फक्त पंधरा मिनिटं (भाग 2)

©कल्याणी पाठक वृषाली काटे



भाग 1 इथे वाचा


श्रुती रोजच्यासारखीच धावतपळत ऑफिसला पोहोचली अन् तिनं घाईघाईनं कॉम्प्युटर सुरू करून लॉग इन करायला घेतलं.

कां कोण जाणे पण आज तिला नेटवर्क खूपच स्लो वाटलं. तिच्या अंगठ्याचा ठसा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह झाला खरा पण बरोब्बर पाच मिनिटे उशीर झाला होता.

"हा ह्या महिन्यातला दुसरा लेट!" तिनं मनाशीच म्हटलं.. "आजची दहा तारीख.. अजून महिना संपायला वीस दिवस शिल्लक आहेत!" तिनं मनाशीच हिशेब केला.

श्रुतीनं मान वर करून बघितलं.. तिची ती महाखडूस बॉस मारक्या म्हशीसारखी तिच्याकडेच बघत होती.

"श्रुती, आज तुला कॅश काऊंटर सांभाळायचं आहे.. नमिता रजेवर आहे!" तिच्या बॉसनं तिला सांगितलं अन् श्रुतीच्या अंगावर काटा उभा राहिला.

"कॅश काऊंटर म्हणजे दिवसभर दमछाक! आता कसलं केळवण अन् कसलं काय! सकाळपासून चहा देखील घेतला नाहीये..!" श्रुतीला अस्वस्थ वाटू लागलं.

"मॅडम, मी पाच मिनिटांत टिफीन खाऊन घेऊ का? सकाळपासून चहा पण घेतला नाहीये हो!" श्रुती अजीजीनं म्हणाली.

बॉसच्या कपाळावर आठ्या पडल्या. "आजही तू उशीरा आलीस.. मला वाटलं आज तरी जेवून आली असशील.. तुझं आता रोजचंच झालंय हे! कॅश काऊंटर वर कस्टमरची गर्दी जमलीय.. तेव्हा लवकर ये!" बॉस कुत्सितपणे म्हणाली.

श्रुतीनं तिच्याकडे दुर्लक्ष करत लेडीज रूम गाठली अन् डब्यातली एक पोळी अन् भाजी दोन घासांत संपवून वरून अर्धी बाटली पाणी रिचवलं अन् निमूट कॅश काऊंटर वर जाऊन बसली.

दिवसभर कामाचा फडशा पाडताना श्रुतीला भुकेची जाणीव देखील झाली नाही. 

वेळेत काम उरकण्याच्या घाईत तिनं दुपारी मैत्रीणीच्या केळवणाच्या निमित्ताने आलेला पुरी,भाजी अन् श्रीखंडाचा लंचपॅक देखील बाजूला सारला अन् निघताना काउंटरवर ड्यूटी असलेल्या चपराशाला देऊन टाकला.

सायंकाळी दमून भागून घरी आली तर सायंकाळचा स्वयंपाक तिची वाटच बघत होता.

"काय झालं का केळवण?" सासूबाईंनी आल्याआल्या चौकशी केली.

"हो, झालं! पण मी कॅशवर होते. मला नाही जाता आलं! त्यांनी लंचपॅक पाठवला.. पण काउंटरवर खूप गर्दी होती. खायला वेळच मिळाला नाही!" श्रुतीनं केविलवाणेपणानं सांगितलं.

"बरं झालं.. डबा घेऊन गेलीस ते!" सासूबाई म्हणाल्या.. "पण डब्यात खरंच पुरेसं अन्न होतं का? श्रुतीचं पोट भरलं असेल का?" हा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.

"सकाळचा साबुदाणा ठेवलाय ना फ्रीजमध्ये.. आज सायंकाळी साबुदाण्याचे वडे करूयात!" सासूबाई म्हणाल्या.

"वडे करूयात!" ह्याचा अर्थ "तू वडे कर!" असा होतो हे अनुभवाने श्रुतीला कळून चुकलं होतं.

"खूप भूक लागलीय आई! आधी थोडं खाऊन घेते.." श्रुती म्हणाली.

"अगं बाई, हो का! सकाळची एकच पोळी शिल्लक आहे आणि गवारीची भाजी! मेथीची भाजी मलाच कमी पडली गं.. अन् आज वरणाला फोडणी घातली नव्हतीस तू..!" 
सासूबाई म्हणाल्या..

"दुपारी मंजू आली होती.. लंच टाईममध्ये.. वेळात वेळ काढून! सकाळी जेवली नव्हती ती! मग तिला जेवून जा म्हटलं.. वरणाला फोडणी घातली अन् तिला जेवू घातलं!" सासूबाई म्हणाल्या.. "मला वाटलं, तू केळवणाचं जेवून येणार असशील!"

"असू द्या.. मी आहे तेच खाऊन स्वयंपाकाला लागते.." श्रुती म्हणाली.. अन् विचार करू लागली.

मंजू म्हणजे तिची नणंद.. समीरची धाकटी बहीण.. तिचं घर देखील गावातच होतं अन् ऑफिस श्रुतीच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर.

बरेचदा जेवणाच्या सुट्टीत ती माहेरी चक्कर टाकायची अन् जेवून जायची. 

तिच्याही घरी एकत्र कुटुंब अन् सकाळची धावपळ! बिचारी उभ्याउभ्या ओट्यावरच एक पोळी भाजी खाऊन धडपडत ऑफिसला जायची.

आईचा जीव दुखायचा अन् म्हणून बरेचदा तिला जेवणाच्या सुटीत घरी बोलावून पोटभर जेवू घालायची.

खरं तर श्रुतीची ह्यासाठी मुळीच हरकत नव्हती. तिची हरकत होती ती घरातल्या गृहिणीच्या जेवणाला दुय्यम महत्त्व देण्याच्या वृत्तीकरिता!

"मंजू काय किंवा आपण काय! घराबाहेर पडतोय अन् नोकरी करतोय! आपलं आर्थिक स्वातंत्र्य वगैरे मोठमोठया गोष्टींसाठी नाहीच करत नोकरी! आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपलं.. आपल्या पालकांचं अन् मुलांचं भवितव्य सुरक्षित असावं म्हणून राबतो आपण.. घरातल्या पुरुषांइतक्याच! पण कितीही आणि कशीही वेळेची ॲडजस्टमेंट केली तरी आपल्या निवांत जेवणाकरिता सकाळची पंधरा मिनिटं काही पदरात पडत नाहीत!" ही गोष्ट आज श्रुतीच्या मनाला पुन्हा एकदा डाचू लागली.

"सकाळी पूर्ण वेळ घरी देऊनही समाधान नाही अन् ऑफिस मध्ये सतत बोलणी ऐका..!" जेवता जेवता श्रुतीच्या मनात विचारांनी फेर धरला.. "माझं घर म्हणून मी राबते.. पण ह्या घरात माझं स्थान काय? माझ्या जेवणाचं स्थान काय? सगळ्यांसाठी स्वयंपाक शिजवून देखील मी जर वेळेवर जेवू शकत नसेन तर माझ्या प्रकृतीचं भवितव्य काय? अन् जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या संसाराचं.. मुलींचं भविष्य काय??"

"कसला विचार करतेस ग?" समीरच्या.. नवऱ्याच्या प्रश्नानं श्रुती भानावर आली.

"आजपण लेट लागला ऑफिसला..!" श्रुतीनं सांगितलं.. "आणि आजपण जेवायला वेळ नाही मिळाला!"

"सकाळी लवकर उठत जा मग!" समीरनं बेफिकीरपणे उत्तर दिलं.

"मी लवकरच उठते, समीर.. रात्री आवरून झोपायला उशीर झाला तर सकाळी जाग येत नाही लवकर!" श्रुती रागानेच म्हणाली.

"अगं, मग ऑफिसात गेल्या गेल्या टिफीन खाऊन घेत जा!" समीर म्हणाला.

"आधीच मी उशीरा पोहोचते अन् कस्टमरची गर्दी जमलेली असते टेबलाजवळ! त्यात जेवायला गेलं की गदारोळ होतो. बॉसला पण खटकायला लागलंय आता माझं रोज रोज उशीरा येणं अन् आल्याआल्या जेवायला जाणं!" श्रुतीनं सुनावलं खरं पण समीरनं न ऐकल्यासारखं केलं अन् तो तडक उठून निघूनही गेला.

रोजच्यासारखाच दिवस संपला.. रात्र झाली.. घरात निजानीज झाली अन् सकाळी सहा वाजताच्या गजराने श्रुती जागी झाली.

तिनं बाहेर येऊन बघितलं.. समीर अजून झोपला होता.. सासूबाई खाली बागेत फुलं गोळा करायला गेल्या होत्या. सासरे मॉर्निंग वॉकला निघण्याची तयारी करत होते.

श्रुतीला बघताच सासरे थांबले.. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!" असं म्हणत त्यांनी श्रुतीला शुभेच्छा दिल्या.

श्रुती चमकली. आज अकरा सप्टेंबर! तिचा वाढदिवस!! रोजच्या धावपळीत ती तिचा वाढदिवस देखील विसरून गेली होती.

सासूबाई देखील फुलं घेऊन आल्या. रोजच्या देवाच्या फुलांच्या परडीत आज एक सुंदर टपोरं गुलाबाचं फूल होतं. ते फूल श्रुतीच्या हातात देत त्यांनी विचारलं.. "वाढदिवसानिमित्त काय हवंय तुला सांग!"

"खरंच, मी म्हणेन ते द्याल मला?" श्रुतीनं साशंक होत विचारलं.

"अगं ती म्हणतेय तर मागून घे पटकन्.. तुला काय हवंय.. पैठणी.. दागिना.. फॉरेन टूर..! विचार कसला करतेस?" सासरे थट्टेनं म्हणाले.

"ह्यातलं काहीच नकोय मला आईबाबा.. सगळं आहे माझ्याकडे.. अन् मी माझ्या भरवशावर मिळवेन सगळं..!"

"पण जर काही द्यायचंच असेल .. तर रोज सकाळची फक्त पंधरा मिनिटं द्या.. माझ्या स्वतःसाठी.. माझ्या हक्काची!" श्रुती म्हणाली.

सासू सासरे प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे बघू लागले.

"मी काय किंवा मंजू काय किंवा नोकरी करणाऱ्या इतर स्त्रिया काय! सकाळच्या धावपळीत अगदी जेवण्यासाठी दहा पंधरा मिनिटं देखील मिळत नाहीत आम्हाला.. आमच्या स्वतःच्या घरी! आता वय वाढतंय तर शरीराला देखील त्रास होतोय ह्या अनियमितपणाचा अन् धावपळीचा!"

"बस.. ह्या पंधरा मिनिटात आम्ही सकाळी निवांतपणे पोटभर जेवलो जरी ना तरी फ्रेश होऊन जाऊ संसाराचा अन् नोकरीचा गाडा ओढायला.." श्रुती नमस्कारासाठी वाकली.

"तथास्तु!" मागून समीरचा आवाज आला अन् घर हास्यात बुडून गेलं.

"आजपासून फुलांचे हार जरा उशीराने करेन.. श्रेया अन् प्रिया क्लासला गेल्या की मग देवपूजा करता येईल!" सासूबाई मनाशीच पुटपुटल्या..

"सकाळी बाजारातून आलो की श्रुतीची स्कूटी बाहेर काढून पुसून ठेवता येईल मला..!" सासरे म्हणाले..

आणि जेवताना माझ्यासोबत तुझंही पान मांडून घेईन मी डायनिंग टेबलवर.." समीरनं तयारी दाखवली.

"आई, आम्ही आता मोठ्या झालोय.. आम्ही आमचं आमचं आवरू.. ऑटोरिक्षाला उशीर करणार नाही.! हॅपी बर्थडे!" श्रेया अन् प्रिया धावतच आईच्या कुशीत शिरल्या.

"चला, आवरा आता..!" असं म्हणत सासूबाईंनी दोघी नातींचा ताबा घेतला अन् त्या तिघी त्यांच्या खोलीकडे जाऊ लागल्या.


©कल्याणी पाठक वृषाली काटे

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

12 टिप्पण्या

  1. Khup chan..pn mazi sasu khup changli ahe..tya swth ani maza navra suddha mazi khup kalji ghetat..pn tumcha lekh bhari awdala.

    उत्तर द्याहटवा
  2. Khup chan..pn mazi sasu khup changli ahe..tya swth ani maza navra suddha mazi khup kalji ghetat..pn tumcha lekh bhari awdala.

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच छान
    गतकाळ डोळ्यासमोरून सरकून गेलाा😔😔😔😔
    असे समंजस सासर खरोखरच सर्वांना मिळू देत

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने