आईपण

आईपण

© स्मिता मिलिंद




हा फक्त माझ्या भावना मांडण्याचा एक प्रयत्न आहे. इथे सगळेच जीवन कसे बेभरवशी आहे. सगळ्याच गोष्टी तो स्वतःच्या हातात ठेवतो. आपला जन्म - मृत्यु आणि मधले जीवन सुद्धा. याचा पुन्हा आलेला प्रत्यय.


ज्याला जन्म देऊन, जन्माचे सार्थक झाले असे वाटते. त्याचाच मृत्यु एक आई कशी सहन करत असेल....? 

माझ्या शेजारी रहाणाऱ्या मैत्रीणीबाबत घडलेली घटना....

रात्रीच्या जागरणाने आणि अबरचबर खाण्याने पित्त झाले असेल.  म्हणून सकाळी एक उलटी झाली, असे वाटले आणि २५ वर्षांचे आयुष्य निव्वळ ५ मिनिटांत संपले.  

वडील नामांकित कंपनीत, चांगल्या हुद्द्यावर कार्यरत.  समाजप्रिय, कुटुंबवत्सल, स्वकष्टाने पुढे आलेला माणुस. मूळचे कोल्हापूरचे. अतिशय स्वच्छ, वक्तशीर व्यक्तीमत्व. नवरा बायको दोघेही कष्टाळू. सामाजिक बांधिलकी मानणारे.... त्यांचे घर अगदी टापटिपीचे... माणसांची सतत ये-जा चालू असणारे. बहुतेक सर्व नातेवाईक कोल्हापूरला रहाणारे .... इथे मोजकेच ..

पण या तिघांनीही मित्रत्वाची, आपुलकीची भरपूर संपत्ती गोळा केलेली.. माणुसकी आणि नाती जपणाऱ्या सच्छिल आणि पापभिरु व्यक्ती..

 हा 'सुमित' नुकताच UK मधुन उच्चशिक्षण घेऊन, तीन महिन्यांपुर्वी भारतात परत आलेला. अत्यंत लाघवी, मायाळु मुलगा. आई वडिलांसोबत भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा. त्यांच्या कष्टाची जाणीव असणारा. मित्रांनी समृध्द. समाजात नातेवाईकांत अगदी प्रिय. 

तिकडे असताना त्याने आई वडील आणि मामा मामीला तिकडे बोलावून घेतले....

त्याला शक्य झाले तितके, यांना फिरवून सर्व दाखवले.. नातेवाईकांबरोबरच मित्रांसाठी सुद्धा, आठवणीने काही ना काही भेटवस्तू आणल्या.... माझा मुलगा सौख्यद .. त्याचा एक जवळचा मित्र ...  

सुमित UK ला जाताना सर्व मित्र,  त्याच्याबरोबर मुंबईपर्यंत जाणार होते... पण त्याचे नातेवाईक आले,  म्हणून तो बेत रद्द झाला.. 

परंतु त्याची कसर,  तो भारतात परतायच्या वेळी भरुन काढली.. 

तो परत येण्याची तारीख फक्त त्याच्या ठराविक मित्रांनाच माहिती होती... मग हे सर्वजण त्याला आणायला मुंबईला गेले होते.. आई वडिलांना सुखद आश्चर्याचा धक्का दयायचा त्याचा बेत, यशस्वी झाला होता....

 सकाळी अचानक त्याला दारात बघून यांना इतका आनंद आणि आश्चर्य वाटले होते ..... असे surprise देणे त्याला खूप आवडायचे .... एक जिंदादिल मुलगा .... 

जातानाही surprise देउन गेलास का रे! ..... 

सुमितच्या स्वभावात आवडणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी होत्या ... म्हणून देवाला देखिल तो आवडला असेल का? 

काय असेल त्या विधात्याच्या मनात?     काय झाले असेल ...? का झाले असेल असे ...?     फक्त तर्क वितर्क... चर्चा.... जर आणि तर.....

 एक म्हण आहे. 'मरणाच्या दारात आणि तोरणाच्या घरात तुमची संपत्ती समजते.' म्हणजे तुम्ही माणूस किती कमावले ते कळते. या बाबत हे कुटुंब अगदी श्रीमंत. सतत माणसांचा ओघ होता ...

एक वाचले होते. 'सर्वात मोठे ओझे म्हणजे मुलाला खांदा देणे'.    ते प्रत्यक्ष समोर पाहिले. त्या मातापित्यांची अत्यंत दारुण अवस्था....

कसे सहन करणार हे दु:ख.....? कसे सहन करत असतील पुत्रनिधनाचे दु:ख.....?  अवघे २५ वर्षे वय. आयुष्य नुकतेच तर उमलु लागलेले.

ज्याला अंगाखांद्यावर वाढवले त्याला खांदा देताना, त्या खांद्यात ताकद कुठुन आणली असेल....? 

ज्याला कडेवर उचलले, 

त्याला उचलताना बघणे. 

कसे पेलले असेल.....?

काय असेल त्या विधात्याच्या मनात...?

का असेल असे यांच्या नशिबात....? 

इतकी असहनीय दु:खे निर्माणच का केली असतील......?

 इतके न टाळता येणारे दु:ख का मिळाले असेल....?

 या प्रश्नांना उत्तरे नाहीत आणि सांत्वनाला शब्द नाहीत.

त्या माऊलीच्या भावना कशा समजाव्या... एकुलता एक, दणकट शरीरयष्टी, निरोगी शरीर आणि फक्त दहा मिनिटांत....तिचे तर जगच संपले, जगणे संपले. अविरत अश्रूधारा.... त्या मात्र न संपणाऱ्या.

तुझ्या काळ्याभोर, हसऱ्या डोळ्यातील, विझलेल्या ज्योती.

इतकीच का होती, आपली संगती.

डोळ्यांसमोरुन सरकलेले तुझे बालपण,

आणि मला लाभलेले आईपण.

तुझ्या प्रगतीचा चढता आलेख,

आम्हा मातापित्यांना धन्य करणारा.

इतके गुणी, का असावे बरं कुणी?

सर्वांच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन, 

सतत भेटवस्तू देणारा तू....

ज्या मांडीवर तुला जोजवले, 

तिथेच डोके घेऊन, सुन्न बसलेली मी. 

जातानाही माझ्या हातात तर होतास....

कसा निसटलास...?

मला दु:खात बघू  न शकणारा 

आता का असा निश्चल..?

माझे अश्रू पुसणारे हात 

असे थंड का...?

माहिती पांढरा तुझा आवडता रंग

तरी या वेषात कशी बघू  तुला...?

दु:खाच्या गर्तेत आम्हाला लोटुन जाताना 

तुझे पाऊल एकदाही अडखळले नाही...?

अखंड चालणारी तुझी बडबड, video calls, messages सगळेच mute करुन गेलास.

घरभर पसरलेल्या तुझ्या आठवणी कशा mute करु...?

आतुन येणारे वात्सल्याचे उमाळे, 

कसे थांबवू ....?

प्रत्येक वाट तर घट्ट बंद केलीस.

फक्त दु:ख मागे ठेउन गेलास....

काळ्याकुट्ट अंधारात 

एकही उजेडाचा किरण ठेवला नाहीस...

आमचा सगळा आनंद, सगळे जगणे सोबत घेऊन गेलास. 

किती पोरकं उजाड करुन ठेवलेसं आम्हाला.....

फक्त तुझ्या अनंत आठवणींची सोबत आता...


परत तुझी हाक कधीच न ऐकू शकणारी तुझी आई आणि बाबा....

प्रिय सुमित बेटा .... असशील तिथे सुखी रहा बाळा ....


सुमितच्या मनात देखिल काही गोष्टी, राहूनच गेल्या असतील ना! आमच्या सारखाच त्याला सुद्धा हा अनपेक्षित धक्का असेल .... काय वाटले असेल त्याला? आत्ता असणे आणि काही क्षणांत नसणे .... सगळेच संपलेले .... हा बदल कसा पचवत असतील? .... त्याने बाप्पाला काही सांगितले असेल का?


अरे बाप्पा! 

आत्ताच तर घराच्या अंगणातून बाहेर पडू बघत होतो.

जरी जन्मदात्यांच्या पंखाखालीच होतो.

इतके लगेच बोलावले तुझ्या घरी.


माणसं वाचायची होती,

जग बघायचे होते.

आई वडिलांच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या होत्या.

माझ्या संसारातून त्यांना फिरवायचे होते.

मग येणारच होतो तुझ्याकडे.

घाईघाईने निरोप धाडलास तू.....


स्वप्नात आत्ताच तर रंग भरायला सुरुवात केली होती. 

जरा दु:खं झेलायची होती,

थोडा आनंद साजरा करायचा होता. 

माझ्या पंखांनी भरारी घ्यायची होती. 

तातडीचा सांगावा तुझा, टाळता नाही आला.....


जन्मदात्यांच्या ऋणातून, थोडे उतराई व्हायचे होते.

माझ्या पावलांनी त्यांना चालवायचे होते.

त्यांच्या दु:खाचे कारण, 

मलाच का रे केलेस! 

मग येणारच होतो तुझ्याकडे.


तुझ्याशी काय बोलायचे, हेही  माहिती नाही मला.

तुझ्या भक्तीची गीतेही पाठ नाही झाली मला,

बाकीचेच तर शिकत होतो.

आता तुझ्याकडे काय मागू, 

माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना, दु:ख झेलायची शक्ती दे.....


©® स्मिता मिलिंद 🍁


सदर लेख लेखिका स्मिता मिलिंद यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने