लग्नकल्लोळ

© नेहा बोरकर देशपांडे



अभिनंदन, अगदी अभिनंदन हं.... आता सुटली गं बाई तू... आता फक्त आराम कर हं....  काल पासून हेच  ऐकतेय मी, कारण कळलेच असेल

अहो, लग्न ठरलं आहे लेकाचे..... महत्तप्रयासाने हे ही कळलेच असेल... शेवटी काय उसका टाईम आगया !! 

आतापर्यंत इतक्या ज्या काही कल्पना, वल्गना करत होते त्या सत्यात यायची वेळ आली हो.... गेली पाच वर्षे 'सुस्वरूप' विवाह संस्थेत भरलेल्या फिने आखिर अच्छे दिन दाखवलेच ....

बैठक ठरली ती पण मुलाने नव्यानेच मेंम्बरशिप घेतलेल्या क्लबहाऊसवर ,म्हणाला 'कोणालाच काम नको' बरं झालं बाई... 

नाहीतर आता पर्यंत मीच आमच्या घरी चहापाणी करत होते, अहो का काय? मुलाचं घर बघायला म्हणून मुलीकडचे आमच्याच घरी येत होते ना!! माझ्या लग्नाच्या वेळी पण इतके चहापोहे केले नव्हते...

मुलाने सांगितले आई, ती टिपीकल साडी नको हं,क्लबहाऊस आहे ते, छान पेस्टल शेडचा पंजाबी ड्रेस घाल..... मग काय त्याची खरेदी पहिली केली. 

तशी मी ड्रेस घालते हो पण मॉर्निंग वॉक आणि मैत्रीणींकडच्या भिशीला... तेव्हा पेस्टल का फेस्टल बघत नाही ना... 

नव-याला मुलानेच जीन्सवर घालायला ब्रँडेड टि-शर्ट आणून दिला. 

सगळा जामानिमा करून तिथे पोहोचलो.  नशीब मुलीकडचे आधीच पोहोचले होते. 

नवी सुनबाई क्रॉपटॉप आणि जीन्स मध्ये तर विहीणबाई पलाझो घालून होत्या. (पलाझो हे ड्रेसच नाव आहे हे मुलाने घरी आल्यावर सांगितले.) असो..

तर मी काय सांगत होते... बैठक आणि पुढची सगळी ठरवाठरवी.... तशा पत्रिकावगैरे आधीच बघितल्या होत्या म्हणा... 

पण ते शरद उपाध्ये नाही का राशीचक्रमध्ये वृषभ राशीचे सांगतात... कि मुलगी दुध आणायला गेली तरी लग्नाला गेल्यासारखी जाते.... म्हणजे खूपच हौशी हो...

तर माझा मुलगा पण तेवढाच हौशी आणि ती पण तशीच भेटली त्यामुळे ही एक वेगळीच रास जुळली ,' होऊ दे खर्चाची'.... दोघेही आयटी कंपनीत नोकरी, एककुलते एक , सेव्हिंग भरपूर, इतरांच्यापेक्षा हटके का काय ते व्हायला पाहिजे ना!! मग काय होऊ दे खर्च.. लग्न आहे घरचं.....

आम्ही आईवडील आपले मम म्हणत होतो...  लेक आणि नव्या सुनबाई सोबत गुगलराव... त्यांना सुचेल त्याचे पत्ता, फोननंबर , लोकेशन ,सगळं "हुकूम मेरे आका ", म्हणत पुरवत होते. 

सगळी जण डेस्टिनशन वेडिंग करतात  तर आपण डेस्टिनशन ऐन्गेजमेंट करायची म्हणे....

अशीही माणसं कमी असणार साखरपुड्याला तर.... शहराच्या जवळ पण आणि लांब पण  'सोपे वाडा' इथे....

सगळी ट्रेडिशनल थीम.... येणा-या पाहूण्यांनी म्हणजे बायका सगळ्या पोचमपल्ली साडी आणि पुरूष पांढरा लखनवी कुडता....

काय गं बाई.... अशाने माणसं पोचणार का साखरपुड्याला? 

अहो काहीतरी बोलतील म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर ते आणि होणारे व्याही सध्याचे राजकारण या विषयात गहन चर्चा करण्यात मग्न होते.... 

विहीणबाई त्यांच्या लेकीकडे कौतुकाने बघत माझ्याकडे कानाडोळा करत होत्या....

एवढ्या वेळात ठरवाठरवीची गाडी जेवणाचा बेत फायनल करून पेशवाई विडे  ठेऊया नंतर म्हणजे कसं ऑथेन्टिक वाटेल इथं पर्यंत येऊन थांबली. 

तर असं सगळं मुलांच्यामार्फत ठरत साखरपुडा ठरून पार देखील पडला. 

सगळं ठरल्याप्रमाणे होत होत पण मलाच मी तिथे असूनही नसल्यासारखी वाटत होते...

साखरपुडा आणि लग्न यामध्ये अजिबात जास्त वेळ ठरवला नव्हता... त्यामुळे लगेच लग्नाची गडबड सुरू झाली. 

सुनेसाठी लक्ष्मीपुजनाची साडी घ्यायला बोलावलं तर म्हणे कि लक्ष्मी रोडवर टिप्पीकल साड्या असतात... आम्ही एका 'साडी स्टुडिओत' अपॉंटमेन्ट घेऊन  जाणार आहोत  तर तूम्ही पण तिथेच या ... म्हणजे जरा 'वेगळं' कलेक्शन होईल.... 

अरे देवा, सात रंगात पाणी कमी जास्त करूनच रंग तयार करणार ना.... अजून कुठले रंग असणार?...

आणि फोटो स्टुडिओ ऐकला होता.... साड्या कधीपासून तिथे मिळायला लागल्या? घाबरू नका हे सगळं मी मनात म्हटलं.... आणि गेले बापडी तिथे.... 

मग होती दागिने खरेदी.... मंगळसुत्र जरा ब-यापैकी बघितलं आणि नंतर  तीने एक दोनच काळेमणी असलेले ब्रेसलेट घेतलं... 

मी काही म्हणायच्या आतच ती म्हणाली, हे पण मंगळसुत्रच आहे, हातात घालतात....

अगं आपण  लग्नानंतरच्या दसरा दिवाळीला केलं असतं कि छोटं मंगळसुत्र....मी म्हटलं...

तर म्हणे मला गळ्यात फार वेळ ना काही आवडत नाही..... मनातल्या मनात मी डोक्यावर हात मारला.....
 
लग्नाच्या पंधरा दिवस आधी मुलगा म्हणे आई आज मी ऑफिसमधून लवकरच येणार आहे...

म्हटलं अरे वा...  जरा आपली काम आहेत ती करून घेऊ.... 

अगं मला परत बाहेर जायचं आहे.. आमचं प्री-वेडिंग शुट आहे.... 

काय आहे? 

मी आल्यावर सांगतो गं...  नाहीतर... तुला इन्टावर टॅग करतो...  असं म्हणून तो गेला.... आता हा मला कुठे टांगतोय?

म्हणता म्हणता आठवड्यावर लग्न येऊन ठेपले....

ग्रहमक,केळवण, सीमांतपुजन हे सगळं होतचं पण... नव्याने संगीत आणि मेहंदीचे सोहळे आयोजित झाले.... 

मला सरप्राईज द्यायला आमच्या घरातल्या माझ्या बहिणी,भाच्या, भाचे,जाऊबाई यांनी सगळ्यामिळुन एक छान कार्यक्रम केला.... 

माझ्याबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलल्या... खरंच डोळे पाणावले... इतक्या वर्षांचे संचित कामी आले हो....  

नव्याने सगळ्यांची मेहंदीबरोबर मन ही रंगली....  

घरचं ग्रहमक केळवण पार पडले.... 

किती वर्षानी मी परत नऊवारी साडी नेसले, नथ ,वाकी, तन्मणी, पिचोड्या,पाटल्या ,बांगड्या  सगळे प्रकार घातले ग्रहमकाला..... वरमाय आहे ना.... मग....  मिरवून घेतले.... 

दुस-या दिवशी सीमांतपुजेला कार्यालयात गेलो... त्या दिवशीची पण थीम होतीच...सुटसुटीत पण छान असे ड्रेस... मला विहीणबाईंनी  याच कार्यक्रमासाठी घेतलेला ड्रेस मी घातला.....

नव्या सुनबाई फॅन्सी घागरा घालून होत्या... आणि पुरूषमंडळी इन्डोवेस्टन कपड्यात मिरवत होते... 

वैदिक पध्दतीने लग्न असल्याने  सकाळी लवकर घाणा, त्याला अनुसरून पुढील विधी सुरू झाले....  

आजची थीम पैठणी होती.... हिरवाकंच रंग आणि त्याला शोभतील असे लालचुटूक काठ, पदरावर दिमाखात रुळलेले दोन मोर, अंगभर टप्पोरा सोनेरी बुट्टा अशी देखणी पैठणी सुनेची.... 

तर मोतिया रंगाची, अंगभर बुट्टा , पदरावर मीनावर्क असलेली... गुलबक्षी मोठ्या काठापदराची पैठणी माझी अशा दोघीजणी आम्ही  लेऊन होतो.....  

माझा लेकही निळ्या रंगाच्या शेरवानीत दृष्ट लागावी असा दिसत होता....  

विवाह वेदीवर मुलीच्या मामाचा पुकारा झाला..... मुलीला घेऊन या.... तेव्हा एका पालखीचे आगमन होऊन त्यातून नवरी मुलगी आली.... 

मागे गाणं वाजत होते... 'नवराई माझी लाडाची लाडाची गं'....

आतंरपाट देखील पूर्णपणे भरतकाम केलेला.... 

एका बाजूला घोड्यावर विराजमान झालेला नवरदेव आणि दुस-या बाजूला डोलीत बसलेली वधू.... असा देखणा ,अनोखा आतंरपाट.... जरा "हटके" ते काय पदोपदी चालू होते..... 

आहो नवरानवरीच्या डोक्यावर अक्षता त्यांच्या आईवडीलांना म्हणजे आम्हांला 'मोत्याच्या' होत्या... 

आता बोला.... हौसेला मोल नाही म्हणतात ते खरेच..... 

सुरेल आवाजात मंगलाष्टके झाली.... आणि लग्न लागले.

जेवणासाठी मात्र आम्ही निक्षून पंगतच सांगितली होती... 

इतका सगळा थाटमाट असल्यावर जेवणाचा बेत पण खासच हो. ... 

सगळे पदार्थ सांगत बसले तर जागा पुरणार नाही.... 

वेलकम ड्रिंक म्हणून केशरसरबत होते इतकेच सांगते.... सुज्ञांस अधिक सांगणे न लगे....

इतक्या दिवस  ज्या दिवसाची मी वाट पाहिली तो दिवस आलाच शेवटी.... 

पाठवणी झाली... आम्ही नवीन सुनबाईंना घेऊन आमच्या घरी आलो....

कितीही नाही म्हटलं तरी मनात एक प्रकारची भिती वाटतेच ना.... 

दुस-याची लेक आपल्या घरात येणार.... 

जसं मुलीच्या आईवडीलांना मुलीच्या लग्नानंतर मुलगी स्वतः ची रहात नाही तसेच मुलाचे लग्न झाले कि सुध्दा मुलगा आपला रहात नाही... 

आणि तसं होणं हे जरूरीचे असते त्यामुळेच त्या मुलीलादेखील नवीन घर आपले वाटायला लागतं आणि ती छान रूळायला लागते.... 

मी सुद्धा  पहिल्यांदाच सासू  होतेय ना.... 

परत एकदा नव्या भूमिकेत.... 

तिला जशी नवीन घरात थोडी भिती तशीच मलाही .... 

इतकी वर्षे आम्ही तिघेच घरात होतो... आता तिही रहाणार.... कौतुक आहेच पण थोडी धाकधूकही  आहे.....

तिला इथलं सगळं आपलंस करायला वेळ लागणार तसाच मलाही वेळ लागणारच ना..... 

सासू आणि सून ह्यांचे एकमत होत नाही म्हणतात..... 

पण मला काय वाटतं.... हे नातं कैरीच्या गोडं लोणच्यासारखं आहे..... 

आंबट कैरी, गुळ, थोडे मेथीचे दाणे, लाल तिखट, मीठ... अशा सगळ्या चवी त्यात असतात... आणि या सगळ्यामुळेच त्या गोडं लोणच्याची चव न्यारी असते.... 

तसेच सासू सून सुध्दा सुरवातीची काही वर्ष अशा गोड,आंबट, कडसर, तिखट,खारट या सगळ्या चवींचा सामना एकमेकांबरोबर करतात.... 

आणि मग दोघीजणी सगळ्यांना हव्याहव्याशा होतात..... 

तर अशी ही आगळीवेगळी, सुरम्य,  अशी लग्नकहाणी साठा उत्तराची पाचा ऊत्तरी   सुफळ संपुर्ण....   

©® नेहा बोरकर देशपांडे. 

सदर कथा लेखिका नेहा बोरकर देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने