© डॉ सुनिता चौधरी
आई ग् sss.......
"आज तुझ्या हातचं थालीपीठ खाऊ वाटतंय करतेस का ग्"? म्हणत वैदेही ने परत अंगावर पांघरूण घेतलं.
सकाळचे आठ वाजले होते तरी वैदेही बेड वरच पडून होती.
आज संडे असल्याने तीला कामावर सुट्टी होती म्हणून गेली तीन चार संडे ती अशीच आठ वाजेपर्यंत बेड वर लोळून रहायची.
पण आज मात्र आईचा पारा चांगलाच चढला होता आणि ती रागातच वैदेही जवळ येत तीचं पांघरूण काढत तीला सुनावू लागली .....
"जरा लाज वाटते का वैदू तुला"?.....
आठ वाजलेत अन् तू अजूनही लोळत पडलीयेस...... मगाशीच जोशी काकू येऊन तुला ह्या अवतारात बघून गेल्या आणि माझ्याकडे "पोरगी हाताबाहेर गेली हो तुमची" म्हणून माझाच उध्दार करत निघून गेल्या.
आईच्या अशा बोलण्याने वैदेही लगेच उठली आणि बेड वरची चादर निट करत आईला विचारू लागली की,
"आई ! मी असं काय केलं ग् की , माझ्यामुळे लोक तुझा उध्दार करत बसलेत? "
वैदेही च्या अशा उलट प्रश्नाने आईचा संताप अगदी डोक्यात गेला होता.
रागाने लाल होत आई जवळजवळ ओरडतच तिला म्हणाली अग् विधवा झाली आहेस तू ! हे विसरलीस का लगेच? नव-याला जाऊन अजून वर्षही झाली नाहीत तर लगेच तुझी ही थेरं मांडलीस का? लोकं काय - काय बोलतात ह्याचं जराही भान आहे का तुला? अग् काय ग् हे तुझं जगावेगळं वागणं?
हसते काय जोरजोरात, गप्पा काय मारत बसते. अन् त्या फोन मधे बघून काय खिदळत असतेस ग्?......आणि हो ग् त्यादिवशी त्या मोरे काकुंकडे असणा-या कार्यक्रमाला अगदीच तयार होऊन आली होतीस ..... तुला माहीते का लोकं काय काय बोलत होते तुझ्याबद्दल.....मला शरमेने मान खाली घालावी लागली होती.
तुला काहीच कसं वाटत नाही ग् ??
मला वाटत होतं की, आज नाही तर पोरगी उद्या सुधरेल, तुलाही परिस्थितीचं भान येईल ....
पण नाहीच तुला बघून आणि तुझं वागणं पाहून तर आता मलाही असं वाटतय की तुला नवरा गेल्याचं अजिबात दु: ख नाही उलट आनंदच झाल्यासारखं वाटतंय. वैदेहीची आई बोलत- बोलत रडकुंडीला आली होती.
अग् आई ! कीती संताप करतीयेस माझा .....
अस् केलंय तरी काय मी की, तू मला इतकं बोलतीयेस .... लग्नाआधीपण मी अशीच रहात होते ना? आणि नीटनेटकं आवरून कोणाच्यातरी कार्यक्रमाला जाणं हे चूक आहे का?
'हो चूकच आहे वैदू ! .... कारण आता दिवस आधीसारखे राहिले नाहीत, आता तू एक विधवा आहेस आणि म्हणून आता तुझ्या वागण्यात मर्यादा यायला हवी समजलं का? नाहीतर लोक जगू देत नाही ग् पिल्ल्या म्हणत आई रडू लागली आणि रडतच तिथून जाऊ लागली' ......
वैदेहीला आईची द्विधा मनस्थिती समजत होती. आपल्या विधवा मुलीला कोणी काही बोलू नये किंवा दुखवू नये म्हणून आई तिचा असा खोटा रागराग करत होती हे तीला तीच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं.
"आई थांब ! मलाही बोलायचंय म्हणत वैदेहीचेही डोळे आज भरून आले होते. आज तिचं मनही खुप भरून आलं होतं"! .....
आईला थांबवत वैदेहीने बोलायला सुरूवात केली.
'आई ग् ,लहानपणापासून तुम्ही मला कशाचीच उणीव भासू दिली नाही. चांगले संस्कार, चांगलं शिक्षण देऊन मला माझ्या पायावर उभं केलंत.
ते सगळं काही दिलं जे एक आई-वडील आपल्या मुलांना देतात आणि एक दिवस असाच माझ्यासाठी एक राजकुमार शोधलात आणि मला ह्या घराला पाहुणी केलंत'.
'मी ही अगदी त्या नवीन आयुष्यासाठी उत्सुक होते. हुरहुरही होती. आपल्यालाही एक असा जोडीदार मिळणार जो आपल्याला आई-वडीलांप्रमाणेच जपेल आणि भरपुर प्रेम करेल म्हणून मी शहारलेही होते.
नवीन नाती जुळतील सासू - सास-यामधे नवीन आई वडील मिळतील म्हणून मी एका नवीन आयुष्यासाठी आतुर होते. नवीन आयुष्यात मी पाऊल टाकलं आणि तुझी शिकवण जपत सासरची इज्जत बनायचा प्रयत्न मी पुरेपूर केला पण खरंच असं झालं का ग्'?
"स्वप्नातला राजकुमार कधी हरवला कळालंच नाही. खरतर तो राजकुमार नव्हताच! ....
होता तो फक्त माझा भ्रम आणि माझं एक गोड स्वप्न! जे कधी पुर्णच झालं नाही".
व्यसनी, संशयखोर, रागीट तसंच मानसिक रोगी होता तो .... आणि त्याला सपोर्ट करणारे माझे सासू-सासरेही तसलेच. असल्याशी गाठ बांधली गेली माझी ...हे योग्य झालं का माझ्यासोबत?
"वैदू !अग् मध्यस्थीने घात केला ग् आणि असला मुलगा पदरी पडायला आम्ही काय मुद्दाम केलं का ग् सोन्या"? .....म्हणत आई रडू लागली.
वैदेही बोलतच राहीली....
रोज मारहाण कधी शब्दांची तर कधी शाररीक ... ह्यासाठीच तुम्ही मला एवढं शिकवून मोठं केलत का?
सगळे राईट्स आहेत आता महिलांकडे ! तक्रार करायची की मग? ... असं बरेच लोक म्हणायचे पण प्रत्येकवेळी संस्कार आड आले ग् ..... घराची मान मर्यादा जपावी म्हणून कीती प्रयत्न केले मी ...वाटायचं ग् ! की आज ना उद्या प्रेमाने सगळे सुधारतील पण नाही !
मला कळायलाच उशीर झाला की असले लोक कधीच सुधरत नसतात आपणच आपली वाट बदलायची असते म्हणून मी घटस्फोटाचा निर्णय घेतला....पण त्यावेळी तुम्ही म्हणालात की, सुधरेल तो !...
पण आई असं किती म्हणून सहन करायचं होतं ग् मी ?
"वैदू ! अग् ते सुधारतील असं वाटलं होतं म्हणून आम्ही तुला असं बोलायचो. कोणत्या आई-बापाला वाटेल ग् की, त्यांच्या मुलीचा संसार मोडावा"? आई आता काकुळतीला आली होती.
"हो ना ! म्हणून पोरीने सहन करतच रहायचं. एवढे शिकलेले असूनही रोज मार खात नातं टिकवण्याचा प्रयत्न करतच रहायचं हो ना"?
आणि हो चार बायकांबरोबर जाऊन मार खाऊनही हसतमुख वडाची पूजाही करायची जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून ..... संस्कृती आहे ना हीच आपली !
अग् किती लाचार बनावं ग् असला नसलेला संसार टिकवण्यासाठी?
भंपकपणा सगळा!
मी माझ्यापरीने नवरा होता तितकी वर्ष प्रयत्न केलेच पण तरी तो सुधारला नाही आणि एक दिवस त्याच्याच कर्माने तो गेला आणि पांढऱ्या पायाची, माझ्या मुलाला खाल्लं हिने म्हणत, सारकडच्यांनी माझी रवानगी माहेरी केली.
पण नक्की कोणी कोणाला खाल्लं होतं? मी त्यांना का त्यांनी मला?
नवरा गेला म्हणून मला दु: ख होण्याचं कारण तरी नको का ग्? का फक्त नवरा होता म्हणून मी शोक करत बसायचं, दिखावा करत लोकांची सांत्वना घ्यायची.
"नाहीये मला नवरा गेल्याचं दु:ख मग"?
का करावं मी दु:ख ?
"तो त्याचा गेला पण मी जिंवत माणूस आहे आणि मला माझ्या मर्जीनुसार जगायचा पूर्ण हक्क आहे. आणि हो ग् आई ; ही विधवेची टॅग लाईन देऊन मला कसं रहायचं, कसं वागायचं आणि कसं जगायचं ह्याचा निर्णय घेणारे कोण आहेत ग् हे लोक नक्की"?
आणि "आई तुम्हाला जर चार लोकं काय म्हणतील म्हणून माझ्या अशा नव-याचा पुळका येऊन पोरीने विधवेसारखंच जगावं वाटत असेल तर मला खरंच कीव येते तुमची"
'मी आजही तुझ्या पोटचीच पोरगी आहे ग् आई ? आणि माझं अजून पूर्ण आयुष्य आहे, मला माझं अस्तित्व आहे आणि ते नाकारून कसं चालेल?
मला मोकळा श्वास घ्यायचाय ग् आई ! .....इतके दिवस मी गुदमरत होते आतातरी मला मोकळा आणि माझ्या हक्काचा श्वास मला मिळू दे ...... आणि हो ,माझ्यापेक्षा जर तुला समाजाची काळजी असेल तर मला स्पष्ट सांग !
उगाच नको त्या गोष्टीवरून माझा राग करणं बंद कर !...
वैदेहीने तिचं बोलणं संपवलं'.....
आई आणि ती किती रडल्या ह्याचा हिशेब नव्हता.
वैदेही आवरून बाहेर पडली तिला अस्वस्थ झालं होतं जाता-जाता ती आईला म्हणाली,
आई मला आॅफीसच्या सरांनी परदेशात काम करून तिथेच राहण्याची आॅफर दिली आहे पण, मला आपली माणसं सोडून कुठेच जायचं नव्हतं म्हणून त्यावर मी काहीच बोलले नव्हते पण आता तुझा निर्णय मला स्पष्ट सांग म्हणजे मला माझा निर्णय घ्यायला मदत होईल.
आणि हो ! मनात कसलाच कटूपणा ठेऊ नकोस म्हणत वैदेही निघून गेली.
आई कितीतरी वेळ तशीच होती आणि बराच वेळाने ती एका निर्धारानिशी उठली.
बराच वेळाने वैदेहीपण घरी परतली आणि नेमक्या 'जोशी काकूही' घरी आल्या होत्या हळदी कुंकूच निमंत्रण घेऊन ...आणि म्हणाल्या; वैदेहीच्या आई तुम्हीच या ह् ; फक्त हळदीकुंकूला! म्हणत वैदेहीला नकळत टोमणा दिला.
वैदेही ते ऎकत तडक तिच्या रूममध्ये गेली आणि तिने पाहिलं बेड वर एक वन पिस गाऊन ठेवला होता आणि एक चिठ्ठी होती.
"वैदू आईला माफ करत हा ड्रेस घालून डेटला येतीस का ग् शोन्या ? कधीतरी आईपण चुकते ग् बाळ! पण काहीही झालं तरी तिला तिचं मूल नेहमीच प्रिय असतं".!
वैदेही हसता - हसता रडू लागली आणि बाहेर आली आणि तिच्या कानावर शब्द पडले ....
"मी फक्त माझ्या मुलीसोबतच हळदीकुंकूला येईन ती विधवा झाली हा तिचा दोष नव्हे तर तुमच्या आमच्या सारख्यांच्या मानसिकतेचा आहे आणि माझ्या मुलीकडे पहायची तुमची नजर बदला म्हणजे तिच्यातली निरागस पोर तुम्हाला स्वच्छ दिसेल, जीला अजूनही छान उमलायचं आहे छान जगायचं आहे. समजलं का ?.....
#समाप्त .........
(आज आपल्या एवढया पुढारलेल्या समाजात अजूनही काही चूकीच्या गोष्टी कळत-नकळत घडताएत, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कधी समाजाच्या नावाने तर कधी संस्कृतीच्या नावाने जिवंत माणसाच्या मनाचाच बळी आपण घेतोय नाही का? पण आता गरज अाहे आपला दृष्टिकोन बदलायची आणि प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे जगायचा अधिकार आहे हे समजून घेण्याची नाही का? ....)
सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!! 📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अप्रतिम लेख.😀
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख आहे
हटवाThank you !!
हटवा. Very appropriate to show the thinking in new light!
उत्तर द्याहटवाThank you so much !!
हटवाखूपच सुंदर लेख अगदी थोड्याच ओळीत तुम्ही समाजात नेमकं काय घडते आणि काय घडायला पाहिजे हे दाखवून दिलं धन्यवाद मॅडम
उत्तर द्याहटवा