©️सौ राजश्री भावार्थी
..ट्रिंग ट्रिंग..रिंग वाजली तशी अर्पिता ने फोन उचलला ....!
फोनवर नेहाने पटकन तासाभरात रेडी हो कॅप्टन अंकल ची तब्येत बिघडली जायला हवे लवकर !! म्हणून निरोप दिला ......!!
आवरता आवरता अर्पिता कॅप्टन अंकल बद्दल आठवू लागली !!...
रविवारचा आळसावलेला दिवस.
लिफ्टमधून सामानाची ने - आण चाललेली ...तसे नेहमीच कोणीतरी नव्याने राहायला येत आणि जात म्हणून लक्ष दिले नाही ......
त्यानंतर दुपारी सहजच चहा घेताना टेरेस मध्ये बसले असता ...
अबे कडू...तुझ्या ....!! हॉटेलात का उतरला बे !!
तुझा कॅप्टन अजून जिवंत आहे !!
आहे तसा बॅग घेऊन माझ्याकडे ये .....
नाहीतर तुझा माझा संबंध संपला !! ....
अर्पिताने भाषेवरून झटकन ओळखले की हे आपल्याच गावातील म्हणून !!
घरात येऊन बोलली तर मुले, नवरा ही आता नवीन गिऱ्हाईक गप्पा मारायला शोधणार अशा आवेशाने हिच्याकडे बघत होते .
मुले थोडी मोठी झाली म्हणून अर्पिताने आपली वकिली प्रॅक्टिस , कौन्सल्लिंग व्याप थोडा कमी केला होता .
तिला पहिल्यापासून समाजकार्याची आवड , त्या विरुद्ध नवरा तटस्थ !! आपण भले आपली कंपनी जॉब बरा !!
त्यानंतर आठच दिवसानी खाली पार्किंग मध्ये कॅप्टन अंकल दिसले तशी ही पहात राहिली की ह्यांना कुठे बघितले !
हिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखून मी कॅप्टन विश्वास देशपांडे अशी ओळख त्यांनी करून दिली आणि सगळा खुलासा झाला ...हा विशु म्हणजे आपल्या दादाचा मित्र !! दोघेही एकाच वर्गात होते ..
साहजिकच तिला खुप आनंद झाला . भावाबद्दल अर्पिता भरभरून बोलली तेंव्हा कॅप्टन बोलले अग आम्ही नेहमी बोलतो आणि मी तुला ओळखले ...!! पण तुलाच मला ओळखता आले नाही !! ....
चार दिवसांनी कॅप्टन अंकल नि अख्या सोसायटी ला पूजे निमित्त घरी बोलावले .
सगळ्यांच्या ओळखी झाल्या.
संपूर्ण हयात लष्करात देशसेवा करण्यात घालवलेली !!
अत्यंत कडक शिस्तीचे , अंकल तितकेच भावूक , मनमिळावू होते ....
पहिल्याच मिटिंगमध्ये सोसायटी चे उपक्रम , कामकाज याचा भार त्यांनी उचलला.
अर्पिताला तो दिवस लख्ख आठवला ...अंकलनी सगळ्याना सांगितले की आजपासून दररोज तीस मिनिटे तरी सायकलिंग करायचे.
ज्यांना शक्य असेल त्या सगळ्या अबालवृद्धांनी !!.....
दुसऱ्या दिवशी सोसायटीतील बऱ्याच लोकांनी आपल्या धूळखात पडलेल्या सायकली धुवून पुसून स्वच्छ केल्या .
काहीजण नंतर सायकल घेतल्यावर किंवा इतरांची वापरून सहभागी होणार होते .
अर्पिताही रेडी होती . घरातील लोक हा काय नवीन प्रकार म्हणून तिच्याकडे पाहू लागले !!
पण कॅप्टन नि सांगितलेले तब्येतीचे महत्व , फिटनेस ह्याची जाणीव त्यांना करून दिली...मुले व नवरा ही ह्यात नंतर सहभागी झाले ही गोष्ट वेगळी !!
पहिल्या दिवशी अर्पिता धास्तावलेली बऱ्याच वर्षांनी सायकल हातात धरलेली !!
पण अंकल व इतरांनी संभाळून घेतले !!
या कॅप्टन अंकल नि सोसायटीत अनेक उपक्रम स्वतःच्या पैशाने राबविले.
अगदी योगा टीचर बोलवून योगा क्लास घेतले , झुंबा , गॅदरिंग , गणपती ...वगैरे ...!!
सोसायटीची बागेची देखभालीकडे पण अंकल चे लक्ष असायचे .
त्यांचा 4 BHK फ्लॅट ...!! दारावर पाटी कॅप्टन हाऊस अशी होती !!
आल्या गेल्या सगळ्याना घर कायम खुले असायचे !! काकू पण अगदी मनमिळावू , लाघवी
.....असे हे दांपत्य ....त्यांची दोन्ही मुले एक दिल्ली , तर दुसरा अमेरिकेत स्थायिक होती !!
काकांनी मात्र आपली पसंती पुण्याला दिली !!
दिवसामागून दिवस जात होते ...आता सोसायटीत कॅप्टन शिवाय कोणाचे पान हालत नसे !! त्यांनी सगळ्यांनाच आपलेसे केलेले ....!
पण ...नियतीला हे सुख पाहवले नाही की काय .....अन छोटेसे आजारपणाचे निमित्त होऊन काकू गेल्या !!
कॅप्टन आपल्या पत्नी वियोगाने उन्मळून पडले !! ....
मुलांनी सहा महिने आपल्याकडे नेले ..!
पण काकांना ते रुचले नाही पुन्हा ते पुण्यात परतले .....!
कॅप्टन हाऊस आता उदास बनून राहिलेले
मग मात्र आम्ही सोसायटीतील सदस्यांनी अंकल ला धीर देऊन पुन्हा कार्यात गुंतवून ठेवले.
अनेक वृद्धाश्रम , अनाथालय इथे कॅप्टन नि भेटी दिलेल्या !!
तिथेही जमेल तशी मदत केली ...मात्र गेल्या काही दिवसांनी हे ताडामाडाचे झाड थोडे वाकलेले , खंगलेले दिसायला लागले !
चौकशीअंती समजले की त्यांच्या सुनेने त्यांना नीट वागणूक दिली नाही आणि त्यांच्या संसारात आपली अडचण नको म्हणून अंकल परत पुण्यात परतले !! ...
कॅप्टन उदास असता सहजच बोलले या म्हाताऱ्याला ....घर आहे पण ...धीर हवा साथ हवी .....!!
आपल्या माणसांची आणि हीच खंत त्यांच्या मनात कायम राहिली ....
.
थोड्याच दिवसात कॅप्टन नि निर्णय घेतला ....कॅप्टन हाऊस ला कुलूप लावून वृद्धाश्रमात राहण्याचा !! आमच्यावर हा खूप मोठा आघात होता !
पण परिस्थितीमुळे सगळेच हतबल झालेले !! कोणी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही !!....
आणि अंकल च्या तब्येतीच्या कुरबुरी वाढल्याने त्यांच्याकडे कायमस्वरूपी लक्ष देणे गरजेचे होते !!
कॅप्टन नि माझ्याकडून मृत्यूपत्र तयार करून घेतले त्यात आपले घर नातवंडाच्या नावे ....
तसेच काही संपत्तीची वाटाघाटी वगैरे ....आणि आज सहा महिन्यांनी आलेल्या या फोन ने अर्पिता सुन्न झाली..
काय चुकले कॅप्टन चे ...मुलांना कडक शिस्तीत , पण लाडाकोडात वाढवले !! ...
पण उतारवयात ह्यांची अशी अवस्था !! हतबलता दाटून आलेली , विचार करून अर्पिताचे डोके बधिर झाले.....!!
काही नाती अशी अमूल्य असतात त्याची किंमत करू नये !! जपावं अगदी तळहातावरील फोडासारखं !! उगाच गंमत बघू नये.
सुनं , सुनं कॅप्टन हाऊस बघून मनी विचार आला !!
बंद घरात बंद चिमणा , काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता !! आपल्या माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेला होता !!
स्वतःची रक्तबंबाळ चोच विसरून आधार धुंडाळत होता !! अगदीच असहाय्यपणे !!
©️सौ राजश्री भावार्थी
सदर कथा लेखिका सौ राजश्री भावार्थी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

कथा अतिशय छान व भावुक करणारी आहे.
उत्तर द्याहटवालेखिकेला अ. आ. व कथा आवडल्याची पोच.
Thank you so much
हटवा