजे तेव्हा वेळ देऊ शकत नव्हते. एकटाच कुढत जगत होता उमेश. एके दिवशी देवाला म्हणा किंवा दैवाला म्हणा उमेशची दया आली. - कदाचित… कदाचित दुर्दैवाच्या सापळ्यात अडकवण्यासाठी टाकलेले दाणे ही असतील..! - 
उमेशला सरकारी खात्यात क्लार्कची नोकरी लागली. भरभक्कम नसला तरी पगार मिळायला लागला शिवाय आठ तास घराबाहेर असल्यानं शांती, समाधानाचं माप उमेशच्या पदरात पडू लागलं. आईची कटकट कमी झाली. 

झोकून देऊन काम करण्याच्या वृत्ती आणि शांत, संयमी स्वभावामुळे उमेश ऑफिसमध्ये सर्वांचा आवडता होता. त्याला आयुष्यबद्दल नुकतीच ओढ वाटू लागली.

रुपा भवानी देवीच्या दर्शनाला आलेले उमेशचे मामा मामी बहिणीला भेटून जावे म्हणून घरी आले होते.

" मग ऽ आक्का उम्याचं लगीन कधी करताव? " मामानं उमेशच्या आईला विचारले.

" करायचं की आता. दोन तीन पोरी बगितल्या आणि बगायलोय. नोकरी न्हाय म्हुण थांबलावताव, आता करताव." आई उत्साहात म्हणाली.

" म्हायार इसरलाव बघा ताई तुम्ही." उमेशची मामी सुचक बोलली.

" आसं का बोलाली गं ? वर्साला एकदा का आसंना येतावं, तुमच्या सगळ्या कारणालाबी आमी घरातलं कुणी ना कुणी येताव." आई.

" आता तुमाला सगळं फोडूनच सांगावं का ? उमेशच्या लग्नाचं म्हणायले. तुमी मागंदी संगुबद्दल इचारलावता इसरलाव का ?" मामी.

" अय्यीऽऽ नको म्हणलाव की नवरा बायको दोगंबी तवा. मी का म्हुण इसरती?" आईनं वार परतवला.

" आक्का ऽ झाली चूक.. झालं गेलं गंगंला मिळालं. मोटं मन कर आता तूच. संगिताचं शिक्षण बी झालंय आता. का ओ दाजी खरं का खोटं ?" मामा अजीजीने म्हणाला.

" खोटं ऽऽ नको तुमची पोरगी ह्या घरात.." उमेशच्या पप्पांनी कधी नव्हे ते आपलं मत मांडलं.

" ऑं ऽऽ काय बोलायलावं ? लोकाच्या लेकराला बोलताना धादा इचार करून बोलावं दाजी." मामा चिडून म्हणाला.

" धादा न्हाय हज्जारदा इचार करून बोलालोय. आमचा उमा शांत शितळ चंदन आणि तुमची संगा नुसती कवसकुली हाय कवसकुली ! जमतच न्हाय जोड." पप्पा ठाम.

" आक्का ऽऽ आसं नाक ठेचायला घरला बोलताव का ? " मामा डिरकलाच.

" आवं, काय इचारत बसलाव ? आपल्याला किंमत न्हाय उटा, चला.." मामी ताट्कन उठून उभी राहिली. मामाही उठू लागला.

" शंकर ऽ शंकर.. ल्हान धाकटा हायीस एवडी पण सत्ता न्हाय म्हण की बोलायला ? आनी तुम्ही न्हाय म्हणलाव तवा आमचं नाकाड न्हाय का ठेचलाव ?" आई समेट करू पहात होती.

" आगं दाजी बघ कसं बोलायल्यात संगीला " मामालाही हेच हवं होतं.

पप्पांचा नकार धुडकावून लावत आईनं उमेशचं लग्न संगिताशी जमवलंच. यात उमेशचा होकार नकार विचारात घेण्याचा प्रश्नच आला नाही. उमेश ऑफिसमधून घरी आल्यावर फक्त त्याला सांगितले आणि त्याच्या स्वभावानुसार तो याबाबत एकही शब्द बोलला नाही. आणि इतर गोष्टी प्रमाणे लग्नही त्याच्यावर थोपलं गेलं. 

भडक डोक्याची, सारासार विचार करण्याची कुवत नसलेली संगिता उमेशची अर्धांगिनी म्हणून त्याच्या घरात आली. सोळकं होईपर्यंत सर्व छान सुरळीत चालू होते.

लग्नानंतर उमेश आज पहिल्यांदाच ऑफिसला जाणार होता. नेहमीप्रमाणे त्याचं आवरणं चालू होतं.

" संगु ऽ ए ऽ संगे ऽऽ उट नवऱ्याला तरी च्या करून दे.." आईनं माडीवर झोपलेल्या सुनेला हाक दिली… हो आता भाची सुनेच्या भुमिकेत आली आणि आईमधली सासू जागी झाली. दोन तीन वेळा आवाज देऊनही संगिता खाली आली नाही.

"उम्या.." आईचा मोर्चा वळला.

" काय आई ?" उमेश ऑफिसला जायची तयारी होता.

" त्या मडमीनीला मकरात बसवाय आणलाव का परणून? "

" हं ऽऽ" उमेशला काय बोलावं ते सुचेना.

" हं.. काय करालायस ? खाली बोलीव तिला."

" आई, लहान आहे का तिनं ? मनानं कळावं की खाली याचं, काम करायचं. सांगायच्या गोष्टी आहेत ह्या ?" उमेश पहिल्यांदाच आईला दोन तीन वाक्ये बोलला. तिच्या भट्टीचा स्फोट झाला.

" बायील भाड्या मला शिकवालास का? गडी हायस नव्हं ? झिपऱ्या धरुन आण की खाली वडत. "

'गडी हायस नव्हं…?' आईचे हे बोलणं आंधळ्या वटवाघळासारखं मेंदूवर आपटत राहीलं. बराच वेळ सुन्न बसून राहिला. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा उपाशीपोटी तो ऑफिसला गेला. संध्याकाळी घरी आला तर त्याच्या 'माय'त महामाया आणि 'गृहलक्ष्मी'त कडकलक्ष्मी घुमत होती. न सांगता ऑफिसला गेला या किरकोळ कारणावरून संगितानं खडाष्टक मांडलं.

इतके दिवस एका तोफगोळ्याला तोंड देत होता आता दोन. रोज रोजच्या कटकटी टाळण्यासाठी तो जास्तीत जास्त घराबाहेर राहू लागला. 

सतत विचार, जेवणाकडे अक्षम्य दुर्लक्ष आणि प्रचंड ताण यामुळे उमेशचे मानसिक स्वास्थ ढासळले. ऑफिसच्या कामात चुका व्हायला लागल्या. त्यामुळे तिथेही अवहेलनाच पदरी पडत होती. पण अशाही स्थितीत तो कधीही कोणालाच तोंड उचलून बोलत नव्हता. आतल्या आत ताण जिरवत राहिला. 

आपल्या नशिबात हेच आहे हे त्यानं मनापासून स्वीकारलं. तो बोलत नसल्याने आई व बायकोची भांडणाची खुमखुमी मात्र कधी कधी लुळी पडायची. उमेशच्या अशा वागण्याने म्हणा किंवा फक्त संगीताची इच्छा म्हणून उमेश दोन मुलांचा बाप झाला. रखरखीत वैराण आयुष्यात थोडीशी कोवळी ओल झिरपली. 

बाकी तेच तिनं अंकी नाटक चालूच होते. कधी आई बायकोच्या कमरेच्या छल्ल्यासारखा वागतो म्हणून झाडाझडती घ्यायची तर कधी बायको आईच्या पदराखालीचं कुक्कुलं बाळ म्हणून उमेशचं रक्त आटवायची.

त्या दिवशी उमेश लंच ब्रेकमध्ये घरी आला तर घरात पाहुणे आलेले. संगीताच्या लहान बहिणीला मुलगा झाला म्हणून तिच्याकडे जाणार होते ते पाहुणे. पाहुण्यांसह सर्वांनाच जेवायला वाढले होते.

" मी काय म्हणायले ? मी पण जाते सुनीताला बघायला." संगिता उमेशकडे बघत म्हणाली.

" काय न्हाय गरज पोरावाला घीवून कुटं जायाची." उमेशची आई कडाडली.

" का ? का न्हाय जायाचं ? जाणार मी."

" जा ऽ जा ऽऽ कशी जाती बगतावच आमी. एकदा घरातनं भायीर टाकल्याला पाय पुन्हा ह्या घरात टाकायचा न्हाय. तिकडंच काळं करायचं. ए नंदीबैला टाकं घातलं काय तुझ्या तोंडाला. सांग बायकूला न्हाय जायाचं म्हणून. " आईच्या तोफेचं तोंड उमेशकडे झालं. सगळ्यांच्या हातातील घास गळून परत ताटात पडले होते. उमेशला ऑफिसला जायला उशीर होत होता म्हणून व त्यांचं बाळ आजारी होते म्हणून तो अगदी सौम्य आवाजात म्हणाला.

" संगू अगं आई म्हणते म्हणून नव्हे पण अंश आजारी आहे. त्याला ताप आलेला आहे. अशात बाहेरच्या हवेत कशाला न्यायचं ? मी तुला पुन्हा घेऊन जाईन."

हे शब्द कानी पडताच संगिताचा तडतड ताशा सुरू झाला.

" लपलाव का मायच्या पदरामागं ? स्वतःचं डोकं चालवायचंच न्हाय ! पुरुष हाव का न्हाय ? हिंमत असली तर आडवून दाखवा मला !! जाणारच मी." गोफणीतून दगड सुटावेत तसे तिचे शब्द उमेशला घायाळ करू लागले आणि कधी नव्हे ते त्याने संगिताच्या थोबाडीत मारली. संगितानं समोरच ताट भिरकावलं, मांडीवरच्या मुलाला खाली आपटून दाणदाण पाय आपटत वरच्या रुममध्ये गेली. जेवणाचा सगळा विचका झाला. आलेले पाहुणे न जेवता गेले. ऑफिसची वेळ टळून गेली होती. उमेशही ऑफिसला गेला. त्याचे वडील रडणाऱ्या बाळाला बाहेर घेऊन गेले. आईचा तोफखाना अजून चालूच होता. दोन तीन तास गेले असतील. उमेशची मुलगी 'मम्मा..' 'मम्मा' म्हणत झोपेतून उठली.

" जा ऽ वर हाय बग तुझी मम्मा न् टम्मा.. जा बोलीव. ह्या लेकराची तरी मया हाय का न्हाय..? पाजीव म्हणावं तिला." आईनं नातीला वर पाठवलं. ती पोर जोरजोरात दार वाजवत होती पण संगितानं दार उघडलं नाही. सहा वाजता उमेश आला. आईनं त्याला साग्रसंगीत सांगितलं. तो वर गेला.

" संगिता ए संगिता ऽ दार उघडं. अगं बाळ रडायलं गं. जा मनं तू गावाला. उद्या सोडतो तुला पण आता दार उघड." उमेश काकुलतीला येऊन विनवत होता. पण आतून शुन्य प्रतिसाद. अर्धा पाऊण तास झाला तरी संगिता ढिम्मच. शेवटी उमेशने मित्रांना बोलवलं. धिरजनं एक दणकट लाथ मारली तसा दरवाजा उघडला. 

समोरचं दृश्य भयावह! संगिताचे लज्जारक्षण करणारी ओढणी उमेशच्या आब्रुचे धिंडवडे काढत संगिताच्या गळ्याला विळखा घालून त्याच्या पंख्याशी बांधली होती.

'मर्द हायस का ?', ' गडी हायस नव्हं ?',

' पुरुष हाव नव्हं ?' या आईच्या, संगिताच्या शब्दांचा खोल गर्तेसारखा भोवरा झाला. '

उमेश त्या भोवऱ्यात गटांगळ्या खाऊ लागला, गुदमरला, निचेष्ट झाला. का ? का ? का ? आणि कुठंवर हे भोग भोगायचे मी ? माझ्या कोणत्या अपराधाची ही शिक्षा ? माझा अपराध आहे ? प्रश्नांच्या असंख्य नागांनी दंश करत भोवती फेर धरला होता. उमेश मात्र जगतही नव्हता आणि मरतही नव्हता…


©® सौ. संध्या सूर्यकांत धर्माधिकारी.

सदर कथा लेखिका सौ. संध्या सूर्यकांत धर्माधिकारी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

धन्यवाद.!!!

📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने