वंशाचा दिवा की पणती

© सौ. प्राजक्ता पाटील




निशा आणि निकिता या दोन मुलींनंतर चांगदेव रावांना मुलगा झाला. म्हणून ते खूप खुश होते. अगदी मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असे समजणारे चांगदेवराव दोन्ही घरी प्रकाश देणाऱ्या पणत्यांना मात्र आपुलकीचे दोन शब्दही बोलू शकत नव्हते. 

आपला मुलगा निशिकांतच्या गुणगौरवाने चांगदेव रावांचा दिवस उगवायचा तसाच मावळायचा.

आईच्या मनात मात्र खंत असायची निशा आणि निकिताचं कौतुक बापाच्या तोंडून कधी ऐकायला मिळत नव्हतं म्हणून. पण बोलायचं कुणाला ??आपलेच दात नि आपलेच ओठ.

निशिकांत आता मोठा होत होता. प्रत्येक गोष्ट निशिकांतच्या मनावरच ठरलेली असायची. निशिकांतनी आधी घ्यायची आणि नंतर दोन्ही बहिणींनी घेतली काय किंवा नाही घेतली काय काहीच फरक पडत नव्हता. 

पण निशिकांतला कोणत्याही गोष्टीत जरा कमी जास्त झालं तर मात्र चांगदेवरावांचा पारा चांगलाच चढायचा आणि आता हे मुलींच्याही अंगवळणी पडलं होतं. 

मुली तशा गुणी होत्या. त्यांना कळायला लागल्यापासून त्या आईची समजूत काढायच्या. अगं आई, तू बाबांच्या वागण्याचं वाईट नको वाटून घेत जाऊस. आम्हालाही निशिकांत च्या येण्याने भाऊ मिळाला म्हणून आनंद वाटतोच. आम्हालाही निशिकांत खुप आवडतोच.आम्हाला बाबांच वाईट नाही वाटत. असू दे.. तू करतेस ना आमची माया झालं तर मग...!

आईचं काळीज मुलींच्या बाबतीत केलेल्या दुजा भावामुळे तुटत होतं. पोरी अभ्यासात खूप हुशार होत्या. अगदी मन लावून अभ्यास करायच्या.गावात दहावीपर्यंत शाळा होती. वडिलांना मात्र मुलींच्या शिक्षणाची ही विशेष रुची नव्हती. 

पण निशिकांत मात्र शहरातल्या शाळेत जावा खूप शिकून मोठा व्हावा असं त्यांना वाटायचं . आणि त्याबाबतचं स्पष्टीकरणही त्यांच्याकडे तयार असायचं. कारण निशिकांत शिकला तर फायदा आपल्याला होईल. पण मुलींना शिकवलं तर काय ? मुली लग्न करून घरी त्यांच्या सासरी जातील आणि त्या थोडेच त्यांचे पैसे आपल्याला देणार! आणि असं पाहुण्याचे धन घेऊन काय पुरणार होय आपल्याला ?

निशा दहावीत होती तर निकिता आठवीत होती. आता निशिकांतही पाचवी इयत्तेत शहरातल्या शाळेत शिकत होता. परिस्थिती जेमतेम असूनही सर्व काही पणाला लावून चांगदेवराव निशिकांतच शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडत होते.

 जिद्द चांगली होती पण त्यात मुलींचा किती बळी जातोय हे मात्र त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. निशिकांतची द्वितीय सत्रातील फी दोन-तीन दिवसात भरा असा शाळेतून निरोप आला. 

कोणताही मागचा पुढचा विचार न करता आजच तुरी घरच्या घरी भरडायच्या आणि तुरीचं खळं करायचं हा निर्णय चांगदेवरावांनी घेतला. 

त्यादिवशी निकिताची शाळेत टेस्ट होती म्हणून आई म्हणाली, "मी आणि निशा करू तुम्हाला मदत. पण ऐकतील ते चांगदेवराव कसले ?"

नाही, काही गरज नाही, टेस्टला जायची. सगळ्यांनी मिळून आज खळं करायचंय. घरच्या घरी खळं करून चांगदेवरावानी तुरी बाजारात नेऊन विकल्या. 

पैसे घेऊन ते निशिकांतच्या शाळेची फी भरूनही आले. 

दहावी झालेल्या निशाच लग्न करण्याचा निर्णय चांगदेवरावांनी घेतला. आणि गावाच्या जवळच असलेल्या सुशिक्षित घरात निशा सून म्हणून गेली.

 माहेरच्या अंगणात जरी वंशाला दिवा मिळाला; म्हणून पणती कडे दुर्लक्ष झालं असलं तरी, सासरच्या उंबरठ्यावर लक्ष्मी म्हणून निशाला स्वीकारलं गेलं. 

तिच्या मतांचा वेळोवेळी आदर केला गेला. त्यामुळे पोलीस असलेल्या तिच्या नवऱ्याने तिला पुढील शिक्षण घेण्यासही परवानगी दिली.

निशा आज कितीतरी खुश होती. जेव्हा ती कॉलेजमध्ये प्रवेश करत होती.घरच्या सगळ्यांचे प्रेम, विश्वास या जोरावर तिला जीवनात यशस्वी व्हायचं हे निशाने ठरवलं होतं. आणि तिने ते सिद्धही करून दाखवलं. 

निशा डी. एड करून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. आणि तिने आकाशाला गवसणी घातली. 

आता तिला निकिताची काळजी वाटू लागली. कारण तिच्या लग्नासाठी स्थळं पहायला सुरुवात झाली होती. आपल्याला मिळालेली माणसं खूप अनमोल आहेत पण तशी निकीताला भेटतील का ?? या विचाराने निशाला अस्वस्थ केलं होतं आणि हे निशाचा पती दिपक च्या लक्षात आलं.

निशाला विचारल्यावर तिने निकिताबद्दल सांगितलं. तू तुझ्या पैशांनी तुझ्या बहिणीचं शिक्षण करू शकतेस असं घरच्या सगळ्यांनी निशाला सांगितलं. 

बाबांचा ही भार हलका करत निशाने निकिताला शहरातल्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले. चांगदेव रावांना मात्र हे बिलकुल आवडलं नव्हतं पण जावयापुढे बोलणार कसे ? म्हणून ते गप्प होते. 

निकिताही बहिणीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडत होती. अभ्यासावर लक्ष केंद्रित करून ध्येय गाठण्यासाठी तयार होती. निशिकांतही शिक्षण घेत होता. बाबा मात्र निशिकांतला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू देत नव्हते. 

निकिताचं शिक्षण पूर्ण झालं. तीही एका कॉलेजवर प्राध्यापिका म्हणून जॉईन झाली. आणि त्याच कॉलेज वरील देगावकर सरांनी आपली सून म्हणून निकिताला मागणी घातली. 

हुंड्याची अपेक्षा न करता सरांनी निकिताला सून म्हणून स्वीकारलं. अशा प्रकारे आपल्या मुली भाग्यवान आहेत हे मात्र पुत्रप्रेमी चांगदेवरावांना अजूनही कळलं नव्हतच.

आता मात्र चांगदेव रावांना धक्काच बसला. पाहतात तर काय ?? राजकुमारा सारखा जपलेला निशिकांत आज परस्पर लग्न करून सून घेऊन दारात उभा होता. 

क्षणभर गोंधळलेले, मनातून दुःखी झालेले चांगदेवराव आंधळ्या प्रेमामुळे पत्नीलाच सुनेच्या औक्षणाची तयारी कर म्हणून सांगू लागले. पहिल्यापासून चांगदेव रावांच्या कोणत्याच गोष्टीला नकार न देऊ शकलेल्या शांताबाई औक्षणाचे ताट घेऊन सुनेच्या गृहप्रवेशाची तयारी करू लागल्या. 

सुनबाई घरात आल्या त्या रूम मध्ये जाऊन आराम करू लागल्या.

शांताबाईनी स्वयंपाक केला. नवीन आलेल्या सुनेला जेवायला बोलवलं. सून कुठली ?काय ? या प्रश्नावर "आम्ही खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेम करतो हे महत्वाच आहे." या वाक्याने सुरुवात करून मग सून कुठली काय हे आई-वडिलांना निशिकांतने सांगितलं.

आणि अजून एक सांगायचं होतं बाबा तुम्हाला म्हणून जेवता- जेवता निशिकांत ने वडिलांना सांगितलं, "बाबा ,मी शहरांमध्ये फ्लॅट बुक केला आहे. त्यासाठी तुमच्याकडे तर पैसे नसतीलच; तर मग मी असा विचार करतोय आपण गावाकडची जमीन विकली तर माझी शहरात राहण्याची सोय उत्तम होऊ शकेल." आणि हा निर्णय उद्याच घ्यायचा आहे. 

परवा मी आणि माझी पत्नी शहरात जायला निघणार आहोत तस मी तिला वचन दिल आहे. काय ते लवकर सांगा. 

ज्या काळ्या आईचे उपकार म्हणून याला शहरातल्या शाळेत शिक्षण घ्यायला मदत झाली. तिलाच विकूया किती सहजपणे बोलून गेला निशिकांत. पण आई बाबांची रात्र मात्र डोळ्यातील आसवे पुसण्यात आणि कुस बदलण्यात गेली.

निशिकांत वडिलांना विचारायला नाही तर सांगायला आला होता याची थोडीशी जाणीव आता वडिलांना झाली होती. सकाळ होताच निशिकांतने शेताचे कागद वडिलांकडे मागितले. 

निशिकांतला नाही म्हणणे वडिलांना अवघड जात होते काळजावर दगड ठेवून त्यांनी निशिकांतच्या हातात जमिनीचे पेपर दिले. 

निशिकांतने आधीच ठरवून ठेवलेल्या गावातील एका इसमाला आपली जमीन विकली. पैसे घेऊन निशिकांत शहरात बायकोसह राहायला गेला .

दुसऱ्या वेळीही निशिकांत परत आला, तो इथले घर विकून शहरात राहायला जाऊ असा वडिलांना हट्ट करू लागला. आई वडील पुन्हा मूग गिळून गप्प बसले. आहेच कोण आपल्याला निशिकांत शिवाय ?? 

शेवटी तोच आपल्याला सांभाळणार म्हणून शहरात राहायला गेले. चार दिवस मजेत केले पण पुढे सुनेने आपले रंग दाखवायला सुरुवात केली गावाकडच्या माणसांचा आहार खूपच मोठा असतो इथपासून ते चांगदेवराव आणि त्यांची बायको यांना त्यांचे घाणेरडे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकू नका अशा या ना त्या कारणावरून सारखी बोल लावत होती. 

निशिकांत मात्र बायको ला कुठेच थांबवत नाही हे पाहून वडिलांना आता बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले . अजून आमचे हात पाय चालत असताना जर सून अशी वागणूक देत असेल तर पुढे काय ?? गावी गेल्यावर हक्काचं शेतही नाही आणि घर ही नाही. या विचाराने चांगदेवराव सारखे आजारी पडू लागले.

ज्या आई-वडिलांच्या रात्रंदिवस केलेल्या मेहनतीवर निशिकांत शिक्षण घेऊ शकला, तो इतका बदलला. 

निशा ला चांगदेवराव आजारी आहेत ही बातमी समजताच वडिलांना भेटायला ती निशिकांतच्या घरी आली. 

निशाला पाणी देणे हे देखील आईच्या हातात नाही हे मात्र निशा सारख्या चतुर मुलीला सांगावे लागले नाही.चांगदेवराव आजारी पडण्याचं कारणही तिला न सांगताच कळलं. 

तिला पाहताच चांगदेवरावाच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. आपण मुलीशी कसे वागलो ?पण आपण आजारी आहोत म्हटल्यावर किती चटकन धावून आली माझी पोर म्हणून चांगदेवराव पहिल्यांदा निशाला जवळ घेऊन चक्क रडू लागले.

निशिकांतला मात्र फार राग आला लहानपणापासून त्याला त्याच्याच कौतुकाची सवय झाली होती. त्यामुळे "दुरून प्रेम दाखवणं सोप्प असतं, असं म्हणून घेऊन जा आई-वडिलांना तुझ्यासोबत." अस निशिकांतच तावातावाने बोलणं अडवत निशाने मात्र लहानपणापासून आईवडिलांनी निशिकांतसाठी किती काय काय केलं तरी तुला जाणीव नसेल तर मी माझ्या आई-वडिलांना आयुष्यभर सांभाळायला तयार आहे हे ठणकावून सांगितलं. 

ज्या मुलीला आपण नेहमी वेदना दिल्या, तिच्यामुळे आज आपल्या वेदना सुखावल्या आणि तिच्यामुळे हसल्या असच वडिलांना वाटलं.

आपले वडील किती मानी आहेत ते जावयाच्या घरी राहायला येणार नाहीत हे निशाला आणि निशिकांतलाही माहित होतं. त्यामुळे निशिकांत आई-वडिलांवर अन्याय करत होता आपण कसेही वागलो तरी ते कुठेही जाणार नाहीत. असा त्याला विश्वास होता. 

पण निशाने नुकतीच शहरात दोन एकर जमीन खरेदी केली होती. तिथेच तिने वडिलांना घर बांधून द्यायचे आणि त्यांना आवड असणाऱ्या शेतीमध्ये त्यांचे मन रमवायचे अस तिच्या सासरच्या मंडळींना विचारलं सर्वांचा होकार घेऊन घर बांधून होईपर्यंत भाड्याच्या रूम मध्ये आई-वडिलांची सोय केली.

खरोखरच आज वडिलांना शेतावर गेल्यावर लाख मोलाच समाधान मिळालं..

© सौ. प्राजक्ता पाटील

सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा आणि खालील लिंकवर क्लिक करून आमच्या मजेशीर स्पर्धेत  भाग घ्यायला विसरू नका. 

इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने