कोंडी आणि निचरा

 #कोंडी आणि निचरा 

© लेखिका - स्मिता मिलिंद 🍁


हा लेख कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळातील आहे. 

आत्ताची परिस्थिती, घरात कोंडलेली. अपरिहार्य, गरजेची पण त्रासदायक. आत्तापर्यंतच्या जीवनशैलीशी विसंगत.
             रोजची धावपळ. घड्याळाच्या काट्यावरची कसरत. शांतपणा नव्हताच. तेच जगणे झाले होते. हेच जीवन आहे, असे ठाम मत होते.
           आणि आता अचानक इतका मोठा बदल झाला. सुरुवातीला जरा चाचपडणे होते. आपल्याला जमेल का? करायलाच हवे. आपण करुच. सजग नागरीक आहोत. आपल्यासाठी हे गरजेचे आहे. या सगळ्या वास्तव गोष्टी, स्वतःला आणि इतरांना ठामपणे सांगितल्या गेल्या.
         आता जसजसे दिवस आठवडे पुढे सरकत आहेत; तसतसे हे झेपणे कठीण होत चाललेय.
        विभक्त कुटुंब पद्धती... दोघेजण office ला जाणारे. मुले शाळा, पाळणाघर, क्लासेस. संध्याकाळ नंतर सकाळ पर्यंत सोबत फक्त.
       सकाळी ' ही ' धावाधाव करुन सर्व आवरणार. 'तो' जमले तर मदत करणार. काही कामे मोलकरणीसाठी राखीव.   मग दिवसभर वेगळ्या आघाडीवर लढायला ती सज्ज. Week end ला जरा या सगळ्या ताणाचा निचरा करण्यासाठी कुठे get together, गप्पांच्या मैफीली, सिनेमा, hoteling. पुन्हा नव्या आठवड्यासाठी लढायला सज्ज. ज्याच्या त्याच्या निवांतपणाच्या व्याख्या वेगवेगळ्या.
           आणि आता सर्वच बदलले. सुरुवातीला मोकळ्या वेळाचा आनंद घ्यायचा प्रयत्न झाला. पण आता हा लादलेला कोंडलेपणा असह्य व्हायला लागला. इतके दिवस काम होतेच. पण कामात बदल होता. कामात बदल सुद्धा आराम ठरतो. घरकाम वेगळे आणि office work वेगळे. आता तोच तोचपणा बोचरा वाटु लागला.
         स्वयंपाक, साफसफाई (जी इतरवेळी मोलाने करवुन घ्यायची सवय होती ), परत परत खाण्याचे लाड पुरवणे, मुलांची काळजी घेणे, नवऱ्याचे मूड्स सांभाळणे, स्वतःची किरकोळ आजारपणे, शिवाय नंतर work from home सुरु झाले. Office ला गेल्यावर निदान त्या कालावधीत घरकाम तरी करावे लागत नव्हते. आता दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पेलताना ती मेटाकुटीला आली.
          ' त्या ' ला तर घरात बसायची सवयच नाही. आणि त्यात तिची अपेक्षा, त्याने घरकामात मदत करावी. ' तो ' आधीच स्वतःला निष्क्रिय समजु लागलेला. पैशांचा ताण, कर्जाचे हप्ते कसे भरु? घरखर्च कसा भागवु? office ची खोळंबलेली कामे. धंदा असेल तर, मालाचे नुकसान, नोकरांचे पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च. एक ना अनेक समस्या डोक्यात.
          मुले वेगवेगळ्या वयातली, वेगवेगळ्या समस्या.
  अजाणत्या वयातली, त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजतच नाही. मग रोज बाहेर फिरायला नेणारे बाबा बाहेर का नेत नाहीत? म्हणून रडारड.
शाळेतल्या मुलांचे उन्हाळ्याच्या सुट्टीतले सर्व खेळणे, गावी जाणे, सहल, सर्वच फिसकटले. म्हणून ती चिडलेली. कॉलेजची मुले, तरुण मुले घरात कोंडणे सहन करु शकत नाहीत. ती वेगळी समस्या.
          आणि हे सर्व स्वतःचे राग, धुसफूस घेऊन सतत एकमेकांसमोर यायचे, म्हणजे भांडणासाठी अगदी छोटीशी ठिणगी सुद्धा कारणीभूत ठरते.
       एकत्र कुटुंबात सून दिवसभर नोकरी करणारी. त्यामुळे एकत्र असण्याचे प्रसंग कमीच.
          परंतु आता सतत समोरासमोर. मग नकळतपणे छोट्या छोट्या गोष्टींसाठी समोरच्याला जबाबदार धरले जाते. इतक्या दिवसांच्या  साठलेल्या रागाचा, नैराश्याचा, अगतिकतेचा वारंवार उद्रेक होतो.
         इतक्या वर्षांची सवय एका रस्त्याने जाण्याची, एका रुळावरून गाडी पळवण्याची. आता रुळ बदलताना, सांधे बदल होताना, खडखडाटाचा आवाज वाढतो. एका जीवनशैलीतुन, अकस्मात उद्भवलेल्या नविन जीवनशैलीत प्रवेश करताना, ती अंगिकारताना, मनाची शरीराची खूप तडफड होते.
       इतरांच्या कृत्याला नावे ठेवणे, चुक ठरवणे वारंवार घडते. आणि मग वाद होतात.
            हा सगळा राग वाद निष्फळ आहे. परिस्थिती आपण बदलु शकत नाही. हे कळलेले असते. त्यातून आणखी हतबलता येते.
          हे कधी बदलेल ही शाश्वती नाही. विशिष्ठ कालावधी नाही. शिवाय सर्व काळजी घेऊन तो आजार कुठूनही येउ शकतो. ही डोक्यावरची टांगती तलवार घेऊन जगायचे. ओढाताण होते मनाची.
        पूर्ण बदललेली सामाजिक घडी. ते मित्र मैत्रीणींबरोबर, नातेवाईकांबरोबर एकत्र येणे.  सुख दु:खाची देवाणघेवाण. त्या पाठीवर मारलेल्या आपुलकीच्या, आधाराच्या थापा. सर्वच तर थांबलेय.
         आपले ओझे आपणच वाहत असतो. आपल्या समस्यांना  आपणच सामोरे जात असतो.  तरीही अधेमधे मिळणारा हा हक्काचा मानसिक आधार चालायला बळ देतो.
        मानसिक शारीरिक ताणाचा निचरा करण्याचे, ज्याचे त्याचे मार्ग भिन्न. तेच अचानक बंद झालेत. जागेवरच अडकणे होतेय. सतत तेच तेच चेहेरे, तोच परिसर, तोच सहवास. थांबलेले आयुष्य. "अतिपरिचयात अवज्ञा " ही स्थिती आहे.
       ज्या घरांत फक्त वृद्ध आहेत, त्यांच्या वेगळ्या समस्या. वृद्धापकाळाने घरकामे होत नाहीत. बायका येउ शकत नाहीत. आजारपणं आणि जीवघेणा एकांतवास.
        अशा स्थितीत मानसिक सामर्थ्याची खरी कसोटी लागते. डोके प्रयत्नपूर्वक शांत ठेवणे गरजेचे. आहे त्या परिस्थितीचा स्थिर मनाने स्विकार करणे. स्वतः बरोबर संवाद साधणे. मानापमानाचा बडेजाव न करणे.
         ही माणसे माझीच आहेत. माझे जगणे, माझे राबणे, माझे सर्वस्व हिच आहेत. असे मनाला सतत बजावणे. एकमेकांच्या काही  कामांची अदलाबदल करणे. आणि सर्वात महत्वाचे "त्याच्यावर " विश्वास ठेवणे.
       ही परिस्थिती बदलणारच आहे. आपण एकटेच या परिस्थितीत अडकलो नाही. तर जगातील सर्वच जण कमीअधिक प्रमाणात असेच अडकलेत. म्हणजे जे जगाचे होइल ते आपले होइल. आपल्या बरोबर सर्वजण आहेत. ही भावना जपणे.
         समस्येवर उत्तर असतेच. कधी मिळेल हे तो ठरवतो. हा काळ खरचं संयमाच्या परिक्षेचा आहे. त्या साठी मनाची तयारी करणे नितांत गरजेचे.
       एखाद्या घटनेकडे आपण कसे बघतो, त्यावर पुढच्या घटनांचा क्रम ठरतो.
     एक साधे उदाहरण पाहू.
मुलाचा ऑफिसचा डबा जेंव्हा, आई मध्येच येउन भरुन देते. तेंव्हा ती घटना कोण कसे घेते ते बघु.
  मुलगा = बरे झाले माझा वेळ वाचला. किंवा माझे मला करता येते. मधे का आलीस .. उगीच लुडबुड करतेस.
  सून = घाईच्या वेळी यांची किती मदत होते. किंवा मध्ये यायलाच हवे होते का? दाखवायचे ना, मी किती चांगली.
         अगदीच छोटी घटना. पण वाईट अर्थ काढला की घटनेचा रंग बदलतो. आणि रागाच्या ठिणग्या जमत जातात. दिवसभरात अशा कितीतरी गोष्टी घडत असतात. आणि त्यातूनच पुढच्या घटनांना गती मिळत असते. म्हणून दृष्टीकोन निकोप ठेवायचा.
          आपण अगदी वेचुन इतरांच्या चुका काढणार... कुरापती करणार. पण समोरच्याने आपली चुक दाखवली की ते सहन करण्याची आपली शक्ती नसते. मानसिकता नसते. तिथे अहंकार आड येतो. इथेच  स्वाभिमान आणि अहंकार यांची गल्लत होते.
                  कधीतरी समोरच्याच्या चुकीकडे दुर्लक्ष करुन बघा. हसुन घालवुन टाका.      स्वतःची चूक दिलखुलास कबुल करा. तुमच्या थोड्या माघार घेण्याने, शांत रहाण्याने, पुढचे कितीतरी मोठे वाद तिथेच नष्ट होतात. हा वाद नाहिसे करण्याचा आनंद घेऊन बघा. स्वतःच स्वतःला शाबासकी द्या. चेहऱ्यावर तो आनंद दिसतोच. आणि मग सगळ्या घरात पसरतो. छोटाच तर प्रयोग आहे. करुन बघा.
      विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वातावरणात, निसर्गात, एक मंथन चालु आहे. सर्व ढवळून निघत आहे. या ज्या लहरी आहेत, त्यांचा परिणाम नक्कीच मनावर होत असणार. म्हणून शांतपणे जो निर्णय घेईल, तोच तरंगेल, तोच तरेल.
      भावनांची आंदोलने वाढली आहेत. झटाझट बदलणाऱ्या भावना, आवाजांचे चढउतार, ही उलथापालथ, घालमेल समर्थपणे पेलायचे आहे.
        माहिती आहे कल्पनाहि केली नाही. अशी परिस्थिती उद्भवली आहे. आपण नक्कीच धैर्याने याचा सामना करणार आहोत. हे सर्व निवळायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत
संयमी राहू
एकसाथ राहू
घरात राहू
"त्याच्या" बरोबर राहू .......

©® स्मिता मिलिंद 🍁

सदर लेख माझा म्हणजेच लेखिका स्मिता मिलिंद यांचा असून मी माझ्या परवानगीने "माझी लेखणी" या वेबसाईटवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. या लेखाचे सर्व हक्क माझ्याकडे राखीव असून माझ्या परवानगी शिवाय ते कुठेही वापरू नयेत किंवा शेअर करु नयेत.
धन्यवाद.!!!

 
©® स्मिता मिलिंद 🍁

 सदर लेख लेखिका स्मिता मिलिंद यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने