सोडी सोन्याचा पिंजरा



© अस्मिता देशपांडे




तात्यासाहेब पटवर्धन हे गावातलं एकदम मोठं प्रस्थ. 

गावात मोठं सोन्याचांदीचे दुकान होतं त्यांचं. माई म्हणजेच त्यांच्या सौभाग्यवती... जानकी नावाने त्यांना कधी कोणी बोलावलेच नव्हते.. 

पूर्ण गावाच्या माईच होत्या त्या. तात्या आणि माई दोघेही स्वभावाने अत्यंत करारी.


त्यांची तीन मुले.. श्रीपाद, वल्लभ, दिगंबर. अगदी त्यांच्या शिस्तीत तयार झालेली..

तिघेही उत्तम शिक्षण घेऊनसुद्धा दुकान संभाळण्याचेच काम करायचे.

पटवर्धनच्या दिगंबरचे स्थळ जेव्हा पाठकच्या अंजलीसाठी चालून आले तेव्हा पाठक कुटुंबीय फारच आनंदी झाले.

अंजली पाठक...सदाशिव आणि पार्वती यांची तिसरी मुलगी. 

पहिल्या दोन्ही मुली गावातच दिल्या होत्या आणि आता अंजलीला एवढ्या मोठया घरातून मागणी आली आहे म्हणल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

अंजलीचे शिक्षण पूर्ण झालेच होते.तिने ज्वेलरी डिझाईन मध्ये डिप्लोमा केला होता. तिलाही दिगंबर पसंत होता.

लग्न शुभ मुहूर्तावर झाले... आणि पंधरा दिवसातच तात्यामाईचे वेगळेच रूप अंजलीला पाहायला मिळाले.

त्या दोघांनाही सगळं काही त्यांच्याच मनाप्रमाणे व्हावं असे वाटत असे. 

घरात कोणालाच कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची मुभा नव्हती..

स्वयंपाकघरात तर माईंचा एकछत्री अंमल होता..

सकाळी नाश्त्याला काय करायचे ते रात्रीच्या जेवणाला काय करायचे हे सगळं काही त्याचं ठरवत असत.. त्या सांगतील ते आणि तसंच सुनाना करणं भाग असायचं..

भाजी कुठल्या पद्धतीची करायची हे सुद्धा त्याच ठरवत.. आमटी करायची की साधं वरण हे सुद्धा त्याच ठरवत.. त्यात कुणी बदल केलेला त्या बिलकुल खपवून घेत नसत..

इथपर्यंत तरी ठीक होतं पण सुनांनी बाहेर जाताना कुठल्या साड्या नेसायच्या, कुठले दागिने घालायचे हे सुद्धा त्यांना विचारून ठरवावे लागे..

सर्वांचे दागिने समारंभ झाल्या बरोबर माईंच्या ताब्यात द्यावेच लागायचे... आणि तिजोरीत ठेवले जायचे लगेचच...

सुनांनी माहेरी कधी जायचं, किती दिवस राहायचं हे माई ठरवायच्या..

थोडक्यात पटवर्धनच्या घरात वारा सुद्धा कुठून वाहणार हे माईना विचारूनच वाहत असायचा बहुधा !!!

अंजलीला आता कळलं होतं की तिच्या मोठ्या दोन्ही जावा, एवढे दागिने आणि उंची साड्या नेसूनसुद्धा टवटवीत, आनंदी का दिसत नव्हत्या ....

तात्याची पण वेगळीच तऱ्हा... तिन्ही मुलांना दुकानातील कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायची मुभा नव्हती.

दिगंबरला दुकानात खुप जाही नविन करण्याची इच्छा असायची पण सर्व कारभार, व्यवहार केवळ तात्याच पाहत.

मुले केवळ कामगारांसारखे काम करत.

चांगले कपडे घातलेले कामगार एवढीच ओळख त्यांची ...

तीन मुले आणि तीन सुना हाताशी येऊनही तात्या आणि माई यांना सत्ता स्वतःच्या हातातून जाऊ द्यायची नव्हती..

आपल्या या वागण्यामुळे सगळयांची घुसमट होते आहे याची जाणीव ही नव्हती त्याना ..


पण अंजलीला मात्र ही घुसमट सहन होत नव्हती. वर्षभर तिने कसेतरी सहन केले.. वर्षानुवर्षे हे सगळे लोक कसे काय यांची सत्ता चालवून घेतात याचे तिला आश्चर्य वाटायचे..

पण मोठया जावानी तिला सांगितलं की कुणी काहीही तक्रार करायचा प्रयत्न केला की तात्या इस्टेटीमधुन बेदखल करण्यास मागेपुढे बघणार नाहीत..


अंजलीने दिगंबरजवळ वेळोवेळी हा विषय काढला पण तो ही याचं गोष्टीला घाबरायचा .. उद्या आपल्याला इस्टेटीतुन बेदखल केलं, घरातून काढलं तर काय करायचं...


दीडेक वर्ष अंजलीने त्यांचा एकछत्री अंमल सहन केला पण मनस्वी अंजलीला तो सोन्याचा पिंजरा जाचक वाटू लागला..


माहेरी गरिबी असली तरी मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य होतं तिला... तिची भयंकर घुसमट होऊ लागली..


शेवटी तिने दिगंबरला सांगितलं की, अशी गुलामगिरीची साजूक तूप लावलेली पोळी खाल्ल्यापेक्षा स्वतंत्र राहून कष्टाची भाजीभाकरी खाऊ... पण आता इथे राहणे नको.. 

मला संपत्ती नको स्वातंत्र्य हवे..मी शिकलेली आहे.. काहीतरी नोकरी करून संसाराला हातभार लावेनच.


दिगंबरला तिचे बोलणे पटले आणि त्याने तात्यामाई समोर वेगळं राहण्याचा विषय काढला...
तात्या माई अपेक्षेप्रमाणे भयंकर चिडले, संतापले..


घरातून एक छदामही मिळणार नाही म्हणाले.

हे सगळं दोघांना अपेक्षितच होतं..
दोघेही घराबाहेर पडले...

गावाजवळच्या मोठ्या शहरात एका छोटयाश्या रूम मध्ये दोघांनी संसार थाटला..

दोघांनी एका मोठ्या ज्वेलर्स शॉप मध्ये नोकरी सुरु केली.

अंजलीला आपल्या शिक्षणाचा खराखुरा उपयोग करता येणार होता.. ती खूष होती.

नेकलेस, मंगळसूत्र, मिनी मंगळसूत्र, अंगठी, बांगड्या, ब्रेसलेटच्या वेगवेगळ्या डिझाईन ती आता कारागीरांकडून बनवून घेत होती... आणि ती डिझाईन्स महिलांना खूप आवडत होती.. त्यामुळे लांबून लांबून लोक येत असत.

बघता बघता दिगंबरने व अंजलीने मालकाच्या मनात चांगलाच विश्वास निर्माण केला.

पुढे मालकाला काही कारणांनी परदेशी जाण्याची वेळ आली त्यामुळे त्यांनी दुकान विकण्याचे ठरवलं.

दिगंबरने एव्हाना बऱ्यापैकी जम बसवला होता.. बँकेचे कर्ज व अंजलीचे स्त्रीधन विकून त्या दोघांनी ते दुकान विकत घेण्याचा निर्णय घेतला.

आज ज्या दुकानात कामं करत होते त्याच दुकानावर अंजली ज्वेलर्सची पाटी दिमाखात झळकत होती.

आज ते दोघेही दुकानाचे मालक होते.

संपत्ती की स्वातंत्र्य यांमधील दिगंबर आणि अंजलीने मिळून स्वातंत्र्य निवडण्याचा घेतलेला निर्णय आज सार्थ ठरला होता.


© अस्मिता देशपांडे

सदर कथा लेखिका अस्मिता देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..


धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...



अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.




2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने