ऋणानुबंध जन्मांतरीचे

© वर्षा पाचारणे.



वैजयंती... बारीक अंगकाठी, चापूनचोपून घातलेली पातळ वेणी, अंगावर जुनीच पण स्वच्छ सुती साडी आणि बोलण्यात मधाचा गोडवा... अशी ही वैजयंती पवार मावशींच्या घरातील सदस्य कधी बनली, कळलं देखील नाही...

पवार मावशींच्या लग्नाआधीपासूनच वैजू त्यांच्या घरात कामाला होती.. मावशी लग्न करून आल्या तेव्हा पासून अगदी मोठ्या बहिणीच्या मायेने वैजयंतीने त्यांना जपलं होतं.. सासु सुनेमध्ये प्रेमाचा झरा वाहावा, याकरिता वैजयंती सतत प्रयत्नशील असायची... 

पवार मावशींच्या सासूने देखील वैजयंतीला अगदी पोटच्या लेकीप्रमाणे जीव लावला होता. पवार मावशी चार दिवसांसाठी का होईना माहेरी निघाल्या, की वैजयंती अगदी कासावीस व्हायची..

"वहिनी, परत कधी येणार?", असं म्हणत पवार मावशी येईपर्यंत वैजयंती सतत वाट पाहत बसायची. तसे हे दोघींमधले गुळपीठ दिवसागणिक वाढतच गेले... पवार मावशींचा एकुलता एक लेक कार्तिक लहानपणापासून आईकडे कमी आणि मावशीकडे जास्त रमायचा... घरात सारंकाही असून देखील त्याला मावशी सारखी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी मात्र सुखावून जायची.

कधी कधी तर नातेवाईक म्हणायचे देखील की ,'या वैजयंतीला कामावरून काढून टाक'.. 'कसा राहतो, कसा वागतो कार्तिक तिच्यासारखा?... एवढ्या मोठ्या संपत्तीचा एकुलता एक वारस असून देखील जरा म्हणून मोठेपण वागवायची सवय नाही त्याच्या अंगी'

या वाक्याने पवार मावशींना मात्र आनंद व्हायचा.. कारण माणसावर जे संस्कार होतात त्यानुसार तो घडत असतो... कदाचित श्रीमंती थाट डोक्यात जाऊन पुढे नसते दुष्परिणाम पाहण्यापेक्षा साध्या राहण्याने त्याचे पाय कायम नक्कीच जमिनीवर राहतील', हे त्या जाणून होत्या..

वैजयंतीचा लहान लेक कार्तिक एवढाच होता. त्यामुळे कार्तिकचे जुने झालेले कपडे पवार मावशी वैजयंतीला द्यायच्या.. कार्तिकची जुनी खेळणी, जुने दप्तर असे सारेच वैजयंतीच्या बबनला मिळायचे.

तो एवढासा बबन एक दिवस कार्तिकच्या आईच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, "मावशी तुमच्यामुळे मला या साऱ्या वस्तू मिळतात, नाहीतर आमची कुठली ऐपत असं काही घ्यायची", असं म्हणून त्याने आईचा आशीर्वाद घेतला.

त्याचं हे बोलणं ऐकून नकळत कार्तिक देखील आपल्याला मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकत होता.

दोन-तीन दिवसांनी कार्तिकचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसाला 'सोसायटीमधील मुलांना बोलवण्यापेक्षा वैजयंती मावशी आणि तिच्या मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला जाऊ', असा हट्ट कार्तिकने धरला.

कार्तिकचे बाबा फार रागावले.. "अरे त्यांच्याबरोबर राहून तुझे नको ते हट्ट वाढायला लागलेत", असं म्हणत बाबांनी कार्तिकला चांगलाच झापला.

 "मला वाढदिवसच साजरा करायचा नाही", असं म्हणत कार्तिकने आपला हट्ट पुढे रेटला... नाही हो करता-करता बाबांनी त्याच्या हट्टाला परवानगी दिली..

वाढदिवसाच्या दिवशी कार्तिक, आई बाबा आणि वैजयंती मावशीची मुलं जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेले... त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच असं हॉटेलमध्ये जाण्याची संधी मिळाली होती.

वैजयंती आणि तिची मुलं हरखून गेली होती.. आपल्या दिसण्याने, वागण्याने साहेबांना कमीपणा तर येऊ नये, या विचाराने ती आणि तिची मुलं चार घास कमीच जेवली... कार्तिकने खूप आग्रह करूनही त्यांनी स्वतःच जेवण आवरतं घेतलं..

घरी आल्यावर बबनने कार्तिकच्या बाबांना नमस्कार करून सांगितलं ,
"काका, आज तुमच्यामुळे अशा मोठ्या हॉटेलमध्ये आम्हाला जायला मिळालं.. रोज घरी साऱ्यांचं कसंबसं पोट भरत असताना, हॉटेल हा विषय आमच्या स्वप्नातंही येत नाही पण कार्तिकमुळे हे स्वप्नातलं सुख आज आमच्या नशिबात आलं"

कार्तिकच्या बाबांनी कसंनुसं हसत त्याला पाठीवर थोपटलं.. आज त्यांना स्वतःच्याच विचारांची लाज वाटत होती.

जे संस्कार आपण आपल्या मुलावर करू शकलो नाही, ते आपोआप वैजयंती करून गेली होती... दुसऱ्याच्या दुःखाची, अपेक्षांची जाणीव ठेवणारा मुलगा आपल्या पोटी असल्याने आज त्यांना धन्य वाटत होते..


दिवस सरत गेले.. कार्तिक शिकून-सवरून मोठा झाला... मोठ्या कंपनीत कामाला लागला.. कंपनीतील स्वरांगी बरोबर लग्न करण्याचा त्याचा निर्णय पक्का झाला.

स्वरांगी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती... कार्तिकच्या घरची श्रीमंती, मुलाची चांगली नोकरी आणि घरचे वातावरण यामुळे स्वरांगीच्या आई-बाबांनीही लग्नाला परवानगी दिली.. 

पवार मावशींनी सुनेची सारी हौस पुरवली होती.. घरात दिवसभर कामाला वैजयंती मावशी असल्याने स्वरांगी मात्र तिच्यावर ऑर्डर वर ऑर्डर सोडत होती.

सुरुवातीला नवीन आहे म्हणून पवार मावशींनी तिला थोडं प्रेमाने समजावून पाहिलं, परंतु नंतर मात्र स्वरांगीची अरेरावी वाढू लागली..

"कामवाल्या बाईला इतकं महत्त्व देऊ नका"... "मी सुन ह्या घरची... आणि तिला कामासाठी ठेवली आहे म्हटल्यावर कामं तर सांगायला हवीच ना".. अशी उलटी उत्तरं स्वरांगीच्या तोंडून येत होती.. 

प्रेग्नेंट असल्यापासून डॉक्टरांनी स्वरांगीला संपूर्ण बेडरेस्ट घ्यायला सांगितली.. मग काय! आता तर स्वरांगीला पुढे पुढे करून घेण्यासाठी कारणच मिळालं होतं.

अशातच एक दिवस वैजयंती मावशी कपडे धुवत असताना स्वरांगिनी त्यांना ग्लासभर दूध गरम करून आणा असं सांगितलं.. आता लगेच दूध दिलं नाही तर सुनबाई रागावेल, या विचाराने वैजयंती मावशी भिजलेल्या कपड्याने उठली आणि बाथरूम बाहेर येताच तोल जाऊन मटकन खाली पडली.. कशीबशी सावरत वैजयंती मावशी दूध गरम करून घेऊन आली.

वैजयंतीचा पाय लंगडत आहे हे पाहून पवार मावशींनी तिला विचारले ,"काय गं, वैजयंती काय झालं?"...

"काही नाही वहिनी, जरा पाय घसरला".. असं म्हणत वैजयंती पुन्हा कपडे धुवायला बाथरुममध्ये जाऊ लागली...

"हे बघ स्वरांगी, तुला काही हवं असेल तर मला सांगत जा, पण वैजयंतीचं आता वय झालं आहे, तिची अशी दगदग वाढवू नको".. असं पवार मावशींनी म्हणताच स्वरांगी मात्र तावातावाने भांडू लागली.. 

तितक्यात कार्तिक आला.. सारा प्रकार ऐकून तो देखील स्वरांगीला एक दोन शब्द बोलला.

"या कोण कुठल्या मोलकरणीसाठी तुम्ही सारे मला का ओरडत आहात?" असं म्हणत स्वरांगी रागारागाने तिच्या खोलीत निघून गेली..

"वैजयंती, तू मनाला लावून घेऊ नकोस"... "तिचं हे असं वागणं हल्ली रोजचं झालंय".. "आणि तुझं देखील आता वय झालंय, त्याच्यामुळे तू काम न करता देखील मी तुला दर महिन्याचा पगार देणार आहे".. "पेन्शन समज हवं तर", असं म्हणत पवार मावशींनी वैजयंतीच्या हातात दर महिन्याचा पगार ठेवला.

"वहिनी, बिना कामाचा पगार कसा घेणार?.. मला माहित आहे, मला नाही जमत वयोमानामुळे काम, पण म्हणून तुमच्या चांगुलपणाचा मी फायदा घेणार नाही... नसेल तुम्हाला मला कामावर ठेवायचं तर मी बघेल उद्यापासून दुसरीकडे काम, पण मला फुकट पैसा नको".. असं म्हणत वैजयंतीने पाणावलेल्या डोळ्यांना अलगद पदर लावला..

"अगं, ठीक आहे माझ्याबरोबर गप्पा मारायला येत जा.. मला बरं वाटावं म्हणून तरी माझ्या घरी येशील की नाही आणि तुझा पूर्ण वेळ तू माझ्यासाठी देणार म्हटल्यावर तुला आता पगार घ्यावाच लागणार की नाही", असं म्हणत पवार मावशींनी हसून तिचे अश्रू पुसले.

वैजयंती कसंनुसं हसत वहिनींच्या पुढे हात जोडून निघून गेली... तिचं ते आहे त्या परिस्थितीत सन्मानाने जगणं कार्तिक आणि पवार मावशींना खूप काही शिकवून गेलं... कार्तिक आणि त्याची आई वैजयंतीच्या पाठमोर्‍या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहात नि:शब्द उभे होते..

दोन दिवसांनी पवार मावशींना छातीत अगदीच दुखल्यासारखं वाटू लागलं.. कार्तिक नेमकाच कामानिमित्त बाहेरगावी गेला होता.. स्वरांगी देखील डिलीव्हरीसाठी माहेरी गेली होती.

"वैजू, आज छातीत खूप दुखतय गं", असं म्हणत पवार मावशींनी कळवळून वैजयंतीला सांगितलं... क्षणाचाही विलंब न करता वैजयंती थरथरत्या पावलांनी जिना उतरत खाली आली.. 

ताबडतोब एका रिक्षावाल्याला थांबवून तिने शेजाऱ्यांच्या मदतीने पवार मावशींना रिक्षात बसवले.. जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेऊन पवार मावशींना ॲडमिट केलं.. दवाखान्यात वीस हजार रुपये भरल्याशिवाय उपचार सुरु होणार नव्हते.

 वैजयंती ने 'मी आत्ता येते', असं सांगून तडक सोनाराचे दुकान गाठलं.. स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र देऊन सोनाराकडून पैशाची व्यवस्था केली.. ते पैसे दवाखान्यात भरून पवार मावशींचे उपचार सुरू केले.

रात्रीपर्यंत कार्तिक देखील घरी परतला.
"मावशी, आज तू नसतीस तर आईचं काय झालं असतं, या विचाराने देखील जीव कासावीस होतोय गं", असं म्हणत कार्तिक वैजयंती मावशीला बिलगला... लहानपणापासून ज्या लेकराला पोटच्या पोराप्रमाणे जपलं त्याच लेकराला आजही हि वैजयंती मावशी धीर देत होती..

तितक्यात वैजयंती मावशीचा मुलगा बबन पवार मावशींसाठी लागणारी औषधं घेऊन आला..

"अरे कार्तिक, तू कधी आलास?"... "तरी तुझ्या कामात खोळंबा व्हायला नको, म्हणून मी आईला फोन करू नको असं सांगत होतो"... "आम्ही दोघं होतोच ना रे इथे".. असं म्हणत बबनने कार्तिकची चौकशी केली.

बबन आणि त्याच्या आईच्या माणुसकीमुळे कार्तिक आणखीनच गहिवरला.. जिच्यामुळे आयुष्य घडलं असं वाटत होतं तिनेच आज आयुष्यातील माणुसकीचं एक अनोखं दर्शन देखील त्याला घडवलं होतं.

स्वरांगीच्या विचित्र वागण्यामुळे इतके वर्ष जपलेलं हे नातं कदाचित तुटलं असतं, पण केवळ मावशींच्या चांगुलपणामुळे आजही ते नातं केवळ टिकून नव्हे, तर आणखी दृढ झालं याची जाणीव कार्तिकला झाली... 'कवडी कवडी जमवून कष्टाने कमवलेल्या पैशाने केलेल्या मंगळसूत्रापेक्षा आज कुणाचा तरी जीव वाचणं जास्त महत्त्वाचं आहे', हे जाणून तिने केलेल्या धावपळीनं कार्तिकच्या मनावर खोल शिकवण रुजवली गेली.

दोन-तीन आठवड्यानंतर पवार मावशींना डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांना काय हवं, काय नको हे पाहण्यासाठी एखाद्या मोठ्या बहिणीच्या नात्याने वैजयंती अंगात त्राण नसतानादेखील सारं काही मोठ्या नेटाने करत होती.

 स्वरांगी बाळाला घेऊन पुन्हा सासरी आल्यानंतरही बाळ, बाळंतीण आणि पवार मावशी या तिघांचेही करताना दमछाक झाली, तरीही माणुसकीच्या नात्याने वैजयंती मात्र सगळे कष्ट अगदी सहजरित्या सहन करत होती.. कोणाच्याही बद्दल द्वेषभावना ठेवू नये हे नकळतपणे तिथे तिच्या मोकळ्या प्रेमळ स्वभावातून स्वरांगीला देखील दाखवून दिले होते.

वैजयंती मावशीचे हे रूप दुरुन पाहणारी स्वरांगी देखील मनोमन स्वतःच्या चुकीबद्दल खजील झाली होती...

 'आपण माणूस ओळखायला चुकलो', हे जाणून ती देखील आपल्या नवऱ्याला घडवण्यात जीचा लाख मोलाचा वाटा आहे, अशा माऊलीला आता मनापासून जीव लावत होती.

मोलकरीण म्हणून कधीही न वाटलेल्या वैजयंती मावशीने केवळ कार्तिकचे आयुष्य घडवण्यातच नव्हे, तर या पवार कुटुंबाला सावरण्यात आणि पवार मावशींचे आयुष्य वाचवण्यात देखील खूप कष्ट घेतले होते.

वयाच्या सत्तरीमध्ये वैजयंती मावशीने अखेरचा श्वास घेतला.. आपलं आयुष्य घडवणारी, आईप्रमाणेच हक्काची वाटणारी, जीवाला जीव देणारी वैजयंती मावशी कायमची सोडून गेली हे दुःख मात्र कार्तिकच्या मनात सतत भरून राहिलं.. 

पण तिने दिलेल्या शिकवणी प्रमाणेच कार्तिकने देखील वैजयंती मावशीच्या बबनला आयुष्यात कधीही अंतर दिले नाही.. एकुलता एक असलेल्या कार्तिकला बबनने देखील मोठ्या भावाच्या मायेने आयुष्यभर जीव लावला.

"वाचकहो, घरात कामाला येणारी कामवाली बाई ही केवळ पैशासाठी नव्हे, तर अनेकदा भावनिक रित्या आपल्यासोबत गुंतलेली असते... अनेक घरांमध्ये अशा वर्षानुवर्ष काम करणाऱ्या या मावश्या कुटुंबाचा कधी भाग बनून जातात, हे कळतही नाही... गरीब-श्रीमंत ही दरी मोडून माणुसकीची भिंत उभारणारी अशी ही मोलकरीण नसूनही घरात हक्काचं स्थान मिळवणारी मावशी अनेकदा आयुष्य घडवण्यात मोलाचा वाटा उचलते... अशा समस्त कष्टकरी महिलांना या कथेतून मानाचा मुजरा.

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने