लग्नानंतर माहेरची जबाबदारी झटकायची का?

© डॉ सुनिता चौधरी



"कोमल तू घरी लवकर निघून ये 'मिरा' चे सासरचे लग्नाची बोलणी करायला येणार आहेत, घरात खुप काम आहे" म्हणत कोमलच्या नव-याने तीला फोन केला आणि लगेच निघून ये म्हणून सांगितलं.

उत्तरादाखल कोमल तिच्या नव-याला सुमीतला म्हणाली की, "अहो पण इथे माझ्या आईला अँडमिट केलं आहे आणि तिच्याजवळ थांबायला कोणी नाही बाबा रात्रभर हाॅस्पीटलमधे बसून होते माझ्यासोबतच म्हणून मीच मुद्दाम त्यांना घरी पाठवलंय, जर मी घरी आले तर ईथे आईजवळ कोण राहणार"?

"हे बघ तू ह्या घरची सून आहेस आता घरचं सगळं तुलाच बघायचंय. तुझ्याच सख्या ननंदचं लग्नाचं चालू आहे म्हणजे तुला तर इथे यावच लागेल ना"?

आणि आईला सगळं मॅनेज होणार नाही. घरातलं काम कोण करणार , ते लोक आल्यावर त्यांच्या करण्यात काही कमी रहायला नको तू पटकन निघ."

"अहो ! मला पण सगळं कळतंय, पण तुम्हीही मला समजून घ्या ना, जर मी तिकडे आले तर इथे आईपाशी कोणीच नाही राहणार आणि डाॅक्टरांनी सांगितलंय की, वयोमानामुळे तिचा त्रास बळावला तर लगेच हालचाल करावी लागेल. बाबा जरी आले तरी सगळी धावपळ करणं त्यांना एकट्याला होणार नाही"; कोमल म्हणाली.

'अच्छा म्हणजे मिराच्या लग्नाचं तुला काहीच वाटत नाहीये आणि इथे माझ्या आईने सगळं कसं करावं ह्याचंही तुला घेणंदेणं नाही का'? सुमित जरा आवाज वाढवूनच बोलला.

"अहो ! तुम्ही रागाला येऊ नका आईंना त्रास होणार याची चांगली सोय मी करते". तुम्हाला सगळं व्यवस्थित व्हावं हेच वाटतंय ना? तुम्ही काळजी करू नका मी करते काहीतरी.

पण कोमलचं वाक्य मधेच तोडत सुमित म्हणाला की,

काहीतरी करते म्हणजे? "तुला समजत नाहीये का की, मी काय बोलतोय ते , तू बाकीचं कशाला बोलते कोमल, मी म्हणतोय ना की, लगेच घरी ये मग ये समजलं का? 

 इथे सगळं काही करायला तु हवी आहेस , उगाच बाकीच्या गोष्टी मला नको सांगूस समजलं का"? म्हणत सुमितने फोन ठेवला.


कोमल विचार करू लागली की, नक्की तिचं काय चुकलं?

सुमित जराही ऎकायच्या मनस्थितीत नव्हता.

आईला बरं नाही म्हणून थोडे दिवस ती माहेरीच राहणार आहे हे सासरकडच्यांना सांगूनही सुमितने अशा प्रकारे आपल्याला समजून न घेणं कोमलला अजिबात पटलं नाही.

लग्न होऊन मुलगी सासरी येते तेंव्हा सासरची सगळी जबाबदारी ती पार पाडतच असते पण ह्याचा अर्थ हा तर होत नाही की, माहेरच्यांच्या बाबतीत तीची सगळी जबाबदारी संपली .

खास तर तेंव्हा जेंव्हा मुलगी एकुलती एक असते किंवा त्या घरातला मुलगा तिथली जबाबदारी उचलत नसेल तर ?

कोमल एकुलती एक मुलगी म्हणूनच तिने सासरसोबत माहेरची जबाबदारीही लीलया पेलली होती पण कधीकधी आधी सासर का आधी माहेर या परिस्थितीत अडकायला होतं आणि त्याच परिस्थितीत कोमल आज अडकली होती.

कोमलच्या कानात सुमितचा आवाज घुमत होता आणि समोर हाॅस्पीटलच्या बेड वरची आई तिला डोळ्याआड होत नव्हती.

तिने लागलीच एक फोन केला तिच्या शेजारच्या काकुंकडे दिवसभर राहून सगळं काम करणाऱ्या बाईंना आपल्या घरी कामासाठी पाठवायची विनंती कोमल ने काकूंना केली आणि काकुंनीही कोणतेच आढेवेढे न घेता तिची मदत करण्याचं कबूल केलं.

बाकीची जुळवाजुळवही कोमलने केली आणि सगळं केल्यानंतर कोमलने सुमितला फोन करुन सांगितलं की, तीला तीच्या आजारी आईला दवाखान्यात एकटं सोडून येता येणार नाही.

तिने केलेली सगळी सोय सुमितला सांगत त्याच्या रिप्लायची वाट न बघता कोमलने फोन ठेवला.

कोमलच्या आईची तब्येत झापाट्याने सुधारली आणि तिला चार दिवसांनी हाॅस्पीटलमधून घरी जाण्याची परवानगी मिळाली.

कोमलने सगळी तीची सगळी कर्तव्य पार करत आईची देखभाल केली.

इतक्या दिवसात तीला सुमित किंवा सासरहून एकदाही फोन आला नाही.

नंतर तीनेही आपल्या आईची बाकीची सोय करत थोड्याच दिवसात ती तिच्या सासरी परतली.

सासरी परतेस्तोवर तीला रात्र झाली होती.

ती घरात आली आणि तिने शांततेत तीची नेहमीची कामं उरकायला सुरूवात केली. तिच्याशी कोणीच बोलत नव्हतं.

अशावेळेस तिनेही शांतच राहणं पसंत केलं.

पण शांत असणाऱ्या कोमलला तिने केलेल्या गोष्टींचं काहीच कसं वाटत नाही म्हणून सुमितला चिडायला झालं. आणि तो अगदीच रागात येऊन तीला बोलू लागला.

"एवढंच माहेर-माहेर करायचं होतं तर तिथेच रहायचं ना ! कशाला परत आलीस इथे? मिराचे सासरकडचे येणार होते त्याचं तुला काहीच वाटलं नाही खुशाल माहेरला राहिलीस , जरा तरी सुनेचं कर्तव्य पार पाडायला शिक कोमल"!


"हे बघा सुमित, मी माझ्या जबाबदा-या पारच पाडत आलीये पण हे सगळं मी एकटीनेच करतीये. ज्या अर्थी मी तुमच्या आई-वडिलांना आपलं मानून सगळं करते त्याअर्थी तुम्हीही माझ्या आईवडीलांना जरा तरी बघावं ना"?

ठिक आहे ना की; मी तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही. मी करतीये सगळं !.... माहेर आणि सासरचा चांगला मेळ घातलाय मी. मिराचा बघण्याचा कार्यक्रम होऊन सगळं झालं होतं फक्त लग्नाची बोलणी आणी बाकीच्या अँडजेस्टमेंटसाठी ते लोक येणार होते.

माझी अशी खास गरज नव्हती पण तुम्हाला "घरात काम कोण करणार"?याची चिंता जास्त होती म्हणून तुम्ही मला बोलवत होता.

पण आईंना त्रास होणार नाही आणि त्यांना कामासाठीची सगळी सोय मी केली होती. हे सगळं मी माझ्या घरासाठीच, तुम्हा सगळ्यांसाठीच केलं ना?

"मी काय सतत उठून माहेरला पळत नाही. त्यावेळेस इथल्यापेक्षा जास्त गरज तिथे होती माझ्या आईला ! म्हणून मी तिथे राहिले , हौसेने तर राहिले नाही ना मी ?

आणि मला एक सांगा सुमित की, उद्या मिराचं लग्न होईल तुम्हीही सतत कामानिमित्त बाहेर असता अशावेळी समजा मी ही नसले तर तुमच्या आई-बाबांना कोण बघेल? उद्या मिरानेही तुमच्या आईला असंच हाॅस्पीटलमधे सोडून दिलं तर चालेल का तुम्हाला"?

कोमलच्या ह्या सगळ्या बोलण्याने सगळ्यांनाच त्यांच्या चुका समजल्या. पण सगळे शांत होते. कोमल बोलतच होती.

"जिथे मला थांबायची खरी गरज होती मी तिथेच थांबले. आज माझ्या आईच्या जागी तुमची आई जरी असती आणि माझ्या घरी कोणता कार्यक्रम असला असता तर मी आधी तुमच्या आईलाच बघितलं असतं". मी आपली दोन्ही घरं समान मानण्याचा प्रयत्न करतीये पण त्यात मला तुम्हा सगळ्यांची साथही हवी असते

पण ती साथ मला खरंच मिळते का? नक्की विचार करा!... असं म्हणत; कोमल तिच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि बाकीचे सगळे खजील झाले.

समाप्त.

© डॉ सुनिता चौधरी

सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!! 📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने