गोकुळ

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)




मोबाईलची रिंगटोन वाजली तेव्हा रजनीताई आंघोळीला गेल्या होत्या. त्यांचे यजमान शशिकांतराव अजून मॉर्निंग वॉक करून परतायचे होते.

"इतक्या सकाळी कुणाचा फोन असेल??" त्या विचारात पडल्या अन् त्यांनी घाईघाईने आंघोळ आटोपायला सुरूवात केली.. पण मोबाईलची रिंग बंद होता क्षणीच लॅंडलाईनची रिंग वाजणं सुरू झालं.

 "अरे हो! येतेच आहे!!" त्यांनी अभावितपणे मोठयाने हाक दिली अन् स्वतःच स्वत:ची जीभ चावली.. "माझा आवाज त्या फोन करणाऱ्या व्यक्तीला थोडाच ऐकू जाणार आहे!" त्या मनाशीच विचार करत खुद्कन हसल्या.

त्या साडी गुंडाळून मोबाईल उचलणार एव्हढ्यात त्यांना चावीने लॅच उघडण्याचा आवाज आला अन् सोबतच शशिकांतरावांच्या मोबाईलची रिंगटोन देखील!! 

"आधी माझा मोबाईल.. मग लॅंडलाईन.. आता 'ह्यां'चा मोबाईल!! ही नक्कीच कविता असणार!! जरा मिनिटभर वाट न बघता भराभर पहिला.. दुसरा.. तिसरा फोन फिरवण्याचा विक्रम फक्त कविताच करू शकते!" रजनीताईंच्या‌ मनात आलं.

"हॅलो, हं बोल कवि.." दरवाजा उघडण्याच्या आवाजासोबतच शशिकांतरावांचा आवाज आला.. अन् आपल्या अंदाजावर रजनीताई खुश झाल्या.. पण क्षणभरच!

शशिकांतरावांचं फोनवर फक्त "हुं.. हां.. केव्हा.. कधी.. अरे बापरे! केव्हा निघताय.. बरं बरं.. चालेल.. काळजी घ्या" एवढं ऐकून प्रकरण काहीसं गंभीर आहे हे रजनीताईंना कळून चुकलं.. 

त्या खाणाखुणा करून "काय झालंय?" हे शशिकांतरावांना विचारू लागल्या.

एका हाताचा पंजा पसरून "थांब" अशी खूण करत शशिकांतरावांनी सावकाश फोनवरचं बोलणं पूर्ण केलं अन् मग ते रजनीताईंकडे वळले. 

"विहीणबाई अंगणात पाय घसरून पडल्यात.. कंबरेला चांगलाच मार लागलाय.. बहुधा ऑपरेशन करावं लागेल! कविता आणि दिनेशराव लागलीच चंद्रपूरला‌ निघत आहेत.

जाताना रस्त्यात आपल्याकडे उतरून प्रतिकला‌ ठेवून अन् जेवून जातील!!" शशिकांतरावांनी रजनीताईंना इत्यंभूत माहिती दिली.

कविता ही शशिकांतराव अन् रजनीताईंची एकुलती एक मुलगी सासरी अतिशय सुखाने नांदत होती. 

ती, तिचा नवरा दिनेश अन् सहा वर्षांचा मुलगा प्रतिक असं सुखी त्रिकोणी कुटुंब नागपूरला‌ राहत होतं अन् तिचे सासू सासरे त्यांच्या मूळ गावी चंद्रपूरला!! 

दोन्ही शहरांच्या मध्ये कविताचं माहेर होतं.. हिंगणघाटला!!

कविता नोकरी करत असल्याने तिच्या सासूबाई प्रतिकला‌ सांभाळायला म्हणून नागपूरला‌ रहात.. त्या गेल्या आठवड्यात काही कामाने चंद्रपूरला गेल्या अन् पाय घसरून पडल्या.

"आई, आता आमच्या आई काही प्रतिकच्या मागे धावू शकतील असं नाही वाटत मला!" चंद्रपूरला जाताना मध्ये हिंगणघाटला थांबलेली कविता आपल्या नवऱ्याचा डोळा चुकवून आईला सांगत होती.

 "आईंच्या भरवशावर माझी नोकरी अगदी व्यवस्थित सुरू होती. आता निदान सहा महिने तरी आईंना विश्रांती घ्यावी लागेल.

नंतर बऱ्या झाल्या तरी प्रतिकचं कितपत करू शकतील देव जाणे! त्यांच्याकडून नाही झालं तर प्रतिकला‌ पाळणाघरात ठेवावं लागेल!"

कविता अन् दिनेश लहानग्या प्रतिकला हिंगणघाटला‌ ठेवून चंद्रपूरला निघून गेले..

विहीणबाईंचं ऑपरेशन होऊन त्यांना दवाखान्यातून सुट्टी होईपर्यंत जवळपास पंधरा दिवस प्रतिक हिंगणघाटला राहिला. 

अगदी शहाण्यासारखा.. अन् रजनीताई अन् शशिकांतरावांना नातवाशी खेळण्याचा नवा विरंगुळा मिळाला. तेव्हापासूनच रजनीताईंच्या मनात एक योजना आकार घेऊ लागली.

चंद्रपूरहून नागपूरला परत जाताना कविता अन् दिनेश प्रतिकला घ्यायला उतरले तेव्हा रजनीताईंनी विषय काढलाच.. "विहीणबाईंना विश्रांतीची गरज आहे म्हणून तुम्ही प्रतिकला पाळणाघरात ठेवाल हे काही मला पटत नाही! 

मी देखील आजी आहे.. मी सांभाळेन त्याला! तो अगदी शहाणा मुलगा आहे.. राहील माझ्याजवळ! राहशील ना रे?" रजनीताईंनी प्रतिककडे बघत त्याला विचारलं.

"हो.. हो.. राहतो की!" प्रतिक आनंदाने उड्या मारू लागला. 

"खरंच.. पाळणाघरात नको पाठवू! आम्ही आहोत ना!" शशिकांतरावांनीही उत्साहानं सांगितलं.

कविता अन् दिनेशनं देखील आपसात सल्लामसलत करत अन् प्रतिकला पुन्हा पुन्हा विचारत त्याला हिंगणघाटला‌ ठेवण्याचा निर्णय घेतला.

आठच दिवसांत प्रतिक हिंगणघाटला‌ परतला अन् त्याच्या आजी आजोबांचं विश्व त्याच्या भोवताली फिरू लागलं. 

प्रतिकला जवळच्या शाळेत प्रवेश मिळाला अन् त्याला सकाळी उठवणं.. त्याची अंघोळ, तयारी, डबा ह्यात रजनीताईंचा सकाळचा वेळ पळू लागला.

शशिकांतरावांनी देखील त्याला शाळेत नेण्याआणण्याची जबाबदारी आनंदानं घेतली. 

प्रतिकची शाळा, त्याच्या शिक्षिका, गृहपाठ, मित्र मैत्रीणी ह्यात दोघे इतके गुंतून गेले की कधी कधी प्रतिक हा आपला मुलगा नसून नातू आहे ह्याचा देखील त्यांना विसर पडत असे.

कविता अन् दिनेश दर आठवड्याला हिंगणघाटला‌ फेरी टाकून प्रतिकला भेटत.. खाऊ अन् खेळणी देत!! प्रतिक मात्र आजी आजोबांकडे छान रमला होता.

"आजोबा, उद्या शाळेत 'पॅरेंट्स मीटिंग' आहे!" प्रतिक घरी आल्या आल्या सांगू लागला.

"अरे! मी येईन की मीटिंगला!" आजोबांनी सांगितल्यावर प्रतिक आनंदाने नाचू लागला.

आपल्या मुलीच्या शाळेच्या पालकसभेला कधीही उपस्थित न राहू शकल्याचं शशिकांतरावांचं शल्य ह्या निमित्ताने दूर झालं.

"आजी, माझे फ्रेंड्स येणारेत आपल्या घरी उद्या! त्यांच्यासाठी काय करशील??" प्रतिक आजीला‌ लाडीकपणे विचारे अन् आजी कधी पावभाजी तर कधी शंकरपाळी करून त्या बाळगोपाळांना घाली.

घरी कविताच्या मैत्रीणी आल्या की "नेहमी नेहमी काय वेगळं करू गं तुम्हाला खायला!" असं म्हणत घरात नेहमी तयार असणारा चिवडा देणाऱ्या रजनीताईंकडे नातवासाठी पदार्थांची मोठ्ठी यादी तयार होती.

तरूण वयातील जबाबदाऱ्या, समस्या अन् व्यस्तता‌ ह्यामुळे दोघांच्या मुठीतून निसटून गेलेलं कविताचं बालपण जणू प्रतिकच्या रूपानं परत आलं अन् दोघांच्या उतारवयात त्यांच्या घरात गोकुळ नांदू लागलं.

"आजी, मला दिवाळीची सुट्टी मिळणार आहे.. तू फराळाचं काय काय करणार??" प्रतिक शाळेतून घरी आल्यावर दप्तर सोफ्यावर फेकत रजनीताईंना विचारू लागला.

"आजी खूप काही करणार आहे.. चकली, शेव, चिवडा, लाडू, करंजी, कडबोळी आणि शंकरपाळी.. " आजी उत्साहानं यादी वाचून दाखवू लागली..

"अनारसे पण करणार ना! माझी आजी खूप छान बनवते अनारसे!!" प्रतिकनं मागणी केली अन् रजनी ताईंनी मनाशी ठरवलं.

"जन्मात मला कधी अनारसे जमले नाहीत! पण ह्यावेळी मी नक्की करणारच!!" अन् त्या यू ट्यूब वर अनारश्यांच्या हुकमी रेसिपी शोधण्यात मग्न झाल्या.

"आजोबा, आकाशकंदील लावू या! तुम्हाला येतो बनवता??" प्रतिकनं विचारलं तसं आजोबांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 

ते शाळेत असताना त्यांची भावंडं मिळून आकाशदिवा‌ बनवत असत. प्रतिकसाठी आजोबा पुन्हा शाळकरी शशी झाले.. अन् प्रतिकसाठी आकाशकंदील बनवू लागले. 

आकाशकंदील तयार होताच प्रतिक टाळ्या पिटत नाचू लागला.. अन् आजी आजोबांचे श्रम कुठल्या कुठे पळून गेले.

प्रतिक अन् आजोबा फटाके आणायला बाजारात गेले.. प्रतिकनं एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवावं अन् त्याच्या आजोबांनी लगोलग ती वस्तू खरेदी करावी.

कविताच्या दिवाळसणानंतर पहिल्यांदाच त्यांनी फटाक्यांची खरेदी केली.. खास प्रतिकच्या आवडीची दिव्यांची माळ अन् कलाकुसर केलेल्या पणत्या विकत घेतल्या.

प्रतिकला त्याच्या आवडीचा नवा ड्रेस घेतला अन् आजी आजोबा अन् नातू मिळून दिवाळी साजरी करण्याची योजना बनवू लागले..

"ह्या वेळी दिवाळीचा बराच खर्च झाला नाही!" रजनीताईंनी रात्री प्रतिक झोपल्यावर शशिकांतरावांना विचारलं.

"छे ‌गं! आपल्या प्रतिकच्या आनंदापुढे कसला खर्च अन् कसलं काय!" शशिकांतरावांनी पत्नीची समजूत काढली.

तरीही शशिकांतरावांनी‌ ह्या वर्षी स्वतःकरिता नवे कपडे घेतले नाहीत हे रजनीताईंच्या नजरेतून सुटलं नाही.


"आई, उद्यापासून माझ्या शाळेला सुट्टी लागणार आहे?" सकाळी कविताचा फोन आल्यावर प्रतिकने स्वतःच फोन उचलून आईला सांगितलं..


"हॅलो, बोल गं कवि.." प्रतिकच्या हातातून रिसिव्हर काढून घेत रजनीताई बोलल्या.. "काय म्हणतेस??"


पलीकडून आवाज येत राहिला.. पण रजनीताई मटकन खाली बसल्या..

"हॅलो, आई.. अगं प्रतिकला‌ दिवाळीच्या सुट्ट्या आहेत तर आम्ही उद्याच येतोय त्याला घ्यायला!! दिनेशचे आईबाबा पण येणार आहेत चंद्रपूरहून!! ते पण आठवण काढताहेत‌ प्रतिकची! 

त्याची बॅग भरून ठेव! आम्ही चंद्रपूरहून जाता जाता त्याला घेऊन जाऊ!" कविता बोलत होती.. पण रजनीताईंना काहीच ऐकू येत नव्हतं.


********


"आपण आपल्या घरी जायचं!!" प्रतिक त्याच्या बाबांच्या अंगावर उड्या मारत म्हणाला.

 "आज्जी.. आजोबा.. मी आमच्या घरी जाणार आहे दिवाळीला.. खूप खूप मज्जा येईल!"

"प्रतिकनं ही सगळी खरेदी केली होती.. दिवाळीसाठी.." शशिकांतरावांनी खरेदीच्या अजून न उघडलेल्या पिशव्या दिनेशला देत सांगितलं. 

"ह्याची काय गरज आहे‌, बाबा? तुम्हालाच असू द्या की सगळं सामान!" असं म्हणत कवितानं त्या पिशव्या बळेच आतल्या खोलीत नेऊन ठेवल्या.


"रजनीताई, तुम्ही दोघं पण चला ना दिवाळीसाठी नागपूरला! एकत्र करू या दिवाळी!" विहीणबाईंनी रजनीताईंना आग्रह केला.

"छे! छे!! अहो, दिवाळीचं दाराला कुलूप कसं घालायचं? घरात दिवा लगायलाच हवा ना!" डोळ्यांआड डोकावलेलं पाणी मागे सारत रजनीताईंनी उत्तर दिलं अन् प्रतिकला उचलून घेतलं.

"पुन्हा केव्हा येशील बाळा??" रजनीताईंनी दाटल्या गळ्यानं प्रतिकला विचारलं..

"दिवाळी संपली की येईन..!" प्रतिकनं‌ निरागसपणे उत्तर दिलं.. अन् त्याने हसत हसत टाटा करून आजी आजोबांचा निरोप घेतला.

आपल्या घरचं औटघटकेचं गोकुळ दूर दूर जाताना बघून रजनीताई आणि शशिकांतरावांचे डोळे‌ मात्र नकळतच भरून वाहू‌ लागले.


© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने