मध्यस्थी ( भाग 2 )

© धनश्री दाबके





राजेशने लंच अवर पर्यंत काही महत्वाची कामं हातावेगळी केली आणि जरा मोकळीक मिळाल्यावर तो तनवीला कसं समजवावं ह्याचा विचार करु लागला. 

पण त्याआधी अपर्णाशी बोलायला हवे असे वाटून त्याने लगेच गाडी काढली आणि लंचसाठी अपर्णाच्या ऑफिसमधे गेला. 

पूर्वी तिच्याबरोबर वेळ मिळावा म्हणून राजेश अनेकदा असा दुपारी तिच्याबरोबर जेवायला जायचा. पण हल्ली बऱ्याच दिवसांत हा योग जुळून आला नव्हता.

 त्यामुळे आज त्याला असा अचानक आलेला बघून अपर्णा सुखावली. दोघं एकत्र जेवायला बसले आणि राजेशने विषयाला हात घातला.

" उद्या तनुच्या शाळेत मीटींग आहे लक्षात आहे ना?"

"हो रे, आहे लक्षात. जाऊया ना आपण. तिच्या aptitude test च्या रिझल्ट वरुन टीचर गाईड करणार आहेत ना कुठले विषय घ्यावेत ते. 

तिच्याशी बोललेही मी परवा तर माझा चॉईस बाबाला माहितीये म्हणाली. तसंही ती सगळं तुलाच तर सांगते. मला तिला जास्त वेळ देता येत नाही म्हणून रागावते ती माझ्यावर. लहान आहे अजून."

"अपर्णा, लहान नाहीये तनु आता. तुला तिच्या वागण्यातला फरक जाणवतच असेल. आधी आई आई करत तुझ्या मागे मागे असायची. 

तू तिला वेळ द्यावास म्हणून तुझे लक्ष वेधून घेण्यासाठी धडपडायची. आणि आता बघ तिच्या लहान आणि मोठ्याही गोष्टींत तुझ्या नसण्याची तिने सवय करुन घेतलीये. 

Now she does not wait for you any more. आणि unfortunately तिचा तुझ्याबद्दलचा राग आता साधा राहिलेला नाही तर तो तिच्या मनात खोलवर जाऊन बसलाय."

राजेशनी मग त्याच्या व तनवीमधला सकाळचा सगळा संवाद अपर्णाला सांगितला. 

"तिने मध्यस्थी हा शब्द वापरला आणि मला तिच्यात माझेच प्रतिबिंब दिसले. माझ्याही मनात बाबांबद्दल असाच आकस आहे जो तुला काही नवीन नाही. 

तू मला त्याबद्दल समजावलंही आहेस आधी बरेचदा. पण खरं सांगतो आज तनवीने तुझ्याबद्दल तशीच भावना व्यक्त केली आणि मी मुळापासून हादरलो. 

बाबांचा लेक म्हणून मला जे समजून घेता आले नाही ते तनवीचा बाबा म्हणून मला आज तरी समजले. म्हणूनच मी चार दिवस सुट्टी टाकलीये आणि उद्याच बाबांना भेटायला जातोय. 

म्हणजे मी जाईन आणि लगेच बाबांशी कनेक्ट होऊ शकेन असं नाही पण मी माझे मन मोकळे करुन त्यांची माफी मात्र मागणार आहे. जे माझं आणि बाबांचं झालं तेच मला तुझ्या आणि तनुमधे व्हायला नकोय. 

मी आजपर्यंत कधीच तुला काही बोललो नाही पण आता मात्र तू जरा फक्त तनवीसाठी वेळ दे आणि मीही थोडी तुम्हा मायलेकींना फक्त तुमचीच अशी जी एक स्पेस असायला हवी ती नक्की देईन. 

शेवटी मुलं आईवडलांकडेच पाहात मोठी होतात ग. माझे आणि बाबांचे stressed रिलेशन्स तिच्या मनानेही टिपले असतीलच. 

माझे बाबांशी वागणे ती बघत आलीये आणि तीही तेच करतेय. त्यामुळे मला आधी स्वतःला बदलावं लागेल. ज्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेनच पण तुलाही स्वतःला बदलावे लागेल अपर्णा."

राजेशच्या मनापासून बोलण्याने अपर्णा गंभीर झाली. " खरंच मी तुम्हा दोघांना खूपच गृहीत धरलं का रे? चुकलंच माझं. माझी लेक माझ्यापासून दुरावते आहे हे मला जाणवलंच नाही.

एवढी केमिस्ट्री एक्सपर्ट मी पण मला माझी आणि तनुची बिघडलेली केमिस्ट्री समजलीच नाही. पण आता मात्र मी परत तनुच्या मनात शिरायचा नक्की प्रयत्न करेन. 

त्यासाठी माझ्या रिसर्चची थोडी आबाळ झाली तरी हरकत नाही पण हे सगळं जिच्यासाठी करतेय तिलाच नाखुश ठेवून कसं चालेल? तू जाऊन ये घरी आईबाबांकडे, मी इथे तनवीशी बोलते."

अपर्णाने असं म्हणताच राजेश थोडा रिलॅक्स झाला. चला एका बाजू तर सर झाली.

"हो तू तर बोलंच पण आज आधी मी तिला थोडं समजावतो म्हणजे ती तुझं बोलणं जरा मोकळ्या मनाने ऐकू शकेल. चल आत्ता निघतो मी. संध्याकाळी तिच्याशी बोलेन." म्हणून राजेश अपर्णाच्या ऑफिसमधून बाहेर पडला.

संध्याकाळी राजेश घरी आला तर तनवी नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत बसली होती. तो फ्रेश होऊन चहा घेत असतांना तनवी रोजच्याप्रमाणे तिचा दिवसभराचा वृतांत द्यायला आली.

तो ऐकून घेतल्यावर राजेश म्हणाला "अगं आज एक मस्त न्यूज मिळाली. माझ्या ऑफिसमधे ते नायर आहेत ना, त्यांचा मुलगा मिहिर. 

त्याचे सायन्स प्रोजेक्ट सिलेक्ट झाले नेहरु सायन्स सेंटर मधल्या एक्झिबिशनसाठी. खूप आनंदात होते नायर आज. त्यावरुन मला तुझे आणि प्राचीचे गेल्या वर्षीचे तुमच्या शाळेतल्या एक्झिबिशनसाठी बनवलेले सोलार एनर्जीवर चालणाऱ्या स्मार्ट होमचे मॉडेल आठवले. 

एकदम सुपर होते तुमचेही प्रोजेक्ट. नाही का?"

"हो रे बाबा. जीव ओतून मेहेनत घेतली होती आम्ही. रात्रंदिवस एक केले होते. पण नाही सिलेक्ट झालं आमचं प्रोजेक्ट. 

नुसतं वर्किंग मॉडेल आहे आणि छान आहे म्हणून ते एक्झॅमिनर्स नाही ना सिलेक्ट करत. तुमचं त्या सब्जेक्टचं understanding ही तेवढंच हवं. मी सगळी उत्तरं छान दिली पण somehow प्राचीला नाही देता आली चांगली उत्तरं. टीमवर्कही महत्वाचं ठरतं अशा टफ कॉंपिटिशन्स मधे"

"हो ते आहेच. आता ह्या वर्षी परत ट्राय करा. पण तुला राग आला असेल ना तेव्हा खूप प्राचीचा? तिच्यामुळे तुझीही मेहेनत फळाला नाही आली"

"राग तर आला होता खूप पण तो तेवढ्यापुरताच. प्राची तेव्हा आमच्या फुटबॉल टीमचीही कॅप्टन होती ना. त्यामुळे तिचं या प्रोजेक्टकडे जरा दुर्लक्ष झालं तेव्हा. नाही जमलं तेव्हा तिला. But its ok as she is my best friend आणि मैत्रीत चालतं तेवढं. तिच्यासाठी कुछभी."

"अरे वा. म्हणजे तूही माझ्यासारखीच दोस्तोंकी दोस्त आहेस तर. जशी तू प्राचीसाठी कुछभी करु शकतेस तसंच मीही माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी सब कुछ मॅनेज करु शकतो."

" yes.. बेस्ट फ्रेंडशिप असतेच तशी."

"हो आणि तुमचा बेस्ट फ्रेंड आणि लाईफ पार्टनर जर एकच असेल, जसे मी आणि आई आहोत तर मग पूर्ण लाईफच धमाल. नाही का? 

म्हणूनच तर आम्ही एकमेकांना सतत सपोर्ट करत असतो. आता आई खूप बिझी असते पण मी तिला समजून घेतो. माझ्या परीने मी तुझी सगळी काळजी घेतो. 

माझी बेस्ट फ्रेंड जेव्हा जीव ओतून तिचं रिसर्चचे काम करत असते तेव्हा मी तिच्या इतर कामांचा भार उचलतो. 

आणि तुला अजून एक सांगू? तुझे आजी आजोबाही असेच एकमेकांचे बेस्ट फ्रेन्ड्स आहेत. पण मला कधी ते समजलंच नाही. 

आज सकाळी तू जेव्हा तुला आई मीटींगला आली नाही तरी काही फरक पडणार नाही म्हणालीस ना तेव्हा मला माझी चूक उमगली. मलाही असाच माझ्या बाबांचा राग यायचा ते मला वेळ देत नाहीत म्हणून. 

तो राग मग वाढतच गेला आणि मी बाबांपासून नेहमी दूरच राहाणे पसंत केले. पण आज मला कळतय की तेही त्यांच्या बेस्ट फ्रेंडवर माझी जबाबदारी टाकून माझ्यासाठीच खूप मेहेनत करत होते. 

जशी आज आई तुझ्यासाठी करतेय तुला माझ्यावर सोपवून. पण येस, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. फ्रेंड्स असलो तरी टीमवर्कही तितकेच महत्वाचे. 

त्यामुळे मी आता माझ्या फ्रेंडवर थोडी जबाबदारी टाकतो आणि उद्या जाऊन आजी आजोबांना भेटून येतो. तुमची फ्रेंडशिप मला उशीरा का होईना पण समजली ते त्यांना सांगून येतो."

राजेशचं बोलणं ऐकून तनवी विचारात पडली. बाबा आजोबांना भेटायला जातोय हा तिच्यासाठी तिच्या बाबा मधला मोठा चेंज होता.

तनवी काही बोलत नाही म्हंटल्यावर राजेशच पुढे म्हणाला "आणि माझी बेस्ट फ्रेंड तयार आहे हा माझ्या सपोर्टसाठी. तेव्हा तनु बेटा प्लीज आईबद्दलचा सगळा राग सध्या बाजूला ठेव आणि तिला समजून घे. 

तिच्या बरोबर छान आनंदात वेळ घालव. मग बघ तुला तुझी पूर्वीची आई परत मिळते की नाही."

"खरंच बाबा? होईल असं खरंच? ...बरं... तू म्हणतोयस म्हणून हा फक्त. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन आईवर न रागवता तिच्याशी चांगलं वागण्याचा. After all you are also my best friend " म्हणत तनवी राजेशच्या कुशीत शिरली.

"Thank you बेटा. You are my best friend too."

तनवी आणि अपर्णा दोघींनाही एकाच पेजवर आणल्याने राजेशच्या मनावरचा भार हलका झाला. आता मायलेकी दोघी नक्कीच एक होतील अशी खात्री वाटायला लागली आणि तो आनंदाने आईला उद्या येतोय म्हणून कळवायला निघाला.

समाप्त

© धनश्री दाबके

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने