भूमिका

 © धनश्री दाबके


आज देशमुखांच्या 'श्री' बंगल्यात अगदी उत्साहाचे वातावरण होते. 

त्याला कारणही तसेच खास होते. ज्याच्यावरुन बंगल्याला  'श्री' नाव दिले होते त्या देशमुखांच्या श्रीकांतची आज एकसष्टी होती. 

श्रीकांत अविवाहित होता आणि आता आई वडील दोघेही राहिले नव्हते. 

'हम दो हमारे दो'  च्या बऱ्याच आधीच्या काळातला जन्म  असल्याने,  श्रीकांतला तीन मोठ्या बहिणी व दोन लहान भाऊ होते. 

वडील एकटे कमावणारे आणि घरात इतकी माणसं. 

त्यात सगळी भावंड अभ्यासात आणि रुपानेही जेमतेम. 

त्यामुळे मुलींची लग्न जमवता जमवताच आईवडीलांच्या नाकी नऊ आलेले. अशात श्रीकांतचे लग्नाचे वय निघून गेलं. 

आधी बहीणींचे लग्न जमेना म्हणून उशीर झाला आणि मग इतकी वर्ष लग्न का नाही जमलं म्हणून त्याला लोकांनी नाकारलं. 

त्यानेही मग कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेत पाठच्या दोन भावांचा मार्ग मोकळा करुन टाकला. 

कालांतराने सगळे मार्गाला लागले. 

सुबत्ता आली आणि हा बंगलाही झाला. आईवडीलांचे शेवटचे दिवस सुखात गेले. 

तिघी बहिणी आपापल्या घरी सुखात होत्या आणि मधला भाऊ नोकरीमुळे दुसऱ्या शहरात सेटल्ड  होता.

 इथे ह्या श्री बंगल्यात श्रीकांत, त्याचा धाकटा भाऊ अनंत, अनंतची पत्नी सुनिता व लेक गौरी असे चौघं राहात होते. 

श्रीकांतचा स्वभाव खुप साधा व सरळ होता. कुठलाही मोठेपणा  न  घेता तो तत्परतेने सगळ्यांना मदत करायला पुढे यायचा.   

श्रीकांत पुढच्या पीढीचा म्हणजे त्याच्या भाचे/ पुतणे मंडळींचाही खूप लाडका होता. 

गौरीला तर तिचा श्रीकांत काका खूपच प्रिय होता. 

तिनेच पुढाकार घेत तिचे आईवडील व सगळ्या भावंडाना बरोबर घेऊन आजचा हा एकसष्टीचा घाट घातला होता. 

अनंत आणि सुनितानेही जबाबदारी स्विकारली होती. 

सुनिताला सुरवातीपासून प्रत्येक बाबतीत श्रीकांतला हाताशी धरायची सवय झाली होती. 

घरात कुठलाही  सणवार, कार्यक्रम किंवा अगदी साधं हळदीकुंकू जरी असलं तरी भाजीपाला व इतर सामान आणायची, घरातली आवराआवर करण्याची सगळी जबाबदारी श्रीकांत पार पाडायचा. 

सुनिताने काही म्हणावं आणि श्रीकांतने लगेच ते झेलावं असा अलिखित नियमच झाला होता जणू. 

आधी आई श्रीकांतला कामं सांगायची आणि तो काहीही न बोलता मुकाट्याने ती करायचा. 

सासूबाईंचा प्रत्येक शब्द आपला हा दीर पाळतो. तेही अगदी कसलीही तक्रार न करता हे सुनिताने हेरले होते व त्याच्या ह्याच स्वभावाचा ती पुरेपूर फायदा उचलत होती. 

भावोजी हे आणाल का किंवा ते कराल का असं सुनिताने विचारल्यावर श्रीकांत लगेच 'हो करेन की. त्यात काय एवढं? असतो मला वेळ आणि चालतं मला सगळं' अशी भूमिका घ्यायचा.

 कामांचा व पैशांचाही बराचसा भार श्रीकांत उचलायचा. अगदी सहजपणे. काहीही न बोलता किंवा जाणवूही  न देता. 

सुनिताला त्याची इतकी सवय झाली होती की तिने आजच्या एकसष्टीच्या कार्याची गुरुजींनी दिलेली यादीही दोन दिवस आधी श्रीकांतकडेच दिली होती. 

पूजेचे सामान आणण्यासाठी आणि श्रीकांतलाही त्यात काही वावगं वाटलं नव्हतं. 

आज एकसष्टीसाठी सगळे नातेवाईक जमले. 

ठरलेल्या वेळेवर गुरुजीही आले व त्यांनी पूजेची मांडामांड करायला सुरुवात केली आणि गुरुजींच्या लक्षात आले की विड्याची पानं दिसत नाहीयेत. 

म्हणून त्यांनी सुनिताला विचारले तर ती आणलेल्या सामानाची शोधाशोध करत म्हणाली " अहो भावोजी तुम्हाला यादी दिली होती ना सामानाची? त्यातली विड्याची पानं विसरलात वाटतं तुम्ही."

ते ऐकून जमलेल्या नातेवाईकांत हे तर होणारच होतं ह्या अर्थाने  कुजबुज सुरु झाली आणि गौरी खूप वैतागली 

" काय ग आई? आज काका उत्सव मुर्ती आहे आणि तू आजचही सामान त्यालाच आणायला सांगितलस? मला म्हणालीस मी सामानाचे बघते आणि ती यादी काकाला दिलीस?" 

"अग भावोजीच म्हणाले होते की आहे वेळ तर मी आणतो सामान. म्हणून दिली मी यादी त्यांना."  सुनिताने सवयीने सहजपणे श्रीकांतला जबाबदार ठरवले. 

मग अनंतने मधे पडत "ठीक आहे गडबडीत राहिली असतील विडयाची पानं. मी पटकन जाऊन आणतो"  असे म्हणून वेळ सावरली.

मग एकसष्टीची पूजा यथासांग पार पडली. 

सगळ्यांनी मिळून ६१ दिव्यांनी श्रीकांतला ओवाळले आणि तीघी बहिणींनी मिळून खास तयार करुन घेतलेला नोटांचा हार घातला. 

पंचपक्वान्नांचे जेवण झाले. 

सगळ्यांबरोबर श्रीकांतचे फोटोसेशन झाले. 

गौरीने तिच्या लाडक्या काकासाठी केलेली कविता वाचून दाखवली.  

श्रीकांतचे लहानपणीचे किस्से आणि आईवडिलांच्या आठवणी निघाल्या. भरपूर गप्पागोष्टी झाल्या आणि संध्याकाळी सगळ्या जमलेल्या पाहुण्यांची पांगापांग झाली. 

कार्यक्रम अगदी छान पार पडला. 

रात्री झोपायच्या आधी श्रीकांतने गौरीचे खूप भरभरून कौतुक केले. 

तिने आजच्या फंक्शनसाठी घेतलेल्या मेहनतीसाठी आणि खास करुन तिने केलेल्या कवितेसाठी. 

तसेच सुनिता आणि अनंतचेही श्रीकांतने मनापासून कौतुक केलं.

"भावोजी अहो तुम्ही खुश आहात ना? मग अजून आम्हाला काय पाहिजे? " असं म्हणून केलेल्या कौतुकाचे क्रेडिट हक्काने घेत सुनिता झोपायला गेली. 

मग गौरी म्हणाली " काका कदाचित तुला आवडणार नाही पण आज मी लहान तोंडी मोठा घास घेणार आहे.

तो विड्याच्या पानांचा एपिसोड वगळता आजचा कार्यक्रम छानच झाला.  

खरंतर आईला काही न बोलता तेही सांभाळून घेता आलं असतं. पण तिने किती सवयीने आणि सहजपणे तुला त्यासाठी जबाबदार ठरवले? "

" अग असं छोटमोठं काहीतरी व्हायचच की एवढ्या तयारीत." 

" काका हेच तर ना? तुला सगळं चालतं म्हंटल्यावर आई खरोखरीच सगळं चालवते रे. 

कारण तू इतकं काम करुनही त्या कामाचा तुला होणारा त्रास किंवा कष्ट कधीच बोलून दाखवत नाहीस ना. 

अरे आपल्या एका बोटाला जर जखम झाली तर त्याचे दु:ख त्याच हाताच्या दुसऱ्या बोटालाही जणवत नाही. मग इथे तर आपण दोन वेगळे जीव आहोत. 

मला वेळ असतो आणि मला चालतं असं म्हणून तू तुला शक्य आहे ते सगळं करतोस. 

पण त्यामुळे तुला त्याचा काही त्रासच होत नाही असं नाही ना? 

मी असं म्हणत नाही की आपण केलेल्या प्रत्येक कामाचा , मदतीचा डंका पिटावा पण समोरच्याला जर त्याची काही जाणीवच नसेल तर ती मात्र जरूर करुन द्यावी. 

कारण आपली स्वतः बद्दलची भूमिकाच इतरांची आपल्याबद्दलची भूमिका ठरवत असते. आणि म्हणूनच आपण ती भूमिका काळजीपूर्वक घेणे फार जरुरीचे असते."

गौरीचे बोलणे श्रीकांतला मनापासून पटले व तो म्हणाला " खरय तुझं गौरी. 

आपली स्वतःबद्दलची भूमिकाच आपल्याला इतरांकडून मिळणारी वागणूक ठरवत असते. 

मी नक्की प्रयत्न करेन हे लक्षात ठेवून वागायचा. बघू किती जमेल ते."

"काका आज मी आईच्या वागण्याचा विचार केला आणि ठरवलं की आजच तुझ्याशी बोलायचं. 

आता लगेच काही चमत्कार नाही होणार पण तुला हे माझे म्हणणे पटले हे ही नसे थोडके. 

आता झोपते मीही शांत" असे म्हणून गौरी झोपायला गेली आणि तिच्या बोलण्याचा विचार करत श्रीकांतही.

******

बऱ्याच ठिकाणी आपल्या बाबतीतही असचं काहीसं घडतं. घरात , नातेवाईकांत आणि ऑफिसमध्येही. चालतो  तिथेच  सगळे आपला हेका  चालवतात आणि मग आपल्याला हे माझ्याच बाबतीत का असा प्रश्न पडतो. पण कदाचित त्या 'का' चे उत्तर बऱ्याचदा आपल्याच भूमिकेत असतं. 

नाही का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा


©® धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने