आई बाबांचा प्रेमळ निरोप घेऊन मी बसमधे चढले. आज मी सासरी निघाले होते.
एकीकडे माहेरचा वियोग व दुसरीकडे नव्या जीवनाची ओढ. अश्रु पुसावे तर परत दोन थेंब बाहेर पडायला तयार. माहेरची सीमा संपून बस सासरच्या रस्त्याला लागली. बसचा वेग जसा वाढत होता तसा अश्रुंचा वेग कमी होत होता. अजयचे मित्र चेष्टा करत होते. त्यात गावाची सीमा केव्हां लागली कळलेच नाही.
दुरुनच छोटया छोटया टेकड्या दिसू लागल्या. इकडे म. प्र. मधे छोटया टेकडयांना डुंगरी म्हणतात. एका बाजुला जालपा माताची टेकडी व दुसरीकडे 'बटेरी की डुंगरी' दिसू लागली. आणी आठवली अजयची प्रथम भेट, प्रथम स्पर्श आणी मी रोमांचीत झाले.
चोरटी नजर बसमधल्या सर्वांकडे टाकली, कुणी बघत तर नाहीये माझ्याकडे. गाव जवळ येत होते, गावाचे नांव राजगड. नेवज नदीच्या काठावर वसलेले. निव्वळ तीस हजाराची वस्ती. जणु हिल स्टेशन. एकाणीशेसोळा मधे राजा वीरेंद्रसिंह गादीवर बसला. छोटा महाल मोठा महाल इतिहासाचे साक्षीदार आहेत.
या गावी माझी आत्या रहात होती. आत्याचा आवडता छंद लग्न जुळवण्याचा. तिनेच माझे लग्न जुळवले.
झटपट पसंती झाली व आत्याने मूलाच्या आईकडुन फिरायली जाण्याची परवानगी घेतली. तेव्हांच अजयबरोबर मी या डुंगरीवर फिरायला आले होते.
लाल मातीच्या कच्या रस्त्याने आम्ही म्हणजे मी व अजय, चढत होतो. आजुबाजुला लहान लहान टेकड्या पसरल्या होत्या. जेष्ठ संपून आषाढ लागणार होता. एक दोन पावसाचे शेरे येउन गेले होते. निसर्गाचे रुप डोळयात मावत नव्हते. वातावरण आल्हाददायक होते. जुन्या आजाद सिनेमाचे गाणे आठवले. 'कितना हसीन मोसम कितना हसी सफर है.'
रहदारी, वर्दळ, आवाज, धूर, यापासून दूर..... सारं कसं शांत शांत. निसर्गाच्या सान्निध्यात, अजयची साथ हवीहवीशी वाटत होती. ओलसर लाल मातीच्या गंधाने मन मोहरले होते.
प्रदुषणात श्वास घेण्याची सवंय, इथं कसं निर्मळ स्वच्छ वातावरण. उतरती उन्हे, सोनेरी साज ल्यायलेल्या टेकडया, जणु सोनेरी मुकुट घातलाय. एवढी मोहक संध्याकाळ शहरातील लोकांना अशक्य ! आता मी इथलीच होणार म्हणजे हा अनुभव नेहमीच माझ्या वाटयाला येणार.
टेकडी वर चढुन आलो तर एक लहानसे देऊळ दिसले, पण अर्धवट बांधलेले. हातात हात घालून आम्ही बसलेलो. गाव इतके छोटे की धुक्यांत नेमकी वस्ती कुठल्या बाजुला हेच कळत नव्हते.
वळणदार रस्ता व त्यावरुन एखादेच जाणारे वाहन. तेवढयात पुजारी आला.
त्याला मी विचारले की हे मंदिर असे अर्धवट कां बांधले आहे? पुजारी म्हणाला की त्याची एक दंतकथा आहे.
'सांगा ना आम्हाला मी म्हणाले. त्या निमित्ताने तेवढाच वेळ अजयच्या संगतीत राहता येईल.
पुजारी सांगु लागला, फार वर्षापुर्वी राजा वीरेंद्रसिंह यांच्या वंशात एक राजा प्रतापसिंह होऊन गेला. पूर्वीचे राजे आपली आठवण रहावी म्हणून वास्तु बांधत. या राजाने एक सुंदर देऊळ बांधायचे ठरविले.
हा राजा प्रजेचा लाडका व विद्वान होता.
राणीने विचारले, " कोणत्या देवाचे देऊळ तूम्ही बांधायचे ठरविले आहे?"
राजाला देखिल प्रश्न पडला, रामाचे, कृष्णाचे की शिवालय !!
राणी म्हणाली, " या देवांना कुणी पाहिले आहे का? मूर्तीकार त्यांच्या कल्पनेने मूर्ती बनवणार."
राजा म्हणाला," अग् देव म्हणजे देव. आपण मानतो तसा घडवायचा त्यात काय?"
"देवाची मंदिरे तर जागोजाग आहेत, त्यात आणखी एक भर. मग वेगळेपणा काय!" राणी म्हणाली.
मग तूच सुचव न कशाचे मंदिर बांधायचे?" तेवढयात तेथे एक' बटेर' घायाळ अवस्थेत येऊन पडली.
कुणीतरी त्या बटेरची शिकार केली होती. बटेर म्हणजे एक प्रकारची चिमणी. या चिमण्या येथे खूप होत्या. आसपासचे आदिवासी या चिमण्यांची शिकार करत.
राणीला कल्पना सुचली. ती म्हणाली," या बटेरचे स्मारक म्हणून एक देवीचे मंदिर बांधावे म्हणजे या चिमण्यांना जीवनदान मिळेल. हयांच्या शिकारीला बंदी घालावी. बटेरीची देवी या चिमण्यांचे रक्षण करील. म्हणजे हे एक जगावेगळे मंदिर होईल.
राजाला ही कल्पना आवडली व बटेरी देवीचे मंदिर बांधण्यास त्याने सुरवात केली.
पण दुर्देवाने राजा तरुण वयातच लढाईत मारला गेला आणी हे मंदिर अर्धेच राहीले. राणी बिचारी दुःखी हे काम पूर्ण करु शकली नाही.
सूर्य मावळत होता. आम्ही दोघं कहाणी ऐकण्यात इतके गुंग झालो की वेळेचे भानच राहीले नाही. मग झटपट खाली उतरुन घरी पोचलो.
आत्या जराशी रागवलीच, " अग् प्रथमच तू त्याच्याबरोबर गेली होतीस तर वेळेचे भान नको का ठेवायला? लोक काय म्हणतील!"
दुसरे दिवशी मी आईकडे परतले. शाळेत जोशी मॅडम व इतर शिक्षिका लगेच म्हणाल्या, काय विशेष खबर ? काहीतरी गोड बातमी दिसतेय. लाजून लाल झाल्याचा अनुभव प्रथमच येत होता. गुलाबी गाल, बोटातील अंगठी, डोळयातील चमक लपवून लपते का !
लग्नापर्यंतचे मधले दिवस निघता निघत नव्हते..... आणी एक दिवस अक्षता, मंगलाष्टकाच्या घोषात मी अजयची झाले.
एका झटक्यात बस थांबली आणी मी विचारांच्या तंद्रीतून जागी झाले. नववधूचे स्वागत झाले. गृहप्रवेश झाला. नवीन नवलाईचे दिवस पहाता पहाता निघून गेले. नवीन पाहुण्याच्या चाहुलीने घरात हर्षाची लहर उठली. सासू सासरे आजी आजोबा होणार म्हणून खूशीत होते. नाव मेधा ठेवले.
पहिले अपत्य म्हणून सर्व तिच्या बाललीलांमधे गुंग होते. मेधा शाळेत जाऊ लागली आणी परत मातृत्वाची चाहूल ! या खेपेला मुलगाच होणार अशी सर्वांना खात्री.
दवाखान्यात सर्व दोन जीवांच्या सुटकेची प्रार्थना करत होते. बाळ रडल्याच्या आवाजाने सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यावळेस अजय माझ्या आईबाबांना घेण्यास स्टेशनवर गेला होता. मुलगी झाली होती.
मेधा बाळ बघायचे म्हणून हट्ट करत होती. लेबररुममधून मला वार्डमधे शिफ्ट केले. मेधाला बाळ बघून खुप आनंद झाला.ती आता ताई झाली होती.
" पण अजून आईबाबा का आले नाही, अजय कसा आला नाही, ट्रेन लेट झाली का?" मी सासूबाईंना विचारले. पण त्या कांहीच बोलल्या नाही. शेजारच्या सुलुला माझ्याजवळ ठेवून सर्व घरी गेले.
सुलूचा चेहरा पण थोडा घाबरलेलाच वाटत होता. पण ती देखिल कांही बोलत नव्हती.
दूसरी मूलगी झाली म्हणून सर्व रागावले असावे बहुदा. दूसरा दिवस उगवला शेजारच्या इंदूताई मला घरी घेउन गेल्या. घरचे दृष्य पाहून माझे भानच हरपले.
क्षत विक्षत झालेला अजय आणी बाबा या दोघांचे निष्प्राण देह झाकून ठेवले होते.
मी शुद्धीवर आले तेव्हां सर्व मला धीर देत होते. मला अवेळीच सोडून निघून गेला होता अजय. ट्रेनचा अपघात झाला होता. बाबा पण त्यात गेले, सुदैवाने आई वाचली.
मृत्यू न म्हणे बाळ तारुण्य, 'मृत्यू कोणालाही घेऊन जाऊ शकतो. माझ्या ललाटरेषेत त्याचा व माझा संसार तेवढाच लिहिला होता. त्याच्या पाठीमागे विराण आयुष्य घालवायचे, ते देखिल तरुण वयात.
तीन महिन्यातच अजयच्या जागी मला बैंकेत नोकरी लागली.
सासु सासरे तरुण मुलाला गमावल्याच्या दूःखात, त्यांना आधार देणे आवश्यक होते. दोघी मुली केविलवाण्या झाल्या. जीव कळवळत होता. आता त्या दोघींसाठी जगायचे.
छोटीने वडिलांचे तोंड देखिल बघीतले नव्हते. निराशेने मन झाकळून गेलेले. हाती आलेले सूख कुणीतरी हिसकावून घेतले होते. मी सैरभैर झाले. काळाच्या ओघात वहात होते.
मुली मोठया होत होत्या. सर्व स्थिरसावर झाले. काळ जातो तशी दुःखाची तीव्रताहि कमी होऊ लागते. वेदनांवर खपल्या चढल्या होत्या, त्या आता वाळत होत्या. सासू सासरे मायेने करत होते.
पण पुन्हा एक खास दिवस उगवला. छोटया दुखण्यांना मी घाबरणारी नव्हते.
पण त्या दिवशी सर्दी, ताप, आणी छातीतून जोरदार निघणारी कळ ! दवाखान्यात भर्ती व्हावे लागले. डॉक्टरने निदान केले' दिल की बिमारी'
माझे दिल तर अजय केव्हांच घेऊन निघून गेला होता. ही बिमारी कुठून आली. मन हळुच कानात कुजबुजले, ही अजयची हांक तर नसेल !! हो नक्कीच अजय मला बोलवत होता. ती अजयचीच हांक होती.
पहाट होत होती. तो दिवस सोनरी सूर्य घेऊन उगवला. दारात गुलमोहोर मोहरला होता. व्याकुळ रंगाने फुललेला. निष्पर्ण होताना बहरायला त्यानेच मला शिकवले. आणी मी मोहरले, गुलमोहरासारखी.' हार्ट ट्रबल' म्हणजे माझे हार्ट अजुन आहे.
एक डहाळी खिडकीतून खुणावत होती. झाडाच्या मधून निळे आभाळ डोकावत होते. सांगत होते, आता आयुष्याचे थोडेच दिवस राहीले. अजयकडे केव्हांही जाण्याचे बोलवणे येईल. काहीतरी स्मृती मागे ठेवून जायला हवे.
आठवण आली बटेरीच्या डुंगरीची. राजा प्रतापसिंहसारखाच अजय ऐन तारुण्यात गेला. त्याची आठवण म्हणून ते अर्धे राहीलेले मंदिर आपणच पूर्ण करायचे. म्हणजे ' बटेरी की डुंगरी अमर होईल.
अजयच्या विमा पॉलीसीचे पैसे होते शिवाय भविष्यानिधीचा पैसा होता आता ती रक्कम पुष्कळ मोठी झाली होती. त्यातून मंदिराचे काम पूर्ण करायचे.
कांही महिन्यातच ते छोटेसे देऊळ बांधून पूर्ण झाले. आता मी केव्हाही अजयकडे जाण्यास तयार आहे, केवळ प्रतिक्षा आहे शेवटच्या क्षणाची, अजयच्या हांकेची !!!!!
©® उषा ठाकरे
सदर कथा लेखिका उषा ठाकरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी. कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
