कधीही सुफळ संपूर्ण न होणारी भांड्यांची कथा

© वर्षा पाचारणे



उद्या रविवार असल्याने सोनालीने नाश्त्यासाठी इडली सांबार असा बेत ठरवला होता... त्यासाठी तिने आदल्या दिवशीच डाळ-तांदूळ भिजत घातले होते... रात्री जेवण आटोपून तिने ते डाळ तांदूळ मिक्‍सरवर वाटून घेतले.

खरंतर जेवणाचं पसारा उरकता उरकता आज रात्रीचे साडे दहा वाजले होते... त्यानंतर ते इडलीचे पीठ तयार करून पुन्हा मिक्सरचे भांडे, पातेले, चमचा, धुवून मिक्सर पुसून जागच्या जागी ठेवे पर्यंत सोनालीला जवळपास झोपायला सव्वा अकरा, साडे अकरा वाजले होते... 

शेवटी सगळी कामं आटोपून ती बेडरूममध्ये आली... आता अंग टेकणार इतक्यात सौरभ तिला म्हणाला ,
"कशाची तयारी करत होतीस?".. "काय मग उद्या काय बेत आहे नाश्त्याला?"..

"अहो, उद्या इडली करणार आहे... पण तनु आणि स्वराला डोसा आवडतो ना, मग त्याच पिठाचे डोसे करेल.. आई बाबांना इडली खावीशी वाटली म्हणून त्यांच्यासाठी खास बेत"... असं म्हणत ती झोपणार तितक्यात सौरभ म्हणाला,
" ऐक ना, प्लीज, माझ्यासाठी मेदू वडा करशील का?... तशीही इडलीसाठी चटणी आणि सांभार तर तू करणारच आहेस ना?"

आता नवऱ्याने कधीतरीच अशी फर्माईश केल्यावर नाही कसं म्हणायचं, म्हणून मग तिने पुन्हा वड्यांसाठी डाळ भिजत घातली... असं करता करता तिला झोपायला बाराच वाजले.

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सगळेच अगदी निवांतपणे उठले. सोनाली मात्र या सगळ्या नाश्त्याची तयारी करण्यासाठी, रोजच्या पेक्षा थोडी उशिरा तरीपण सात वाजता उठलीच.

रविवार असल्याने तिला केस धुवायचे होते... त्यानंतर झाडलोट, पूजाअर्चा असं करता करता सव्वा आठ वाजलेले पाहताच मग मात्र तिची धावपळ सुरु झाली.. एकीकडे सांबारची तयारी, दुसरीकडे इडली, त्यानंतर वडे तळण्यासाठी तिने कढई ठेवली. 

एकीकडे तवा तापायला ठेवला... गॅस वरून एक गोष्ट बाजूला केली की पुन्हा दुसरी गोष्ट तयार ठेवावी लागत होती. ती हे सारं करत असताना मुलींची मात्र सतत आरडा ओरड चालू होती... "आम्हाला डोसा पाहिजे, आम्हाला डोसा पाहिजे",... त्यामुळे त्या मुद्दाम डिश वर चमचे आपटत होत्या... म्हणून सोनालीनेही पटकन मुलींना पहिले डोसे बनवून नाश्ता दिला. 

त्यानंतर आई-बाबांना गरमागरम इडली, चटणी आणि सांबार देऊन मग ती वडे तळायला स्वयंपाक घरात वळली.

"अगं सोनाली, आज माझा मित्र येणार आहे बरं का आपल्या घरी? त्यामुळे मला लवकर नाश्ता दे म्हणजे मग निवांत त्याच्याबरोबर गप्पा मारता येतील"... "बरं तो काही एकटा येणार नाही, त्याची फॅमिली पण येणार आहे, त्यामुळे दुपारी जेवणाला काहीतरी झकास बेत कर", असं म्हणत सौरभने सोनालीचं काम वाढवलं होतं.

सोनालीची धावपळ पाहताना सासुबाई म्हणाल्या ,"अरे सौरभ, त्यापेक्षा तू असं कर, तो मित्र आला की त्याच्याबरोबर गप्पा मारत बस आणि सोनालीची पण त्याच्या बायकोबरोबर छान ओळख होईल, त्यांनाही गप्पा मारता येतील आणि मग तू हॉटेलमधून काहीतरी पार्सल मागव म्हणजे सगळ्यांना थोडा निवांतपणा आणि मुलांना तर बाहेरचे पदार्थ खायला आवडतातच"... अशाप्रकारे सासूबाई सोनालीचा भार हलका करू पाहत होत्या.. "बरं, बघूयात", असं म्हणून सौरभने नाश्ता करायला सुरुवात केली.

साऱ्यांचा नाश्ता झाल्यानंतर मग सोनाली नाष्टा करायला बसली. तोपर्यंत सांभार आणि इडली दोन्ही थंडगार झाले होते.

मग तिने पटापट नाश्ता करून ती ढिगभर भांडी पाहून एक दीर्घ श्वास घेतला.. त्या भांड्यांमधलं सगळं खरकटं वेगळं करून भांडी घासून धुऊन ठेवेपर्यंत तिचा तासभर गेला. आता कुठे पुन्हा स्वयंपाक ओटा लख्ख दिसू लागला होता.

'आता जरा केस विंचरून थोडा बरा ड्रेस घालून बसावं' अश्या विचारात ती असतानाच दारावरची बेल वाजली.

"बापरे! आले का काय यांचे मित्र?... असं म्हणत तिने दार उघडलं... दारात आईंच्या तीन चार मैत्रिणी उभ्या होत्या.

"येऊ का गं सोनाली?"... कुलकर्णी काकू म्हणाल्या.

"अहो काय काकु? या की".... "अहो मी परवाच आईंना म्हणाले की तुम्ही साऱ्याजणी बरेच दिवसांपासून भेटल्याच नाही... आपल्या घरी मस्त गेट टुगेदर ठेवूया" असं वाटलंच होतं मला"....

"अगं हो, तूझी सासू कधीपासून आग्रह करत होती...त्यात ती आम्हाला म्हणालीच की आता सुनेने पण बोलावणं पाठवलं आहे तुम्हाला... मग आमच्या या लाडक्या लेकीचा आग्रह कसा मोडायचा... म्हणून आलो बाई"

"किती छान काकू!... बसा ना, मी पाणी आणते", असं म्हणत सोनाली सगळ्यांसाठी माठातले थंडगार पाणी घेऊन आली.

"सोनाली, बाळा सगळ्यांसाठी चहा ठेवतेस का जरा?"...

"हो, मस्त आलं घालून करते", असं म्हणत सोनाली स्वयंपाक घराकडे वळणार तितक्यात देशमुख काकू म्हणाल्या ,"बाळा मी चहा नाही घेत, वयोमानाप्रमाणे आता जास्तच ऍसिडिटी होते मला"...

"मग तुमच्यासाठी छान पैकी कोकम सरबत आणते काकू" असं म्हणत सोनालीने बाकीच्यांना चहा आणि काकूंसाठी जिरेपूड आणि थोडसं सैंधव मीठ घातलेलं कोकम सरबत आणले.

"मनमिळाऊ आहे हा तुझी सून", असं जोशी काकूंनी म्हणताच सोनालीला देखील मनातून खूप छान वाटलं..

"हो गं, ती घरातल्यांचं तर करतेच, पण आल्या गेल्याचा पाहुणचार देखील पद्धतशीरपणे करते"... आता सासुबाई आणि त्यांच्या मैत्रिणीकडून एवढी कौतुकाची थाप मिळताच जणू सोनालीच्या अंगावर मूठभर मांस चढलं होतं.

'आता तरी छान आवरून बसू', या विचारात तिने कपाटातून छान पोपटी रंगाचा ड्रेस काढला. तितक्यात तनु आणि स्वरा धावत आल्या आणि म्हणाल्या ,

"आई बाबांचे ते मित्र आणि त्या काकू आल्या आहेत".... "त्यांच्या घरी पण आमच्यासारख्याच, पण दोन जुळ्या मुली आहेत"...

हातात घेतलेला ड्रेस तसाच कपाटात ठेवत सोनाली बाहेर आली.. अहोंच्या मित्राचं आणि त्याच्या बायकोचे छान स्वागत करत त्यांच्या मुलींचा गोड पापा घेतला.. पुन्हा त्या मित्राच्या फॅमिलीसाठी चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. 

तितक्यात सौरभ म्हणाला ,"सोनाली, मस्त गरमागरम पोहे होऊन जाऊ दे आता"...

"हो, लगेच करते", असं म्हणत बिचारी सोनारी मनातल्या मनात कितीही वैतागलेली असली तरी पुन्हा एकदा स्वयंपाक घराकडे वळली.

पुन्हा कांदे, मिरच्या, कडीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे अशी सगळी तयारी करून तिने साऱ्यांसाठी मस्त गरमागरम लुसलुशीत कांदे पोहे बनवले..

"वाह! वहिनी तुमच्या हाताला भलतीच भारी चव आहे की", असं म्हणत मित्राच्या बायकोने सोनालीचे भरभरून कौतुक केले..

"हो ना, मी तर किती दिवसांनी असा गरमागरम नाष्टा करतोय... नाहीतर आमच्याकडे पिझ्झा, बर्गरचं रतीबच असतं" असं म्हणत मित्राने बायकोची खिल्ली उडवली.

"अरे, मग थांब की... आज दुपारी जेवणात मस्त गावरान बेत करू", असं म्हणत नाष्टा करून लगेच निघणाऱ्या मित्राला सौरभने मात्र आग्रह करून करून थांबविले..

मग काय मित्राने देखील हक्काने सोनालीला फर्माईश सोडली. "वहिनी, तुम्ही गावाकडच्या असल्याने तुम्हाला गावरान पदार्थ भारी जमत असणार, यात काही शंकाच नाही", मग होऊन जाऊ दे आज पिठलं-भाकरी, मिरचीचा ठेचा, पापड असा साधासुधा बेत"..

"आणि हो, याच्या आवडीचं मसाला वांगं देखील", असं म्हणत मित्राच्या हातावर टाळी देत सौरभने पुन्हा एकदा तिच्या कामात भर घातली होती.

बिचारी सोनाली सगळ्यांच्या आवडीचा बेत करताना मनातून कितीही वैतागलेली असली तरी चेहऱ्यावर मात्र सतत स्मितहास्य होतं... तिला मुळात स्वयंपाकाची आवड होतीच, पण त्या स्वयंपाका नंतरची आवराआवर आणि भांडी मात्र जीवघेणी वाटायची.

'आजची सुट्टी एन्जॉय करू', असा विचार करून या सततच्या कामाने आणि सिंकमध्ये पडलेल्या भांड्यांमुळे तिला जणूकाही ती कामवाली असल्यासारखं वाटू लागलं होतं... सोनालीचं तोंड भरून कौतुक करत सगळ्यांनी जेवणावर चांगलाच ताव मारला.

जेवण आटोपून पुन्हा सगळे जण निवांत गप्पा मारू लागले... सोनाली मात्र ती सगळी भांडी घासता घासता पुरती दमून गेली होती... सगळी भांडी घासून तिने भांडी निथळण्याच्या जाळीमध्ये भरून ठेवली..

"हुश्श! संपली बाबा एकदाची भांडी", असं मनात म्हणत तिने इतका वेळ कमरेभोवती गुंडाळलेली ओढणी सोडून पुन्हा व्यवस्थित केली.. तितक्यात सौरभ बाहेर जाऊन आईस्क्रीम घेऊन आला...

"आई, बघ ना बाबांनी केवढा मोठा फॅमिली पॅक आणला आहे", असं म्हणत तनु तो आइस्क्रीमचा पॅक घेऊन आईकडे आली... "आई, आम्हाला चौघींना आधी दे", असा तनु हट्ट करू लागली.

तितक्यात स्वरा म्हणाली ,"नको.. आधी बाहेर सगळ्यांना देऊयात"... "आपण चौघीही आईचं काम हलकं करूयात", असं म्हणत आईने आईस्क्रीमच्या वाट्या भरताच तनु आणि स्वरा एक एक करत सगळ्यांना बाहेर आईस्क्रीम देऊ लागल्या... पण त्या धावपळीत तनुच्या हातून एक आईस्क्रीमची वाटी पटकन खाली पडली... इतर वेळेला काही वस्तू हातातून खाली पडताच आई ओरडते, हे माहीत असल्याने 'आता आपलं काही खरं नाही', असं वाटून तनु निमूटपणे आईसमोर कान धरुन उभी राहिली.

"आई, सॉरी.. चुकून माझ्या हातून वाटी खाली पडली", असं म्हणत रडवेला चेहरा करून सांगू लागताच हॉलमध्ये बसलेल्या साऱ्यांचेच लक्ष सोनालीकडे गेले... आता घरात एवढी पाहुणे मंडळी असताना सोनाली लेकीवर अजिबातच रागावू शकली नाही...

"असू दे हा बाळा, मी घेते पुसून", असं म्हणत तिने सारा राग मनातल्या मनात गिळला आणि ते सांडलेलं आईस्क्रीम साफ करत पुन्हा दुसरी वाटी भरून तनुच्या हातात दिली... 'आज आई आपल्याला ओरडली नाही' या आनंदात तनु देखील आईस्क्रीम आनंदाने मटकावु लागली.

"आजची तुझ्या घरची पार्टी मात्र झक्कास झाली", असं म्हणत मित्र मंडळी निघून गेली. या सगळ्या प्रकारात जवळपास संध्याकाळचे पाच साडे पाच वाजले होते...

"बापरे! दमले", असं म्हणत आता आपल्यालाच कोणीतरी आयता चहाचा कप हातात आणून द्यावा, असं सोनालीला वाटलं... आणि तसं तिने नवर्‍याला बोलुन देखील दाखवलं...

"ये बात, अगदी माझ्या मनातलं बोललीस"... "अगं, आता टीव्हीवर मस्त मॅच रंगणार आहे"

 "बरं झालं, आठवण केलीस, या दिवसभराच्या धावपळीत विसरूनच गेलो होतो"...

सोनालीने मनात विचार केला ,'धावपळीत? नक्की धावपळ कोणाची? माझी का यांची?'

 'निवांत बसून गप्पाटप्पा आणि खाण्याच्या ऑर्डर तर सोडायच्या होत्या'... 'माझ्या मात्र रविवारचा पुरता बट्ट्याबोळ करून टाकला'... पण तो राग तिने मनातल्या मनात गिळला, 

कारण दिवसभराच्या एवढ्या धावपळीनंतर तिच्यात वाद घालायचा सुद्धा त्राण शिल्लक राहिला नव्हता.. तिला आता मस्त एका कडक चहाची नितांत गरज होती... बिचारीने त्या मरगळलेल्या अवस्थेतच स्वयंपाक घरात जाऊन मस्त आलं, वेलची घालून स्पेशल चहा बनवला... आणि नवरोबाला देत म्हणाली ,"घ्या, माझ्या नशिबात नसेल आयता चहा तर निदान तुम्ही तरी प्या", असं टोमणेवजा सुरात सुनावलं.

"ऐक ना सोनू, अगं दुपारी जेवण इतकं भन्नाट झालं होतं, पण गप्पांच्या नादात मी कमीच जेवलो.. आत्ता मला काहीतरी खारी, टोस्ट आणून दे ना"... असं म्हणत पुन्हा नवरोबा मॅच बघण्यात गुंग... त्या मॅच ची मजा घेत चहा खारी संपून साधा चहाचा कप आणि ताटली सुद्धा उचलून ठेवण्याचे कष्ट सौरभने केले नाहीत.

'आता संध्याकाळी फक्त डाळ खिचडी करूयात', असं म्हणून सोनालीने निदान अर्धा एक तास तरी निवांतपणे बसण्याचे ठरवले... पण आज कदाचित तिच्या नशिबात बसण्याचं सुखंच नव्हतं.

नेमक्या त्याच दिवशी गावावरून चुलत सासूबाई आणि चुलत नणंद सात साडेसातला घरात हजर... आता इतक्या लांबून आलेल्या माणसांना डाळ खिचडी कशी खायला घालायची, म्हणून पुन्हा साग्रसंगीत दोन भाज्या, वरण, भात, चपाती, कोशिंबीर असा बेत करावाच लागला.

 कारण साधं हलकंफुलकं जेवून चालणार नव्हतं. दुसऱ्या दिवशी चुलत सासूबाईंचा उपवास असल्याने त्यांना आदल्या दिवशी असाच भरभक्कम आहार लागत असे.. स्वयंपाक करण्यात नणंद बाईंनी बऱ्यापैकी मदत केली.. पण मग प्रवासाची दगदग झाल्याने त्यांना थोडा पित्ताचा त्रास जाणवू लागला होता... म्हणून फक्तं वरण भात खाऊनच त्या झोपून गेल्या.

मग पुन्हा ते भांड्यांनी भरलेलं सिंक आणि सोनाली एकमेकांचे दुखः वाटून घेत होते... एक एक भांड धूवुन जाळीमध्ये ठेवताना जणूकाही मैलाचा प्रवास केल्यासारखं आज सोनालीला वाटू लागलं होतं.

शेवटी कुठे रात्री दहा वाजता किचन ओटा तो एवढा सारा स्वयंपाक घरातील पसारा संपून पुन्हा दुसर्या दिवशी तोच पसारा अनुभवण्याची वाट पाहत बसला होता.

एखाद्या पदार्थाची फर्माईश करणं सहज सोपं असतं, पण तो पदार्थ बनवून शेवटी स्वयंपाक घरातील आवराआवर होईपर्यंत, त्यामागे किती कष्ट असतात, हे फक्त इतकी आवराआवर करणारी व्यक्तीच समजू शकते... 

अशी ही कधीही सुफळ संपूर्ण न होणारी... गृहिणींच्या आयुष्यातील भांड्यांची कथा... नव्हे व्यथा...

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

2 टिप्पण्या

  1. अशा लोकांचा (नवरा) खूप राग येतो,जे आयत्या वेळेस सर्व सांगतात. एकदा स्वतः करून बघा म्हणो स्वयंपाक. एव्हढे करून त्या स्त्रीला श्रेय कुणीच देत नाहीत.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने