पाखरु



© वर्षा पाचारणे




परी... दिसायला अतिशय सुंदर मुलगी... लहानपणापासूनच फॅशनेबल कपडे घालण्याची हौस असलेली परी पाचवीत गेल्यापासून होस्टेलला राहत होती.

मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिला अनेक खेळांचे सैनिकी प्रशिक्षण मिळाले होते.

पाचवी ते बारावी पर्यंतचं सर्व शिक्षण तिने मिलिटरी स्कूलमध्ये पूर्ण केलं.

स्वतःची कामे स्वतः करणे, सकाळी लवकर उठणे, आपल्या कामांचे नियोजन करणे, या सगळ्या गोष्टी ती शाळेच्या या वर्षांमध्ये शिकली होती. 

बारावीची परीक्षा संपली आणि परी घरी आली. पण घरी आली म्हणून निवांत पडून किंवा उगाच टाईमपास करत वेळ काढणं मात्र तिला जमत नव्हतं.

अशातच एका छोट्याशा गावामध्ये कॅम्पच्या निमित्ताने समाजसेवा करण्यासाठी म्हणून ती गेली. काही ठिकाणी समाज सेवेबरोबरच समाज प्रबोधन करणं देखील तितकंच गरजेचं असतं हे तिने आजवर ऐकलं होतं.

कॅम्पमधील प्रत्येकाला आजूबाजूच्या गावांमध्ये एकट्याने राहून समाज प्रबोधन करायचं होतं... पण 'आपण कोण आहोत?', हे मात्र गावातल्या मंडळींना कळू द्यायचं नाही, असा त्या योजनेतला मुख्य नियम होता.

कॅम्पचा दिवस उजाडला आणि परी आणि तिच्या मित्रमंडळींचा गावांच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

गाडीतील एक एक करून सगळे मित्र आपल्या ठरलेल्या ठिकाणी उतरून निघून गेले. 

आता फक्त गाडीमध्ये परी बसली होती. ड्रायव्हरने तिलाही तिच्या ठरलेल्या गावामध्ये सोडले आणि तो निघून गेला. आता जवळपास ते सारे जण एक महिन्यानंतर भेटणार होते. 

सैनिकी शाळेत राहिल्यामुळे आणि काही कॅम्पला जाऊन आल्यामुळे परीला हे सगळंच खूप भारी वाटत होतं.

हलक्या गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, वाऱ्यावर भुरभुरणारे केस, गोरा मोहक रंग आणि सडपातळ बांधा अशी परी गावात आली तेव्हा साधारणपणे रात्रीचे आठ वाजले होते.

गावातील मंदिराच्या बाजूला असलेल्या पाटलांच्या दोन रिकाम्या खोल्या तिने भाडेतत्वावर घेतल्या होत्या. 

परी तिच्या ठरलेल्या घरी पोहोचेपर्यंत, गावातील पारावर बसलेल्या टुकार पोरांचं लक्ष मात्र तिच्या दिसण्याने वेधून घेतलं. 

आजवर केवळ भडक रंगाचे पंजाबी ड्रेस, हातामध्ये बांगड्या, घट्ट बांधलेले केस अशा मुली बघायची सवय असलेली पोरं परीला बघून मात्र पुरती बिथरली.


परीने 'मी या गावात नवीन शिक्षिका म्हणून आले आहे', अशी आपली ओळख करून दिली.

आता मात्र अडाणी मुलांना पण शिक्षणाची खोटी ओढ वाटत होती. 

ती शाळेत जायला निघाली की मुलं तिच्याकडे बघून एकमेकांना म्हणायची ,"अरे ,अशी शिक्षिका असली, तर मी म्हातारं होईपर्यंत शिकेन. तर कधी परी दिसताच मुद्दाम आपसात टाळ्या देत 'परी हू मैं, मुझे ना छूना', अशी गाणी म्हणत टवाळखोरी करायचे.

परीचे घर अगदी मंदिराशेजारीच असल्याने आता देवाला नाही पण परीला बघण्यासाठी मात्र पोरासोरांची मंदिरात ये-जा वाढली होती. 

एवढेच काय गावातील एक दोन पोरांचे बाप असलेले बापेदेखील मंदिरात घुटमळू लागले होते.

कधीतरी "माझ्या आईने आज शिरा केला आहे म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलोय", असे सांगत तर कधी तिचे दार ठोठावत कुणी माझ्या मुलीला शाळेत ऍडमिशन घ्यायची आहे, म्हणून उगाचच चौकशी करण्याच्या निमित्ताने यायचे.

परी वयाने लहान असली तरी तिला समज मात्र मोठ्या माणसांप्रमाणे होती... "बरं झालं, आपण या गावात समाज प्रबोधन करण्यासाठी आलो', असा विचार करून तिने मनाशी काही निश्चय केला... तिने मनाशी ठरवलं 'जशास तसं', हि युक्ती वापरून आपण आपलं काम साधूयात.

इतके दिवस होऊनही सरळ मार्गी चालणारी परी आता कोणी तिच्याशी बोलायला आलं, तर खोटं खोटं का होईना पण हसून बोलत होती. 

तिने गावातील मुलींशी मैत्री केली. परी बरोबर छान मनमोकळी मैत्री झाल्यानंतर मुलीही तिला स्वतःच्या मनातलं सांगू लागल्या. 

त्यांच्या दृष्टीने ती एक शिक्षिका होती, पण शाळेबाहेर त्या तिला परीताई असेच म्हणायच्या. 

मग मुली आणि परीने एक योजना आखली... गावात दारू आणि बायकोला मारहाण हा मुद्दा ऐरणीवर होता.

मग परीने ठरवलं कि आता ज्या दिवशी मी हे गाव सुधारुन दाखवेल, त्याच दिवशी मी हे गाव सोडून जाईल... तो पर्यंत मी माझे प्रयत्न चालू ठेवेल"

मग काय दुसऱ्या दिवशीपासून मिशन फत्ते करायच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. 

मुलांबरोबर एक दिवस पारावर जाऊन बसलेल्या परीवर इंप्रेशन मारण्यासाठी मुलं तिच्या कलेकलेने वागण्याचा प्रयत्न करत होती. 

मुळात शहरात वाढलेल्या परीला एकमेकांशी बोलताना टाळी वगैरे देताना काहीच वेगळं वाटत नव्हतं.

परंतु गावात वाढलेल्या आणि मनात केवळ मुलींबद्दल आकर्षणाच्या भा्वना असलेल्या त्या मुलांना परीने टाळी देताना तिच्या हाताचा झालेला स्पर्श मात्र सुखावून जायचा.

आता तर त्या मुलांमध्ये चढाओढ लागली होती ,'जो आधी परीला प्रपोज करेल, तो हिरो'.... असं त्यांच्यात ठरलं. 

बरं, मुलं सोडाच पण त्यात एक दोन बापेदेखील सामील झाले... परीचा प्लॅन आता कुठे फत्ते व्हायच्या दिशेने सुरुवात झाली होती.

त्यात एक दिवस परी एकटीच बसलेली असताना, एका मुलाने अगदी निळू फुले स्टाईलमध्ये आवाज टाकला 'गावात एक पाखरू आलंय'.

इतक्यात लगेच दुसरा एक जण म्हणाला ,'बाई वाड्यावर चला'.... त्यांच्या अश्या वागण्यावर चिडण्यापेक्षा परीने अगदी खळखळून हसून प्रतिसाद दिला.

तिच्या स्लीवलेस ड्रेसमधून दिसणाऱ्या गोर्‍यापान दंडांकडे बघून ती पारावरची टवाळखोर मंडळी घायाळ होत होती.. आणि आता तर त्यातल्या एकाने डेरिंग करत परीला त्यादिवशी विचारले ,"परी, मला तू खूप आवडतेस... मी तुझ्यासाठी काही वाट्टेल ते करीन".... त्याची फिल्मी स्टाईल आणि एटीट्यूड पाहून खरंतर परीला अतिशय हसू येत होतं.

पण तिने हसणं तोंडातल्या तोंडात दाबत त्याला सांगितलं,' ठीक आहे, पण मला विचार करायला थोडा वेळ लागेल'.... आता परी येवढे स्वतःहून म्हणते म्हटल्यावर त्याची हिम्मत थोडी आणखी वाढली.

 इतर मुलांकडे एक हिरो स्टाईलमध्ये कटाक्ष टाकत तो पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला ,'मग आज रात्री मी तुझ्या घरी येतो'.. तेव्हा तुझा उत्तर मला सांग'... परीने विचार केला 'आयताच तावडीत बकरा सापडला आहे'.

मग तीही त्याला आग्रहाने 'हो ,नक्की' असं म्हणत लाजत, मुरडत घरी निघून गेली... तिचं मुरडत चालणं बघून अनेकांच्या हृदयाची धडधड वाढत होती.

'त्या प्रेमवीराआधी आपणच परीला विचारायला हवं होतं', असं अनेकांच्या मनात येऊन गेलं.... याला जर परी 'नाही' म्हणाली, तर आपण तिला उद्या विचारू, असा विचार करत बाकीचे बसलेले प्रेमवीर अचानक देवदास बनले होते.


रात्री तो प्रेमवीर अगदी थाटामाटात परीच्या घरी पोहोचला. 

आता परी काय उत्तर देते, हे ऐकण्यासाठी बाकीची गॅंग लपत-छपत खिडकीच्या मागे दबा धरून बसली होती. परीने दार उघडताच हा प्रेमवीर तिच्यासमोर गुलाबाचे फुल घेऊन उभा राहिला...

 तितक्यात परी त्याला म्हणाली "अरे, घाई काय आहे, आतमध्ये तरी ये... काही चहापाणी घेशील की नाही'... 

जणू घरातून हाकलून दिल्यासारखी पारावर ओवाळून टाकलेली मंडळी ही.... आणि आज इतका आदर मिळत असल्याने तो पठ्ठ्या अगदी हरखून गेला.

परी खुर्चीत बसताच ह्याने मात्र हिम्मत वाढवत तिच्या गालावरुन हात फिरवत 'माझी होशील का?' म्हणताच तिने कराटेच्या अशा दोन-चार किक मारल्या, की तो 'आहsss उहssss' करत मटकन खाली बसला.

 परीने अजून दोन-चार सणसणीत त्याच्या कानाखाली देत त्याला चांगलं सुनावलं... 'रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या मुली म्हणजे काय तुम्हाला तुमची खाजगी मालमत्ता वाटते काय... मुलींचा आदर करता येत नसेल तर अनादर करत जाऊ नका' असं म्हणून आतल्या खोलीतून व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या नेहाला बाहेर बोलावले.

ते शूटिंग प्रेमवीराला दाखवत परी म्हणाली, "आता इथं जे काही झालं ते मी बाहेर जाऊन सांगितलं, तर तुझी काय इज्जत राहील" त्यावर परीची माफी मागत तो गयावया करू लागला.

त्यावर परी त्याला म्हणाली 'आता मी सांगते तसं कर... रोज तू एका मुलाला उगाचच मी तुझ्याशी किती छान वागले, याचं खोटं कौतुक करून सांग... नाहीतर मी हा व्हिडिओ दाखवेन... त्यावर तयार होत तो पठ्ठ्या आल्यापावली पळून गेला.


दुसऱ्या दिवशी पारावर बसलेले असताना परीला पाहून त्याच्या तोंडातून शब्द काही फुटेना.

 कदाचित याला परीने नकार दिला असेल, हा विचार करत इतर चार जणांनी त्याला विचारले 'काय रे ,काल काय झाले? तर तो म्हणाला 'नाही, तिला तुमच्यातला दुसरा कोणीतरी आवडतो आहे.... असे ती म्हणाली. 'आता तो कोण?, हे मात्र तिने सांगितलं नाही'..... त्याचे बोलणे ऐकून खुश होणारा प्रत्येक जण तिला प्रपोज करण्याच्या मागे लागला होता. 

रोज एक जण जाऊन मार खाऊन दुसऱ्या दिवशी पारावर गपचूप बसलेला असायचा. 

रात्री आपल्याबरोबर काय झालं? हे सांगायची मात्र त्यांची हिंमत होत नव्हती... 'एका मुलीकडून मार खाल्ला', ही गोष्ट त्यांना अपमानास्पद वाटत होती.

बोल, बोल म्हणता पारावरची गर्दी आता कमी व्हायला लागली होती... शाळेत जाणाऱ्या मुली निवांतपणे न घाबरता घरापासून शाळेत ये-जा करू लागले होते.

गावातील महिलांनाही परीने पूर्वकल्पना दिल्याने तिच्याबद्दल मात्र सार्‍या महिलांमध्ये आणि मुलींमध्ये आदर निर्माण झाला होता.

एका अनोळखी पण गावाचं भलं इच्छिणाऱ्या मुलीचं नकळत गावकरी महिलांबरोबर मायलेकीसारखं नातं निर्माण झालं होतं....


समाजप्रबोधनाचा कॅम्प पूर्ण करुन परी पुन्हा तिच्या घरी निघाली, तेव्हा साऱ्याच जणी तिला 'पुन्हा कधी येशील?' म्हणून विचारत होत्या.

तेव्हा परी हसून म्हणाली,' माझ्या आयांनो, आता तुमच्या लेकींमध्ये मी एवढा मोठं डेरिंग निर्माण केलं आहे, की गावातंच काय, गावाबाहेर देखील त्यांना कोणी छेडण्याचा प्रयत्न जरी केला, तरीही तो मार खाल्याशिवाय राहणार नाही'... परीच्या या बोलण्यावर एकच हशा पिकला...


काही नाती ही रक्ताची नसली तरीही आपुलकीने, माणुसकीने बांधलेली असतात... महिलांना, मुलींना कायम टारगेट करत, त्यांची घुसमट करणारा समाज आजही पदोपदी बघायला मिळतो. 

अशा वेळी न घाबरता थोडीशी युक्ती करून, जर प्रसंगाला सामोरं गेलं, तर प्रत्येक स्त्री किंवा महिला ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकते.... आणि मग क्वचित प्रसंगी असे एखाद्या अनोळखी गावात देखील मैत्रीचे बंध निर्माण होतात.


© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने