दोष कुणाचा

 दोष कुणाचा?

© राधिका कुलकर्णी


"हे बघ शेवंतेऽऽऽ तुला सांगुन ठेवतेय,नवरा कितीही चल चल म्हणुन आग्रह करेल पण तु नाही म्हणुन सांग. बारशाचा कार्यक्रमाला वांझोट्या बाईनं जाऊ नये.अपशकुन घडतो.माहितीय ना तुला? तरी तोंड वर करून कुठ निघालीस गं तरातरा लगेच नवऱ्यामागे?? काही यायचं नाही सांगुन ठेवतेय. मीनाला लगीन होऊन पोरगं बी झालं पण तुझी कूस अजुन उजवली नाही. तिच्या सासूला मुळीच आवडणार नाही तु आलेली.तेव्हा तु घरीच थांब.बरीच कामे पडलीएत ती उरक.आम्ही सगळे जाऊन येतो." शेवंताची सासु अस सगळं तिखट बोलुन तिला हिणवुन निघुन गेली. 

शेवंता म्हणजे सोपानची बायको. सोपानच्या घरी लग्नाआधी तो धरून पाच माणस.आई वडील मोठा मुलगा सोपान,त्या पाठीवर बहिण मीना आणि आणखी एक भाऊ जो शहरात कॉलेज शिकत होता. घरची परीस्थिती तशी ओढग्रस्तच.वडील गेल्यावर घराचा सर्व भार सोपानवर येऊन पडला.स्वत:ची थोडीफार शेती होती पण अवकाळी पावसाने त्याच्या उभ्या पिकाची नासधूस केली होती.कसबसं कर्ज काढुन बी बियाणं आणुन त्याने जमीन कसली होती.

ह्यावेळेला जरा बरे पीक येईल अशी आशा होती तोच ओला दुष्काळ पडला आणि काढायला आलेले पीक जमीनदोस्त झाले. ह्या पिकाच्या भरोशावरच तर बहिणीचा साखरपूडा झाला. घरात सगळी तयारी चाललेली लग्नाची.उधार उसनवार करून कसेबसे लग्न तर पार पडले.पण पावसाने करामत केली अन सोपानला प्रश्न पडला आता कर्ज कसं फेडायचं.मनात हे विचार चाललेले असतानाच राखीचा सण जवळ आला.लग्नानंतर मीनाची पहिली राखीपौर्णिमा. भावाकडुन चांगली ओवाळणी मिळावी ह्या अपेक्षेने मीना चार दिवस आधीच माहेरपणाला आली. सोपानच्या खिशात तर पाच पैसे नव्हते.काय करावे?मीनाला राखीची भाऊबीज तर करायलाच पाहिजे. कुठुन पैसे आणावे? हा विचार करत गावभर प्रत्येक नातेवाईक,ओळखी पाळखीचे मित्रांना भेटुन काही पैसे उधारीवर मागु लागला पण कुणाकडेच पैशाची सोय झाली नाही.असाच भटकत भटकत तो ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ पोहोचला.

पिंपळाच्या पारावर काही मंडळी तंबाखु मळत बसली होती.तो ही निराश मनाने पारावर बसला. इकडे तिकडे बघत असतानाच एका भिंतीवरच्या जाहिरातीवर त्याची नजर पडली.ती जाहिरात वाचुन त्याची कळी खुलली.त्याला एक मार्ग सुचला. त्याखाली दिलेल्या संपर्कावर तो जाऊन भेटला. त्या दिवशी सोपान खूप आनंदात घरी गेला. त्याच्या राखीच्या सणाची सोय झाली होती.

असेच काही वर्ष गेली.सोपानचेही लग्नाचे वय झाले होते.आता मधल्या काळात परिस्थितीही जरा स्थिरावली होती त्यामुळे आईने सतत सोपानच्या मागे लग्नाचा लकडा लावला. सोपानची लग्नाला तयारी होती पण त्याची एक अट होती.त्याला लग्नाआधी मुलीला एकांतात भेटायचे होते. पण खेडेगावात अजुनही लग्न होईपर्यंत मुलामुलीला आपापसात भेटु बोलु दिले जात नाही त्यामुळे शेवंताच्या घरच्यांशी बोलणी होऊन पसंती झाली तरीही सोपानची अट काही मान्य झाली नाही.त्याने बरेच प्रयत्न केले शेवंताची भेट घेण्याचा पण शेवंताही तशाच संस्कारात वाढलेली.ती ही भेटायला नाही म्हणाली. सावळी,नाजुक,शेलाटी शेवंता सोपानच्या मनात भरली होती.तो स्वत:ही सावळा असला तरी दिसायला देखणा होता.दोघांचा जोडा अगदी अनुरूप होता.

मग जास्त विचार न करता आपला हट्ट सोडुन देऊन सोपान बोहोल्यावर चढला.लग्न झाले आणि शेवंता सोपानच्या घरी सून म्हणुन आली. दोघांचे नव्या नवलाईचे दिवस अगदी आनंदातच जात होते. रोजच्या रात्री एकमेकांच्या बाहुपाशात सरत होत्या.सोपान शेवंता मिलनोत्सवात नाहुन निघत होते.दिवस कधी सरतो अन् कधी रात होते असे होई सोपानला.शेवंताचीही अवस्था काही वेगळी नसे. कधी एकदा सोपानच्या मिठीत शिरते असे होई शेवंताला.दिवस अगदी मजेत चालले होते.

शेवंता स्वभावाने मनमिळाऊ शांत आणि सर्व कामात हुशार त्यामुळे लवकरच घरात सासुची लाडकी झाली.सासुला तर सुनेला कुठे ठेवु न कुठे नको असे होऊन जाई.दिवस जात होते तशी शेवंताही नव्या घरात छान रूळली. घरातल्या  सर्व कामांची जवाबदारी हळुहळु तिच्याच अंगावर पडू लागली.ती ही सगळे आनंदाने करे.घरातुन वेळ मिळाला की सोपानच्या मदतीला शेतावर पण जाई.

अशीच वर्ष सरत गेली.नव्याची नवलाई संपुन लग्नाला एव्हाना दोन वर्ष झाली तरी शेवंताची कूस काही उजवत नव्हती. सासू आडुन आडून तिच्या पाळीला यायला उशीर झाला की लगेच विचारी,"पाळी चुकली का गंऽऽऽ..?"

तेवढे पूढे गेलेले दिवस सासुकडुन लाड व्हायचे आणि दोन तीन दिवसांनी बाजुला बसली की सासूच्या तोंडाचा अखंडपट्टा चालु व्हायचा.

लाडाची शेवंता आजकाल सासुच्या मनात खटकायला लागली होती कारण तिला वंशाला दिवा हवा होता जो शेवंता देत नव्हती. शेवंतालाही आता आपण आई व्हावे असे वाटू लागले होते.दोघेही कुठलीही गर्भनिरोधक उपाययोजना करत नसुनही तिला दिवस रहात नव्हते त्यामुळे ती ही खूप उदास रहायची. तिच्या बरोबरीच्या सगळ्या मैत्रिणी लग्न होऊन वर्षा दोन वर्षातच आया झाल्या होत्या परंतु शेवंताची काही गोड बातमी मिळत नव्हती. नवस-सायास,उपास-तापास,गंडे-दोरे,साधु-बूवा सगळे करून झाले पण कशानेच गूण येत नव्हता.शेवटी डॉक्टरकडेही दाखवुन झाले पण शेवंतामधे काहीच दोष नव्हता तरीही तिला गर्भधारणा होत नव्हती.

करता करता दहा वर्ष झाली पण शेवंताला काही मूल झाले नाही.शेवटी सोपानने आपण मूल दत्तक घेऊ असा उपाय मांडला पण हा उपाय आईला मुळीच मान्य होईना.दुसऱ्याचं रक्त,कोण कुठले ते पोरं आपल्या घराचा वंश कसा चालवेल? अशा भ्रामक समजुतीपायी शेवंता मात्र मातृत्वाला मुकली होती.

सकाळी सकाळी वांझोटीच दर्शन नको म्हणुन बाया बापड्याही तिला बघुन मुद्दाम तोंड फिरवायच्या.बाहेरचा त्रास काय कमी होता म्हणुन घरात सासुही तोंडसुख घेई.ती मुकाट्यानं सारं सहन करी. कधी कधी खूप गलबलुन येई तिला.

कित्येक रात्री नवऱ्याच्या कुशीत शिरून खूप रडे शेवंता.सोपानलाही मनात सतत एक बोचणी लागुन राही. काहीतरी बोलायचे असे त्याला पण हिंम्मतच व्हायची नाही.मुकपणे सहन करण्याचा खूप त्रास होई त्यालाही.मग तिची समजूत घालायला तो तिला म्हणे,"आत्ता जाऊन आईशी बोलु का सांग? तिला चांगले झापतोच जाऊन."

पण शेवंताच त्याला नको म्हणुन रोखत असे. आसपासच्या ओळखी-पाळखीत,नात्या -गोत्यात कोणीच तिला मुहुर्त,लग्न,बारसं किंवा सवाष्ण म्हणुन जेवायलाही निपुत्रिक म्हणुन बोलवत नसे.सरळ तोंडावर बोलत "तुझ्यासारख्या वांझोटीला कोण बोलावणार…??"

ती हे टोमणे ऐकुन कंटाळुन गेली होती.त्यात भरीस भर नणंदेने भावासाठी गुपचूप दुसरे स्थळ पण आणले लग्नाकरता.

मीना आपल्या मोठ्या भावाशी बोलतानाचे संवाद तिच्या कानी पडले. "दादाऽऽऽ..जे झाड फळ देत नाही त्याला आपण उपटून टाकतो मग हिलाच काय सोनं लागलयं? दे सोडुन.तिच्याहुन रूपाची खाण आहे माझी नणंद.करत असलास तर हो म्हण,देऊ बार उडवुन ह्या मोसमात."

ऐकुन तिच्या पायाखालची जमिनच सरकली. डोईवरचा हंडा जागीच सरकला.हातातली घागरही गळुन पडली. ती जागच्या जागीच थिजुन गेली.डोळ्यातुन आश्रुंच्या धारा वाहू लागल्या. तिला घरात पाऊलही ठेववेना.ती तशीच पुन्हा आडाकडे गेली.कितीतरी वेळ आसवं गाळत तिकडेच बसुन राहीली.मन रडुन शांत झाल्यावर पुन्हा हंडा कळशी घेऊन घरात आली.

विषय जसा काही आपण ऐकलाच नाही ह्या दिखाव्यात ती घरात आली.नणंदेकडे पाहुन खोटे खोटे छानसे हसली पण बदल्यात मीनाने रागाने तोंड फिरवले आणि तिच्याशी न बोलताच तिकडुन निघुन गेली.शेवंताच्या डोळ्यात तळं जमा झालं एव्हाना.

सोपानला तिची अवस्था कळत होती.तिची आपल्यामुळे अशी अवस्था होतेय हे माहित असुनही बोलायची हिंम्मत व्हायची नाही त्याची.

आज तर कहरच झाला होता. आपल्या आईला स्वच्छ शब्दात सांगितल,"आईऽऽऽ वहिनीला माझ्या सासरी बारशाला मुळीच घेऊन येऊ नकोस.हे आमंत्रण फक्त तुला अन् दादाला आहे.माझ्या सासुला मुळीच चालणार नाही वांझोटी बाई बारशात आलेली."त्यावर सासुही बरं म्हणाली.

ह्याच कारणास्तव सासुने आज इतके सारे उणेदुणे ऐकवुन शेवंताला घरीच रहायला सांगितले. येताना मीनाच्या नणंदेला बघण्याचाही छूपा डाव रचला होता माय लेकींनी.

इतके दिवस बाहेरच्यांनी केलेला अपमान निमुटपणे गिळला शेवंताने पण आज आपल्याहुन लहान नणंदेनेही तिच्या घरी येवु नको असे स्पष्ट शब्दात सांगितले इतकेच नाही तर परस्पर भावासाठी सोयरीक सुद्धा आणली. ह्या गोष्टीने शेवंता खूप व्यथित झाली. 

आज घरात ती एकटीच होती.देवासमोर मनसोक्त रडून घेतले तिने. काय दोष होता माझा?मी पुर्ण स्त्री असुनही मूल होत नसेल तर ह्याचा सगळा दोष फक्त माझाच कसा?

खरच आपल्या जगण्याला काहीच  अर्थच नाही का? माझे जगणे इतके निरूपयोगी असेल तर मग मी जगतेय तरी का? ? माझ्या मरण्याने जरी ह्यांची वाट मोकळी होत असेल तर मी ते तरी करते. असेही मी असे पर्यंत नवरा दुसरे लग्न करणार नाही त्यापेक्षा मीच त्यांची सुटका करते.जगुन नाहीतर नाही मरून तरी उपयोगी पडते. निदान मी मेल्यावर तरी ह्या सगळ्यांचे दु:ख दूर होईल.तिने डोळे पुसले.मनाशी काहीतरी निर्णय केला.

चौथीपर्यंत शिकलेल्या शेवंताला लिहीता वाचता येत होते.जवळच वाण्याच्या वाणसामान यादीचा कागद पडलेला होता.त्यावर काहीतरी खरडले आणि आपल्या खोलीत गेली.लग्नातला शालू नेसुन नवरीगत छान सजुन तयार झाली. देवघरात आली.मोठा मळवट कपाळावर माळला तसेच भांगात कुंकू भरले.तिची मूद्रा एखाद्या देवीप्रमाणे दिसत होती आता.मगाशी लिहीलेली चिठ्ठी देवघरात ठेवुन देवाला नमस्कार करून ती परसदारी गेली.

इकडे मीनाकडे मुलाच्या बारशाचा कार्यक्रम थाटात पार पडला. बारशाच्या घुगऱ्या खावुन जेवणे उरकुन निरोप घेत सोपान आईसह घरी परतला. दार बडवले पण कोणीच दार उघडेना.त्याने जरा जोरात दारावर थाप मारली तसे दार किलकिले उघडले गेले.हलके आत ढकलताच दार लगेच उघडले गेले तसे दोघेही आत आले.

आत येताच सासुने जोरात आवाज देऊन हाक मारली " ए अवदसे कुठे तडफडलीस? पाणी आण प्यायला." पण स्वैपाकघरातुन एक नाही की दोन नाही. सासू रागातच उठुन स्वैपाकघरात गेली.शेवंता तिथेही नव्हती.आता तिचा पाराच चढला.आपण कोणी घरी नाही पाहुन कुठे तोंड कांळ करत फिरतीय म्हणत तिने अख्ख घर शोधलं.सोपानही आता जरा चिंतीत झाला.शेवंता आजवर अशी घर सोडुन कधीच कुठे गेली नव्हती त्यामुळे तिला घरात न बघुन सोपानही घाबरला. त्याने मागचे आंगण,पुढचे अंगण,शेजार पाजार, गल्ली,पारावरच्या मारोतीच्या मंदिरात सगळीकडे हुडकले पण शेवंता कुठेच सापडली नाही.

आता मात्र त्याला काळजीने घेरले.

आज तिचा जो काही अपमान आपल्या माय बहिणीने केला तो तर त्यालाही सहन झाला नव्हता.आतुन टोचणीही होतीच की तिच्या त्रासाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे परंतु त्याला कधीही आपले कटुसत्य सांगायची हिंम्मत झाली नव्हती.पण भोगावे मात्र शेवंताला लागत होते.आता त्याला पश्चा:त्ताप होत होता की मी वेळीच तोंड उघडलं असतं तर किती बरं झाल असतं.

कुठे गेली असेल शेवंता?

त्याने तिच्या माहेरी पण चौकशी केली पण ती तिकडेही नव्हती.आता काळजीचे रूपांतर भीतित होऊ लागले.

त्याने देवघरात जाऊन देवापुढे हात जोडले.डोळे उघडताच त्याची नजर देवघरात ठेवलेल्या कागदावर पडली.त्याने थरथरत्या हातानेच ती चिठ्ठी उचलली.मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेल्या सोपानने डबडबल्या डोळ्यांनीच चिठ्ठी वाचली. 

इकडे सासुचा अजुनही अखंड पट्टा चाललेलाच होता.होते नव्हते तेवढे सर्व शिव्या शाप देऊनही तिचे मन शांत होत नव्हते. सोपान धावतच मागल्या परसात गेला.तिथले दृष्य बघुन त्याच्या हातापायतल त्राणच गेलं.

सोपानने मोठ्ठी किंकाळी फो़डली. आऽऽऽऽईऽऽ….!

आई धावत परसात आली.आडात डोकावुन पाहताच समोरचे दृश्य बघुन तीही सुन्न झाली.

परसातल्या आडात शेवंताचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता.

सोपान स्वत:वरच प्रचंड संतापला होता.एका निरापराध व्यक्तीने त्याच्या करणीची सजा भोगली होती. समाजातल्या टाकाऊ फालतु रूढी परंपरांच्या चक्कीत पिसुन एका निष्पाप जीवाने आपल्या प्राणांची आहूती दिली होती.

काय होते ते भयानक सत्य..?काय होते चिठ्ठीत?

सोपानने आधी सगळ्यांना गोळा केले.

मग आपल्या बहिणीला आणि आईला शेवंताच्या प्रेतासमोर बसवुन शेवंताची चिठ्ठी वाचुन दाखवली.


प्रिय धनी,,

 शेवंताचा सादर प्रणाम।

मी पापी आहे असे सासुबाई,नणंदबाई सगळ्यांना वाटते.मी नकोशी झालेय सर्वानाच. तुमच्या घराण्याला वारस देऊ शकत नाही म्हणुन सगळे हिणवतात मला. आजवर फक्त बाहेरचे ऐकवत होते पण आज घरातल्यांनीही यायला बंदी केली मग मी जगुन तरी काय करू? 

मीनाताईंनी तुमच्याकरता पोरगी पाहिलीय हे कळलेय मला. मी जीवंत असे पर्यंत तुम्ही लग्नाला तयार होणार नाहीत हे ही माहितीय मला कारण तुमचा खूप जीव आहे माझ्यावर.म्हणुनच तुमची वाट मोकळी करायचा निर्णय मी घेत आहे.

माझ्या मृत्युला कोणालाही जवाबदार धरू नये.मी हे मरण माझ्या इच्छेने स्वीकारलेय.मी गेल्यावर तुम्ही नव्याने संसार थाटा आणि सगळ्यांना आनंदी करा.

जाता जाता एक प्रश्न मनात येतोय.

मूल होत नसेल तर दोष कुणाचा? फक्त स्त्रीचा की पुरूषाचाही??

काही चुकल्यास माफ करा.

ह्या जन्मात सुख न देऊ शकलेली 

तुमचीच,

निपुत्रिक शेवंता….।


पत्र ऐकुन सगळेच स्तब्ध झाले.सोपान मात्र संतापाने पेटला होता.बहिणीला उद्देशुन तो म्हणाला," पाहिलेस…,काय लिहीलेय माझ्या शेवंतीने? तुम्ही दोघी माझ्या निष्पाप शेवंताला वांझोटी वांझ म्हणुन हिणवत होत्या नाऽऽऽ पण वांझोटी ती नव्हती.वांझोटा हाऽऽऽ..हाऽ तुझा भाऊ होता....

आईऽऽऽ हे वांझोटेपण मी का पत्करले ऐकायचेय तुला.?? ? तर कान उघडे ठेवुन दोघीही ऐका."

हीऽऽऽ…,ही माझी बहिण मीना.लग्ना नंतर पहिल्या राखीला आली तेव्हा माझ्याजवळ पाच पैसे नव्हते ओवाळणीत घालायला.कोणीच पैसे उसने द्यायला तयार नव्हते.निराश होऊन पारावर बसलो तर एक जाहिरात वाचली.नसबंदी करून घेतली तर सरकार पैसे देणार कळले.त्यात मी लग्न न झालेला तरीही नसबंदी करून घेतो म्हणल्यावर त्यांनी मला अजुन जास्त पैसे देवु केले.हे घे.वाच हे पुराव्याचे पेपर्स. त्याच पैशात तुझी राखी साजरी झाली.

नंतर लग्नाआधी मुलीशी बोलु द्या हे कितीवेळा सांगितले पण कोणी ऐकले नाही. लग्नानंतर तिला तुम्ही इतके छळताल असे कुठे वाटले मला. तुम्ही छळुन छळुन जीव घेतलात माझ्या निष्पाप शेवंताचा. बघ मीनेऽऽ तिने तुझ्या पायात आपला जीव गमावला.

आज तिचा जीव जायलाही तुच जवाबदार आणि तेव्हा मी हे ऑपरेशन करायलाही तुच जवाबदार आहेस.

तिने विचारलेय ना दोष कुणाचा??

तर दोष ह्या कीड लागलेल्या समाजाचा आहे.तुमच्या सारख्या कुजक्या विचारसरणीचा आहे. वेळोवेळी तिचा अपमान ऐकुनही सत्य सांगु शकलो नाही म्हणुन दोष कुणाचा असेल तर तो फक्त माझ्या सारख्या भ्याड नामर्दाचा आहे.

माझ्या बहिणीच्या मायेपोटी मी एका मातृत्वाला वांझ केले.जर दोष कुणाचा असेल तर तो माझा आहे..दोष फक्त माझा आहे.

बोलता बोलताच सोपानही शेवंताच्या बाजुलाच घेरी येवुन पडला ते कधी न उठण्यासाठीच.

सोपान-शेवंता एका नविन प्रवासाला अनंतात निघुन गेले एक प्रश्न तसाच सोडून…..

दोष कुणाचा..???

© राधिका कुलकर्णी

सदर कथा लेखिका राधिका कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल साभार

 


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने