ए आई ते अहो आई


© धनश्री दाबके



आज प्रतिभाकडे तिच्या सगळ्या मैत्रीणी जमल्या होत्या. निमित्त होते ते प्रतिभाच्या मुलाच्या म्हणजे रोहनच्या साखरपुड्याचे फोटो आणि CD बघण्याचे.


गेल्याच आठवड्यात रोहनचा साखरपुडा झाला होता. सगळ्याच मैत्रीणींना साखरपुड्याला बोलावणे प्रतिभाला शक्य झाले नव्हते. त्यामुळे आज तिने सगळ्यांना घरी बोलावले होते.


चहा, उपमा आणि प्रतिभाच्या हातच्या बेसन लाडूंवर ताव मारता मारता सगळ्या जणी फोटो बघत होत्या.


प्रतिभाची होणारी सून मैथिली सगळ्यांनाच खूप आवडली.


मैथिली होतीही तशीच. कोणालाही बघता क्षणी आवडेल अशी. तरतरीत, हसतमुख आणि सुंदर. रोहन आणि मैथिलीचा जोडा अगदी शोभून दिसत होता.

" प्रतिभा अगदी सुरेख आहे ग तुझी सून. आवडली बाबा आपल्याला."

" आता काय बाई मजा आहे तुझी. सासूबाई होणार आता. वरमाईचा थाट आता बघायलाच नको" अशा एकेक कमेंट्स येत होत्या आणि गप्पांची गाडी सुरेख सूनबाई वरुन होणाऱ्या सासूकडे वळली होती.

"अगं मजा कसली? मला तर जरा दडपणच आलंय. सासू होणं काही सोपं काम नाही. हल्लीच्या काळात तर अजिबात नाही." प्रतिभा म्हणाली.

" मला वाटलच होतं. मला अजूनही चांगलं आठवतय तू स्वतःच्या लग्नात होणाऱ्या सासूचे किती टेंशन घेतलं होतस ते आणि आता लेकाच्या लग्नात सासू होण्याचे घेते आहेस. अजूनही तशीच आहेस बघ अगदी " लगेच प्रतिभाची बालमैत्रीण साधना म्हणाली.

"तसं नाही गं. आता काळ एवढा बदललाय पण अजूनही आपल्याकडे लग्नात नवऱ्यामुला इतकीच किंवा कदाचित त्याही पेक्षा जास्त चर्चा मुलाच्या आईबद्दल होत असते.

वरमाई ही नेहमी खाष्टच असते जसा कन्यादान करणारा मुलीचा पिता बाय डिफॉल्ट बिचारा असतो. म्हणजे मुलीच्या आईवडिलांच्या भावना मी नक्कीच समजू शकते. त्यांना त्यांच्या काळजाच्या तुकड्याची काळजी असणारच.

पण त्यामुळेच मला जरा दडपण आलय. कारण आता सतत मुलीकडचे लोक माझ्या वागण्या बोलण्याचे स्कॅनिंग करणार एखाद्या सेलिब्रिटी सारखं. मलाही मुलगीच व्हायला हवी होती असं वाटायला लागलय मला आता."

"अगं बाई !! तू नको ग इतकं दडपण घेऊ. वरमाई खाष्टच असते असा काही नियम नाही आणि असलाच तरी तू तो अपवादाने सिध्द करशील." मीना म्हणाली

"नाहीतर काय? हिच्या इतकी समजून घेणारी सासू कुठे शोधूनही सापडणार नाही.

मला तर आत्ताच दिसतय लग्नानंतरचे चित्र. आता ही सकाळी दोन डबे भरतीये नंतर तीन भरणार. लकी असणारे मैथिली" साधनाने मीनाच्या बोलण्याला पुस्ती जोडली.

"हो बाई प्रतिभा, तू ना जरा ठाम रहायला शिक आता नाहीतर सूनवास व्हायचा हो. मी बघ कसं माझ्या दोन्ही सूनांना माझ्या शब्दात ठेवलय." एका अनुभवी व जाणत्या सासूने प्रकाश टाकायला सुरुवात केली.

" हे बघ घरात मतं सगळ्यांचीच महत्वाची पण आपला निर्णयाचा अधिकार मात्र सोडायचा नाही हा. नाहीतर ही नवीन पीढी आपल्याला गुंडाळून ठेवायला जराही कचरत नाही. तेव्हा घरात आपला वचक कायम ठेवत आपला मान आपणच जपायचा."

ह्या सल्ल्याच्या प्रकाशाने दिपलेले प्रतिभाचे डोळे गच्च मिटले गेले आणि डोळ्यांसमोर त्या मैत्रीणीच्या आज्ञाधारक पण वैतागलेल्या सूना आल्या.

नाही बाई हा असा नाईलाजाने जपलेला मान नकोच आपल्याला. आणि आता दोघांचा करतेय तर नंतर तिघांचा डबा केला तर असा कितीसा फरक पडणारे मला?

पण आत्ता ह्या सगळ्यांच्या चिवचिवाटात हे विचार मनातच ठेवावेत असा सूज्ञ निर्णय घेऊन प्रतिभाने हो ला हो करत कार्यक्रम आटोपला.

रोहनच्या साखरपुड्यासाठी प्रतिभाची आईही आलेली होती गावावरून जी इतका वेळ ह्या सगळ्या गप्पा शांतपणे ऐकत होती.

सगळ्या मैत्रीणी गेल्यानंतर प्रतिभाची आवराआवर आटोपल्यावर आई म्हणाली, "ऐकलं मी मगाशी तुझं बोलणं. सासू व्हायचं दडपण आलंय ना? कुठलंही नवं नातं जोडतांना दडपण तर येणारच.

त्यात ह्या सासूसुनेच्या नात्यावर जरा जास्तच फोकस असतो सगळ्यांचा आणि तितकाच आकसही.

आपल्या सगळ्या आशा आकांक्षा, स्वप्न घेऊन, आपल्या जीवलगांना सोडून एक मुलगी आपल्या घरात येते. तेव्हा मानपान, अपेक्षा ह्या सगळ्या भावनांना दुय्यम दर्जा देत तिला मोकळ्या मनाने स्विकारणे जास्त महत्वाचे.

आता तुला एकुलता एक लेक आहे पण मला तू आणि प्रदीप दोन मुलं. दोघ एकाच घरात वाढलात.

आम्ही दोघांना सारखेच प्रेम दिले, तुमच्यावर सारखेच संस्कार केले. दोघांची शाळा आणि शिक्षकही एकच होते.

म्हणजे तुमच्या दोघांचे पालक, शिक्षक, संस्कार, घरातल्या खाण्यापिण्याच्या व रहाण्याच्या सवयी, घरी येणारे नातेवाईक, पाहुणे म्हणजे थोडक्यात सगळे महत्वाचे घटक जे माणसाला घडवतात ते सगळे सारखेच होते.

पण तरीही तू आणि प्रदीप अगदी सारखे आहात का? तुमच्या आवडीनिवडी, स्वभाव, सवयी, तुमचे गुण, अवगुण हे सर्व काही वेगवेगळे आहे.

एकाच आईच्या पोटी जन्मलेली दोन भावंडे जर एक सारखी नसतात तर येणारी सून तर परक्या घरातून येणार. तेव्हा तिने सासरी येवून सासरच्या घरासारखे वागावे हे लगेच कसे जमावे?

आपल्या बहीण भावांमधला किंवा आपल्याच दोन मुलांमधला फरक आपल्याला जाणवतही नाही किंवा जाणवला तरी ते वेगळेपण आपल्याला बोचत नाही. कारण ते वेगळेपण आपण अगदी मनापासून आपलं मानून स्विकारलेले असते.

पण ह्या नात्यात कुटुंबात येणाऱ्या सूनेला किंवा जावयाला स्विकारायच्या आधीच त्यांच्यावर अपेक्षा लादल्या जातात आणि ते नाते फुलायच्या आधीच क्लिष्ट केले जाते.

आजचे तुझ्या मैत्रीणींचे एकेक सल्ले ऐकले आणि मी तुझ्याशी बोलायचे ठरवले.

आधी मैथिलीला येऊ तर दे घरी. तिचा स्वभाव, सवयी, आवडीनिवडी कळू देत. मग बघता येईल की.

तिचे येणे मनापासून स्विकार आणि जशी तू मुळात आहेस तशीच तिच्याशी खऱ्या मोकळेपणाने वाग. कुठलाही मुखवटा न लावता. म्हणजे बघ तुमचे नाते कसे फुलेल ते.

यात फार कठीण असं काही नाही ग." आईने प्रतिभाचा ब्रेन फुल आई स्टाईलने धुतला आणि तिचे सगळे दडपण पळवून लावले.

प्रतिभा म्हणाली " अगदी खरं आणि योग्य सांगितलंस तू आई. मी उगीचच पुढचा नको तो विचार करुन दडपण घेत होते. पण आता मी तयार आहे वरमाई होऊन रोहनच्या लग्नाचा बार उडवून द्यायला."

****

प्रत्येक पती पत्नीचे नाते जसे तुमचे आमचे सेम असूनही unique असते तसेच प्रत्येक सासू- सून नातेही unique असते. तेव्हा उगीच होणाऱ्या सासूने स्वतःच्या सासूबाईंच्या अनुभवांमुळे आणि होणाऱ्या सूनेने इतरांच्या अनुभवांमुळे ह्या नात्यावर पूर्वग्रहीत दृष्टिकोनाचा भार टाकू नये. एकच सासूबाई दोन सूनांशी वेगळ्या पध्दतीने डील करु शकतात कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. अर्थात हे झाले आपले माझे मत.

तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमधून नक्की कळवा.

© धनश्री दाबके



धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...



अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा आणि खालील लिंकवर क्लिक करून आमच्या मजेशीर स्पर्धेत भाग घ्यायला विसरू नका.


इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻


#मजेशीर_स्पर्धा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने